आयुष्याच्या शब्दकोशामध्ये ‘पराभव’ या शब्दास अपरिचित असलेली व्यक्ती तशी दुर्मीळच, मग प्रश्न उभा राहतो, यास व्यक्ती सामोरी कशी जाते? आहे त्या परिस्थितीस स्वीकारणं, सर्व सामर्थ्य एकवटून त्याचा प्रतिकार करणं अथवा सकारात्मक विचारांना बरोबर घेऊन प्रभावरूपी राक्षसास पळवून लावणं म्हणजेच शस्त्र हातात न घेताही शत्रूवर विजय प्राप्त करणं. कर्करोगाच्या बाबतीतही अनेकदा नेमकं हेच घडतं.
प्रथमत: तो आपल्या शरीरात आला कसा हेच समजण्यात त्याचा पहिला टप्पा पार पडलेला असतो. नंतर अदृश्य असला तरी जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी दिसू लागतो, आणि व्यक्ती खचून जाण्यास सुरुवात होते म्हणजेच विज्ञानाच्या भाषेत त्याची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते आणि मग निरोपाची भाषा अश्रूमय रस्त्यावर वाटचाल करू लागते. पण खरंच कर्करोग असाध्य आहे? विज्ञान सांगते, तसा तो असाध्य मुळीच नाही. आपण आता २१व्या शतकात आहोत, विज्ञान किती तरी पुढे गेलं आहे, त्याचं निदान पहिल्या टप्प्यात झालं तर कर्करोगावर मात केली जाते अर्थात काहीवेळा त्यास गाठण्यास, त्याचा हात पकडण्यात आपण कमी पडतोही परंतु आजही त्याच्या पूर्णत: पराभवासाठी सगळेच संशोधक, अभ्यासक कसून प्रयत्न करीत आहेत.
आपल्या शरीराला कार्यक्षम करण्यासाठी अनेक संप्रेरकं चोवीस तास कार्यरत असतात. यातील काही संप्रेरकं आपल्याला आनंदी, उत्साही ठेवतात तर काही संप्रेरकं ताणतणावाशी संबंधित असतात. असं म्हटलं जातं की, ज्या व्यक्तीमध्ये आनंदी संप्रेरकांची पातळी उच्चतम असते अशा व्यक्ती नेहमी सकारात्मक असतात, म्हणूनच अनेक रोग त्यांच्यापासून अंतर ठेवून असतात. अर्थात असं सरसकट सर्वांना लागू होत नाही, हेही तितकंच खरं परंतु नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये कायम तणाव असतो. त्यांच्यात कॉर्टिसोल या संप्रेरकाची पातळी वाढलेली असते. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते, ज्यामुळे त्यांच्यात कर्करोग होण्याची शक्यता बळावते, असं मानलं जातं. चौथ्या टप्प्यामध्ये असणाऱ्या कर्करोगग्रस्तांमध्ये कॉर्टिसोलचं प्रमाण हे नेहमीच उच्चतम पातळीवर असतं. ताणतणाव कुणासही टाळता येत नसला तरी दररोज नियमित व्यायाम, ध्यानधारणा, मनाची एकाग्रता आणि आरोग्यदायी संतुलित आहार कॉर्टिसोल पातळी कमी करतो. लहान मुलांचा आनंदी सहवास, निसर्ग सान्निध्यात राहणं, आवडत्या संगीताचा अथवा छंदाचा आस्वाद, इतरांचं मनापासून कौतुक करणं, हे सर्व आपला ताणतणाव निश्चितच कमी करतात. कर्करोग पेशींचा शरीरात प्रसार होण्याआधीच या सर्व उपाययोजना जास्त प्रभावशाली होऊ शकतात, कारण याच कालखंडात सकारात्मक विचाराने शरीराची प्रतिकारशक्ती वाढून कर्करोग पेशींना पिटाळून लावणं शक्य होतं.
डॉ. पार्थ दासगुप्ता आणि अमेरिकेतील डॉ. सुजित बसू या दोन प्राध्यापकांना ‘कोलकाता चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था’ आणि ‘व्हेक्सनर वैद्याकीय संस्था’, ‘ओहिवो विद्यापीठ, अमेरिका’ येथे प्राण्यांवर केलेल्या प्रदीर्घ संशोधनात ‘डोपामाईन’ (dopamine) या आनंदी संप्रेरकाचा आणि कर्करोगाची गाठ नष्ट करण्याचा शोध अगदी योगायोगानं लागला. कर्करोगाच्या पेशी वेगानं वाढतात आणि पसरतात, नंतर त्यांचे गाठीत रूपांतर होते. या गाठीचा रक्तप्रवाह बंद झाला तर भुकेपोटी त्या कोरड्या होऊन नष्ट होतात. डोपामाईन कर्करोग गाठीचा रक्तप्रवाहच बंद करतं, जेणेकरून त्या गाठीचा आकार लहान लहान होत ती अदृश्य होते. किती साधं सोपं असलेलं संशोधन आपणास असाध्यतेतून अगदी सहज साध्यतेकडे घेऊन जातं; आपण जेवढे आनंदी, सकारात्मक असू तेवढं निसर्गानं आपणास दिलेलं हे आनंदी संप्रेरक रक्तात उच्च पातळीवर जातं आणि कर्करोगासारख्या नको असलेल्या अनाहूत पाहुण्यांना हुसकावून लावतं. अर्थात हे संशोधन अद्याप माणसांवर केेलेलं नाही. मात्र लवकरच त्यावर अधिक संशोधन केलं जाईल, हे निश्चित.
आनंदी संप्रेरकांच्या या यादीमधील ‘ऑक्सिटोसीन’ आणि ‘सेरोटोनिन’ या दोघांना नजरेआड करून कसं चालणार? पुरुषामधील प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग आणि त्याची सुरुवात ऑक्सिटोसीनची रक्तातील उच्चतम पातळी मोजून सहज ओळखता येतं तर सेरोटोनिन हे संप्रेरक स्तनांचा कर्करोग योग्य वेळेतच ओळखण्यास मदत करतं. रक्तामधील याच्या पातळीत वाढ म्हणजे स्तनांच्या कर्करोगाचा धोका निश्चित समजला जातो. आपल्याकडे अजूनही कर्करोग निदानामध्ये संप्रेरकांची रक्तातली पातळी तपासणं आणि त्यानुसार उपचार पद्धती सुरू करणं काही अपवाद वगळता दुर्लक्षितच आहे. कारण याविषयी अद्याप लोकांना माहिती नाही.
गाठ म्हणजे कर्करोग आणि कर्करोग म्हणजे पराभव असं वाटणं चुकीचं आहे. कारण कर्करोगाच्या रुग्णामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असणं हे सध्या काळजीचं कारण आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका संशोधनानुसार, सर्वात जास्त नैराश्य घसा, स्वादुपिंड आणि फुप्फुसाचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांमध्ये आढळतं. त्या संशोधनानुसार स्त्रियांच्या तुलनेत असे पुरुष रुग्ण जास्त नैराश्यवादी वाटले. जुलै २००४ मध्ये प्रसिद्ध झालेला हा अहवाल स्त्री कर्करोग रुग्णांना त्यांच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीमुळे झुकतं माप देतो.
कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात सहज ओळखता येतो आणि त्यावरील उपचार पद्धतीसुद्धा आता खूपच सुलभ झाली आहे. न्यूयॉर्कस्थित ‘मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर’, ‘डाना फॉरबर कॅन्सर इन्स्टिट्यूट’, ‘मायो क्लिनिक कॅन्सर इन्स्टिट्यूट’ या अमेरिकेतील अद्यायावत कर्करोग संशोधन संस्थांबरोबरच मुंबईस्थित ‘टाटा मेमोरियल’सुद्धा कर्करोग उपचारासाठी जगप्रसिद्ध आहे.
कर्करोग उपचार पद्धतीमध्ये सध्या ‘टी’ पेशींना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. या पांढऱ्या पेशी आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीमध्ये मुख्य ढालीचं कार्य करतात. कर्करोग पेशी नष्ट करण्यामध्ये यांचा सहभाग अतिशय मोलाचा आहे. कर्करोगाच्या अत्याधुनिक उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या रक्तातून प्रतिकार करून क्षीण झालेल्या या पेशी काढून घेतल्या जातात, कर्करोग विशिष्ट पेशी ओळखण्यासाठी त्यांची आनुवंशिकता बदलली जाते आणि नंतर त्यांना प्रयोगशाळेत मोठ्या संख्येत वाढवून परत त्यांना कर्करोग पेशींवर हल्ला करण्यासाठी रुग्णाच्या रक्तात सोडलं जाते. प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक असलेल्या या पद्धतीस ‘CAR T cell therapy’ म्हणतात.
‘नॅनोमेडिसिन’ हीसुद्धा अशीच एक अत्याधुनिक उपचार पद्धती आहे. ज्यामध्ये अतिसूक्ष्म कण (Nanoparticles) कर्करोगावरील प्रभावी औषधास स्वत:बरोबर घेऊन सरळ कर्करोग गाठीमध्येच प्रवेश करतात. या पद्धतीत निरोगी पेशींना हानी पोहोचत नाही, यामुळे इतर दुष्परिणाम टाळता येतात.
टारगेटेड थेरपीमध्ये प्रभावी औषध कर्करोग पेशीमधील एका विशिष्ट रसायनावरच कार्य करते, ज्यामुळे त्या पेशीची वाढ आणि त्यांचा प्रसार थांबतो. यास ‘मोलेक्युलर टारगेट थेरपी’ असंही म्हणतात. स्तनाच्या कर्करोगावर ही उपचार पद्धती अतिशय यशस्वी ठरली आहे.
