’सखेसोयरे’ हा माझा पहिला ललित व्यक्तिचित्रांचा संग्रह. गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांत कळत नकळत कित्येक व्यक्तींनी मनात स्थान निर्माण केले, मनावर खोल संस्कार केले अशा अकरा लेखांचा हा संग्रह म्हणजे ‘सखेसोयरे’.
आज आपण जसे आहोत तसे घडवण्यात किती जणांचा, कसा वाटा आहे, त्यांचे किती ऋण आहे हे सर्व लेख पुस्तकरूपाने एकत्रित आल्यावरच माझे मला अधिक उमगले. आपल्या संस्कारित जगण्याचा एक आकृतिबंध त्यातून साकार होत आहे, हे जाणवले. यातील काही लेख लिहिताना मनातल्या घालमेलीला वाट करून देणं हा उद्देश होता (उदा. माझी अकाली कालवश झालेली शेजारीण सुप्रिया), तर काही व्यक्तिचित्रांना एखादी बातमी निमित्त होते. (उदा. लालन सारंग नाटय़संमेलनाच्या अध्यक्ष होणं.)
ही व्यक्तिचित्रं रूढ अर्थानं त्या व्यक्तीचं बाह्य़रूप चितारणारी नाहीत, तर माझ्या मनावरच्या त्या संस्कारमुद्रा आहेत. म्हणूनच रा. भि. जोशी, सुधाताई जोशी, डॉ. सरोजिनी वैद्य जसे माझ्या आयुष्याचा भाग बनून गेले, तसाच माझ्या मुंबईचा एक रस्ताही माझ्या मनात ठाण मांडून बसला. स्वत: न हलता इतरांचं जीवन प्रवाहित करणारा हा रस्ता माझा किती ‘सोयरा’ बनलाय हे तो माझ्याशी एक दिवस बोलायलाच लागल्यावर मला नव्यानं कळलं.
एखादं माणूस आपण प्रत्यक्ष न पाहताही आपलंसं होतं. वेणू चितळे या त्यापैकी एक. माझी आणि त्यांची गाठभेट कधी झालीच नाही, पण त्यांच्या कर्तृत्वानं झपाटून जाऊन मी त्यांचा शोध घेतला. दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत बीबीसीवरून बातम्या देणारी, इंग्रजीत अस्सल मराठी जीवनावर कादंबरी लिहिणारी, मुल्कराज आनंदांची ही समकालीन. त्यांचं लेखन, त्यांचे आप्तस्वकीय त्या जिथे जिथे राहिल्या ती घरं यांचा शोध घेता घेता मी त्यात इतकी गुंतले की वेणुताई मला ‘माझ्या’ वाटू लागल्या, त्यांच्या अक्षरातून माझ्याशी बोलू लागल्या. त्यातून साकार झाला दीर्घ लेख ‘एक होती वेणू’.
आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जाण ज्यांनी मला दिली ते माझे वडील नी. य. काळे. तीन मुलींचे पितृत्व त्यांनी अतिशय डोळसपणानं पेललं. संस्कारांचा, विचारांचा वारसा दिला. सामान्यातलं असामान्यत्व म्हणजे काय, हे मला मोठय़ा वयात जाणवलं.
या सर्व लेखनाची सुरुवात काहीशी अनपेक्षितपणे झाली. पुण्यातली माझी नवविवाहित शेजारीण सुप्रिया हिनं अगदी थोडय़ा अवधीत जीव लावला आणि दुर्दैवानं आकस्मिकपणे ती कायमची दुरावली. तेव्हा तिच्याशी काल्पनिक संवाद साधत ते नातं जागतं ठेवायचा मी या लेखातून प्रयत्न केला. या पुस्तकातील अकरा लेखांपैकी सहा लेख महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा वयाच्या स्वभावधर्माच्या पण मनस्वी स्त्रियांवर आहेत. सुप्रियाचा अपवाद वगळता, सरोजिनी वैद्य काय, लालन सारंग काय, विजया मुळे काय, वेणू चितळे किंवा सुधाताई जोशी काय, या सगळय़ा स्त्रिया स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या विलक्षण तेज अंगी असलेल्या व स्व-भान असलेल्या स्त्रिया आहेत. विशेषत: विजया मुळे आणि (कै.) वेणू चितळे यांच्या कर्तृत्वाचा परिचय या लेखांच्या रूपानं प्रथमच ग्रथित झाला आहे. ‘कॉन्टिनेन्टल’ने तो प्रकाशित केला आहे. या वेगवेगळय़ा व्यक्तींशी असलेल्या भावबंधांनुसार, संवेदनांनुसार या लेखांमध्ये वेगवेगळय़ा शैली वापरल्या गेल्या. उदा. ‘सुप्रिया’ हा पूर्ण एकतर्फी संवादच आहे, तर माझ्या वडलांच्या व्यक्तिचित्राचा शेवट माझ्या मुलीनं लिहिलेल्या त्यांच्यावरील उताऱ्यानं केला आहे, कारण त्यांच्या वारशाची ती धनी आहे, तो एक वाढता वसा आहे.
या व्यक्तींवर लिहिता लिहिता नजीकच्या, गेल्या अर्धशतकातल्या मुंबई-पुण्याच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणाचा ‘अंदाज’ पुस्तकातून व्यक्त होतो. अवतीभवतीच्या जीवनाशी जे भावपूर्ण संबंध आपण जगतो, त्यांचे ताणेबाणे एकमेकांमध्ये गुंतल्यामुळे एक पट उलगडतो. तो पट मर्यादित असेल, विशिष्ट काळातला असेल, पण तो एक जिवंत चैतन्यमय असा भाव इतिहास असतो.
डॉ. विजया देव
vijayadeo@yahoo.com
कादंबरी स्मशानवासिनीची
स्मशानात चौकीदारी करणाऱ्या, एका स्त्रीच्या जगण्याचा आपल्या कुटुंबाला जगवण्याच्या जिद्दीचा धडाधडीचा आलेख म्हणजे ‘अनन्तयात्रा’ ही कादंबरी. ही कादंबरी पूर्णपणे सत्यावर आधारित असली तरी कल्पनेचा आधारही घेतलेला आहे. मी मूळची नागपूरची. तिथे राहात असताना मी रत्नाबाईला भेटले.
नागपूर शहरात अंबाझरी नावाचं स्मशान आहे. या स्मशानात एक बाई सरण रचण्यापासून तर रक्षा गोळा करण्यासाठी आलेल्या लोकांना मदत करण्यापर्यंत सगळं काही करते, असं तिथे जाऊन आलेल्या बऱ्याच लोकांनी मला सांगितलं. माणसाच्या वस्तीकडे पाठ फिरवून या बाईनं थेट स्मशानात आपला प्रपंच का मांडला असेल, मूलबाळ घेऊन अशा जागी ती का राहते? तिची नेमकी काय मजबुरी असेल? जिवंत माणसांच्या जगात आणि जिथे जगणं संपलेल्या माणसाच्या देहाची राख होते अशा जागेत राहताना तिला काय अन् कसे अनुभव आले असतील? या विचारांनी मी अस्वस्थ झाले. बायका स्मशानात जात नाही म्हणतात, पण मला त्या बाईंना भेटून त्यांचं जगणं, त्यातले खाचखळगे समजून घ्यायचे होते. त्या बाईंना स्मशानात भेटले. त्या मोकळेपणानं बोलल्या. मी रत्नाबाईंना विचारलं, गजबजलेली वस्ती सोडून तुम्ही या स्मशानात का राहता? मुलांना घेऊन इथे राहताना तुम्हाला भीती नाही वाटत? त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं त्यानं माझा मेंदू सुन्न झाला. त्या म्हणाल्या होत्या, ‘जित्या जागत्या माणसांनी माझं जगणं मुश्कील केलं होतं, म्हणून मी माझं चार वर्षांचं लेकरू घेऊन मेलेल्या माणसांच्या या दुनियेत आले. बाहेरच्या जगातली माणसं मला जिवंतपणी सरणावर लोटायला निघाली होती, इथं मला कशाचीच भीती वाटत नाही, माणसाला सगळय़ात जास्त भीती मरणाची वाटते, इथं रोजचंच मरण पाहून माझी मरणाची भीती बोथट झाली. स्मशानात भुताचा वावर असतो असं म्हणणारे म्हणू देत, मला इथे आल्यापासून कधीही भूत दिसलं नाही की माझ्या नवऱ्याला, मुलांना, सुनेला तसा भासही झाला नाही. भूतबीत सारं आपल्या मनात असते, बाकी काही नाही,’ शांत स्वरात ती जे बोलून गेली, माणसाच्या जगण्यामरण्याचं सार सांगून गेली.
