‘कान चित्रपट महोत्सवा’तल्या ‘रेड कार्पेट वॉक’चा रुबाब फार मोठा आहे. एरवी ‘कान’च्या रेड कार्पेटवर चित्रविचित्र पोशाख घालून, भरगच्च मेकअप करून चालणाऱ्या जगभरातल्या सुंदर अभिनेत्रींची चर्चा असते. या वेळेस चर्चा झाली, ती ठसठशीत महाराष्ट्रीय नथ घालून मिरवणाऱ्या आपल्या छाया कदम यांची.
त्यांच्या सौंदर्याची जातकुळीच वेगळी. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कृत्रिम नाही. निखळ, खरंखुरं आहे. ‘कान’मध्ये छाया त्यांच्या दिवंगत आईची साडी नेसून आणि नथ घालून आल्या होत्या. कुठल्याही मराठी माणसाला आनंद व्हावा असंच ते दृश्य होतं, कारण तब्बल ३० वर्षांनंतर भारतीय चित्रपटाची मानाच्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये निवड झाली आहे.
हेही वाचा : महागडी पुस्तके आपण मुलांच्या हाती केव्हा देणार?
महोत्सवातल्या मुख्य चित्रपट विभागात पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुइ इमॅजिन अॅज लाइट’ हा चित्रपट होता. या चित्रपटाला Grand Prix हा सन्मान मिळाला. हा मल्याळम् आणि हिंदी भाषिक चित्रपट आहे. त्यात तीन भारतीय स्त्रियांची कथा उलगडते. त्यातल्या दोघी केरळमधल्या आहेत आणि त्या मुंबईत नर्सच्या नोकरीसाठी आल्या आहेत. हा चित्रपट बघायची आता आपल्या रसिकांमध्ये उत्सुकता आहे आणि त्यातला छाया यांचा अभिनय पाहायची विशेष उत्कंठा आहे. छाया यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. त्या पार्वती नामक मुंबईतल्या स्त्रीची भूमिका करत आहेत. या भूमिकेविषयी छाया सांगतात, ‘‘पार्वतीची भूमिका माझ्या वास्तव आयुष्याशी फारच जवळीक साधणारी होती. पार्वती गिरणी कामगार आहे आणि माझ्यासारखी कोकणातली आहे. हा चित्रपट म्हणजे या तिघींच्या मैत्रीची गोष्ट आहे, तसंच ती दिग्दर्शिका पायल कपाडिया यांचीही गोष्ट आहे.’’
या चित्रपटाला ‘कान’मध्ये आठ मिनिटांचं ‘स्टँडिंग ओव्हेशन’ मिळालं. ते पाहताना भारतीय माणूस म्हणून खूप अभिमान वाटत होता. छाया कदम यांची भूमिका असलेला, करण कंधारी दिग्दर्शित ‘सिस्टर मिडनाइट’ या चित्रपटाचीही निवड कान महोत्सवात झाली. एकाच वेळेस एकाच अभिनेत्रीचे दोन चित्रपट ‘कान चित्रपट महोत्सवा’त असणं ही दुर्मीळच घटना असावी. यानिमित्तानं छाया कदम या गुणी, दमदार अभिनेत्रीविषयी सगळीकडे कुतूहल निर्माण झालं आहे.
हेही वाचा : ‘आपल्या’ गोष्टी!
याच वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या, किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटातसुद्धा छाया यांची ‘मंजू माई’ ही लहानशी, पण फार महत्त्वाची भूमिका आहे. या भूमिकेचंही खूप कौतुक झालं. मंजू माई पाहून त्यांचीच ‘सैराट’मधली ‘सुमन अक्का’ आठवली होती. स्त्रीवादाचं स्तोम न माजवता स्वत:च्या आयुष्यात स्त्रीवाद जगून दाखवलेल्या या दोन्ही भूमिका फार दणकट स्त्रियांच्या आहेत. वास्तवातही पुरुषकेंद्री इंडस्ट्रीमध्ये छाया कणखरपणे उभ्या आहेत. ‘‘भले घर की लडकी’ ये सबसे बडा फिरॉड है,’ हे सांगणारी मंजू माई अशीच उगाच कुणालाही सापडत नसावी!
काही वर्षांपूर्वी रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ चित्रपटात ‘अक्का’ ही वेगळी, कणखर भूमिका त्यांनी साकारली होती. या चित्रपटावरून तेव्हा वादही झाला होता. गेल्या काही वर्षांपासून अशा धाडसी आणि वेगळ्या भूमिकांतून छाया यांनी आपली छाप सोडली आहेच. त्यामागे आहे त्यांचा भूमिका स्वीकारण्या आणि करण्यामागचा चोखंदळ दृष्टिकोन.
भूमिका सापडते कशी, याविषयी बोलताना छाया म्हणाल्या, ‘‘आपल्याला फ्लॅट मिळतो, पण त्याचं ‘घर’ आपल्यालाच करावं लागतं! मी भूमिकेकडे अशा नजरेनं पाहते. एक भूमिका लिहिलेली असते, मग मी तिच्या व्यक्तिमत्त्वातले बारीकसारीक कंगोरे शोधून काढते. ती बाई कुठल्या प्रदेशातली आहे, कुठल्या वयाची आहे, ती कपडे कशी घालेल, चालेल कशी, बोलेल कशी, उभी कशी राहील, तिच्या भाषेचा लहेजा कसा असेल, हे सगळं शोधून काढायचं आणि मग ते दिग्दर्शकासमोर मांडायचं. हे ‘डीटेलिंग’ जमलं की भूमिकेचा आत्मा सापडतो.’’
हेही वाचा : ‘टाँगलेन’ची अनोखी गल्ली!
छाया कदम हे नाव पहिल्यांदा ठसठशीतपणे लक्षात आलं ते नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटात. ‘नानी’च्या भूमिकेत. ही खरोखरच त्या गावातली, कैकाडी समाजातलीच बाई असावी असं वाटत होतं, इतकी ती भूमिका अस्सल घडली होती. त्यानंतर ‘सैराट’, ‘न्यूड’, ‘रेडू’ असे चित्रपट येत गेले. ‘सैराट’मध्ये घरातून पळून हैदराबादला आलेल्या आर्ची-परश्याच्या पाठीमागे उभी राहिलेली सुमनताई अंधारात आशेचा किरण भासते.
त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे छाया हिंदी चित्रपटांतून दिसू लागल्या. ‘सिंघम रिटर्न्स’, ‘केसरी’, ‘गंगूबाई काठियावाडी’ अशा ‘मेनस्ट्रीम बॉलीवूड’ चित्रपटांत त्यांनी काम केलं. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’मध्ये त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नीच्या भूमिकेत होत्या. नुकत्याच आलेल्या ‘मडगाव एक्स्प्रेस’मध्ये लेडी ड्रग डीलर कंचन कोंबडीची भूमिका त्यांनी केली आहे.
अभिनयाची एक ताकद असते. अनेकदा उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या व्यक्तीपेक्षा तिची ती भूमिका लोकांच्या अधिक लक्षात राहते. या सगळ्यांत त्या व्यक्तीच्या यशामागे वैयक्तिक आयुष्य, संघर्ष आणि तडफड किती आहे, हे फार कमी वेळा जाणवतं. छाया मूळच्या कोकणातल्या धामापूरच्या. एका सामान्य परिवारात वाढलेल्या. त्यांचं बालपण मुंबईत गेलं. वडील गिरणीत नोकरीला होते. शाळेत असताना छाया कबड्डी खेळाडू होत्या. त्या राज्य पातळीवर कबड्डी खेळल्या आहेत. २००१ मध्ये त्यांचे वडील आणि मोठा भाऊ यांचं अचानक निधन झालं. या दु:खातून सावरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी थेट वामन केंद्रे यांची अभिनय कार्यशाळा करायचं ठरवलं. या निर्णयानं त्यांचं नशीब बदललं. अर्थात या कार्यशाळेनंतर त्यांना प्रत्यक्षात काम मिळायला सहा वर्षं जावी लागली. ‘झुलवा’ या नाटकात त्यांना भूमिका मिळाली. त्यानंतर ‘दूरदर्शन’वर शरण बिराजदार दिग्दर्शित ‘फाट्याचं पाणी’ या लघुपटामध्ये छोटी भूमिका मिळाली. हे छाया यांनी कॅमेऱ्यासमोर केलेलं पहिलं काम. ‘बाईमाणूस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. पण तो प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी लहानमोठ्या भूमिका केल्या. अभिनेता फहाद फसीलच्या ‘पाचूवम अद्भुता विलक्कम्’ या मल्याळम् चित्रपटातही काम केलं. ‘हुतात्मा’ या वेबसीरिजमध्ये काम केलं.
हेही वाचा : सांधा बदलताना : हस्तांतरण..
चित्रपटसृष्टी- विशेषत: ‘बॉलीवूड’ हे बेभरवशी क्षेत्र आहे. इथे भरपूर ग्लॅमर आहे, पैसा आहे. पण त्याचबरोबर हे जग कधीही डोक्यावर घेतलेल्या व्यक्तीला खाली फेकून देऊ शकतं. अनिश्चितता हाच या क्षेत्राचा स्थायिभाव. अशात एका साध्या मराठी घरातून आलेली, चारचौघांसारखं रंगरूप असलेली स्त्री, कुठल्याही ‘गॉडफादर’शिवाय इथे स्थिरावते, ही विशेष गोष्ट आहे. अभिनयाचं नाणं खणखणीत असल्याशिवाय हे शक्य नसतं. छाया सांगतात, ‘‘या क्षेत्रात येणारी हल्लीची मुलं सोशल मीडियामागे धावतात. तुमचे ‘फॉलोअर्स’ किती आहेत, यापेक्षा मुळात तुम्हाला अभिनय येतो का, हे इथे महत्त्वाचं आहे.’’
सध्याच्या डिजिटल मनोरंजन क्रांतीनं बदललेल्या काळात अभिनयासाठी अनेक कवाडं उघडली गेली आहेत. आता कुठल्याही भाषेतला चित्रपट जगभर पोहोचतो. उदा. ‘कान’मध्ये पुरस्कार मिळालेला मल्याळम चित्रपट आता केवळ केरळमध्ये पाहिला जात नाही, तर तो जगभर पोहोचतो. छाया यांच्यासारख्या अभिनेत्रीसाठी हा उत्तम काळ आहे. नशीब संधी बनून समोर येतं खरं, पण त्यासाठी सतत कष्ट करत राहणं, भूमिकेत मिसळून जाण्यासाठी आवश्यक तो अभ्यास करत राहणं, भूमिकेतलं डीटेलिंग, अचूकता शोधणं, भाषेवर काम करणं, नवीन वाचन करणं, विचार पक्का करणं, सहकलाकारांकडून शिकत राहणं, हे सगळं छाया करत राहिल्या, म्हणून त्या आज ‘कान’मध्ये पोहोचल्या.
उंच उडून भरारी घेताना आपली मुळं न विसरणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळेच फ्रान्समध्ये झालेल्या ‘कान’मध्ये वावरताना आईची नथ घालणाऱ्या, सहजतेनं साडीत वावरणाऱ्या छाया फार लोभस दिसत होत्या. ‘आईला तर विमानानं नेता आलं नाही, पण तिची साडी आणि नथ तर विमानानं नेली!’ अशा अर्थाची छाया यांची पोस्ट पाहून त्या व्यक्ती म्हणूनही किती संवेदनशील, भावनिक आहेत, ते दिसलं.
छाया सांगतात, ‘‘मी परदेशात एकटीनंच येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘कान’मध्ये येण्याचं स्वप्नही मी कधी पाहिलं नव्हतं. इथल्या लोकांचं चित्रपटांविषयीचं प्रेम कमाल आहे. इथली शिस्तही अफाट आहे, व्यवस्था उत्तम आहे. या लोकांनी आपल्या मातीतल्या चित्रपटाला जे प्रेम दिलं त्यानं मी पुरती भारावून गेलेय.’’
पुरस्कार मिळालेल्या चित्रपटाविषयी बोलताना छाया सांगतात, ‘‘पायल कपाडिया आणि तिची टीम विशेष तयारीची आहे. पायलला मागच्या वर्षी ‘कान’मध्येच उत्कृष्ट लघुपटासाठीचा पुरस्कार मिळाला होता. आमचा हा चित्रपट ‘कान’ला जाणार हे समजल्यापासूनच मला वाटत होतं, की आपल्याला पुरस्कार मिळणार आहे… आणि तसंच झालं!’’
हेही वाचा : ‘एका’ मनात होती : जोडीदाराशिवायचं एकटेपण!
वाट्यास आलेलं काम तुम्ही प्रामाणिकपणे करत राहिलात, तर या बेभरवशी, चकचकीत चित्रपटसृष्टीतही छाया कदम यांच्यासारखं पाय रोवून उभं राहता येतं. छाया सांगतात, ‘‘मी वास्तव आयुष्यात रस्त्यावर उतरून समाजसेवा किंवा आंदोलन करू शकणार नाही. पण माझ्या भूमिकांतून जमेल तितकं चांगलं काम करत राहणार आहे. व्यावसायिक सिनेमांपेक्षा मला ज्या भूमिकांतून आनंद मिळतो, काही शिकायला मिळतं, असं काम करायचा माझा प्रयत्न असतो.’’
मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन, आपल्या मातीतल्या, साध्यासुध्या माणसांच्या कथा जागतिक पातळीवर नेऊन मांडणं ही चित्रपट या माध्यमाची ताकद आहे. ही ताकद छाया यांनी अचूक ओळखली आहे. म्हणूनच आज भारताची मान अभिमानानं उंचावणाऱ्या चित्रपटांचा त्या भाग आहेत. ‘कान’मधला त्यांचा गौरव हा म्हणूनच केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नाही, तो सामान्यांमधल्या असामान्यत्वाचा गौरव आहे!
juijoglekar@gmail.com