एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा थोडी प्रभावी दिसली की आपण गमतीने आपण म्हणतो- ‘वा! काय तेज आहे!’ पण या गमतीच्या उद्गारांमध्येही वास्तवता आहे.
आपल्या शरीरापलीकडे आपल्याभोवती स्वत:चे असे एक Electromagnetic field अर्थात विद्युत चुंबकीय क्षेत्र अस्तित्वात असते. या वलयालाच आपले ‘तेजोवलय’ असे संबोधले जाते. आपल्या शरीरातील आपल्या प्राणशक्तीचा प्रवाह या वलयाची अखंडितता अथवा त्याचा प्रभाव ठरवीत असतो. ‘किर्लीयन’ या रशियनशास्त्रज्ञाने या वलयाचे फोटो काढण्याचे तंत्र विकसित केले. देहातील प्राणशक्तीचा प्रवाह संतुलित करून रोगांवर उपचार साधता येण्यासाठी प्राणोपचार
(pranic healing) हे तंत्र फिलिपाइन्समध्ये मास्टर चोआ कॉक सुई यांनी विकसित केले. आजही जगभर या तंत्राचा अवलंब करून pranic healers दुखणे सुसह्य़ करण्यास मदत करतात. परंतु ‘उपचारक’ म्हणून काम करणे अजिबात सोपे नाही. उपचारकाची साधना अत्युत्कृष्ट कोटीतील असेल, तर या विद्येचे व्यापारीकरण करावे असे कदाचित वाटणारही नाही. अर्थात या सर्व पद्धती केवळ माहितीसाठी लेखांत अंतर्भूत केल्या आहेत.
त्रिमूर्ती प्राणायाम
आज आपण त्रिमूर्ती प्राणायाम साधना करू या. प्रथम बठक स्थितीतील कुठलेही सुखासन धारण करा. डोळे मिटून घ्या. एक खोलवर श्वास घ्या, सोडून द्या. उजव्या हाताची अंगुली मुद्रा करा. आता नाडीशुद्धी प्राणायामासाठी डाव्या नाकपुडीने पूरक करा. मनातच म्हणा -ॐ ब्रह्मणे नम:। यशाशक्ती कुंभक करताना म्हणा- ॐ विष्णवे नम: । उजव्या नाकपुडीने श्वास सोडताना म्हणा- ॐ रुद्राय नम:। हे अध्रे आवर्तन झाले. आता उजव्या नाकपुडीने पूरक, यशाशक्ती कुंभक व डाव्या नाकपुडीने रेचक करताना वरीलप्रमाणेच ब्रह्मा, विष्णू, महेशाचा मानसिक जप करा. हे नाडीशुद्धीचे ब्रह्मा -विष्णू- महेश या त्रिमूर्तीसह पूर्ण आवर्तन झाले.
हा वैशिष्टय़पूर्ण प्राणायाम सृष्टीमागील काम करणाऱ्या यंत्रणेला कृतज्ञतापूर्वक वंदन करायला लावतो. अगदी साधा, बंधविरहित पण कमालीचा उच्च पातळीचा हा प्राणायाम आहे.

Story img Loader