चाळिशीच्या घरातली रत्नाबाई, तिचा एका पायानं अधू असलेला नवरा. तिचा मुलगा. मुलाचं लग्न तिथेच झालं. मी तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा तिची सून दोन महिन्यांची बाळंतीण होती. बाळ-बाळंतीण अगदी छान सुदृढ होती. रत्नाबाईचा मुलगा चार वर्षांचा असताना रत्नाबाई स्मशानात राहायला आली होती, रत्नाबाईला मी नंतर अनेक वेळा भेटले. तिच्या जीवनाचा पट हळूहळू तिच्या बोलण्यातून माझ्यापुढे उलगडत गेला. तो मी या कादंबरीतून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बाई शरीरानं भलेही नाजूक असेल, पण मनानं ती भक्कम असते. खंबीर असते. कुठलाही प्रसंग आला तरी ती मागे हटत नाही, तर प्रसंगाशी दोन हात करण्याची तिची तयारी असते, यातलं तथ्य आणि सत्य रत्नाबाईला भेटले. तिच्या वाटय़ाला आलेले अनुभव ऐकताना सावळय़ा अंगाबांध्यानं नाजूक चणीच्या रत्नाबाईचा कणखरपणा पाहताना नव्यानं जाणवलं.
स्मशानात अंत्ययात्रेबरोबर येणारे लोक, त्यांचं वागणं-बोलणं, त्यांच्या काही नजरांमधलं कुतूहल, काही नजरांमधला रत्नाबाईंकडे पाहताना उमटणारा वासनेचा जाळ, तटस्थपण पाहणारी, नजरेत जरब असलेली रत्नाबाई, मोकळेपणानं आपले अनुभव सांगत गेली. एक सरण रचायला किती मण लाकडं लागतात, रॉकेल किती लागतं, स्मशानाचा पास कसा काढतात, ही आणि अशी बरीच माहिती त्यांनी दिली. स्मशानात चौकीदारी करणाऱ्या रत्नाबाईच्या जीवनावर ही कादंबरी लिहिलेली असली तरी या कादंबरीतील काही घटना, पात्र, नाव काल्पनिक आहेत. कादंबरीतील नायिका गुंजा, एका पायानं अधू असलेला तिचा नवरा जगन त्याला असं स्मशानात राहायला सरणा-मरणाची कामं करायला अजिबातच आवडत नाही. पण गुंजा स्मशानात राहून पडेल ते काम करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. तिला तिच्या मुलांना खूप शिकवायचं आहे. त्यांनी खूप शिकावं, कर्तबगार व्हावं. समाजात त्यांना मानाचं स्थान मिळावं त्यासाठी ती जिवाचं रान करते आहे. आपला प्रपंच ती स्मशानात थाटते. मनाविरुद्ध तिथं यावं लागल्यानं नाराज आसलेला जगन असहकाराचं धोरण स्वीकारतो, तेव्हा गुंजा ठेकेदाराकडून सरण रचण्यापासून सगळी काम शिकते अन् पुढे होऊन करते. अनेक घटना, प्रसंगांतून, उपकथानकांमधून गुंजाचा जीवनपट कादंबरीत उलगडला जातो. सोलापूरच्या ‘नंदादीप’ प्रकाशनाने ही कादंबरी प्रसिद्ध केली. वाचकांचा या कादंबरीला चांगला प्रतिसाद लाभला. एका स्मशानवासिनीच्या हिमतीनं,कणखरपणानं मला झपाटून टाकलं अन् अनंतयात्रा त्या झपाटलेपणातून अस्वस्थतेतून लिहिली गेली.
ज्योती पुजारी
chaturang@expressindia.com
परीक्षेची भीती घालवण्यासाठी
माझी मुलं वाढवताना आणि शाळेत मुलांबरोबर काम करताना ‘मुलं’ माझ्या आयुष्याचा भाग बनून गेली. मुलांना जे जे उपयुक्त ते ते जिथून मिळेल तेथून मिळवण्याची धडपड सुरू झाली. मिळालेलं मुलांपर्यंत पोचवताना मुलं मला वाचता येऊ लागली.
जसा काळ पुढे सरकत होता तसं मला तीव्रतेनं वाटू लागलं की ‘स्वत:चा अभ्यास स्वत:च करायचा असतो’ हे मुलांना सांगण्याची गरज निर्माण होत आहे. कमी वेळात जास्तीत जास्त परिणामकारक अभ्यास करता येणं ही स्पर्धेत राहण्यासाठीची गरज आहे.
