अभियंत्या असणाऱ्या रोहिणी खारकर यांनी ‘कार सायलेन्सर’ बनवून एका वेगळ्याच व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आज त्यांचं संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात आहे. अनेक अडचणींना संधीचं रूप देत आपल्या व्यवसायाला आकार देणाऱ्या तंत्रज्ञान उद्योजिका रोहिणी खारकर यांच्याविषयी..
अडचणींना संधी आणि संधीला आव्हान समजून ‘कार सायलेन्सर’ या अनोख्या व्यवसायात यशस्वी वाटचाल करणाऱ्या रोहिणी खारकर यांचे स्त्री तंत्रज्ञान उद्योजिका म्हणून वैशिष्टय़पूर्ण स्थान आहे. या व्यवसायात १९८० मध्ये पाऊल टाकणाऱ्या त्यांच्या रोहिणी इंजिनीयर्स या कंपनीने गेली ३२ वर्षे अनेक अडचणींचा निर्धारपूर्वक सामना करीत आपल्या कंपनीचे ‘(कार) सायलेन्सर’ बोधवाक्य सार्थ केलेच, शिवाय रोहिणी यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन व्यवसायात सहभागी झालेल्या आपल्या मुलांच्या व सुनांच्या सहकार्याने त्याला अत्याधुनिक स्वरूपसुद्धा दिले आहे.
ज्या १९७० च्या काळात मराठी माणसं उद्योग-व्यवसायात मोजकीच होती त्या काळात एखाद्या स्त्रीने अनोळखी व्यवसायाची पाऊलवाट निवडावी व तीसुद्धा इंजिनीयरिंगसारख्या क्षेत्रात म्हणजे धाडसच होते. मात्र पूर्वाश्रमीच्या रोहिणी टिपणीस (आता खारकर) यांनी ते आव्हान स्वीकारले. त्यांचे प्रेरणास्थान होते त्यांचे वडील सत्येंद्र टिपणीस. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास कार्यालयात सहसंचालक या पदावर असणाऱ्या सत्येंद्र यांच्याकडे इच्छुक व्यावसायिकांना व्यवसायक्षेत्र निवडीपासून ते तंत्रज्ञान व आर्थिक माहिती देण्याचा तसेच सरकारी सवलती, निर्यात याविषयी मार्गदर्शन करण्याचा विभाग होता. त्यामुळे आपणसुद्धा व्यवसाय सुरू करावा, असा त्यांचा विचार होता. १९७३ मध्ये त्यांची मुलगी रोहिणी इलेक्ट्रिकल इंजिनीअर झाली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या विचाराला मूर्त स्वरूप देण्याचे ठरविले..
याच काळातील केंद्र सरकारच्या लघुउद्योग विकासासाठी असलेल्या आकर्षक सवलती लक्षात घेऊन सत्येंद्रनी १९७६ मध्ये रोहिणीच्या नावावर ‘रोहिणी इंजिनीयर्स प्रा. लि.’ ही कंपनी स्थापन केली. परदेश निर्यातीचे सरकारचे प्रोत्साहक धोरण लक्षात घेऊन कंपनीने ‘काटेरी तारा’ (बार्बड वायर)चे उत्पादन पनवेल येथे सुरू केले. मात्र या काटेरी व्यवसायाच्या काळातच ‘काटेरी’ समस्या निर्माण झाली व ती म्हणजे उत्पादन निर्यातीकरिता असलेली सरकारी आर्थिक सहाय्य (कॅश क्रेडिट) सवलत बंद झाली. त्याचा व्यावसायिक तोटा म्हणजे केवळ देशभरातच उत्पादन विक्रीला प्राधान्य देणे भाग पडले. मात्र तेथे उत्पादक स्पर्धक अधिक असे चित्र असल्याने नाइलाजाने अन्य व्यवसायाचा विचार करावा लागला. त्यानुसार फॅब्रिकेशन हा पर्याय निवडून इतर व्यावसायिकांची यांत्रिक उत्पादने तयार करणे (फॅब्रिकेट) यावर भर देण्यात आला. मात्र वाईटातून चांगले होते, याचा प्रत्यय या व्यवसायात आला व तो म्हणजे ‘रोहिणी इंजिनीयर्स’च्या आजच्या प्रमुख उत्पादनाची कार सायलेन्सरची ती नांदी ठरली!
कार सायलेन्सरचे तंत्रज्ञान म्हणजे चार चाकी गाडीच्या चालू इंजिनचा आवाज रोखणे (ध्वनिरोधक तंत्रज्ञान). कार उत्पादन व्यवसायात या उत्पादनाची जरुरी असल्याने त्याला सतत मागणी असते. पुणे येथील किलरेस्कर कमिन्स कंपनीने त्यांच्या परदेशातून आयात केलेल्या तांत्रिक उत्पादनांचे भारतात निर्मिती करण्याचे धोरण अवलंबिले. याचा भाग म्हणून मोटारीच्या इंजिनमधील ध्वनिरोधक (कार सायलेन्सर) उत्पादनाची निर्मिती करण्याचे वैशिष्टय़पूर्ण फॅब्रिकेशनचे काम ‘रोहिणी इंजिनीयर्स’ला मिळाले.
फॅब्रिकेशन व्यवसायाच्या काळात १९७८-७९च्या सुमारास सत्येंद्र नोकरीतून निवृत्त झाल्याने रोहिणी यांना त्यांचे पूर्ण वेळ सहकार्य मिळू लागले. वेल्डर्स, फिटर्स यांच्या कामावर देखरेख करणे, कंपनी व्यवस्थापन तसेच इंजिनीयरिंग ड्रॉइंग तयार करणे यावर सत्येंद्र यांचा भर असे. त्या काळात संगणकयुक्त प्रणालीद्वारे- कॅड-कॅम पद्धतीने- ड्रॉइंग तयार करण्याची सुविधा नसल्याने स्वत: सत्येंद्र ती तयार करीत असत. यामुळे उत्पादन निर्मिती व इतर तांत्रिक गोष्टींबाबत रोहिणी पूर्ण वेळ देऊ शकल्या. प्रदीप खारकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना कुटुंबातील आणखी एक महत्त्वपूर्ण सहकारी मिळाला.
व्यवसायाचे वाढते स्वरूप लक्षात घेऊन रोहिणी इंजिनीअर्सने पुणे येथे १९९० मध्ये दुसरे व पुणे येथील पहिले उत्पादन केंद्र सुरू केले. मात्र या वाढत्या व्यवसायाला कामगार संघटनेच्या असहकाराने अडचणींना सुरुवात झाली. दुसरा मोठा आघात म्हणजे एका मोठय़ा कंपनीच्या सायलेन्सर उत्पादनात झालेली लक्षणीय घट. कुठल्याही व्यवसायाचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे केवळ एकाच मोठय़ा ग्राहकावर न विसंबणे हे होय. ‘रोहिणी इंजिनीयर्स’चा एकमेव मोठा ग्राहक असलेल्या या कंपनीने सायलेन्सर व मोटार धूर प्रदूषणरोधक उत्पादनांची निर्मिती करणारी अमेरिकेतील एक कंपनी खरेदी केली. त्याचा फटका ‘रोहिणी इंजिनीअर्स’ला बसला व त्यांच्या उत्पादनात ८० टक्क्य़ांवरून एकदम ३० टक्के इतकी घट झाली. परिणामी उत्पादन निर्मिती बंद करावी लागली. तसेच नुकसानभरपाई देऊन कामगार संख्या कमी करावी लागली. याच्या जोडीला पर्यायी व्यवसाय म्हणून सुरू केलेला वीजनिर्मिती कंपन्यांसाठीचा ट्रान्स्फॉर्मर निर्मिती व्यवसायसुद्धा तोटय़ात गेला. मात्र या अडचणींवर रोहिणी यांनी जिद्दीने मात केली. तज्ज्ञ कामगार कायदे जाणकारांच्या मार्गदर्शनानुसार कामगारविषयक तंटय़ातून त्यांनी मार्ग काढला. महत्त्वाचे म्हणजे या जिद्द व कार्यक्षमतेला सहकार्याचा हात पुढे आला तो ‘अॅटलास कॉपको’ व ‘किलरेस्कर न्यूमॅटिक्स’ यांचा. या कंपन्यांकडून लाखमोलाची कार सायलेन्सर उत्पादनाची ऑर्डर मिळाल्याने ‘रोहिणी इंजिनीअर्स’ कंपनीला पुन्हा एकदा स्थैर्य आले. याचा सुपरिणाम म्हणजे १९९८ मध्ये पुणे येथे दुसरे उत्पादन निर्मिती केंद्र सुरू झाले. पनवेल येथील कामगारांच्या कटू अनुभवामुळे कंपनीने तेथील उत्पादन पूर्ण बंद केले व २००४ मध्ये पुणे येथेच तिसरे युनिट सुरू केले.
व्यावसायिक समस्यांशी निर्धारपूर्वक यशस्वी सामना करणाऱ्या रोहिणी यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या त्यांच्या मोठय़ा मुलाने- गौतमने इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन केल्यावर परदेशगमनाचा आपला विचार बदलून कौटुंबिक व्यवसायात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. व्यवसायाचा सखोल अभ्यास करून व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून १९९७ पासून व्यवसाय विकसित करण्याच्या दृष्टीने तो मेहनत घेत आहे. रोहिणी यांनी १९८९ मध्ये व्हीजेटीआयमधून कॉम्प्युटर इंजिनीयरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर आपल्या व्यवसायात संगणकाचा वापर सुरू केला होता. गौतमच्या त्या विषयातील पदवीमुळे नवीन तंत्रज्ञानाचा फायदा कंपनीला मिळू लागला. गौतमच्या पावलावर वैवाहिक जीवनाचे पाऊल टाकणाऱ्या सी.ए. उत्तीर्ण त्याच्या पत्नीने- मेघाने- २००४ पासून टॅक्सेशन व ऑडिट या कंपनीच्या कामात तसेच सौरभ या दुसऱ्या मुलाने (२००६, कॉमर्स पदवी व एम.बी.ए.) आर्थिक व्यवहार, खरेदी, एच.आर.डी. हे विभाग व त्याची पत्नी माधवी (२००७, एम.बी.ए. मार्केटिंग) हिने उत्पादनाचे मार्केटिंग अशा महत्त्वपूर्ण व्यावसायिक शाखांवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला. विशेष म्हणजे प्रदीपचे वडील व रोहिणीचे सासरे मनोहर खारकर हेसुद्धा कंपनी कार्यात सहभागी झाले. कॅटर पिलर, केओईएल, एल अॅण्ड टी, जेसीबी इत्यादी मोठे ग्राहक कंपनीला मिळाले. तसेच डिझेल मोटर ध्वनी मोजण्याचे आधुनिक तंत्रज्ञान (सॉफ्टवेअर) कंपनीने विकसित केले. आज त्यांच कुटुंबच या व्यवसायात रमलय.
आंतरराष्ट्रीय व्यापारवृद्धीसाठीचा आयएसओ-९००१ च्या दर्जाची निर्मिती तसेच आयएसओ-३८३४ या दर्जानुसार असलेल्या कंपनीच्या निर्मितीक्षमतेमुळे ‘कॅटर पिलर’ या कंपनीने आपल्या उत्पादन निर्मितीचे कंत्राट २००५ पासून रोहिणी इंजिनीअर्सला दिले आहे.
‘रोहिणी इंजिनीअर्स’ची २०११ सालची वार्षिक उलाढाल १५ कोटी रुपये होती व ती २०१२-१३ मध्ये २५ कोटी रुपये करण्याचे त्यांनी ध्येय ठेवले आहे. त्या दृष्टीने कंपनीने एक पाऊल पुढे टाकले आहे व ते म्हणजे स्वत:च्या उत्पादनांची निर्मिती हे होय. मोटार धूर प्रदूषणरोधक उत्पादन (उदा. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर फॉर कार एक्झॉस्ट पोल्युशन कन्ट्रोल) ज्याला जागतिक स्तरावर वाढती मागणी आहे, त्याच्या संयुक्त उत्पादनासाठी एक जर्मन कंपनीबरोबर बोलणी चालू आहेत.
अनेक पुरस्कार मिळविलेल्या रोहिणीताईंना सामाजिक कार्याची आवड असल्याने गेली १५ वर्षे रोटरी क्लब, पुणे या संस्थेच्या त्या सक्रिय सभासद आहेत. तसेच सीकेपी इंडस्ट्री अॅण्ड कॉमर्स असोसिएशन, पुणे या संस्थेतसुद्धा त्या कार्यरत आहेत.
वडील सत्येंद्र टिपणीस यांनी सुचविलेली अनोळखी व्यावसायिक पायवाट रोहिणी व प्रदीप खारकर यांनी समर्थपणे रुळवली. आता युवा पिढीच्या विचाराने रोहिणी इंजिनीअर्स अधिकाधिक विकसित होत आहे.
…आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या
अभियंत्या असणाऱ्या रोहिणी खारकर यांनी ‘कार सायलेन्सर’ बनवून एका वेगळ्याच व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आज त्यांचं संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात आहे. अनेक अडचणींना संधीचं रूप देत आपल्या व्यवसायाला आकार देणाऱ्या तंत्रज्ञान उद्योजिका रोहिणी खारकर यांच्याविषयी..
आणखी वाचा
First published on: 05-11-2012 at 09:49 IST
मराठीतील सर्व करिअरिस्ट मी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Careerist me car silencer silent problem