बालपणात घडलेल्या काही घटनांमुळे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यातून आलेल्या एकाकीपणामुळे धोकादायक वर्तन एखाद्या रुग्णाकडून केलं जाऊ शकतं. गाडी सुसाट चालवत कुठे तरी निघून जाणं, प्रमाणाबाहेर शॉपिंग करणं, घरात तोडफोड करणं, रात्री बेरात्री सुनसान रस्त्यावर एकट्यानं फिरणं अशी लक्षणं असलेल्या आणि युवा वर्गामध्ये बरीच चर्चा असलेल्या ‘बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ या व्यक्तिमत्त्व विकाराविषयी…

ज्याप्रमाणे ‘डिप्रेशन अँझायटी’ (Depression Anxiety) या मानसिक आजारांबद्दल समाजात बरंच बोललं जातं. त्याचप्रमाणं व्यक्तिमत्त्व विकारांमधील ‘बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर’(बीपीडी) याबद्दलही युवा वर्गामध्ये बरीच चर्चा असते. चर्चा असते म्हणण्यापेक्षा ते भांडण झाल्यावर, शिव्या दिल्यासारखं चिडून, ‘ये तेरेको ‘बीपीडी’ है क्या?’ असं बोलताना दिसतात. मध्यमवर्गीय लोकांमध्ये कमी आणि ‘जेन झी’मध्ये जास्त चर्चिला जाणारा हा ‘बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ आहे काय?

newly married girl loksatta article
इतिश्री : वैचारिक सीमोल्लंघन
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
people with personality disorder
स्वभाव, विभाव : खुदी से इश्क किया रे…
sandha badaltana manprasthashram
सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम
Loksatta chaturang article about friendship
सांदीत सापडलेले…! मैत्री
mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : सच्ची साथसोबत
world mental health day chaturang article
ऐकावे मनाचे… करावे मनाचेच…
chaturang article
‘भय’भूती: मम भय कोण वारिते?

आत्तापर्यंत पाहिलेल्या ‘क्लस्टर बी’मधील हा तिसरा व्यक्तिमत्त्व विकार आहे. सर्वात किचकट, आप्तस्वकीयांना सांभाळायला अवघड आणि त्रासदायक असलेला बीपीडी हा आव्हानात्मक व्यक्तिमत्त्व विकार आहे. ‘बॉर्डरलाइन’ म्हणजे कशाची तरी सीमारेषा. ही सीमारेषा असते ‘न्यूरोसिस’आणि ‘सायकोसिस’ची. ‘न्यूरोसिस’मध्ये अतार्किक भीती, चिंता ही लक्षणं बघायला मिळतात, पण वास्तवामध्ये त्यांची भीती किंवा चिंता अतार्किक आहे हे त्यांना माहीत असतं. त्याउलट ‘सायकोसिस’मध्ये भ्रम-विभ्रम दिसून येतात आणि त्यांना जे भास होत आहेत ते खरे नाहीयेत हे त्यांना मान्य नसतं म्हणजेच वास्तवापासून ते दूर असतात. आता या व्यक्तिमत्त्व विकारातील रुग्ण हे कधी ‘न्यूरोसिस’म्हणजे चिंता, भीती या लक्षणांना सामोरे जातात, तर कधी संशयामुळे भ्रम-विभ्रमांना बळी पडतात. त्यांच्यामध्ये दोन्ही प्रकारची लक्षणं दिसतात. त्यामुळे या विकाराला ‘बॉर्डरलाइन’असं नाव दिलेलं आहे.

हे ही वाचा…माझी मैत्रीण : ‘आम्ही मैत्रीवर प्रेम करतो’

आपण प्रियाच्या प्रकरणाने हा विकार समजावून घेऊ या. प्रियाचं वयाच्या २२व्या वर्षी ‘बीपीडी’चं निदान झालं असलं, तरी तिच्यात किशोरावस्थेपासूनच काही लक्षणे दिसत होती. प्रिया तिच्या आजोळी सगळ्यांचीच खूप लाडकी होती. सुट्टी लागली रे लागली की हिची बॅग भरून आजीकडे जायची तयारी झालीच म्हणून समजा. अशीच एकदा ती आजीकडे गेली असता घरात मामा आणि प्रिया दोघंच होते. त्यावेळी ती साधारण १२-१३ वर्षांची असेल. मामाने आधी टीव्हीवर काहीतरी अश्लील गाणं लावून ठेवलं आणि मग तिच्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. तितक्यात आजोबांच्या गाडीचा आवाज आला आणि ती वाचली. शारीरिकदृष्ट्या वाचली तरी मनावर चरा उमटलाच. पुढे पंधराव्या वर्षी तिच्या सगळ्यात आवडत्या गणिताच्या सरांनी सहलीच्या वेळी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तिने आई-बाबांना सांगायचा प्रयत्न केला पण ‘तू जरा सांभाळून राहत जा. एकटी फिरत जाऊ नकोस.’ यापलीकडे त्यांनी या प्रकरणात काहीच केलं नाही. या घटनांनंतर प्रियाला आपण कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही का? ‘आपले आई-बाबाही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाही तर मग माझं असं कोण आहे?’हा प्रश्न उभा राहिला. वयाच्या बरोबरीनं या प्रश्नाचं गांभीर्यही वाढलं. एक प्रकारची पोकळी (emptiness) तिच्या मनात तयार झाली आणि इथूनच पुढे ती आयुष्यात कायम ही पोकळी भरून काढायचा प्रयत्न करत राहिली.

या व्यक्तिमत्त्व प्रकारातील सर्वांत प्रमुख लक्षण असतं ते म्हणजे त्यांच्या तीव्र भावना आणि सारखे बदलत राहणारे मूड. अशा तीव्र भावना रुग्णाच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला खूप त्रासदायक असतात. पण त्यामागचे कारण असते त्यांची असुरक्षितता. प्रियाच्या आयुष्यातील पोकळी भरून काढणारा ‘तो’ तिच्या आयुष्यात आला आणि प्रिया हरखून गेली. पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना तिला वर्गातला सर्वात देखणा आशीष आवडायला लागला. आशीषनेही तिची दखल घेतली होतीच, कारण दिसायला तीही सुंदरच होती. आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत एक पोकळी होती आणि आता ती पोकळी भरून निघाली असं तिला वाटायला सुरुवात झाली. ती चार दिवसांच्या आत आशीषवर जिवापाड प्रेम करायला लागली. ती रात्रंदिवस त्याच्याच विचारत असायची. एके दिवशी तिने आशीषला लग्नाविषयी विचारलं आणि त्यानेही फार पुढचा विचार केला नाही आणि होकार दिला.

