सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
मे महिन्याची सुट्टी म्हणजे दीर्घ रजेचा कालावधी. अनेकदा अंगावर येणारी. दरवर्षी त्या त्या गावाला जाण्यामुळे काहींना कंटाळवाणी वाटणारी. आई-बाबा आणि मुलांचे वाद टाळायचे असतील तर या सुट्टीचा योग्य विनियोग करण्यासाठी समुपदेशनाची गरज आहे.
‘सुट्टी रे सुट्टी, शाळेला बुट्टी, जो सुट्टी देईल त्याच्याशी गट्टी, जो देणार नाही त्याच्याशी कट्टी’ मुलांचं आवडतं गाणं. सुट्टीची सारी आतुरतेनं वाट पाहत असतात. प्रत्यक्षात सुट्टी सुरू झाल्यावर थोडय़ाच दिवसांत सुट्टीचा कंटाळा येऊ लागतो. सुट्टी संपत येताना ‘शाळा परत कधी सुरू होते, आपल्या मित्रांना, शिक्षकांना कधी भेटतो,’ असं होऊन जातं. मोठय़ा माणसांची स्थिती वेगळी नसते. ‘शाळा सुरू झाली की सुटलो. सुट्टीत पण शाळा सुरू का ठेवत नाहीत, कोण जाणे?’ असा सूर ऐकू येऊ लागतो.
असं का होतं? हे जाणून घेण्यासाठी आपण भेटू या आपल्या छोटय़ा दोस्तांना. यांच्या गप्पांचं सार एकच असतं. ‘सुट्टीत होणारे वादविवाद आणि भांडणं’. विनंती करायला सारेजण विसरत नाहीत. ‘बाई आमची खरी नावं लिहू नका हं..’
तन्मय, यश, तारा अशी अनेकजण सुट्टी लागताच गावी पळतात आणि शाळा सुरू झाल्यावर परततात. यांच्या घरी सुट्टीपूर्वीच आवाज चढतात. तेच संवाद होतात दरवर्षी. ‘आधी कोणाच्या गावाला जायचं? आईच्या की बाबांच्या?’ परीक्षा जवळ आलेली असते आणि वातावरण गढूळलेलं असतं. ‘मोठी माणसं अशी का वागतात?’ मुलांना पडलेला प्रश्न. रतन, प्रज्ञा या वयानं थोडय़ा मोठय़ा मुली. त्यांचा प्रश्न असतो, ‘पालक आम्हाला समजून का घेत नाहीत? लहानपणी ठीक होतं. गावी मज्जा यायची. आता मात्र वाटतं इतर मैत्रिणींसारखं वेगवेगळ्या गावी जावं, नवं काही शिकावं. पुस्तकं वाचावीत. गावी जाणं म्हणजे मौल्यवान वेळ वाया घालवणं.’
मुलांची एकटं राहायची पण तयारी असते. त्यांना गावी जाऊन महिनोन्महिने राहणं पटत नसतं. मग होतात वादविवाद. ‘मला तर शिबीर अटेन्ड करायला खूप आवडतं,’ साक्षी असं म्हणताच चंदू उसळून म्हणाला, ‘ए जास्त शहाणपण दाखवू नकोस. शिबिराचं नावही घेऊ नकोस.’ माझ्यासकट सर्वाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. ते पाहता सुगंधा आणि अर्चनाने खुलासा केला, ‘आई-बाबा मित्र-मैत्रिणींचं, सहकाऱ्यांचं ऐकतात आणि मग आम्हाला काय आवडतं ते विचारात न घेता, आम्हाला विश्वासात न घेता, समजून न सांगता शिबिरात अडकवतात.. मग सारा घोटाळा होतो.’ सारी चंदूकडे पाहत असतात. चंदूची नजर खाली झुकलेली. कारण.. चंदू थोडा हूड. शिस्तीचं त्याला वावडं. त्याच्या बाईंनी एका संस्थेचं नाव सुचविलं. आईनं ताबडतोब नाव दाखल केलं. ते निवासी शिबीर होतं. एक-दोन दिवसांतच चंदू वैतागला आणि घरी पळून आला. सगळ्यांची नजर चुकवून. मग काय झालं असेल ती कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे एकच घडलं, शिबीर या संकल्पनेबाबत त्याच्या मनात कायमची अढी निर्माण झाली. घरातलं वादळ थोडय़ा दिवसांनी शांत झालं. त्याच्याच शेजारी राहणाऱ्या सुगंधा आणि अर्चनाची थोडी वेगळीच तक्रार. त्या आणि त्यांच्या शाळेतला चमू ओळखला जाई ‘नाईन जेम्स’ म्हणून. त्या सर्वाना घरी एकटेपणाचा खूपच कंटाळा येई. वेगवेगळं शिकायला आवडे. मग ते सारे नवं नवं काही शोधत. घरी विषय काढला की ‘काही वेळेला पटकन परवानगी मिळतेही, पण वादही झडतात. याची गरज काय? पैसे झाडाला लागलेत का? जरा स्वस्थ बसलात, घरकामात थोडी मदत केलीत तर काही बिघडेल का?’ इत्यादी इत्यादी. मग सुरू होतात वादविवाद, चर्चा. घरातलं वातावरण गरम राहतं, पण नंतर.. ‘त्या सांगतात या शिबिरांनी आम्हाला ऑल राऊण्ड बनविलं. नवे मित्र दिले. आमची क्षितिजे विस्तारली. पवनला आयएएस बनण्याचं, दीप्तिला पायलट बनण्याचं, शेखरला समाजसेवक बनण्याचं ध्येय दिलं.