मात्र, मुलांनी भरपूर अभ्यास करावा आणि ढीगभर मार्क मिळवावेत यासाठी जे मार्ग अवलंबले जात आहेत त्यानं मुलांची अभ्यासातली गोडी कमी होत आहे. परीक्षा या शब्दानंच त्यांना धडकी भरते आणि सर्वागीण विकासापासून ती कोसो मैल दूर राहतात. या विचारानं अस्वस्थता वाढत गेली. आसपासच्यांचा आग्रह वाढत गेला आणि अभ्यासाचा अभ्यास सहजपणे कसा करावा हे सांगणारं ‘परीक्षेची भीती कशाला’ हे पुस्तक लिहिण्याचं निश्चित केलं.
माणूस कसा शिकतो यावर अगदी पुरातन काळापासून आजपर्यंत संशोधन सुरू आहे आणि भविष्यातही सुरू राहील. गरज आहे, या साऱ्या संशोधनाचे निष्कर्ष जाणून घेऊन त्यांचं उपयोजन करण्याची. मी तेच करण्याचा प्रयत्न प्रत्यक्षात करत आले आणि आज पुस्तकरूपाने तो ‘ग्रंथाली’च्या सहकार्यामुळे सर्वापर्यत आणता आला आहे. अभ्यासनीती, पाठांतर, मनन-चिंतन, एकाग्रता, वेळेचे नियोजन, उजळणी अशी अभ्यास तंत्रे- ‘मुलांनो अभ्यास करा’ असं केवळ न सांगता ही तंत्र विकसित कशी करावी, केव्हा, कुठे, कशी वापरावी हे मुलांना शिकवण्याची गरज आहे. आज असं लक्षात येतं की मुलं अभ्यासात मागे पडतात, कारण त्यासाठी लागणारी श्रवण, निरीक्षण, संभाषण, वाचन, लेखन ही मूळ कौशल्येच विकसित झालेली नसतात. खरं तर कोणत्याही वयात ही कौशल्ये निर्धाराने विकसित करता येतात. ही कौशल्य पुरेशी विकसित असतील तर अभ्यासाचं ओझं वाटत नाही. शाळा-महाविद्यालयातला अभ्यास सहजसाध्य होतोच, त्यासाठी काय करावं लागतं हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
माझं दुसरं पुस्तक आहे,‘ जॅक ऑफ ऑल’. मुलं लहान असतात तेव्हा अमाप उत्साह, चैतन्यानं सळसळत असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत कुतूहल असतं. प्रत्येक गोष्ट बघायची असते, ऐकायची असते आणि करूनही बघायची असते. बरोबर-चूक, यश-अपयश अशा कल्पना त्याच्या मनात फिरकत नसतात. कसलीच भीती वाटत नसते. कोडी सोडवणं असो, बैठे वा मैदानी खेळ खेळणं असो, रांगोळी काढण असो वा किल्ला बनवणं. या आणि यासारख्या असंख्य गोष्टी त्याला शिकवत असतात. मोठं-शहाणं करत असतात. त्यांच्या अनेक क्षमता विकसित करीत असतात.
या साऱ्यांचा फायदा त्याला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर होत असतो. आपली मुलं मोठी होईपर्यंत असंख्य प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध असतील. अनेक नवे व्यवसाय, उद्योगपतीची दार खुली असतील न जाणो त्याच्या स्वत:च्या क्षमतांच्या आधारे तो स्वत:च वेगळं विश्व निर्माण करण्याची स्वप्न बघेल. त्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी झटेल. ही जिद्द, क्षमता पेरावी लागते या वयात.
त्यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. खूप वेळ द्यावा लागतो, मेहनत घ्यावी लागते असही नाही. असावी लागते इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती. असंख्य साधनं आपल्या भोवती विखुरलेली असतात. जसं की निसर्ग, घरातल्या वस्तू, वृत्तपत्र, मासिकं, जाहिरातींचे कागद, मणी, दोरे, रंग, सुखी पानं, जुनी-नवी कॅलेंडर्स. फक्तत्यांचा वापर कसा करावा हे आपल्याला सुचायला हवं. त्या वापरांचे नियम नसतात. त्यावर र्निबध नसतात. आपल्या सोईनुसार, गरजेनुसार आपण त्याचा वापर करू शकतो. पण काही वेळा मोठय़ांनाच लहानपणी अशी संधी मिळालेली नसते, मग त्यांना सुचणं कठीण जातं. या पुस्तकात अनेक गोष्टींचा खजिना आहे.
अशा साऱ्या गोष्टींसाठी जॅक ऑफ ऑल पुस्तक मदत करेल. प्रथम ते चाळा. ‘‘खुल जा सिम सिम’ म्हटल्यावर उघडणाऱ्या खजिन्याप्रमाणे तुम्हाला अनेक गोष्टी सापडतील.
अनुराधा गोरे
chaturang@expressindia.com