योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

आपण काम व्यवस्थित करूनही त्याचा मोबदला मिळण्याच्या वेळी दुसऱ्याकडून चालढकल केली जाण्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकानं कधी ना कधी घेतलेला असतो. व्यावसायिकांना तर असे अनुभव नवीन नाहीत. मात्र वारंवार असे अनुभव येत असतील तर त्याबद्दल काहीतरी ठाम भूमिका घ्यावी लागते. ‘क्लायंट टिकवणं’ हे व्यवसायाच्या यशाचं एक सूत्र आहे हे मान्य, पण ते करताना आपण आपल्या प्रामाणिक कष्टांची किंमत कमी करतोय का, याचं गणित कधीतरी मांडावंच लागतं. ‘त्या’नं नेमकं हेच केलं.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

त्या दिवशी दुपारी अडीच-तीनची वेळ होती. दुपारचं जेवण झाल्यानंतर येणारी स्वाभाविक गुंगी त्या ऑफिसच्या संपूर्ण वातावरणात पसरली होती. तेवढय़ात तो ऑफिसमध्ये शिरत आपल्या मित्राला म्हणाला, ‘‘अरे इथूनच जात होतो, म्हटलं डोकावून जावं आणि तुला वेळ असेल तर पटकन चहाही घ्यावा.’’

मध्यरात्री झोपेतून उठवून जरी कोणी चहा विचारला तरी त्याला नाही म्हणायचं नाही, हे मित्राचं तत्त्व असल्यामुळे पुढच्या पाच मिनिटांत ते दोघंही त्या ऑफिसजवळच्या टपरीपाशी पोहोचले. तिथल्या बाकडय़ावर बसताना दोघांनी आपले मोबाइल दोघांच्या मधोमध ठेवले आणि चहाची ऑर्डर दिली. मग अनेक विषयांवर त्यांच्या मस्त गप्पा सुरू झाल्या. एरवी दिवसभरात क्षणाचीही उसंत नसलेला तो आज आपणहून ऑफिसमध्ये आला याचं मित्राला आश्चर्य वाटत होतं.

गप्पा सुरू असतानाच त्याचा मोबाइल फोन फ्लॅश व्हायला लागला. फोन ‘सायलेंट’वर असल्यामुळे तो काजव्यासारखा काही वेळ चमकला आणि बंद झाला. चहा येईपर्यंत असं तीन-चार वेळा झाल्यावर मात्र मग मित्राला राहावेना. मित्रानं विचारलं, ‘‘कोणाला टाळायचा प्रयत्न करतो आहेस?’’

त्यावर शांतपणे चहाचा घोट घेत तो म्हणाला, ‘‘ज्यांनी मला इतके दिवस टाळलं त्या सगळ्यांना.’’

‘‘म्हणजे? तुला कु णी का टाळेल?’’ त्याच्या बोलण्याचा नेमका रोख न समजून मित्र म्हणाला. तेव्हा तो मंदपणे हसून म्हणाला, ‘‘अरे माझ्या सगळ्या त्या क्लायंटनी.. ज्यांनी माझ्यामागे घाई करून दर कमी करून कामं तर करून घेतली. पण पैसे देण्याची वेळ आल्यावर बिलं थकवली. त्यातल्या काहींनी तसं करण्याची हजार कारणं सांगितली. तर काहींनी एक कारण देण्याचीही तसदी घेतली नाही. काही विशेष महाभागांनी ‘आपल्याला भविष्यात मोठी कामं करायची आहेत,’ असं कल्पक कारण देऊन ठरले होते त्यापेक्षा कमी पैसे दिले. या अशा सगळ्या लोकांना मी मुद्दामहून टाळतोय. अर्थात हे सगळं मी खूप विचार करून जमवून आणलं आहे. कारण आधीचे पैसे थकले असतानाही ही मंडळी उजळ माथ्यानं त्यांची पुढची कामे घेऊन आली. तेव्हा मग गेले महिनाभर मी दिवसरात्र काम करून या लोकांची पुढची कामे पूर्ण केली. फक्त आता, माझे आधीच्या कामाचे आणि या कामाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मी पूर्ण झालेलं काम त्यांच्या हाती देणार नाही, हे मी त्यांना सांगितलं आहे.’’

ते ऐकल्यावर मित्र काळजीनं म्हणाला, ‘‘तुला अशा लोकांचा राग येणं हे स्वाभाविक आहे. पण सारासार विचार करायचा झाला तर तुझा व्यवसाय पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. मोठय़ा कंपन्यांचा विषय वेगळा असतो. पण तू अशी टोकाची भूमिका घेतल्यामुळे गेली अनेक र्वष तू मेहनतीनं गोळा केलेले हे क्लायंट तुला सोडून गेले तर?’’