आमचं बोलणं सुरू होतं तेवढय़ात किरणचा मोबाइल वाजू लागला. त्याचा चेहरा त्रासिक झाला आणि त्याचे मित्र त्याच्याकडे रोखून पाहू लागले. किरण सारं समजला. त्यानं दोनदा फोन कट केला. तिसऱ्या वेळी मात्र तो बोलला, ‘घरी येतो मग बोल.’ त्याची आई त्याचा आठवीचा रिझल्ट लागण्यापूर्वीच त्याच्या नववीच्या क्लासला, तोपण पूर्ण वेळ टाकायची तयारी करीत होती. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं आणि अर्चना त्याला समजावीत होती, ‘आमचं ऐकलं असतंस तर..’ दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यानं आई-बाबांकडे हट्ट धरला. ‘संगणक घ्या. सुट्टीत बोअर होईन. दुपारी मी एकटा घरी बसून करू काय?’ त्याचे आई-बाबा राजी होईनात. आई-बाबांनी सुचविलेले पर्याय त्याला पटेनात. दुपारी बोअर झाल्यावर त्यानं कपाटातले पैसे घेतले आणि कोपऱ्यावरच्या सायबर कॅफेत धाव घेतली. दोन-चार दिवस बिनबोभाट गेले. मग तर त्याला चटकच लागली. आईला न विचारता आपण पैसे घेतोय, हे चुकतंय हे त्याला समजत नव्हतं. त्यानं विचार केला होता, ‘आई-बाबा नाही का काही वेळा सांगत हे कर, घे पण सांगू नकोस..’ पण शेवटी त्याचं गुपित फुटलंच. त्याला चोर ठरविलं गेलं. हाणामारी, भांडणं, त्याच्यावर बंधनं आली. सोसायटीत बदनामी झाली आणि सुट्टीत इयत्ता नववीसाठी पूर्ण वेळ, दोन सेशनमध्ये व्हेके शन बॅच घेणारा क्लास पालकांनी शोधलाच. किरण रडवेला होत सांगत होता, ‘कशाला देतात सुट्टी? वैताग नुसता..’ त्याची कड घेत साऱ्यांनीच आवाज चढविला, ‘सुट्टीतसुद्धा आम्ही जास्त वेळ झोपायचं नाही, टीव्ही बघायचा नाही, वेळेवर जेवायला यायचं म्हणजे काय? वर्षभर अभ्यास करून आम्हाला कंटाळा येत नाही का?’ मीरा, बबन अशा अनेकांनी तर मजेशीरच स्टोरी सांगितली. विचार करायला लावणारी, ‘अहो, एरवी आम्ही दुपारी घरी कुठे असतो? मग कोणाची आई, आजी वा आजोबा यांनी त्यांचं टाइम टेबल ठरविलेलं असतं. त्यांच्या टाइम टेबलचे सुट्टीत पार बारा वाजतात. मग कटकट सुरू होते. वेळेवर जेवायला या. त्यांची झोप डिस्टर्ब करू नका. त्यांच्या झोपेच्या वेळेत टीव्ही पाह्य़लात तरी चालेल, पण त्यांच्या नेहमीच्या सीरियलच्या वेळी.. महाऽपापम्. एरवी भांडू नका, मोठय़ानं समजून घे इ. इ. सागंणारी ही मोठी माणसं अगदी हमरीतुमरीवर येतात..
मुलांना आवरणं आता मला कठीण वाटू लागलं. टीव्हीनं आम्हाला गुलाम केलंय, हेच खरं. पूर्वी टीव्ही नव्हता तेव्हा.. लहान-थोर साऱ्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. वेळ सत्कारणी लावण्याचे नवे, वेगळे मार्ग शोधायला हवेत. काळाच्या पडद्याआड गेलेल्या कित्येक कला, खेळ यांचा त्यांनी शोध घ्यायला हवा. माझ्या विचारांची तंद्री प्रफुल्लाच्या आणि सिद्धूच्या बोलण्यानं तुटली.
