आज आपण जसे आहोत तसे घडवण्यात किती जणांचा, कसा वाटा आहे, त्यांचे किती ऋण आहे हे सर्व लेख पुस्तकरूपाने एकत्रित आल्यावरच माझे मला अधिक उमगले. आपल्या संस्कारित जगण्याचा एक आकृतिबंध त्यातून साकार होत आहे, हे जाणवले. यातील काही लेख लिहिताना मनातल्या घालमेलीला वाट करून देणं हा उद्देश होता (उदा. माझी अकाली कालवश झालेली शेजारीण सुप्रिया), तर काही व्यक्तिचित्रांना एखादी बातमी निमित्त होते. (उदा. लालन सारंग नाटय़संमेलनाच्या अध्यक्ष होणं.)
ही व्यक्तिचित्रं रूढ अर्थानं त्या व्यक्तीचं बाह्य़रूप चितारणारी नाहीत, तर माझ्या मनावरच्या त्या संस्कारमुद्रा आहेत. म्हणूनच रा. भि. जोशी, सुधाताई जोशी, डॉ. सरोजिनी वैद्य जसे माझ्या आयुष्याचा भाग बनून गेले, तसाच माझ्या मुंबईचा एक रस्ताही माझ्या मनात ठाण मांडून बसला. स्वत: न हलता इतरांचं जीवन प्रवाहित करणारा हा रस्ता माझा किती ‘सोयरा’ बनलाय हे तो माझ्याशी एक दिवस बोलायलाच लागल्यावर मला नव्यानं कळलं.
एखादं माणूस आपण प्रत्यक्ष न पाहताही आपलंसं होतं. वेणू चितळे या त्यापैकी एक. माझी आणि त्यांची गाठभेट कधी झालीच नाही, पण त्यांच्या कर्तृत्वानं झपाटून जाऊन मी त्यांचा शोध घेतला. दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत बीबीसीवरून बातम्या देणारी, इंग्रजीत अस्सल मराठी जीवनावर कादंबरी लिहिणारी, मुल्कराज आनंदांची ही समकालीन. त्यांचं लेखन, त्यांचे आप्तस्वकीय त्या जिथे जिथे राहिल्या ती घरं यांचा शोध घेता घेता मी त्यात इतकी गुंतले की वेणुताई मला ‘माझ्या’ वाटू लागल्या, त्यांच्या अक्षरातून माझ्याशी बोलू लागल्या. त्यातून साकार झाला दीर्घ लेख ‘एक होती वेणू’.
आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जाण ज्यांनी मला दिली ते माझे वडील नी. य. काळे. तीन मुलींचे पितृत्व त्यांनी अतिशय डोळसपणानं पेललं. संस्कारांचा, विचारांचा वारसा दिला. सामान्यातलं असामान्यत्व म्हणजे काय, हे मला मोठय़ा वयात जाणवलं.
या सर्व लेखनाची सुरुवात काहीशी अनपेक्षितपणे झाली. पुण्यातली माझी नवविवाहित शेजारीण सुप्रिया हिनं अगदी थोडय़ा अवधीत जीव लावला आणि दुर्दैवानं आकस्मिकपणे ती कायमची दुरावली. तेव्हा तिच्याशी काल्पनिक संवाद साधत ते नातं जागतं ठेवायचा मी या लेखातून प्रयत्न केला. या पुस्तकातील अकरा लेखांपैकी सहा लेख महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा वयाच्या स्वभावधर्माच्या पण मनस्वी स्त्रियांवर आहेत. सुप्रियाचा अपवाद वगळता, सरोजिनी वैद्य काय, लालन सारंग काय, विजया मुळे काय, वेणू चितळे किंवा सुधाताई जोशी काय, या सगळय़ा स्त्रिया स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या विलक्षण तेज अंगी असलेल्या व स्व-भान असलेल्या स्त्रिया आहेत. विशेषत: विजया मुळे आणि (कै.) वेणू चितळे यांच्या कर्तृत्वाचा परिचय या लेखांच्या रूपानं प्रथमच ग्रथित झाला आहे. ‘कॉन्टिनेन्टल’ने तो प्रकाशित केला आहे. या वेगवेगळय़ा व्यक्तींशी असलेल्या भावबंधांनुसार, संवेदनांनुसार या लेखांमध्ये वेगवेगळय़ा शैली वापरल्या गेल्या. उदा. ‘सुप्रिया’ हा पूर्ण एकतर्फी संवादच आहे, तर माझ्या वडलांच्या व्यक्तिचित्राचा शेवट माझ्या मुलीनं लिहिलेल्या त्यांच्यावरील उताऱ्यानं केला आहे, कारण त्यांच्या वारशाची ती धनी आहे, तो एक वाढता वसा आहे.
या व्यक्तींवर लिहिता लिहिता नजीकच्या, गेल्या अर्धशतकातल्या मुंबई-पुण्याच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणाचा ‘अंदाज’ पुस्तकातून व्यक्त होतो. अवतीभवतीच्या जीवनाशी जे भावपूर्ण संबंध आपण जगतो, त्यांचे ताणेबाणे एकमेकांमध्ये गुंतल्यामुळे एक पट उलगडतो. तो पट मर्यादित असेल, विशिष्ट काळातला असेल, पण तो एक जिवंत चैतन्यमय असा भाव इतिहास असतो.
डॉ. विजया देव
vijayadeo@yahoo.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा