न्यूट्रिशिअनमध्ये मास्टर्स केल्यानंतर स्पोर्ट्स मेडिसिनचा कोर्स करत असतानाच अचानक फिटनेसचं क्षेत्र समोर आलं आणि लीना मोगरे यांच्या करिअरचा मार्ग खुला झाला. प्रचंड मेहनतीच्या बळावर या मराठी स्त्रीने अगदी उच्चभ्रू वस्तीत ‘लीना मोगरे फिटनेस सेंटर’ सुरू केलं. आज चार ठिकाणी सुरू असणारे जिम् पुढच्या चार वर्षांत पन्नासपर्यंत वाढवायचा त्यांचा विचार आहे. काळाची पावलं ओळखून आपलं करिअर आखणाऱ्या फिटनेस व न्यूट्रिशिअन तज्ज्ञ आणि ‘लीना मोगरे फिटनेस सेंटर’च्या संचालिका लीना मोगरे यांच्या ‘फिट’ करिअरविषयी..
एका इंटरनॅशनल जिमनॅस्टिक ब्रॅण्डसाठी ‘जिम्’ चेन सुरू करून देण्याच्या अनुभव लीना मोगरे यांना खूप काही शिकवून गेला इतका की त्या अनुभवाचा फायदा घेत त्यांनी स्वत:ची जिम् सुरू केली. एक नाही तर तब्बल चार. अगदी मुंबईतल्या उच्चभ्रू ठिकाणी. आज फिटनेस आणि लीना मोगरे हे समीकरणच आहे.
या समीकरणाची सुरुवात कशी आणि कधी झाली, हे विचारता लीना मोगरेंनी सांगितलं, ‘‘मला वाटतं ते माझ्या रक्तातच असावं. माझे आजोबा वयाच्या सत्तराव्या वर्षांपर्यंत रोज शंभर सूर्यनमस्कार घालत. आजी तिच्या काळात हॉर्स रायिडग करत असे. तेव्हा हे गुण कुठे तरी माझ्यातही असणारच. खरं तर माझं शिक्षण वेगळ्याच क्षेत्रात झालंय. मी न्यूट्रिशिअनमध्ये मास्टर्स केलं आहे. त्यानंतर वर्षभर प्राध्यापकीदेखील केली, पण मला त्याची फारशी आवड नव्हती. काही तरी वेगळं करण्याक डे मन धावत होतं. त्यातच ओळख झाली ती स्पोर्ट्स मेडिसिनची. मग त्याचा कोर्स केला आणि ते करत असतानाच अचानक फिटनेसचं क्षेत्र समोर आलं.
अचानक म्हणजे?
‘‘स्पोर्ट्स मेडिसिन आणि फिटनेसचं नातं किती जवळचं आहे हे मी सांगायलाच नको. तेव्हा जिम् अॅक्टिव्हिटी आणि एरोबिक्सची आवड निर्माण झाली. तेव्हा आपल्याकडे एरोबिक्स शिकण्याची फारशी सोय नव्हती. म्हणून परदेशात जाऊन या विषयातलं प्रशिक्षण घेतलं.’’
प्रशिक्षण घेत असताना इथे येऊन जिम् अर्थात जिमनॅस्टिक (आधुनिक व्यायामशाळा) उभारण्याचा विचार होता?
‘‘असा काहीच विचार केला नव्हता. सुरुवातीला पर्सनल ट्रेनर आणि एरोबिक इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत असे. तो फक्त छंद होता. तेव्हा काही यात करियर वगरे करायचं मनात नव्हतं. पुढे विठ्ठल कामत यांनी फिटनेस क्लब सुरू करण्याविषयी सुचविले. त्यांच्या या म्हणण्यावर विचार करताना लक्षात आलं की, आपल्याकडे फिटनेसचं योग्य प्रशिक्षण मिळतच नाही. तेव्हा १९९४ मध्ये ट्रेनिज् प्रशिक्षण वर्ग सुरू केले. या कोर्समधून जवळपास दहा हजार मुलं उत्तीर्ण होऊन बाहेर पडली आहेत. त्यावरून माझ्या लक्षात आलं की, आपल्याला याच क्षेत्रात काही तरी करण्याची आवड आहे. म्हणून २००५ साली एका इंटरनॅशनल चेन ऑफ जिम्बरोबर मी जिम् सेटअपचं काम सुरू केलं. त्यांच्याबरोबर मी अकरा जिम् उभारून दिले.’’
त्यातूनच त्यांना दिशा मिळाली ती स्वत:चे जिम् सुरू करण्याची..
‘‘इतर लोक त्यांची जिम् चालवायला माझ्या नावाचा उपयोग करतायत असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा वाटलं की, आता आपण दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वत:चे जिम् सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत आणि माझ्या पहिल्या जिम्ची सुरुवात झाली.. ‘लीना मोगरे फिटनेस सेंटर’. माझं पहिलं जिम् तसं लहान जागेत सुरू केलं. फक्त ४००० स्क्वेअर फूट जागेत सुरू केलेल्या त्या जिम्ला खूप छान प्रतिसाद मिळाला. तब्बल एक हजार सदस्य झाले. तो माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. त्याचबरोबर ती शिकण्याची प्रक्रियाही होती.’’
