पूर्वी रेकॉर्ड प्लेयर अनेकांच्या घरात असायचा. रेकॉर्डरची पिन एका ठिकाणी अडकून पडली की तेवढीच एकअर्धी ओळ पुन:पुन्हा वाजत राहायची. असंच आपणही अनेकदा वर्षानुवर्षांचे जुने सल सांभाळून ठेवून त्या तक्रारी आयुष्यभर रेकॉर्डसारख्या उगाळत राहतो. साहजिकच एखाद्या व्यक्तीविषयीचा कटू अनुभव कायम त्या व्यक्तीला लगटून कडवट आठवणीच तयार करतो. त्यातून बाहेर पडायचं असतं वा पडता येतं हेच अनेकांच्या लक्षात येत नाही.
‘‘लग्न ठरवताना त्यांचा तोरा पाहूनच मला वाटत होतं, की काहीतरी चुकतंय, पण घरातल्यांच्या आग्रहामुळं राणीशी लग्न केलं.’’
‘‘रीत पाळायची पद्धत नाहीचे त्यांना, वऱ्हाडाच्या बसवरच्या बॅनरवर आधी मुलाचं आडनाव आणि नंतर मुलीचं लिहितात, पण यांनी सगळीकडे स्वत:चंच नाव आधी लिहिलंय…’’
‘‘लग्नात एकदम भारी वरात आणण्याचं माझं स्वप्न होतं. मित्रांनी वरातीत नाचण्याचा आठवडाभर सराव केलेला, पण यांनी कार्यालय घेतलं तेही गर्दीच्या रस्त्यावर, दहा मिनिटांत ट्रॅफिक जाम झाला, संपलं. वरात काय पुन:पुन्हा निघते का? बिनडोक माणसं.’’ आपल्या पाठमोऱ्या चुलत भावंडांची कुजबूज अदितीला स्पष्ट ऐकू येत होती.
हेही वाचा : दु:ख ‘एकुलत्या एक’ मुलांचं!
‘‘लागली यांची पुन्हा तीच रेकॉर्ड. दहा वर्षं झाली, काकांच्या कुटुंबाला या गोष्टी बोलल्याशिवाय राहावतच नाही. बसवरचा बोर्ड आणि वरात हे काय मुद्दे आहेत का लक्षात ठेवायचे? तेही सुशिक्षित घरातल्या इंजिनीयर मुलासाठी? प्रेमविवाह असून सासऱ्याकडून हुंडा आणि फ्लॅट घेतलेला ते मात्र सांगत नाही.’’ अदितीच्या मनात आलं.
कौटुंबिक कार्यक्रमात सगळे नातलग भेटतात म्हणून अदिती आतेभावाच्या साखरपुड्याला आवर्जून आली होती, मात्र नवरा सोबत न आल्याने तिचा मूड गेलेला होता. ‘उद्या यायला जमणार नाही, लग्नाला नक्की येईन,’ असं काल त्यानं जाहीर केलं, त्यावर, ‘मला माहीतच होतं. माझ्या माहेरचे कार्यक्रम तू कायम ऐनवेळी टाळतोस. तुमच्याकडच्या कार्यक्रमांना मात्र मी जायचं. एकटीच आलीस? नवरा कुठेय, या प्रश्नाला उद्या काय नवीन उत्तर देऊ?’ वगैरे नेहमीप्रमाणं त्यांचं एक जंगी भांडण झालं होतं. डोक्यात अजून तीच कलकल चालू असताना आपल्या भावंडांच्या जुन्यापुराण्या रेकॉर्डचा कंटाळा येऊन ती तिथून उठून चुलत बहिणीपाशी जाऊन बसली. सुरुवातीची हालहवाल विचारल्यावर बहीण म्हणाली, ‘‘अदिती, चार बहिणींतली धाकटी असणं अवघड गं. माझ्या वडिलांना निवृत्तीनंतर तीन बहिणींची लग्न करावी लागली. मला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं, पण भावावर भार नको म्हणून कॉमर्सला गेले. चौथ्या मुलीसाठी स्थळं पाहण्याचाही कुणाला उत्साह नव्हता. पहिला होकार आला त्या स्थळाशी निमूटपणे लग्न केलं. नवरा वाईट नाहीये, पण आपण हुशार असूनही कशाचा ‘चॉइस’च नव्हता याचं अजूनही वाईट वाटतं.’’ अदिती तिच्याकडे पाहून समजुतीचं हसली. तरीही, ‘हिची पण पंधरा वर्षांची जुनी रेकॉर्ड’ असं तिच्या मनात आलंच. तेवढ्यात आत्या शेजारी येऊन बसली. ‘माझा मुलगा भारी कमावतोय, सून बरी वागते, पण मुलींना हल्ली घरकामाचं ओझं वाटतं.’ वगैरे सांगता सांगता आत्या चपळाईनं स्वत:च्या भूतकाळात शिरली. ‘आम्ही किती कष्ट केले, शून्यातून वर आलो, कुणीच कशी मदत केली नव्हती.’ वगैरे वगैरे. ‘तीस वर्षं जुनी रेकॉर्ड.’ अदितीच्या मनात आलं. ती हळूच तिथूनही सटकली, तर माहेरच्या सोसायटीतला राजन आणि एकजण सोसायटीतल्या सुमेधाबद्दल बोलत होते.
हेही वाचा : मासिक पाळीतील मानसिक आरोग्य
‘‘सुमेधावर तिच्या नवऱ्याने सर्वांसमोर वाट्टेल ते आरोप केले, पण सुमित भाऊ असून एका शब्दानं बोलला नाही. नंतर सिद्ध झालं, की फक्त संशय घेऊन तिच्या नवऱ्याच्याच डोक्यात स्टोरी तयार झाली होती. सुंदर बायको झेपत नाही. माझ्या बहिणीवर असे आरोप कोणी केले असते ना, दात पाडून हातात दिले असते.’’ राजन तावातावाने सांगत होता. राजनचा सात्त्विक संताप अदिती समजू शकत होती. कॉलेजमध्ये असताना राजनचा सुमेधावर एकतर्फी क्रश होता. तिच्यासारख्या देखण्या, साध्या, प्रामाणिक मुलीवर फक्त संशयातून असे आरोप होणं वाईटच. पण ज्याच्याबद्दल, ‘तोंडावरची माशीसुद्धा उडवता येत नाही’ असं राजनचंच मत होतं, तो सुमित बहिणीच्या बाजूनं काय भांडणार होता? राजननं जुनी भडास काढून जीव हलका केला एवढंच.
वर्षानुवर्षांचे जुने सल सांभाळून ठेवून प्रत्येकजण तक्रारी उगाळत राहतोय हे जाणवून अदिती अस्वस्थ झाली. तिला लहानपणी घरी असणारा रेकॉर्ड प्लेयर आठवला. एखाद्या रेकॉर्डला एखादा चरा पडलेला असायचा. रेकॉर्डरची पिन तिथे अडकून तेवढीच एक-अर्धी ओळ पुन:पुन्हा वाजत राहायची. तिला एकदम जाणवलं, आपणही तेच तर करतोय. माहेरचा कार्यक्रम असला की, ‘माझ्या माहेरच्यांना तो टाळतो’ इथे आपली पिन अडकतेच. तशीच घरात पसारा दिसल्याबरोबर ‘अदिती बाहेरची कामं फटाफट करते, पण घर आवरायचा आळस.’ इथे त्याचीही पिन दरवेळी अडकतेच अजूनही. नाराजी, वाद, भांडणं बरेचदा तिथूनच तर सुरू होतात. मग या गोल गोल फिरणाऱ्या वर्तुळांमधून बाहेर कधी पडणार? आणि कसं? या प्रश्नात अदिती अडकली असताना कोपऱ्यात बसलेले आजी-आजोबा तिला दिसले तशी ती त्यांच्याकडे गेली.
अजून जेवणाला वेळ होता, पण मॅनेजरकडे वशिला लावून आजोबांनी प्रेमाने आजीच्या आवडीच्या गरमागरम २-३ जिलब्या आणल्या होत्या. त्यांनी एक जिलबी वाटीतून काढून तिच्यापुढे केली, मात्र आजी फटकन म्हणाली, ‘‘नको, नेहमीप्रमाणे आधी हात धुतले नसतीलच तुम्ही…’’ आजीच्या अशा ठसक्यातल्या वाक्यांची अदितीला लहानपणापासून सवय होती. आता आजोबा पूर्वीसारखंच काहीतरी तडकून बोलणार आणि आजी, ‘बाकी सगळं कळतं, फक्त स्वच्छता तेवढी कळत नाही.’ म्हणत भडकणार या अपेक्षेत अदिती होती, पण आजोबांनी ‘राहिलं’ म्हणत हातातली जिलबी स्वत:च्या तोंडात घातली, अदितीच्या हातात वाटी देत आजीला म्हणाले, ‘‘ही जिलबी मी खातो. वेटरने हात न लावता चिमट्याने जिलब्या घातल्यात वाटीत, त्या तू हात धुवून खा. अदिती येतो गं परत… ’’ म्हणत आजोबा कुणाशीतरी बोलायला गेले. आजी दुखऱ्या स्वरात म्हणाली, ‘‘माझ्यासाठी मायेनं करतात, पण लग्न झाल्यापासून, गेली ५० वर्षं प्रयत्न करतेय, जेवण्यापूर्वी आपण होऊन हात धुवायची सवय काही लावू शकले नाही. ’’
हेही वाचा : सांदीत सापडलेले: आजारपण!
अदिती ऐकतच राहिली. ‘आजीची रेकॉर्ड तर ५० वर्षं अडकून बसलीय इथे. कदाचित, शेवटपर्यंत…?’ असं मनात येऊन ती हादरली. आपणही म्हातारी होईपर्यंत आपली चक्रं अशीच वागवणार का? का बनतात ही चक्रं? मरेपर्यंत तोडता येत नाहीत का?’ त्याच त्याच लोकांपाशी पुन्हा पुन्हा तेच तेच बोलणं यालाच नकळत आपण नाती म्हणतो का? ओळखीचे, नातलग, मित्र अशा जवळच्यांची चक्रं एकापाठोपाठ समोर आल्यामुळे अदितीला प्रश्नामागून प्रश्न पडत होते आणि त्या अस्वस्थतेतून काहीतरी उलगडतही चाललं होतं.
