लोकगाथांमधून सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व भावनिक स्थित्यंतरे तर कळतातच, पण स्त्रियांच्या जगण्याची निरनिराळी रूपेही प्रतिबिंबित होतात. एखादी स्त्री लोकगीतातून स्वत:च्या भावभावना जरी मांडत असली तरी त्याचे स्वरूप विश्वात्मक ऐक्याशी जोडून टाकते, हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच एकच लोकगीत वेगवेगळ्या भाषेत आढळून येते. कधी कधी ते जागतिक ठरते. लोकगीतांद्वारा स्त्री-जीवनाचा आलेख मांडता येतो, हे फार महत्त्वाचे आहे. कारण लोकगाथा स्वाभाविक, सामूहिक आणि प्रामाणिक असतात. त्यामुळेच त्याआधारे बदलत्या परंपरा, बदलती संस्कृती आणि बदलते भावजीवन याचाही आढावा घेता येतो. तसेच पूर्वीच्या स्त्री-विश्वाचा कानोसाही घेता येतो.
लोकगाथेतील स्त्रीला शेजारणीबद्दल इतका विश्वास वाटतो की, तीच परंपरा बनते. या स्त्रिया एकमेकींना घेऊन वाटचाल करतात. स्त्रीत्वाला तोलून धरतात. त्याचबरोबर स्त्रीऋणातूनही मुक्त होतात. हे फारच महत्त्वाचे आहे.
‘‘पऱ्हाटीचे बोंड येचतो लाई लाई
आमच्या गावात हुंडय़ाची बोली नाई’’
असे ठणकावून सांगताना ही स्त्री स्वत:पुरते पाहत नाही, तर संपूर्ण गावाचा विचार करते. आपल्याबरोबर आपल्या गावातील सर्वच स्त्रियांना एक पाऊल पुढे नेते. कष्ट करून पोट भरण्याची हिंमत आणि कुवत आमच्या ठायी आहे, असे सर्वाच्या वतीने सांगताना ती सर्वच स्त्रियांना समान सूत्रात ओवते. त्यांना सख्या मानते. म्हणूनच आज नव्याने या लोकगाथेतील स्त्री-अस्मितेच्या पाऊलखुणा शोधल्या तर आजच्या स्त्रीची पाऊलवाट ठरतील, असे वाटल्यावरून ‘पारंपरिक स्त्री गाथा’ लिहिण्यास सुरुवात केली आणि त्यानिमित्ताने अनेक लोकसाहित्याचा अनमोल ठेवा हाती लागला. लेखिका पुस्तक प्रकाशन प्रकल्पाने तो प्रकाशित केला आहे. आजच्या भांबावलेल्या स्त्रीला घरातील मायेच्या आजीगत त्या धीर देतीलच, पण त्याच वेळी नव्या वाटेवर चालताना बळही देतील. त्यामुळेच आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या व काळाच्या दृष्टीने उपयोगी असणाऱ्या कोनातून नव्याने विचार या पुस्तकातून केला आहे. हा खरा तर कस्तुरीमृगाचा शोध आहे. आपल्याच सुवासाची कुपी आपल्याच जवळ असताना आपण मात्र कसला शोध चालू केला आहे? तेव्हा या कुपीलाच हस्तगत करण्याचा हा उद्योग आहे. सैरभैर मन त्यामुळेच नक्कीच ताळ्यावर येईल, सावरेल हा विश्वास आहे. तेच या पुस्तकात केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा