डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

आपल्यापैकी कित्येकांच्या मनात अपराधीपणाची भावना प्रबळ असते. एखादी चूक हातून घडल्याबद्दल किंवा न घडल्याबद्दल किंवा अगदी केवळ चुकीचे विचार आल्याबद्दलही काही जण सतत स्वत:ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असतात. घडून गेलेल्या गोष्टी भूतकाळातल्या असल्यामुळे त्यावर आपलं फार कमी नियंत्रण असतं. त्यामुळे ही अपराधी भावना फक्त वर्तमानात मानसिक आरोग्याचं नुकसान करते. चुकीच्या वर्तनाप्रति असलेली मनाची संवेदनशीलता न गमावता अतिसंवेदनशीलता कमी करणं आणि अपराधीपणाच्या काळ्या छायेतून बाहेर येणं ठरवल्यास नक्की जमू शकेल..

‘‘मला अनेक गोष्टींबद्दल अपराधी वाटतं. शाळेत असताना आम्ही काही मित्र वर्गातल्या एका मुलाची खिल्ली उडवायचो. तेव्हा मजा यायची, पण आता आठवून अपराधी वाटतं. मी इंजिनीअरिंगला जावं अशी माझ्या आईवडिलांची खूप इच्छा होती; पण आवश्यक तेवढे गुण न मिळाल्यामुळे मला ‘बीएस्सी’चं शिक्षण घ्यावं लागलं. त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही, याबाबतही मला अपराधी वाटतं. माझं जास्त असलेलं वजन आटोक्यात आणण्यात माझी इच्छाशक्ती कमी पडते म्हणूनही मला अपराधी वाटतं. ऑफिसमधलं काम नीट पार पाडूनही ते वरिष्ठांसमोर मला सफाईदारपणे सादर करता येत नाही, मला त्याबद्दलही अपराधी वाटतं. त्यामुळे माझ्या चुका वाढत जातात. मग चुका केल्याबद्दल मला अपराधी वाटतं. त्या का घडत आहेत हे माहीत असूनही त्या मी टाळू शकत नाही म्हणूनही अपराधी वाटतं. ही यादी वाढतच चालली आहे. आता तर सतत स्वत:ला अपराधी ठरवल्याबद्दलही अपराधी वाटतं.’’ तन्मय सांगतो.

अपराधीपणाच्या विळख्यात सापडलेला तन्मय एकटा नाही. आपल्यापकी कित्येकांच्या मनात अपराधी भावना दबा धरून बसलेली असते. स्वत:च्या हातून घडलेल्या छोटय़ामोठय़ा चुकांच्या वेळी ती फणा धरून बाहेर येते;

पण ती तेवढय़ावर थांबत नाही. मग अपराधीपणाबद्दलची अपराधी भावना, कळूनही ती कमी होण्यासाठी आपण काहीच करत नसल्याबद्दलची अपराधी भावना असे अपराधी भावनांचे अनेक थर सुरुवातीच्या अपराधी भावनेवर चढत जातात. त्यामुळे ती अधिकाधिक वाढत जाते. आपण तिच्यात इतके होरपळून निघतो, की आपलं मानसिक स्वास्थ्य ढवळून निघतं. कितीही काळ लोटला तरी त्या वेदनांचं ठुसठुसणं चालूच राहतं. या वेदना स्वत: ओढवून घेतल्या आहेत असं वाटून आपण स्वत:ला इतके बोल लावतो आणि स्वत:ची इतकी कठोर निर्भर्त्सना करतो, की अपराधी भावनेतून बाहेर पडण्याऐवजी तिच्या विळख्यात अधिकच अडकत जातो.

अपराधी भावनेची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की, आपल्याला केवळ चुकीच्या वर्तनाबाबतच अपराधी वाटतं असं नाही, तर एखादं वर्तन हातून न घडल्याबद्दलही अपराधी वाटतं. वर्तन न करताही नुसता मनात चुकीचा विचार आला म्हणूनही अपराधी वाटतं. इतकंच काय, पण ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत त्या इतरांना न मिळाल्यामुळे चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्याबाबतही काहींना अपराधी वाटतं. काहींना तर आपल्यात अपराधी भावना वास करून आहे याची जाणीवही नसते. उदाहरणार्थ, काहींना वाटत असतं की, आपण दानशूर आहोत म्हणून दानधर्म करत आहोत; पण वास्तविक आपल्या हातून घडलेल्या चुकीच्या कृत्यांची भरपाई करण्याच्या अपराधी भावनेपोटी आपण दानधर्म करत आहोत याचा त्यांना पत्ताही नसतो. अपराधी वाटण्याकडे कल असणाऱ्या व्यक्ती स्वत:चं वर्तन अयोग्य आहे एवढय़ावर थांबत नाहीत, तर त्याला नतिकतेच्या तराजूत तोलतात. त्यामुळे आपल्या हातून पाप घडलं आहे आणि त्याची कठोर शिक्षा मी आयुष्यभर भोगलीच पाहिजे याचं सततचं ओझं मनावर बाळगतात. याचा परिणाम म्हणजे सतत दिलगिरी व्यक्त करणं, परत परत माफी मागणं, आत्मनिर्भर्त्सना करणं, स्वत:ला कमी समजणं, चुकांबाबत अतिसंवेदनशील होणं, असे अनेक वर्तनप्रकार दर्शवले जातात.

