मित्राशी किंवा मत्रिणीशी विवाहपूर्व लैंगिक संबंध असण्याचे प्रमाण अलीकडे निश्चितच वाढले आहे. मात्र आपली बायको कुमारिका असावी आणि आपला नवरा कारा असावा, अशी अपेक्षा बहुसंख्य विवाहेच्छुक तरुण-तरुणींमध्ये दिसून येते. त्यासाठी पूर्वआयुष्यातील ब्रेक-अपबद्दल खरेखुरे सांगून टाकले तर मागचे सगळे विसरून पुन्हा नव्याने नात्याची सुरुवात करायला अनेक मुले आणि मुली तयार आहेत..
आ मच्या ‘अनुरूप’ संस्थेच्या विवाह नोंदणी फॉर्ममध्ये विवाहेच्छुकांनी आपल्या आधीच्या ब्रेक-अपबद्दल लिहावे, असे आम्ही नमूद केले आहे. त्यावर अनेक पालक विचारतात, ‘मुलामुलींना विचारायचा हा प्रश्न आहे का?’ त्यांचे हेही म्हणणे असते, ‘आमची मुले नाहीत हो त्यातली.’ मी मात्र मनातल्या मनात हसतो. सगळेच पालक किती निष्पाप मनाने मुलांकडे बघतात! कदाचित सध्याची मुले-मुली काय करतात याची त्यांना फारशी कल्पनाच नसते. सर्वच मुला-मुलींच्या आयुष्यात  हे घडते, ब्रेक-अप येतो किंवा येतात असे माझे म्हणणे नाही, पण बहुतांशी मुलामुलींना भावनिक रित्या मित्रात किंवा मत्रिणीत गुंतण्याचा अनुभव असतो. त्याचे रूपांतर प्रत्यक्ष लग्नात, गेलाबाजार आणाभाकात होतेच असे नाही. काही ब्रेक-अप मात्र खरेखुरे असतात. काही काळ दोघे ‘घनिष्ठ’ मित्र-मत्रीण म्हणजे आजच्या भाषेत गर्ल फ्रेंड-बॉय फ्रेंड म्हणून जगतात. हा कालावधी एक वर्षांपासून पाच वर्षांपर्यंत असू शकतो.
अशी जी नाती असतात त्यात खूप मोकळेपणा असतो. दोघांच्याही घरच्यांना त्यांची मत्री ठाऊक असते पण शरीर, मनाने ते किती जवळ आले आहेत याची जाणीव नसते. बऱ्याच दिवसांपूर्वी माझ्याकडे एक मुंबईची कॉलेज तरुणी अगदी वेगळ्या संदर्भात भेटायला आली होती. मुला-मुलींमधला मोकळेपणा या विषयावर आमचे बोलणे चालले होते. मी तिला सांगत होतो, ‘मी कॉलेजमध्ये असताना ट्रिपला गेल्यावर होणारा जोडसाखळीचा खेळ इतकाच मुला-मुलीत मोकळेपणा असे. फारच थोडय़ा अतिश्रीमंत मुलांकडे बाईक असत. बाकी सगळ्यांकडे लूना मोपेड. त्यामुळे कुठल्या मुलीला लिफ्ट देणे वगरे प्रकारच नव्हते. त्यामुळे एकमेकांना स्पर्श होतच नसे!  ती म्हणाली, ‘काका काय सांगताय काय?’ आमच्या कॉलेजमध्ये कुठली मुलगी कुमारी (वर्जिन) असेल की नाही याबद्दल मला जरा शंकाच आहे.’  हे ऐकल्यावर मी जरा चक्रावलोच. काही महिन्यांपूर्वी याला थोडी पुष्टी मिळाली. झाले असे की माझ्या एका मित्राकडे मी सकाळी गेलो होतो आणि माझा वाचायचा चष्मा विसरलो त्याच्याकडेच! दुपारी थोडा वेळ होता म्हटलं  जावं त्याच्याकडे. फोन केला तर तो म्हणाला, बायको नाही, पण मुलगा घरीच असेल. त्याचे काही कॉलेजचे काम आहे त्यामुळे तो नक्की घरी असेल.’ मी त्याच्या घरी गेलो. त्याची आणि माझी चांगली दोस्ती होती. त्याचा नुकताच ब्रेक-अप झाला होता आणि त्याबद्दल आम्ही बोललो होतो. त्यामुळे थोडेसे बोलणेही होईल असे मला वाटत होते. मी बेल वाजवली. जवळजवळ दहा मिनिटांनी दरवाजा उघडला. तो आला तसा अस्ताव्यस्तच. गालावर लिपस्टिकचे डाग दिसत होते. त्याने पाणी पण विचारले नाही. तेवढय़ात एक मला अपरिचित अशी मुलगी बाहेर आली आणि भराभरा चपला अडकवून बाहेर पडली. तो सहज म्हणाला, माझी नवी गर्ल फ्रेंड! मला आश्चर्य वाटले. थोडय़ाच दिवसांपूर्वी त्याचा ब्रेक-अप झालेला आणि हा पुन्हा नव्याने नाते जोडतो काय आणि..
या ब्रेक-अप संस्कृतीबद्दलचे माझे कुतूहल वाढू लागलेय..
अपूर्वाचा मला फोन आला होता. ती नोएडाला असते. एका निम्नवर्गीय मराठी घरातली ही मुलगी. तिचे शिक्षण तिने स्वत:च्या पायावर केले. पहिली नोकरी लागली ती नोएडा येथे. तिच्याच कंपनीतील एक पंजाबी मुलगा भेटला. तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा. झाले ते गर्ल फ्रेंड-बॉय फ्रेंड. आधी दोघे पेइंग गेस्ट म्हणून राहायचे. मग दोघांनी भाडय़ाचे घर घेतले. दोघे त्याच घरात एकत्र नवरा-बायकोसारखे राहू लागली. दोघांच्याही घरी या परिस्थितीची अजिबात कल्पना नाही. तीन वर्षे झाल्यावर तिने घरी सांगितले. आधी थोडी खळखळ झाली पण तिच्या घरच्यांनी तिचे हे नातेसंबंध स्वीकारले अट इतकीच की दोघांनी लग्न करून हे संबंध वैध करावेत. पण त्याच्या पंजाबी घरच्यांना हे अजिबात मंजूर नव्हते. ते एकत्र राहत होते तीन वर्षे हेही त्यांना ठाऊक नव्हते. तिने त्याच्या घरच्यांना मनवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या पशाच्या अपेक्षा प्रचंड होत्या. तिच्या घरच्यांना ते परवडणारे नव्हते. तिने कर्ज काढायची तयारी दाखवली. पण त्यांच्या मागण्या वाढतच होत्या. मी विचारले, या सगळ्यात त्याची भूमिका काय? ती म्हणाली, तो घरच्यांचे ऐकतो.
मी विचारले, ‘तू काय ठरवले आहेस?’
‘नाते संपवायचे! घर त्याच्या नावावर आहे. त्यामुळे मलाच बाहेर पडावे लागणार !’
मी म्हणालो, ‘यातून तू बाहेर पडू शकशील? ती म्हणाली, ‘‘ हेच आयुष्य आहे. या अनुभवाने मला खूप काही शिकवलं आहे. जग काय म्हणेल यापेक्षा पुढल्या आयुष्यात मी कोणत्या चुका करायच्या नाहीत हे पक्केकरायचे मला.’’
शेवटी न राहवून मी विचारले, ‘तुझा निर्णय झालाय तर तू मला फोन कशासाठी केलास?’
‘नाही, माझा निर्णय बरोबर आहे का नाही हे तपासून पाहायचे होते.’ आणि मी अजिबात विलंब न लावता म्हणालो, ‘योग्य निर्णय’
लग्नाविना एकत्र राहणारी जोडपी काही प्रमाणात दिसू लागली आहेत. त्यांची संख्या फार मोठी नाही. पण मित्राशी किंवा मत्रिणीशी विवाहपूर्व लंगिक संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे हे निश्चित. आपली बायको कुमारिका असावी आणि आपला नवरा कारा असावा अशी अपेक्षा मात्र बहुसंख्य मुला-मुलींमध्ये दिसून येते.  त्यासाठी पूर्वआयुष्यातील ब्रेक-अपबद्दल खरेखुरे सांगून टाकले तर मागचे सगळे विसरून पुन्हा नव्याने नात्याची सुरुवात करायला अनेक मुले आणि मुली तयार आहेत.
याचाच अर्थ त्यांनी ब्रेक-अप हा जगण्याचा एक भाग असल्याचे स्वीकारायला सुरुवात केली आहे.
पण लग्नानंतर होणारे ब्रेक-अप, घटस्फोट आणि जोडीदाराचे आकस्मिक निधन किंवा अपरिहार्यपणे स्वतंत्र राहावे लागणे याबद्दल तो जगण्याचा एक भाग आहे, असे मानून जगणे सुरळीत चालू ठेवणे अनेकांना अवघड जाते.
शरयूला लग्नानंतर पाच-सहा वर्षांत कळले की सतीश केवळ व्यसनीच नाही तर बाहेरख्यालीही आहे. हे कळले तोपर्यंत दोन मुले झालेली होती. तिला नोकरी नव्हती. एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे पशांचा फारसा प्रश्न नव्हता. थोडय़ा दिवसांनी तिने त्याच्यापासून अस्पर्श राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो िहसक होऊ लागला. रात्री आरडाओरडा, मारहाण सगळे चालू झाले. सासरची मंडळी ‘तूच वाईट वागतेस त्यामुळे तो असा वागतो,’ अशी दूषणे देऊ लागली.’ एक दिवस हे सारे सहन न होऊन तिने बाडबिस्तरा गुंडाळला आणि ती माहेरी आली. छोटीशी नोकरी स्वीकारली. मुलांचे शिक्षण चालू ठेवले. मुले कर्ती झाली तेव्हा तिला अचानक या ब्रेक-अपचा त्रास होऊ लागला. जे काही भोग आले ते फक्त तिच्या वाटय़ाला! सतीश आरामात घरी राहत होता. त्याचे बाहेरचे संबंध व्यवस्थित चालू होते. मुलांची शिक्षणे झाल्यावर तिला वाटू लागले आता मी काय करायचे ? घर खायला उठे. टीव्ही तरी किती बघणार?
किंवा माधवी. माधवी आणि मििलद अगदी शाळेपासूनचे मित्र-मत्रीण. दोघे वयात आले आणि आपापले शिक्षण पूर्ण होताच लग्न करायचे ठरवले. ती एका बँकेत अधिकारी म्हणून काम करू लागली. तो इंजिनीअर होऊन आयटीमध्ये लागला. एकच मुलगी. दृष्ट लागण्यासारखा संसार. मुलगी पण इंजिनीअर झाली तिला चेन्नईला नोकरीपण लागली. सगळे मस्त चालू होते. आणि अकस्मात मििलदला रक्ताचा कर्करोग झाला. पंधरा दिवसांचा खेळ आणि म्हणता म्हणता माधवी एकदम एकटी पडली. नोकरी चालू होती पण मििलदच्या आठवणीतून ती बाहेरच येऊ शकत नव्हती. सगळे घर खायला उठे. त्यांचे मित्र-मित्रमंडळी आपापल्या व्यापात गुंतलेले. सगळ्यांच्या पाटर्य़ा होत. एक-दोनदा ती गेली. पण तिला जाणवले मििलदविना या गटात आपले स्थान नाही. बँकेतल्या मत्रिणीही मर्यादित. शेवटी ती उच्चपदस्थ अधिकारी होती. तिच्या बरोबरीच्या फारच थोडय़ा होत्या. त्यात तिला पुरुषांकडून वाईट अनुभव येऊ लागले. त्याची तिला शिसारी येई. पण दोन वर्षांनंतर तिची मुलगीच म्हणाली, ‘ममा तू लग्न का करीत नाहीस?’ तिला हा विचारसुद्धा त्रासदायक वाटला. पण एके दिवशी तिने वर्तमानपत्रात वाचले की अशा लोकांसाठी एक गट असतो. ती धाडस करून पत्ता शोधत त्या गटात गेली. आणि जेमतेम दोन वेळा त्या सभांना गेली. तिथले वातावरण तिला अजिबात पसंत पडले नाही. तिथे असलेल्या बहुसंख्य पुरुषांची नजर तिच्या मते वासनेने लडबडलेली होती. तिला वाटत होते इथे कोणीतरी आपल्या भावना समजून घेणारे भेटेल.. मत्री होईल. पुढचे पुढे.
किंवा निखिल. लग्न झाल्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत त्याला पत्नीशी संबंध करता आला नाही. तर त्याची बायको लगेच माहेरी निघून गेली. त्याने वाचले होते की प्रत्येकालाच लगेच जमते असे नाही. पण बायको हे समजून घ्यायलाच तयार नव्हती. तिने घरी जाऊन तमाशा केला. माझी फसवणूक झाली. माझा नवरा षंढ आहे, असे सगळ्यांना सांगू लागली. तो कामविज्ञानतज्ज्ञाकडे गेला. त्यांनी तपासले. सर्व काही नॉर्मल असल्याची खात्री दिली. दोघांनी एकमेकांना पुरेसे जाणून घावे आणि मग प्रश्न येणार नाही हे सांगितले. पण बायकोने त्याच्या घरात पाऊल टाकायला नकार दिला. आणि तो नराश्याच्या गत्रेत सापडला. परस्परसामंजस्याने घटस्फोट आणि बायकोला १२ लाख देऊन प्रश्न सुटला. आई-वडील म्हणाले, लग्न कर. पण तो अजिबात तयार नाही.
असे कितीतरी वेगवेगळे ब्रेक-अपस्. अनेकांच्या जगण्यात येत आहेत.
मोठा प्रश्न आहे असे काही झाले तर काय करायचे? या स्थितीशी जुळवून कसे घ्यायचे? जुन्या आठवणी पुसून कशा टाकायच्या? आणि समजा ठरवले तरी आठवणी पुसल्या जातात का? का प्रत्येक गोष्टीला काळ हेच उत्तर आहे, असे समजून आला दिवस उलटून टाकायचा?
पूर्वी एकत्र कुटुंब असतानाची गोष्ट वेगळी होती. लग्नानंतरच्या या विभक्तीला थोडा तरी आधार होता. पण आता सगळेच बदलले आहे.
मध्यंतरी ब्रेक-अपस्शी कसे जुळवून घ्यावे याबद्दल मार्गदर्शन करणारी वेबसाइट असल्याचे वाचनात आले. पण तिथेही फार वरवरची माहिती होती.
मला वाटते प्रत्येकाने आपल्या ब्रेक-अपशी कसे जुळवून घ्यावे याचा स्वतंत्र प्लान करणे गरजेचे आहे.
कसा करावा तो प्लान ते पाहूया १ डिसेंबरच्या  लेखात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा