आजीआजोबा शाळेत असताना हातखर्चाला पैसे देण्याची पद्धत जवळपास नव्हती. आता मध्यमवयीन असलेल्यांनाही कसाबसा आणि तुटपुंजा पॉकेटमनी मिळायचा. आजच्या पिढीचा ‘पॉकेटमनी’ ऐकला, तर मात्र आजीआजोबांचे डोळे पांढरे होतील! पण या पॉकेटमनी प्रकाराला थोडं वळण देऊन, मुलांसाठी वर्षभर होणाऱ्या खर्चाचं त्यांनाच अंदाजपत्रक बनवायला लावलं तर?… सुमिता आणि सुष्मिताच्या घरात असा प्रयोग सुरू झाला होता…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुट्टीचे शेवटचे दोन आठवडे म्हणजे तसे कंटाळवाणेच. उन्हाचा हाऽऽ तडाखा आणि बाकी काही करायला शिल्लक राहिलेलं नसतं. मग सुमिता आणि सुष्मिता उगाच काहीतरी दुष्काळी कामं काढत बसल्या होत्या. कपाटांची आणि खोलीची आवराआवरी चालू होती. लहान झालेले, विटलेले कपडे बाजूला काढणं, बाकीच्या नको असलेल्या गोष्टी बाजूला काढणं, मागच्या वर्षीची वह्या-पुस्तकं रद्दीत देण्यासाठी बाजूला ठेवणं, इत्यादी कामं चालू होती.

दोघी जुळ्या असल्या तरी त्यांच्या स्वभावात कमालीचा फरक होता आणि तो वर्षागणिक वाढतच चालला होता. सुष्मिता म्हणजे स्वच्छता आणि व्यवस्थितपणाचा कळस, तर सुमिताला रोज सर्व गोष्टी नव्यानं शोधाव्या लागायच्या. तिचं सगळं सामान घरभर पसरलेलं असे. मे महिन्याचा शेवटचा रविवार हा ‘चित्रगुप्त रविवार’ म्हणून त्यांच्या घरात पाळला जायचा. दोन्ही मुली आणि आई-बाबा मीटिंग घेऊन पुढच्या वर्षाच्या पॉकेटमनीची रक्कम ठरवत असत. तो दिवस आता जवळ आला होता. सुश्मिताचा हिशेब आकडे आणि मागण्या लिहून तयार होता. पण सुमिता मात्र अजून बागडतच होती.

हेही वाचा: ‘‘…तर भूमिकेचा आत्मा सापडतो’’

या वर्षी दोघी सातवीतून आठवीत जाणार, म्हणून घरात जास्त ‘सीरियस’ मूड होता. ‘आता महत्त्वाची वर्षं सुरू झाली,’ हे वाक्य गेल्या आठवड्यात निदान वीस वेळा कानावर पडलं होतं. आठवी ते बारावी ही पाच वर्षं म्हणजे ‘फारच महत्त्वाची’ असं ऐकून ऐकून दोघीही आताच कंटाळल्या होत्या. ‘मग सातवीतच एक वर्ष मी अजून राहते ना,’ असा सुमिताचा हट्ट करून झाला होता आणि त्यावर घरात बरीच थट्टामस्करीसुद्धा झाली होती. ‘‘खरंतर तुला परत नर्सरीमध्येच पाठवायला पाहिजे. तिथेच तू सुखात होतीस!’’ या सुष्मिताच्या टिप्पणीवर तिनं जोरदार उत्तर दिलं होतं. ‘‘सुष, मी जाईनच नर्सरीमध्ये! मी टीचर होणार आणि नर्सरी स्कूलमध्ये शिकवणार.’’ हे ऐकून आई-बाबा भयंकर काळजीच्या नजरेनं एकमेकांकडे पाहात राहिले होते. पण तो विषयच वेगळा होता. सध्याचा सर्व भर हा येत्या रविवारी काय होणार यावर होता.