‘हॅड्रॉन थेरपी’मध्ये उच्च ऊर्जेचे कण फक्त कर्करोगाच्या गाठींवरच प्रहार करतात, ज्यामुळे निरोगी पेशी सुरक्षित राहतात. स्तनाच्या कर्करोगावर ही प्रणाली प्रभावी आहे.
निरोगी पेशींमध्ये जेव्हा जनुकीय अडथळा निर्माण होतो, तेव्हा ती पेशी तिच्या हुबेहूब प्रतिकृतीचा मार्ग बदलून नवीन प्रकारच्या पेशींची उत्पत्ती सुरू करते, त्यांची वाढ वेगाने होऊन, त्या एकत्र येतात व गाठ तयार होते हाच तो ट्युमर, अर्थात सर्वच गाठी म्हणजे कर्करोग नव्हे. संशोधकांनी आता कर्करोग निर्माण करणाऱ्या गाठीमधून त्यांची जनुकं शोधली असून त्या जनुकावरच कार्य करणारी औषध प्रणाली विकसित केली आहे. शरीरामध्ये कर्करोगाची लक्षणं शोधण्यासाठी रुग्णाची जनुकीय चाचणी केली जाते. ज्यामध्ये रक्ताचा नमुना, लाळ अथवा रुग्णाच्या पेशींचा वापर करतात. या तंत्रज्ञानासाठी ‘स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर’द्वारा विकसित ‘ MSK – IMPACT’ चाचणीला नुकतीच ‘FDA’ची मान्यता मिळाली आहे.
शास्त्रज्ञांनी आतापर्यंत ३८ प्रकारच्या कर्करोगांचं व त्यास कारणीभूत असलेल्या जनुकांचं सखोल ‘जीनोमिक’ विश्लेषण पूर्ण केलं आहे. त्यामुळेच आता मानवामध्ये ट्युमर कसा, कुठं व का उद्भवतो? याची संपूर्ण माहिती मिळत आहे. शास्त्रज्ञांचा हा जनुकीय विजयच कर्करोगाच्या पराभवाचा खरा राजमार्ग आहे. अत्याधुनिक संशोधनाचा रथ याच मार्गाने दौडत आहे, हे विशेष आहे.
कुठल्याही औषध प्रणालीमध्ये सर्वप्रथम आजाराचं मूळ शोधणं आवश्यक असतं आणि कर्करोगावर कार्यरत जनुकीय पद्धती नेमकं हेच कार्य करत आहे. २०२४ पर्यंतचा कर्करोग संशोधनाचा हा सर्व आवाका पाहता हा रोग आता निश्चितच आपल्या नियंत्रणात येणार, अशी खात्री पटू लागली आहे.
स्तनाच्या कर्करोगाबरोबर स्त्रियांना होणारा गर्भाशय मुखाचा कर्करोग भारतासारख्या विकसनशील देशासाठी आज मोठं आव्हान ठरत आहे. यावर प्रभावी उपाय म्हणजे ९ ते १४ वयोगटांमधील मुलींचं लसीकरण. वाढत्या प्रसूतीमुळे आदिवासी स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. मी स्वत: मुंबईजवळच्या आदिवासी भागात या स्त्रियांसाठी मुद्दाम एक वैद्याकीय शिबीर आयोजित केलं होतं, पण स्त्रियांची उपस्थिती अगदी नगण्य होती. अर्थात कारण एकच, मनात भीती.
मात्र टांझानियामध्ये ‘जागतिक आरोग्य संघटने’तर्फे आयोजित शिबिराला मी स्त्रियांची मोठी गर्दी अनुभवली. दोन्हीकडे आदिवासीच, मग एक जागरूक आणि आपल्याकडे? कर्करोग उपचार पद्धतीमध्ये सर्वप्रथम साक्षरता महत्त्वाची, त्यानंतर सकारात्मकता.
भारतात प्रति वर्षी अंदाजे १४ लाख कर्करोग रुग्णांचं निदान होतं. त्यापैकी आठ लाखांच्या वर मृत्यू होतात. हा सार्वजनिक आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय आहे. ही आकडेवारी कमी होण्यासाठी आपल्याला कर्करोग दिनाचं महत्त्व समजणं आवश्यक आहे. हा रोग असाध्य नाही, तो सहज साध्य होऊ शकतो, फक्त त्याची ओळख तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. विविध चाचण्यांचा आधार घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:वरचा ताणतणाव कमी करून स्वप्रतिकारशक्ती वाढवा. पाहुण्यांना जा म्हणणं एवढं सोपं नसतं, पण या अशा हात-पाय पसरून मुक्काम वाढविण्याचा इरादा असलेल्या पाहुण्यास तुम्ही सहजपणे घराबाहेरचा रस्ता दाखवू शकता आणि हाच एवढा सकारात्मक संदेश आपण या कर्करोगदिनी स्वीकारावा एवढीच इच्छा.
(लेखक विज्ञान प्रसारक आहेत.)