त्यावर तो म्हणाला, ‘‘गेली कित्येक र्वष त्याच भीतीनं मी गप्प होतो. पण शेवटी विचार केला, जेव्हा मला गरज असते तेव्हा मला पैसे वेळेत मिळणारच नसतील तर त्याचा काहीही उपयोग नाही. कोणताही व्यवसाय करताना वेळेला कमालीचं महत्त्व असतं. अनेकदा आजची गरज आजच पूर्ण होणं आवश्यक असतं. त्याला दोन दिवस जरी उशीर झाला, तरी ती संधी हुकलेली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काम वेळेवर पूर्ण करत असेन, तर माझा मोबदला मला वेळेत मिळाला पाहिजे ही अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही.’’

‘‘बरोबर आहे. पण तू व्यवसाय सुरू करताना त्यात असे लोक भेटू शकतात हा विचार केला असशीलच ना?’’ मित्रानं त्याचा पुढचा मुद्दा मांडला. त्यावर सुस्कारा सोडत तो म्हणाला, ‘‘हो.. मी विचार केला होता. पण पैसे थकवल्यावर त्याची किती विविध कारणं देऊन समोरचा वेळ काढू शकतो, हा विचार करताना माझी कल्पनाशक्ती पूर्णपणे अपयशी ठरली. दुसऱ्याच्या चांगुलपणाबद्दल जो विचार केला होता तोही तोकडा ठरला. खरं म्हणजे जेव्हा पहिल्यांदा माझे पैसे थकले, तेव्हाच त्याबद्दल मी काहीतरी ठोस भूमिका घ्यायला हवी होती. पण आपल्याला क्लायंटला टिकवायचं आहे, असा विचार केला आणि गोष्टी अवघड झाल्या.’’

त्यावर एक दीर्घ सुस्कारा सोडत मित्र म्हणाला, ‘‘क्लायंट टिकवताना तडजोड करावी लागते, हा तुझा विचार चुकीचा होता असं मला वाटत नाही. व्यवसाय करणाऱ्या सर्व लोकांना ते करावंच लागतं.’’ त्यावर होकारार्थी मान हलवत तो म्हणाला, ‘‘बरोबर आहे.. पण तेव्हा मी अर्धाच विचार केला हे माझं पुढचं अपयश. क्लायंट टिकताना तो कधीही तुम्ही त्याला पैसे थकवण्याची मुभा देता, इतक्या एका कारणावर टिकत नाही. तुमचं काम किती उत्तम आणि दर्जेदार आहे हे तिथं निर्णायक ठरतं. बरं, माझे सगळेच क्लायंट असे नाहीत. काही जण तर कायमच वेळेत पैसे देतात. ठरलेल्या दिवशी काही कारणानं पैसे देता येणं शक्य नसेल तर कळवतात. भले असं वागणाऱ्यांचं प्रमाण कमी असेल, पण असेही क्लायंट असतात. उलट या बाकीच्या मंडळींमुळे त्यांचं असणं ठळकपणे अधोरेखित होतं.’’

त्यावर दोघांसाठी आणखी एक-एक चहा सांगत मित्र म्हणाला, ‘‘पण असंही होऊ शकतं ना, की तुझ्या क्लायंटला तुला वेळेत पैसे देण्याची इच्छा आहे. पण तोही व्यवसाय करत असल्यामुळे त्याचेही पैसे खरोखर कुठेतरी अडकलेले असू शकतात.’’ मित्राच्या त्या मुद्दय़ावर काहीसा विचार करून तो म्हणाला, ‘‘बरोबर आहे. असं होऊ शकतं.. नव्हे होतच असणार. कितीतरी वेळा त्यांचेही पैसे इतर लोक बुडवत असतील हा मुद्दा नजरअंदाज करून चालणार नाही. शेवटी सर्व पातळ्यांवर वेळेवर पैसे देणाऱ्यांचं प्रमाण कमीच असतं. पण गंमत अशी आहे, की आपल्याला जे त्रासदायक अनुभव येतात, तसे अनुभव आपल्यामुळे दुसऱ्याला येऊ नयेत यासाठी किमान प्रयत्न तरी किती लोक करतात? उलट एकानं दुसऱ्याचे पैसे थकवले, हे मनात ठेवून दुसरा तिसऱ्याचे पैसे थकवतो. आणि वर सांगतो, की ‘असंच वागायचं असतं’. त्यापासून धडा घेत मी एक सूत्र सांभाळतो, माझ्या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मी ज्यांच्याकडून घेतो, त्यांना त्यांचे पैसे वेळेत देतो. कोणत्या तरी पातळीवर ती साखळी तुटावी, यासाठीचा माझ्या परीनं हा छोटासा प्रयत्न मी कायम करतो. शेवटी वेळेत पैसे न मिळण्याचा ‘मनस्ताप’ हा काही ‘रिले रेस’सारखा नाही, की प्रत्येकानं बॅटन दुसऱ्याच्या हातात देत त्याला पळायला सांगावं.’’

‘‘मग उपाय काय?’’ मित्राला त्याचं म्हणणं पटलं होतं. तेव्हा तो म्हणाला, ‘‘माझ्या मते, निदान माझ्या व्यवसायाच्या बाबतीत तरी यावर उपाय एकच आहे, सेवेची मागणी करणारा आणि सेवेचा पुरवठा करणारा ही एकाच रथाची दोन चाकं आहेत हे मान्य करणं. संतुलन सांभाळण्यासाठी दोघांनाही मेहनत घ्यावी लागेल ही ठाम भूमिका पहिल्या दिवसापासून घेणं. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन काम मिळणं ही जशी माझी गरज आहे, तसंच ते काम दर्जेदार होणं ही क्लायंटचीही गरज आहे. या सगळ्यात काही क्लायंट तुमच्याबरोबर कधीच जोडले जाणार नाहीत, पण ही तयारी ठेवावी लागेल.’’

त्यावर मित्र म्हणाला, ‘‘तुझ्या अशा अपेक्षा असतील तर तुला तुझ्या कामाच्या बाबतीत फार काटेकोर राहावं लागेल.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘बरोबर! दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना उरलेली बोटं आपल्याकडे आहेत, याची जाणीव मला कायम ठेवावीच लागेल. मी माझ्या कामात चुकारपणा करत असेन, खोटय़ा वेळा कबूल करत असेन, काहीतरी कारणं सांगून आधी कबूल केलेल्या गोष्टी पुढे ढकलत असेन, सुमार दर्जाचं काम क्लायंटच्या गळ्यात मारत असेन, तर मग माझे पैसे कु णी थकवले तर त्याबद्दल तक्रार करण्याचा कोणताही हक्क मला नाही, याची मला जाणीव आहे. पण तसं नसेल आणि तरीही मला हा मनस्ताप सहन करावा लागत असेल, तर मी गोष्टी हाताळण्यात अपयशी ठरलो आहे असंच म्हणावं लागेल.’’

त्यावर मित्र चहाचा शेवटचा घोट घेत म्हणाला, ‘‘ठीक आहे. तुझे सगळे मुद्दे मला मान्य आहेत. पण हे जे तू फोन उचलत नाहीस, ते मला फारसं पटलेलं नाही. या लोकांनी उलट वागायचं ठरवलं आणि तू त्यांचं महिनाभर केलेलं काम स्वीकारायला नकार देऊन ते काम त्यांनी दुसऱ्याकडे दिलं, तर तुझी मेहनत आणि थकबाकी दोन्ही बुडालं.’’

त्यावर चहावाल्याला पैसे देत तो म्हणाला, ‘‘काही जणांच्या बाबतीत ती शक्यता आहे. पण असं केल्यामुळे खरोखर किती क्लायंट माझ्याकडे माझं काम आवडतं म्हणून येतात आणि किती लोक थकबाकीची सवलत मिळते म्हणून येतात हे तरी मला समजेल. हे बघ, मी कोणतंही आततायी पाऊल उचलू नये हेच तू मला सुचवायचा प्रयत्न करतो आहेस हे मला माहिती आहे. शिवाय मला ‘कस्टमर इज गॉड’ हेही मान्य आहे. पण काही वेळा परिस्थितीच अशी येते की तुम्हाला देव पाण्यात ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. माझ्यासमोरही तोच उपाय उरला आहे. तसंही यापलीकडे जाऊन मी काय करू शकतो? कु णाच्या खिशात हात घालून तर आपण पैसे काढून घेऊ शकत नाही. लोक स्वत:च दिलेल्या शब्दाची किंमत ठेवत नाहीत.. तेव्हा किमान आपण आपल्या मेहनतीची तरी किंमत ठेवावी. नाही का?’’

हे सगळं बोलणं सुरू असतानाच त्याचा मोबाइल पुन्हा फ्लॅश झाला. त्यानं फोन मित्राला दाखवला. कु णाचे तरी पैसे जमा झाल्याचा तो मेसेज होता. त्यावर तो हसून म्हणाला, ‘‘थकलेले पैसे मिळण्याचा हा कदाचित पहिला आणि शेवटचाही मेसेज असेल, पण शेवटी तो आला हे महत्त्वाचं! ’’