एवढ्यात आजी हातात एक वही घेऊन त्यांच्या खोलीत आली आणि बेडवर बसली. बसताना ती कटाक्षानं सुमिताच्या बाजूला बसली. बेडची सुष्मिताची बाजू नीटनेटकी आणि व्यवस्थित होती उशी व्यवस्थित ठेवलेली, ब्लँकेट घडी घालून पायाशी ठेवलेलं. सुमिताची बाजू म्हणजे फक्त अस्ताव्यस्त ब्लँकेट दिसत होतं. एक बाजू फुगलेली होती- म्हणजे बहुतेक तिथे उशी असावी. आजीनं हातानं चाचपून मग बैठक मारली. त्या ब्लँकेटखाली एखादं खेळणे, वही किंवा पुस्तकसुद्धा असणार याची तिला खात्री होतीच. पण तरीही ती त्याच बाजूला बसली, कारण सुष्मिता फारच काटेकोर होती. तिच्या वस्तूंना हात लावलेलं किंवा बेडवर कोणी बसलेलं तिला मुळीच आवडायचं नाही.

हेही वाचा: महागडी पुस्तके आपण मुलांच्या हाती केव्हा देणार?

‘‘हे बघ मला काय सापडलं! मुद्दाम तुम्हाला दोघींना दाखवायला घेऊन आलीये,’’ आजीच्या हातातली वही खूप जुनी होती. वरती गंधानं स्वस्तिक काढलेलं होतं आणि मोठ्या अक्षरात ‘श्री’ असं लिहिलेलं होतं. मुलींनी कुतूहलानं वही उघडली. पहिल्या पानावर पुन्हा एकदा आजीच्या सुंदर अक्षरात ‘श्रीराम’ आणि ‘श्री गणेशाय नम:’ लिहिलेलं होतं. ही वही म्हणजे काही तरी स्पेशल असणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी पुढचं पान उघडलं. एप्रिल १९८० असं वर नीट लिहिलेलं आणि त्याच्या खाली ‘पगार ९७७’ रुपये जमा अशी एक ओळ. त्याखाली तारीख, वार, खर्च, असे कॉलम पेन्सिलनं नीट काढलेले.

‘‘वा वा! पण तू स्प्रेडशीट नाही वापरायचीस का गं?’’ सुष्मिता म्हणाली ‘‘ते वापरलं ना, की खूप काही पटकन करता येतं. मी शिकवू का तुला? तुझ्या टॅबवर पण आहे. पटकन शिकता येईल. सोपं आहे.’’ असा इकडे प्रौढ शिक्षणाचा प्लॅन बनवत असताना तिकडे सुमिता चित्कारली, ‘‘आजी इथे बघ… ‘गजरा वीस पैसे’ असं लिहिलंय आणि दर शनिवारी लिहिलंय! आणि रविवारी ‘डोसा व इडली ६ रुपये ५० पैसे’ असं लिहिलंय.’’ आजी एकदम लाजली. ‘‘अगं, तुझे आजोबा दर शनिवारी कामावरून येताना गजरा आणायचे आणि रविवारी आम्ही सकाळी नाश्ता बाहेर हॉटेलमध्ये करायचो.’’
‘‘ हॉटेलमध्ये राहतात गं! तुम्ही जायचात त्याला ‘रेस्तरा’ म्हणतात.’’ पुन्हा एकदा सुष चुका शोधण्यात तत्पर.
‘‘वाव! आजी… दर शनिवारी गजरा? हाऊ क्युट!’’ सुमिता.
‘‘ते सगळं सोडा. तुमची तयारी झाली का? रविवार जवळ आलाय.’’
‘‘आजी मी तयार आहे. स्प्रेडशीट तयार आहे. मी या वर्षी २५ टक्के जास्त मागणार आहे. आय कॅन जस्टिफाय!’’ सुष्मितानं टॅबवर बोटं नाचवत सांगितलं.
‘‘सुमे, तुझं काय?’’
‘‘ माझं काही नाही! मी बाबाला सांगेन, सेमच दे.’’
आजीनं कपाळावर हात मारला, ‘‘अगं शेवटी तो तुला ‘हो’ म्हणेलच, पण उगाच दोन तास लेक्चरमध्ये जातील.’’
‘‘त्याला वाटतं की ते ‘काउन्सिलिंग’ आहे! हा हा! मी ऐकून घेते. आता सवय झाली आहे. ते फक्त ऐकून घ्यायचं असतं.’’
हे ऐकून आजीच्या कपाळावर आठ्यांचे मजले चढले. ‘‘बारा-तेरा वर्षांच्या आहेत, पण बापाची मापं काढतात पोरी. अशानं पुढची वर्षं अवघड जातील. तशा मुली चांगल्या आहेत. नसते उद्याोग करत नाहीत… निदान अजून तरी. पण अशा प्रकारे आई-बापाला ‘मॅनेज’ करायला शिकल्या असतील तर अवघड आहे…’’ थोडं त्या दोघींशी, तर थोडं स्वत:शीच पुटपुटत आजी म्हणाली.
ही चर्चा चालू असतानाच आई डोकावली. ‘‘चला मुलींनो, तयार व्हा. टेनिसची वेळ झालीय…’’ चर्चा संपली आणि हिशेबाची वही घेऊन आजीही बाहेर पडली.