एखादी गोष्ट खूप प्रामाणिकपणे, मनापासून, खोलवर वाटत असते आणि जवळची व्यक्ती ऐकत नाही तेव्हा अपेक्षाभंग होऊन मन दुखावतं, कारण या अपेक्षा तत्त्वत: किंवा जनरूढी म्हणून योग्य असतात. जसं आजीला आरोग्यासाठी स्वच्छता हवीय, मला नाती टिकवण्यासाठी कौटुंबिक समारंभांना जायला हवंय, राजनच्या मते भावाने बहिणीला संरक्षण द्यायला हवं. वगैरे. माझी योग्य अपेक्षा माझ्या जवळच्या, प्रेमाच्या व्यक्तीनं मानली पाहिजे ही इच्छा स्वाभाविक आहे. पण ती मानली‘च’ पाहिजे ही जबरदस्ती कुठून येते? जोडीदार किंवा संबंधित व्यक्ती ही वयाने मोठी, सज्ञान असते, तरीही तिनं माझं ऐकलंच पाहिजे, मला योग्य वाटतं तसंच वागलं पाहिजे हा अट्टाहास कशासाठी ? प्रेमाच्या व्यक्तीनं तसं वागलं तरच ते खरं प्रेम. न ऐकणं म्हणजे माझ्या प्रेमाचा अपमान असं का वाटतं? मग त्या तथाकथित अपमानानं स्वत:ला पुन:पुन्हा दुखवून घेत राहतो आपण, दुखवून घेण्याचीही सवय होते. अदितीला जाणवलं, ‘नवरा कार्यक्रमाला येणार नाही, हे आपल्याला सवयीनं माहीतच होतं, भांडणाचे नेहमीचे संवादही आपल्या मनात आधीपासूनच तयार होते. खरं तर त्याला एकूणच समारंभ आवडत नाहीत, हे माहीत असूनही वाद घालत राहण्यामागे माझ्या मनाची गरज काय असते? त्याला नाही आवडत हे स्वीकारून सोडून का नाही देता येत? साध्या साध्या गोष्टी वर्षानुवर्षं दुखावून घेण्याइतक्या महत्त्वाच्या का होतात? या सर्व ‘चक्रधरां’सारखी माझ्या चक्राची भुणभुण मी इतरांपाशी आज केली नसली, तरी मनात ती चालूच आहे. इगो आहे का हा?’ या प्रश्नापाशी अदिती थबकली.
‘हो, बरोबर. हा इगोच. दुसऱ्याला कमी लेखून स्वत:चा चांगुलपणा सिद्ध करण्यानं इगो कुरवाळला जातो. तुझंच बरोबर आहे, तू चांगली व्यक्ती आहेस, इतरच चुकीचे आहेत अशी प्रशस्ती परिवाराकडून, समाजाकडून मिळवणं ही गरजच आहे या वागण्यामागे. म्हणून फक्त आपलीच – एकच बाजू मांडली जाते. स्वत:च्या प्रेमात असताना, आपण चक्रात अडकतोय हे लक्षातही येत नाही. आज सर्वांच्या गोष्टी ओळीनं एकापाठोपाठ अंगावर आल्यामुळे आपल्याला आपलं चक्र दिसलं तरी. पण त्यामुळे आता त्या चक्रातून सुटण्याचा रस्ता शोधता येईल.’ अदितीला हलकंच वाटलं एकदम.
हेही वाचा : माझी मैत्रीण: मैत्रीचं माहेरघर
ती जेवायला बसली तर, ‘सगळा मेनू नवऱ्याचा आवडता. त्यानं यायला हवं होतं. पण माझ्या माहेरच्या कार्यक्रमाला कसा येणार तो?…’ मनाची फुणफुण पुन्हा सुरू झालेली जाणवून अदिती थबकली. ते चक्र परत यायला संधी शोधतंय, पण आता त्याच्या प्रशस्तीच्या गरजेची शिकार व्हायचं नाही. आत्ताचा क्षण जगला पाहिजे. लोकांना अडकू दे आपापल्या चक्रात. मला मुक्त होण्याचा रस्ता सापडलाय. आजोबा जसे आजीच्या जुन्या रेकॉर्डकडे दुर्लक्ष करून पुढे गेले तसंच आपणही स्वत:च्या रेकॉर्डवरची पिन उचलून पुढे सरकवायची.
अदितीने शांतपणे नवऱ्याच्या नावाची जिलब्यांची दोन चक्रं स्वत:च्या पानात वाढून घेतली आणि ‘युरेका’ म्हणत चवीनं खायला सुरुवात केली.
neelima.kirane1@gmail. com