ती आशीषवर खूप खर्च करायची. त्याच्यासाठी अभ्यासाच्या नोट्स काढायची. त्याच्यासाठी खायला करून आणायची. थोडक्यात, ती त्याच्यावर जीव ओवाळून टाकायची. मात्र मनात सतत एक असुरक्षिततेची भावना होती. ‘‘याला कोणी दुसरी मुलगी आवडली तर? हा मला सोडून गेला तर?’’याला कारणही तसंच होतं. आशीष सततच मुलींच्या गराड्यात असायचा. आशीषशी कोणतीही मुलगी बोललेली तिला अजिबात खपायचं नाही. ही असुरक्षितता मनात डोकावली की त्यांच्या भेटीचा पूर्ण वेळ ‘‘तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे का?’’, असं विचारत भांडणानेच संपवायचा. ‘‘तू माझ्या मेसेजला उत्तर दिलं नाहीस, तू दहा मिनिटं उशिरा आलास तेव्हा कोणाबरोबर होतास?’’असे आरोप आशीषसाठी नवीन नव्हते. तिचं प्रेम त्याला माहीत असल्याने तो तिला स्पष्टीकरण देत बसायचा. पण हळूहळू त्याला हे सगळं खूप त्रासदायक वाटायला लागलं आणि शेवटी त्याने ते नातं तोडून टाकलं. प्रियाच्या मनाला ही गोष्ट खूप लागली, पण परत ते एकटं राहणं, परत ती पोकळी सहन करणं ही तिच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. तिची तिच्या शेजारी नव्याने राहायला आलेल्या कियाशी मैत्री झाली. या व्यक्तिमत्त्व विकाराच्या लोकांची मैत्री होतेही पटकन. आई-बाबांनी त्यांच्या खूप वेळ एकत्र घालवण्यावर कधी आक्षेप घेतला नाही. तिने कियाला आपल्या आयुष्याची सगळी कथा सांगितली. तिच्याकडून खूप सहानुभूती मिळवली. पण कियाच्या मैत्रिणींवर मात्र तिचा जाम राग होता. किया कोणाही मैत्रिणीबरोबर गेली की तिचं बिनसायचं. परत तीच असुरक्षितता, ‘‘ही मला सोडून गेली तर?’’ आशीष किंवा किया दोघांच्याही बाबतीत एक गोष्ट समान होती. ती म्हणजे त्यांना तिच्याबरोबरच्या नातेसंबंधांमुळे घुसमटून जायला व्हायचं. सतत तिच्याभोवती फिरत राहाणं, त्यांना नकोसं होऊन जायचं. त्यांना स्वत:चा असा थोडा वेळ हवा असायचा. सतत आश्वासनं, स्पष्टीकरणं देऊन जीव नकोसा झाला की या रुग्णांचे साथीदार त्यांच्याशी नातं तोडून टाकतात.

हे ही वाचा…जिंकावे नि जगावेही: विचारांची सदाबहार फुलबाग

या व्यक्तिमत्त्व विकाराचं आणखी एक लक्षण म्हणजे समोरच्या माणसाला काळ्या, पांढऱ्या रंगात बघायचं. एके दिवशी तुम्ही खूप आदर्श असता तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या दृष्टीने तुम्ही जगातली सर्वात वाईट व्यक्ती असता. टाळेबंदीच्या काळात माझ्याकडे नीलिमा ही २५ वर्षांची, आयटी क्षेत्रातली, बीपीडी निदान झालेली तरुणी समुपदेशनासाठी आली होती. मी तिची पाचवी थेरपिस्ट होते. ती प्रत्येक सत्रामध्ये आधीच्या थेरपिस्ट कशा चांगल्या नव्हत्या, त्यांनी तिला कसं फसवलं हे सांगत राहायची आणि अर्थातच मी किती चांगली आहे, तिला माझ्याकडून कशी योग्य मदत मिळतीये हे कधी कधी विनाकारण सांगत राहायची. एके रात्री तीन वाजता तिच्या मनात आत्महत्येचे विचार सुरू झाले. ती खूप अस्वस्थ होऊन मला कॉल करत होती, पण नेमकी त्याच वेळी मी प्रवासात असल्यामुळे तिचा कॉल घेऊ शकले नाही. तेव्हा तिने मला भला मोठा मेसेज करून मी पण तिला कसं फसवलंय आणि यापुढे तिला माझ्याशी असलेलं ‘थेरपिस्ट-रुग्ण’ हे नातं तोडायचं आहे, हे सांगून टाकलं. ही काळ्या-पांढऱ्या रंगात बघण्याची बाब त्यांचे पालक, मित्र, डॉक्टर, शिक्षक, विशेषत: जोडीदारांबरोबर कोणाबरोबरही होऊ शकते. (यातून थेरपिस्टही सुटत नाहीत.) हे करताना आक्रस्ताळेपणा, शिव्या देणं ही वागणूकही बघायला मिळते.

असं नातं तुटलं की, ते प्रचंड अस्वस्थ होतात. त्या अस्वस्थतेतून ते अविचारीपणाचं वर्तन करतात. जसं की, गाडी घेऊन सुसाट चालवत कुठेतरी निघून जाणार, प्रमाणाबाहेर क्रेडिट कार्ड स्वाइप करून शॉपिंग करत राहणार, घरात तोडफोड करणार, रात्री-बेरात्री सुनसान रस्त्यावर एकट्यानं फिरणं, असं सगळं धोकादायक वर्तन ते करतात. आपल्याला कोणीतरी धोका दिला आहे, आपण एकट्या आहोत. आता आपलं कोणीच नाहीये, या विचाराने ते दु:ख विसरायला असे रुग्ण ड्रग आणि दारू यांचा आधार घेतात. त्यामुळे या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्तींमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाणही जास्त आढळते. आपल्या जोडीदाराने आपल्याला धोका दिलाय याचा बदला घ्यायच्या नादात ते कोणाशीही असुरक्षित शारीरिक संबंध ठेवायला तयार होतात. यांचं आणखी एक लक्षण म्हणजे स्वत:ला इजा पोहोचवणं. जसं त्यांच्या लक्षात येतं की, आपला जोडीदार आपल्या वागण्याला, संशयाला कंटाळून सोडून चाललाय तसं ते जोडीदाराला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्यासाठी आत्महत्येचे प्रयत्न करतात. विशेषत: हाताची नस कापून घेणं ही सगळ्यात जास्त पाहायला मिळणारी कृती. त्यांना खरं तर मरायचं नसतं, पण समोरच्याला ब्लॅकमेल करण्यासाठी ते स्वत:ला इजा पोहोचवतात. बघणाऱ्याला हे नाटक वाटतं, पण हे खरं पाहता या आजाराचे लक्षण आहे. अशा प्रकारे उद्विग्नतेतून स्वत:ला इजा करून घेतल्यावर त्यांना एक प्रकारे समाधान मिळतं. या प्रकाराला ‘प्यारासुसाइड’ (Parasuicide) असं म्हणतात.

आपल्याला जे पाहिजे असेल ते मिळवण्यासाठी या व्यक्तिमत्त्व विकाराचे रुग्ण ‘प्यारासुसाइड’ करताना दिसतात. असं करताना त्यांनी पुरेशी काळजी घेतलेली असते की त्यांना काही इजा होणार नाही. या व्यक्तिमत्त्व विकाराच्या रुग्णांची स्वप्रतिमा खूप डळमळीत असते. त्यांना काहीही करत असताना त्यात समाधान मिळणं किंवा पूर्णत्वाची भावना येत नाही. कोणीतरी येऊन त्यांना पूर्णत्व द्यावं, पोकळी भरून काढावी, असं सारखंच वाटत राहतं आणि म्हणूनच ते त्यांच्या जोडीदाराला खूप घट्ट पकडून ठेवायचा प्रयत्न करतात.

हे ही वाचा…स्त्री-शोषणाचा जातपंचायतीचा विळखा

‘बॉर्डरलाइन व्यक्तिमत्त्व’ विकार हा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो. बालपणात घडलेल्या काही घटना, न मिळालेला पाठिंबा या गोष्टी या विकाराच्या मागे कारणीभूत असू शकतात. यांच्याबरोबर राहणाऱ्या जोडीदाराला तर खूप त्रास होतोच, पण सतत अस्वस्थतेच्या, असुरक्षिततेच्या भावनेत राहणं रुग्णांसाठीही क्लेशदायक असतं. खरं तर ‘सायकोथेरपी’तून त्यांना पुष्कळ मदत होऊ शकते, पण आधी तर आपल्याला काही झालंय हे इतर व्यक्तिमत्त्व विकारांच्या रुग्णांप्रमाणे यांनाही मान्य नसतं आणि सलग दीर्घकाळापर्यंत एका थेरपिस्टबरोबर विश्वासानं काम न करणं हा एक अडथळाच आहे, पण दीर्घकाळ सायकोथेरपीची मदत घेतल्याने यांचं आयुष्य सामान्य व्हायला काही प्रमाणात मदत होऊ शकते. (तळटीप या लेखातील माहितीचा वापर स्वत:च्या किंवा आप्तस्वकीयांच्या निदानासाठी कृपया करू नये. योग्य निदानासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.) trupti.kulshreshtha@gmail.com

Story img Loader