हेही वाचा: ‘आपल्या’ गोष्टी!

नेहमीप्रमाणे रविवार उजाडला. सकाळपासून घरात शांतता होती. ताण नव्हता, पण एक प्रकारचं अवघडलेपण होतं. अचानक आलेल्या ऑफिसच्या कामासाठी आई बाहेरगावी गेली होती, बाबा घरीच होता. ब्रेकफास्ट करून मुली आणि बाबा टेबलावर बसले. आजी बाजूला बसून आता काय होतंय ते बघू या, म्हणून प्रेक्षकाच्या भूमिकेत होती.
‘‘चला, सुरुवात करू या,’’ बाबानं लॅपटॉप उघडला आणि काही क्षण शोधाशोध करून मागील वर्षांच्या ‘चित्रगुप्त फाईल’ उघडल्या.
‘‘तुम्हाला मागच्या वर्षी दर महिन्याला एक हजार रुपये दिले. पण प्लॅनपेक्षा एकूण ५,५०० रुपये जास्त खर्च झाले आहेत. ते मी सोडून देतोय, कारण आपण फक्त ८ बर्थ डेंचा प्लॅन केला होता आणि सुमीनं १४ बर्थ डे अटेंड केले आणि बजेटची वाट लावली.’’
‘‘मग काय मी फ्रेंड्सना सांगायचं का, की प्रेझेंटचं बजेट संपलंय, आता फ्रेंडशिप संपली?’’ सुमीनं हसत हसत विचारलं.
‘‘तसं नाही. तुला मित्रमंडळी आहेत ही चांगली गोष्ट आहे. मी फक्त आकडे सांगतोय. आपण किती खर्च करतो हे माहीत नको का?’’ बाबा अजून चांगल्या मूडमध्ये होता.

‘‘हो माहिती आहे मला. सगळं माहिती पाहिजे… ‘गजरा वीस पैसे’ माहिती पाहिजे. आजीला विचार!’’ सुमी जोरात हसत हसत म्हणाली.
‘‘हे काय आई? ‘गजरा वीस पैसे’ काय आहे?’’ बाबाला प्रश्न पडला.
‘‘सोड रे! नंतर सांगते. तू काम संपव. या पोरी टोपी घालतात बघ तुला!’’ आजीनं आपलं कर्तव्य चोख बजावलं.
आता बाबा एकदम गंभीर झाला. ‘‘चला, पुढच्या वर्षाचा प्लॅन सांगा.’’
सुश्मितानं टॅब बाबापुढे सरकवला. ‘‘हे बघ. सगळं आहे यात,’’ बाबानं कौतुकानं ते सगळं वाचायला घेतलं. शाळा, पुस्तक, स्टेशनरी, ट्युशन, टेनिस, सगळं ‘अॅज अॅक्चुअल्स’ असं लिहिलं होतं. वाढदिवस, मैत्रिणींबरोबर कॉफी आणि कपडे याला २५ टक्के जास्त दाखवले होते. शिवाय टेनिस शूज, सॉक्स आणि रॅकेट यासाठी २५,००० वेगळे मागितले होते.
‘‘पंचवीस हजार खूप जास्त होतात ना पिल्लू?’’
‘‘नाही रे बाबा! मी चांगली खेळते आहे. मला या वर्षी कॉम्पिटिशन टीममध्ये चान्स मिळणारच. नवीन चांगली रॅकेट आणि गिअर पाहिजे. सिलेक्शन झाल्यावर घेऊ या. आधी नाही मागत आहे.’’
हा समजूतदारपणा बघून बाबाला फारच भरून आलं आणि त्यानं फक्त मान डोलावून ‘ओके’ सांगितलं. शिवाय २५ टक्के वाढीव बजेटपण पास करून टाकलं.
‘‘हं, सुमे, तुझं काय? कुठे आहे तुझं स्प्रेडशीट?’’
‘‘माझं पण तेच आहे. सेम. देऊन टाक.’’
आता मात्र बाबा तापला, ‘‘तेच म्हणजे काय? सेम म्हणजे काय? तू कुठे कॉम्पिटिशन लेव्हलला खेळतीयेस? नुसतं जाऊन टेनिसला टाइमपास करतेस! तुला काय करायचंय नवीन रॅकेट आणि शूज? पैसे झाडाला लागतात?’’
आता वातावरण तापायला लागलं होतं आणि आजीचे कान टवकारले. सुमी हे कसं हँडल करणार, याचा ती विचार करत होती.