‘आमच्या घरी तर अतीच होतं. माझा मोबाइल जप्त केला. कारण काय तर मोबाइल चार्ज करायला पैसे मागितले. आता मला सांगा, मोठय़ा हौशीनं मला लांबच्या शाळेत कशाला घातलं? सगळे मित्र-मैत्रिणी लांब राहणारी. इमारतीत माझ्या वयाचं कोणी नाही. मग दुपारभर मी करणार काय? बरं मैत्रिणींकडे जायला परवानगी नाही आणि रिक्षा तर म्हणजे बिलकूल करायची नाही. सुट्टी आहे तर चालत जा म्हणे.. आता एवढय़ा लांब चालायचं म्हणजे..’ ‘काहींच्या घरी केबल काढून टाकतात. कॉम्प्युटर लॉक करून ठेवतात. आता हे बरोबर आहे का?’ स्वातीचा प्रश्न. तीच पुढे सांगू लागली, ‘मला घरी सारी लाडू, ढब्बूमिर्ची असं काय काय चिडवतात. आई भल्या पहाटेच उठवते आणि तिच्याबरोबर फिरायला- मॉर्निग वॉकला येण्याचा आग्रह करते.’ मी म्हटलं, ‘अगं मग त्यात काय चुकलं तिचं..’ माझं वाक्य ऐकताच तिला आणि तिच्या मैत्रिणीला हसू फुटलं. ‘अहो बाई, आई रोज मॉर्निग वॉकला जाते ना, मग ती एवढी गोलमटोल आहे का ?’ तिचा प्रश्न चुकीचा नव्हता खास. तरी मी आईची बाजू घेत म्हटलं, ‘अगं, तुझं असं होऊ नये म्हणून तर..’ इतका वेळ शांत असणाऱ्या सरिता, संतोष आता उसळून म्हणाले, ‘अहो, आमच्या घरी आई-बाबा सारखं असंच म्हणतात. आजीशी वाद घालतात. वर्षभर घरी जुगलबंदी सुरू असते. आजी म्हणते, एवढे दमता, मुलांना जरा कामाला लावा आणि आई-बाबा म्हणतात, तू ते केलंस म्हणून आमची शिक्षणं अर्धवट राहिली आणि हलकी कामं नशिबी आली. म्हणून मग आम्हालाही बजावतात, ‘उगाचच टंगळमंगळ करू नका. फक्त अभ्यास करा आणि तेच आई-बाबा सुट्टीत काम करायला सांगतात.’ मी म्हटलं, ‘मग काय चुकलं त्यांचं? रिकामा वेळ असतो ना?’ मला आठवत होते, आठ-दहा वर्षांपूर्वीचे काही माजी विद्यार्थी घरोघरी दूध पोहोचविणारे, वृत्तपत्राची लाइन टाकणारे, गाडी साफ करून घरखर्चाला हातभार लावणारे. त्यात काहीच गैर नव्हतं. ही मुलं कौतुकाचा विषय ठरत. अनेकजण त्यांना मदतही करीत. आज त्यांच्यापैकी कितीतरी जण चांगले मार्गाला लागले, शिकले; पण ही आजकालची मुलं. मी हतबुद्ध झाले.
पुष्करनं कमालच केली. ‘ते अमेरिकेत असतं नं तसं आपल्याकडे हवं. मुलांचा छळ केला तर..’ आता मलाच काय, पण बहुसंख्य मुलांना राहावलं नाही. त्यांनीच माझं काम केलं. त्याला चांगलंच फैलावर घेतलं, ‘म्हटलं, हा भारत आहे. दोन-चारदा अमेरिकेला जाऊन आलं म्हणजे अमेरिकन नाही होता येत. आणि काय रे, त्या मुलांसारखा थोडा मोठा झाल्यावर स्वत:च्या पायावर उभा राहणार आहेस? स्वत: पैसे कमावून स्वत:च्या शिक्षणाचा खर्च स्वत: करणार आहेस? हा.. आमची घरात भांडणं होतात. वाद होतात, पण आम्हाला आई-बाबा खूप खूप आवडतात आणि आम्हालाही माहीत आहे की, ते आमच्यावर खूप प्रेम करतात. आमच्या भल्यासाठीच त्यांची धडपड असते. शाळा सुरू असतानाची एक-दोन दिवसांची सुट्टी हवीहवीशी वाटते, पण मोठय़ा सुट्टीचा कंटाळा येतो. पालकांप्रमाणे आम्हालाही वाटतं, सुट्टीत पण शाळा का नाही ठेवत?’
थोडक्यात बदललेली कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती याच्याशी आमचा सांधा अजून जुळला नाही आहे. मुलांना आणि पालकांनाही गरज आहे समुपदेशनाची. सुट्टीचा हाती आलेला वेळ कसा वापरावा, याबद्दल प्रबोधन करण्याची. तसंच हे आव्हान आहे सामाजिक संस्थांना. आणि शासनानंही करायला हवा पुनर्विचार. मोठय़ाऽऽऽऽ मोठय़ा सुट्टीचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा