एचडीएफसी बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजर आणि मुंबईच्या क्लस्टर हेड रेखा व्यास यांनी आपलं करिअर निगुतीने सांभाळलंय. एकत्र कुटुंबाचा संसार सांभाळतानाच पद्मश्री सतीश व्यास यांचा सांगीतिक संसार आणि जेट एअरवेज कमांडरपदी असणारा लेक विक्रम यांचं अधिकारी आयुष्य यांचा ताळमेळ घालत स्वत:च्या कुटुंबाला अधिक व्यापक बनवलं. त्यांच्या व्यस्त करिअरविषयी..
‘‘लहानपणी माझे वडील माझ्यासोबत नेहमी बुद्धिबळ खेळत असत. त्या खेळादरम्यान प्रतिस्पध्र्याला चेकमेट द्यायचा असेल, तर तो देण्यापूर्वीच्या किमान १० मूव्हज् अर्थात खेळी या कोणत्या असल्या पाहिजेत, याचा विचार करावा लागे. त्यांच्यासोबत खेळताना प्लॅन करून खेळणं असो अगर खेळाव्यतिरिक्त प्रत्यक्ष जीवनातही पूर्ण विचारांती करण्याची कोणतीही कृती असो, त्याचा सर्वेसर्वा विचार करूनच पाऊल टाकायचं, हे मी आपोआपच शिकत गेले. त्या अबोध वयात अनेक उत्तम विचार, संस्कार त्यांनी आम्हा भावंडांवर केले. त्यातूनच पुढे आयुष्य जगताना जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगणं, आनंदी राहणं सहजच जमून गेलं.’’
एचडीएफसी बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजर आणि मुंबईच्या क्लस्टर हेड रेखा व्यास यांच्याशी त्यांच्या करिअरविषयी गप्पा मारताना त्यांच्यातील कणखरपणा, निडरता, परिस्थितीशी दोन हात करण्याचे, वेळप्रसंगी तिच्यावर संयमाने मात करण्यातील त्यांचे कसब या व अशा अनेक लहानलहान बाबी दृग्गोचर होत राहिल्या.
एनसीसीमध्ये अव्वल असलेल्या रेखा यांना शौर्याचं क्षेत्र विलक्षण भावायचं. आरसी चर्चमधील शूटिंग रेंजवर जाऊन ‘फायिरग’चा सराव करणाऱ्या त्या बेस्ट शूटरही ठरल्या होत्या. एनसीसीशी संबंधित कॅम्पच्या वेळी तिथे असलेल्या कमांडर, मेजर पदावरील वर्दीधारी महिलांचा रुबाब त्यांना भुरळ घालायचा. आपणही असंच सन्य दलातील अधिकारी व्हावं, या प्रेरणेनं त्यांचं मन व्यापून जायचं. त्या दिवसापासूनच्या आठवणींना ताजं करताना हसत त्या सांगू लागल्या, ‘‘मला खरं तर युनिफॉर्मधारी पर्सनॅलिटीशी लग्नं व्हावंस वाटायचं. एनसीसीच्या मुशीतून घडलेल्या मला सतीशसोबत साखरपुडा होईतोवर फक्त समरगीतंच काय ती माहीत होती. आमचं लग्न ठरवून झालेलं. साखरपुडय़ाच्या दिवशीच सतीशच्या बाक्रे या मित्राकडे आयोजित कुमार गंधर्व स्मृतीमफलीला मी गेले. ती मफल ही माझ्या आयुष्यात अनुभवलेली पहिलीच शास्त्रीय मफल. ते स्वर ऐकताना काही तरी खूप खूप हळूवार, असं मनाला जाणवायला लागलं आणि तिथपासून शास्त्रीय संगीताशी मी जोडले गेले. माझी आईसुद्धा चांगली कलाकार होती. अनेक कामांत तर तिचा हातखंडा, उत्साह तर पाहवा असाच. हाच उत्साह, कामाचा उरक माझ्यात झिरपत गेला.
कॉलेज जीवन संपता संपतानाच रेखा कानेटकरची रेखा सतीश व्यास झाल्यालाही नुकतीच ३३ र्वष झाली. अगदी अलीकडेपर्यंत माझे आई-वडील आणि सासू-सासरे आमच्याजवळच होते. व्याह्या व्याह्यांचं चांगलं पटत नाही, असा काहीसा समज आहे. आमच्याकडे मात्र तो खोटा ठरला. त्यांची भट्टी इतकी उत्तम जमून यायची की त्या गप्पांतून उठून जाऊच नये. आज ते हयात नाहीत. मात्र, त्यांनी दिलेल्या आनंदाच्या ठेवी, संस्कार आम्हाला नेहमीच समृद्ध करत राहतात.’’
‘‘माझे सासरे पं. सी. आर. व्यास आणि सासूबाई माणसांचे अतिशय लोभी. घर नेहमीच भरलेलं असायचं. दोन दीर, जावा हे तर प्रोत्साहन द्यायला, मदतीला नेहमी तत्पर. माहेरसारखेच आम्ही इथेही सगळी एकत्र राहत होतो. लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांनी सतीशने पूर्ण वेळ संगीत करण्यासाठी आयसीआयसीआयमधील नोकरीचा राजीनामा देण्याचा विषय काढला. खरं तर, त्याने मला या संदर्भात पत्नी म्हणून सर्वाआधी विश्वासात घेऊन काहीच कसं सांगितलं नाही, याबद्दल नाराज झाले. परंतु, परिस्थितीला तोंड देत मार्ग काढण्याचं बाळकडूच मिळाल्याने त्याही वेळी पुढचा अदमास घेण्यादृष्टीने मी काही प्रश्न त्याला विचारले. तशातच त्याच्या बॉसनेही राजीनामा मंजूर न करता त्याला ८ दिवस विचार करायला वेळ दिला. सुदैवाने, तो पुन्हा नोकरीत रुजू झाला. परंतु तेव्हाच माझ्या मनाने घेतलं, की आपल्याला आíथकरीत्या स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता आहे. आíथक पाया भक्कम असेल तर सगळ्या गोष्टी निभावून नेता येऊ शकतात. तेव्हाचा काळच असा होता की, निव्वळ शास्त्रीय संगीत हेच करिअर म्हणून करणं आíथकदृष्टय़ा मानवणारं नव्हतं. पॅशन एकीकडे आणि पशांचं गणित दुसरीकडे. आमच्या डोक्यावरचं छप्परही तेव्हा भाडय़ाचं होतं. अशा परिस्थितीत स्वत:चं हक्काचं घर, कुटुंबाची किमान सुस्थिती येईपर्यंत नोकरी न सोडण्याबद्दल सतीशला समजवण्यात मी यशस्वी झाले. घरातच संगीत असल्याने सतीशने संगीतातच पुढे काम करण्याची इच्छा धरणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्याचा रियाज दरम्यानच्या काळात सुरूच होता. वडिलांकडे गाणं आणि दुसरीकडे संतूरचं शिक्षणही सुरू होतं. त्याचसुमारास एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांच्यामुळे आमचं चेंबूरमध्ये हक्काचं घर झालं.’’
लग्नानंतर बिझनेस करावा की पोलिसमध्ये जावं याबद्दलचे माझे विचार सुरू होते. पोलिसी सेवेसाठी अत्यावश्यक सर्व प्रशस्तीपत्रं माझ्याजवळ होतीच. पण नंतर विचार आला, शास्त्रीय संगीताच्या सासरच्या अंगणात युनिफॉर्मधारी मी, बंदूक, पोलीस गाडी वगरे हे कसं दिसेल.. साहजिकच तो विचार बाजूला पडला. तशात सासूबाईंनी मला कॉलेजचा निकाल लागेपर्यंत बी. एड्. करण्याचं सुचवलं. झालं, गणित, सायन्स हे विषय घेऊन मी तेही केलं. मला बी.एड. ला ७९ टक्के मिळाल्याचं पत्र घरी आलं ते थेट सासऱ्यांच्याच हाती पडलं. तेव्हा आम्ही माटुंग्याला राहत होतो. सासऱ्यांना इतका आनंद झाला की ते तिथून दादरच्या पणशीकरांचे पेढे घेऊन माझ्या वडिलांकडे तसेच चालत गेले. रात्री उशिरा घरी आले आणि मला आवडीची कांजीवरम साडी घेण्याकरिता पसे दिले. किती ते कौतुक! त्याच सुमारास एचडीएफसीमध्ये मला नोकरी लागली. गृहकर्ज क्षेत्रातील तशी ही आद्य कंपनी म्हणता येईल.’’
‘‘त्याच दरम्यान व्यास कुटुंबात आमच्या छोटय़ा विक्रमच्या येण्याने भर पडली. सुहास, सतीश, शशी यांच्यासारख्या सुशील, सुसंस्कृत आणि उच्चविद्याविभूषित मुलांना घडविणाऱ्या त्या मातेच्या हाती तिचा नातू विक्रमला सोपवताना मी नििश्चत होते. सासू-सासऱ्यांचा भक्कम आधार आम्हाला, घराला होता. एचडीएफसीमधील माझी नोकरी अशा स्वरूपाची होती की, त्यात मी केव्हाही रजा घेऊन अथवा लवकर निघून येण्याची शक्यता खूप कमी होती. घर आणि त्यासाठी घेतलं जाणारं कर्ज हा अगदी संवेदनशील विषय असल्याने प्रत्येक ग्राहकाच्या मानसिकतेचा, त्याच्या आíथक कुवतीचा अदमास बांधत त्याचप्रमाणे कंपनीच्या कामकाजाच्या चौकटीत सगळ्या गोष्टी बसवत काम करणं हा वेगळा अनुभव होता आणि आजही आहे. परंतु विक्रम लहान असताना मनात असूनही कधी कधी मी घरात वेळ देऊ शकत नसे. हे सासूबाईंना खटकत असलं तरीही त्यांनी आणि माझ्या जावांनी मला खूप सांभाळून घेतलं.’’
‘‘हक्काच्या घराचं कर्ज फिटल्यानंतर १५ वर्षांनी सतीशने नोकरी सोडली आणि तो पूर्णवेळ संतूरवादनात रमला. पं. शिवकुमार शर्मासारखा गुरू त्यांना लाभला. एचडीएफसीमध्ये माझ्याही कामाचा व्याप वाढत गेला. स्वत:च्या घराचं स्वप्नं उराशी घेऊन कर्जासाठी इथे येणाऱ्यांना त्यांच्या पशांबाबत आश्वस्त करणं, आज केलेल्या गुंतवणुकीचं भविष्यातलं मोल पटवून देणं आणि हे करत असताना त्यांच्या खिशाला कमीतकमी झळ कशी बसेल, याचं नियोजनपूर्वक मार्गदर्शन करणं यात अतिशय आनंद सामावलेला आहे. आमच्या हक्काच्या घराबद्दलची तळमळ, कळकळ आणि ते स्वप्न पूर्ण होण्यातला आनंद असा कुठे तरी सांधला जात असतो. त्या आनंदाचा पुन:प्रत्ययच मला येत असतो आणि माझी आनंदाची तिजोरी दिवसेंदिवस भरत जाते. तसं पाहायला गेलं तर मी सायन्स ग्रॅज्युएट, या बँकिंग क्षेत्रात आले आणि इथलीच होऊन गेले, त्याचं कारण इथलं कौटुंबिक वातावरण. ऑफिस किंवा करिअर असं कधी हे क्षेत्र वाटलंच नाही. इथे येण्याची ओढ काल इतकीच आजही आहे.’’
‘‘ विक्रमच्या बाबतीतही माझ्या आई-वडिलांनी आम्हाला दिलेल्या स्वातंत्र्याचाच पुरस्कार केला. स्वयंअध्ययनाला, विषय समजून घेण्याला, वेगळा विचार करण्याच्या त्याच्या वृत्तीला नेहमीच सतीशने आणि मी प्रोत्साहित केलं. मार्काकडे लक्ष देण्यापेक्षा विषयांचा सांगोपांग विचार, वाचन, अभ्यास करण्याला त्याला प्रवृत्त केलं. आज तो जेट एअरवेजमध्ये कमíशयल पायलट म्हणून रुजू होऊन कमांडरपदी पोहोचला आहे. कडक वर्दीचं मला जे आकर्षण होतं ते विक्रमच्या माध्यमातून असं पूर्ण होताना पाहण्याचा आनंद मला मिळाला. हा माझ्या आयुष्यातला जसा अत्युच्च आनंदाचा क्षण आहे, तसाच आणखी एक क्षण म्हणजे सतीशला मिळालेला पद्मश्री सन्मान. तसं पाहायला गेलं तर संगीताच्या क्षेत्रात त्याने आपल्या करिअरला उशिरा सुरवात केली होती. अखंड रियाज, सर्वस्व ओतून त्याने संतूरवादनासाठी दिलेलं योगदान, गुरूंचं अनमोल मार्गदर्शन या सगळ्याचा परिपाक म्हणजे पद्मश्री हा राष्ट्रीय सन्मान त्याला मिळताना पाहणं. त्या वेळी अतिशय ठामपणे मी घेतलेल्या निर्णयांचा, त्याला सर्वानी दिलेल्या साथीचा एक प्रकारे गौरवच झाला होता.’’
रेखाताईंचे ‘बेटर हाफ’ प्रसिद्ध संतूरवादक सतीश व्यास म्हणतात, ‘‘रेखाने अतिशय निगुतीने आमचं कुटुंब एकत्र बांधून ठेवलंय. इतकंच नाही तर माझ्या देशविदेशातील विद्यार्थ्यांचं घरी येणं-जाणं, राहणं, त्यांची सरबराई करणं हेसुद्धा ती इतक्या आपलुकीने करते की, आमचं कुटुंब अशा अर्थाने व्यापक होत गेलं आहे.’’
व्यावहारिक आयुष्यात एक स्त्री म्हणून जी काही नाती जन्माने, कर्माने जोडली जातात त्यांचा रंगतदार गोफ कसा गुंफता येईल, हेच पाहणाऱ्या रेखाताईंच्या सस्मित स्वभावाकडे पाहूनच गंभीर प्रश्न अल्पावधीतच सुटत असतील हे नक्की.
आनंदाचं लेणं.. आनंदाचं देणं
एचडीएफसी बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजर आणि मुंबईच्या क्लस्टर हेड रेखा व्यास यांनी आपलं करिअर निगुतीने सांभाळलंय. एकत्र कुटुंबाचा संसार सांभाळतानाच पद्मश्री सतीश व्यास यांचा सांगीतिक संसार आणि जेट एअरवेज कमांडरपदी असणारा लेक विक्रम यांचं अधिकारी आयुष्य यांचा ताळमेळ घालत स्वत:च्या कुटुंबाला अधिक व्यापक बनवलं. त्यांच्या व्यस्त करिअरविषयी..
First published on: 24-11-2012 at 04:12 IST
मराठीतील सर्व करिअरिस्ट मी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Careerist me