हेही वाचा: ‘टाँगलेन’ची अनोखी गल्ली!

पण सुमीला हे नवीन नव्हतं. ‘‘मी जाणारच नाहीये कॉम्पिटिशनला. मला नुसतं टेनिस खेळायला आवडतं. माझे तिथे फ्रेंड्स आहेत. मला २५ हजार रुपये टेनिससाठी नकोच आहे मुळी! मी या वर्षी ग्लास पेंटिंग करणार आहे. त्याच्या क्लासला आणि मटेरियलला पैसे दे.’’
‘‘अगं, ग्लास पेंटिंगचे २५ हजार होतात का? तुम्ही काय व्हेनिसवरून काचा आणणार आहात का?’’ बाबा आता वैतागला.
‘‘अरे बाबा, नवीन क्लासबरोबर अजून फ्रेंड्स होतील. अजून बर्थ डे वाढतील… आणि माझ्या बर्थ डेला ते सगळे लोक्स वाढतील ना? त्याचे सगळे मिळून २५ हजार होतीलच ना!’’
बाबाचं नुसतंच तोंड हललं. पण काय बोलावं हे त्याला सुचेना. सुमिता एकदम सीरियस चेहरा करून म्हणाली, ‘‘सी बाबा, दोन्ही मुलींना सेमच बजेट द्यायला पाहिजे. म्हणजे खरा न्याय होईल! मराठीत जस्टिस म्हणजे न्याय ना?’’
बाबांनी फक्त हो म्हणून डोकं हलवलं.
‘‘हे बघ, मी जर खूप चांगलं टेनिस खेळले, टूर्नामेंटला गेले, तर तुला तो सगळा खर्च करावा लागेलच ना! शिवाय बर्थ डेचा खर्च आहेच वाढणारा दरवर्षी. आहे की नाही? त्यापेक्षा मी टेनिस नुसतं एक्सरसाइज म्हणून खेळते. नवीन गिअर घेत नाही. म्हणजे सगळं सेमच होईल की नाही? जस्टीस पण आणि हॅपीनेस पण! हो की नाही? मी हॅपी व्हायला नकोय का तुला?…’’

हेही वाचा: सांधा बदलताना : हस्तांतरण..

बाबाला काही सुचेना. त्यानं फक्त परत एकदा डोकं हलवलं आणि सुमी उठून उभी राहिली.
‘‘झालं तर मग! फायनल ठरलं. पंचवीस टक्के एक्स्ट्रा दर महिन्याला आणि २५ हजार एक्स्ट्रा अलाउन्स वन टाइम. चल सुष, आपण जाऊ या. बाय बाबा… यू आर माय स्वीटहार्ट!’’
त्या दोघी खेळायला निघूनही गेल्या.
बाबा शांतपणे हातातल्या टॅबकडे बघत होता. बारीक आवाजात तो म्हणाला, ‘‘तरी मी हिला म्हणत होतो… की तू असतानाच हे चित्रगुप्त सेशन करूया. मी एकटा नको!’’
आजी मिश्कील आवाजात म्हणाली, ‘‘ बघ पुढच्या वर्षी पुन्हा एकदा प्रयत्न करून! मानसिक तयारी करायला एक वर्ष आहे तुला. आणि तोपर्यंत आहेच ‘गजरा वीस पैसे’!’’ आणि त्याच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघून आजीला हसू आवरेना.
chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Calculation of salary new generation old generation css
Show comments