अपराधी भावनेकडे कल असलेल्या व्यक्तींची संवेदनशीलता व नीरक्षीरविवेकबुद्धी उच्च असते. अयोग्य वर्तनाबाबत ते इतरांना किंवा परिस्थितीला दोषी ठरवत नाहीत, तर स्वत:च्या हातून घडलेल्या चुकांची जबाबदारी स्वत: घेतात. अपराधी भावना त्यांना घडलेल्या चुकांची जाणीव करून देते आणि काही प्रमाणात ते वर्तन भविष्यात परत करण्यास प्रतिबंधही करते. असं असलं, तरी तन्मयप्रमाणे अपराधी भावनेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचं मात्र या भावनेमुळे फायद्यापेक्षा मानसिक आरोग्याचं अपरिमित नुकसान होतं हे निश्चित. हे नुकसान का होतं याचं उत्तर शोधण्यासाठी अपराधी भावनेच्या थोडं खोलात जावं लागेल. ते तन्मयच्या उदाहरणातून पाहू.

तन्मयला अपराधी वाटतं म्हणजे नेमकं काय होतं? तर स्वत:च्या हातून घडलेल्या चुकीच्या वर्तनापाशी तो थांबत नाही, तर ते वर्तन घडल्याबद्दल तो स्वत:च्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर ‘वाईट’ असा शिक्का मारतो. एखाद्या किंवा काही कृत्यांवरून संपूर्ण स्वत:ला वाईट ठरवणं हे अवास्तव तर आहेच; पण अतिशयोक्तीपूर्णही आहे. समजा, एका फळांच्या करंडीत अनेक फळं ठेवली आहेत. त्यातील काही पिकलेली आहेत, काही रसरशीत आहेत, रसाळ आहेत, काही नासकी, खराब आहेत. या करंडीला एकच नाव द्यायचं असेल तर आपण फक्त ‘खराब फळांची करंडी’ असं म्हणू शकतो का? तसं म्हणणं वस्तुस्थितीला धरून होणार नाही, कारण तिच्यात खराब फळांबरोबर चांगली फळंही आहेत; किंबहुना कुठलंही एकच एक नाव करंडीला देता येणार नाही, कारण तिच्यात वेगवेगळ्या गुणविशेषांची फळं आहेत. आपलं व्यक्तिमत्त्वही या फळांच्या करंडीप्रमाणे आहे. त्यामध्ये जसा काही योग्य वर्तनांचा समावेश आहे, तसा काही अयोग्य वर्तनांचाही आहे. त्यामुळे फक्त अयोग्य वर्तन वेचून काढून ‘वाईट’ असल्याचा शिक्का संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर मारणं योग्य नाही.

असा शिक्का तन्मय स्वत:वर मारून घेत असल्यामुळे तो स्वत:ला सांगतो, की माझ्या हातून केवढय़ा घोडचुका घडल्या आहेत. या चुका म्हणजे माझ्या व्यक्तिमत्त्वावर घोर कलंक आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी तो पुसला जाणार नाही. त्यामुळे त्याच्या मनात स्वत:बद्दल कमीपणाची भावना निर्माण होते आणि स्वत:त  सुधारणा होण्याचा आत्मविश्वास तो गमावून बसतो. आपण दोषी किंवा वाईटच आहोत, असं ठरवल्यामुळे स्वत:च्या हातून घडलेली चांगली कृत्यंही त्याला उतारा देत नाहीत. व्यक्तिमत्त्वावरचा कलंक धुऊन काढण्यासाठी तो स्वत:ला  पदोपदी आरोपीच्या िपजऱ्यात उभं करून कडक शिक्षा देतो. स्वत:ला कमी लेखून आसूड मारण्यातच त्याची ऊर्जा खर्च होते.

थोडक्यात, अपराधी भावना चुकीच्या वर्तनाची पुनरावृत्ती भविष्यात न करण्यास तन्मयला फारशी मदत करत नाही. उलट त्याच्या मानसिक आरोग्याचं नुकसान करते. हे नुकसान टाळण्यासाठी तत्मयनं सर्वप्रथम अपराधी भावनेबद्दल अपराधी वाटणं थांबवलं पाहिजे. तरच स्वत:च्या मनावर चढलेली अपराधीपणाची अनेक पुटं बाजूला करून मूळ अपराधी भावनेवर त्याला लक्ष केंद्रित करता येईल. त्या वेळी तो पुढील मार्गाचा अवलंब करू शकेल.

शिक्कामोर्तब न करणं- जर तन्मयनं स्वत:च्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर शिक्का मारला नाही तर काय होईल? स्वत:चं वर्तन व व्यक्तिमत्त्व यात तो फरक करेल. स्वत:चं एखादं वर्तन म्हणजे ‘संपूर्ण मी’ असा अतिशयोक्तीपूर्ण निष्कर्ष न काढता फक्त वर्तनावर लक्ष केंद्रित करेल. स्वत:च्या हातून घडलेली चूक तो मान्य करेल. त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करेल. त्या वर्तनाबाबत सद्य:परिस्थितीत शक्य असेल तर सुधारणा करेल व भविष्यात त्याची पुनरावृत्ती न होण्याची दक्षता घेईल; पण त्या चुकीला तिथंच पूर्णविराम देईल. अपराधी वाटून क्षणोक्षणी चुकीचं ओझं बाळगणार नाही.

स्वत:ला  माफ करणं- तन्मयला वाटतंय, की त्यानं स्वत:ला  माफ केलं तर तो स्वत:च्या चुकीच्या वर्तनाला प्रोत्साहन देईल आणि ते वर्तन त्याच्याकडून अधिकाधिक घडलं जाईल. त्यानं हे लक्षात घेतलं पाहिजे, की स्वत:ला माफ करणं म्हणजे चुकीच्या वागण्याला मोकळीक देणं नव्हे किंवा चुकांकडे कानाडोळा करणं नव्हे, तर चुकांबाबत वाढलेली अतिसंवेदनशीलता कमी करणं. चुकांच्या बाबतीत असंवेदनशील असणं असा त्याचा अर्थ नव्हे. असंवेदनशीलतेतून चुकीचं वर्तन परत घडण्याची शक्यता आहे. चुकांबाबत असंवेदनशील न राहता फक्त अतिसंवेदनशीलता कमी केली तर तो स्वत:चं माणूसपण स्वीकारू शकेल. जगातल्या सर्व माणसांच्या हातून काही योग्य कृत्यं घडतात आणि काही  अयोग्य घडतात. मीही या माणसांपकीच एक असल्यामुळे स्वत:च्या प्रमादशीलतेचा स्वीकार करेन, असा क्षमाशील दृष्टिकोन तो बाळगेल.

स्वत:शी दयाळूपणे वागणं- तन्मय स्वत:वर सतत टीकेचे आसूड ओढत आहे. त्याला वाटतंय की तसं केलं नाही तर आपल्या हातून चुकीचं कृत्य घडेल; परंतु त्यासाठी त्यानं स्वत:ला  सतत धारेवर ठेवायची गरज नाही. कारण त्याची नीरक्षीरविवेकबुद्धी उच्च असल्यामुळं तो दुसऱ्या टोकाला जाऊन दुष्कृत्यं करत राहण्याची शक्यता कमी आहे. स्वत:वर पदोपदी अंकुश न ठेवताही तो सद्वर्तनाचं प्रमाण उच्च ठेवू शकतो. तसंच टीकेचे आसूड ओढताना तो स्वत:तल्या फक्त नकारात्मक कृत्यांवरच लक्ष केंद्रित करतो. स्वत:शी दयाळूपणं वागणं म्हणजे स्वत:च्या चांगल्या कृत्यांचाही स्वीकार करणं व त्यांच्याबद्दल चांगलं वाटून घेणं.

भूतकाळातून बाहेर पडणं- अपराधी भावना प्रबळ असणाऱ्या व्यक्ती तन्मयप्रमाणे भूतकाळावर वाजवीपेक्षा जास्त लक्ष केंद्रित करतात. घडून गेलेल्या घटनांवर आपलं फार कमी नियंत्रण असतं हे लक्षात न घेता तन्मय त्या परत परत उगाळून अपराधी भावना जास्त जोमानं जोपासत आहे. या भावनेचं स्वत:वरचं प्राबल्य कमी करण्यासाठी घडलेल्या घटना उगाळत बसण्याची सवय त्यानं सराव करून थांबवली पाहिजे.

तन्मयनं जर हे मार्ग अमलात आणले तर त्याच्या मनावरचं अपराधीपणाचं ओझं कमी होऊ शकेल. एका ब्रिटिश लेखकानं अपराधीपणाबद्दलची अनुभूती नोंदवताना जे लिहिलं आहे, तशी अनुभूती तोही घेऊ शकेल. हा लेखक लिहितो-

‘एक काळी छाया सतत माझा पाठलाग करते.

उठताना, बसताना, चालताना, झोपताना.

ती दिसायला नको म्हणून मी

आरशात बघणंच सोडून दिलं होतं.

पण आज िहमत करून पाहिलं तेव्हा कळलं

की मीच तिला घट्ट  पकडून ठेवलं आहे.’