त्याआधी त्यांच्याकडे जो जिम् सेटअपचा अनुभव होता तो फक्त जिम् सेटअप करून देण्यापर्यंतचाच होता.
त्या सांगतात, ‘‘इथे सेटअप, मार्केटिंग, त्यासाठी लागणारं आíथक पाठबळ, हे सगळं मी सांभाळलंय. त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर माझ्यासाठी तो संघर्षांचा काळच होता. पशाचा प्रश्न होताच, पण तुमची जर मेहनतीची तयारी असेल तर यश मिळतंच.’’
काय अडचणी आल्या पहिलं जिम् सुरू करताना?
‘‘अडचणी नव्हत्या. उलट आम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की जागा कमी पडू लागली. म्हणून मोठय़ा जागेत जिम् हलविण्याचा विचार करावा लागला.’’
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना यश मिळालं तेही भरघोस! त्या छोटय़ा जिम्मधून त्या वांद्रे येथील मोठय़ा जिम्मध्ये गेल्या.
‘‘मोठं सेटअप उभारायचं म्हणजे खर्चही तितकाच आला. त्या वेळी भांडवल उभं करणं ही एकच अडचण आमच्यापुढे होती, पण ती अडचण काही सोडवता येणार नाही इतकी मोठी नव्हती. बँकेने तर आम्हाला खूपच चांगली मदत केली आणि १२ हजार स्क्वेअर फूट जागेत आमचं जिम् उभं राहिलं. त्यानंतर शिवाजी पार्क, ठाणे, वाशीसारख्या ठिकाणी शाखा उघडल्या. पुढच्या चारेक वर्षांत ‘लीना मोगरे फिटनेस सेंटर’च्या पन्नास जिम् उभ्या राहतील. त्यासाठीचं नियोजनही सुरू आहे.’’
या यशामागे मेहनतीबरोबर आणखी काय असणं गरजेचं आहे?
‘‘मेहनतीबरोबरच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे. जिम्ची व्यवस्था, देखभाल, वातावरण, कर्मचारी वर्ग, त्यांचं प्रशिक्षण, मार्केटिंग, विक्री अशा एक ना दोन अनेक बाबी असतात, ज्यातली एकही बाजू लंगडी पडून चालत नाही. या सगळ्या बाबतीत अतिशय सजग राहावंच लागतं.’’
यात अपयश किंवा फसवले जाण्याचे अनुभवही तुम्हालाही आले?
‘‘व्यवसाय म्हटला की बरेवाईट अनुभव हे आलेच. तसे आम्हालाही आले आहेत. कोणी जिम् सुरू करायचं सांगून आयत्या वेळी पाऊल मागे घेतं. अशा वेळी मोठय़ा आíथक फटक्याला तोंड द्यावं लागलं किंवा कधी क र्मचारी, तर कधी एखाद्या सदस्याकडून फसविलं जाण्याचाही अनुभव आला आहे. माझा नवरा निखिल व्यवस्थापनाची बाजू सांभाळतो. तो काही काळापूर्वी चार महिने गंभीर आजाराने हॉस्पिटलमध्ये होता. त्या वेळी आमच्याकडे काही चुकीच्या गोष्टी झाल्या. हे अनुभव खूप शिकवूनही जातात. आता मी कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवू शकत नाही. म्हणतात ना, एकदा तोंड पोळलं की माणूस ताकही फुंकून पितो तसंच झालं आहे माझं.’’
स्वत:चा ब्रॅण्ड किंवा नाव जपण्यासाठी किती जागरूक असावं लागतं?
‘‘अरे बापरे! खूपच. आमच्या जिम्चे जे नियम आहेत किंवा ज्या पॉलिसीज् आहेत, त्या अतिशय काटेकोरपणे पाळल्या गेल्याच पाहिजेत यावर मी काटेकोरपणे लक्ष देते. हे फक्त कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत नाही तर सदस्यांच्या बाबतीतदेखील आहे. आमच्याकडे कोणत्याही स्तरावरचा माणूस असो, मग तो परदेशी ब्रॅण्डच्या गाडीतून येत असेल किंवा चालत येत असेल, आमच्यासाठी सारखाच असतो. आमचं जिम् रात्री ११ वाजता बंद होणार म्हणजे होणार. त्याला कोणीही अपवाद ठरू शकत नाही, तसंच व्यायाम करताना मोबाइल बंदी आहे. हा नियम कोणी मोठा राजकारणी आला किंवा फिल्म स्टार आला तरी शिथिल होत नाही.’’
एक स्त्री म्हणून या क्षेत्रात उभं राहताना काय अडचणी आल्या?
‘‘खरं तर हे क्षेत्र पुरुषांची मक्तेदारी असणारं आहे. इथे मी येते आणि इतकी यशस्वी होते याचं अनेकांना आश्चर्य वाटतं, जे मला बोलूनही दाखवलं गेलं आहे; पण मला वाटतं की स्वत:वर विश्वास असेल तर स्त्री असो वा पुरुष काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पडेल ते काम करण्याची तयारी पाहिजे. जिम्ची स्वच्छता नीट केली आहे की नाही हे पाहाणं. कर्मचारी असो वा सदस्य, दोघांशीही नीट व्यवहार करता आलंच पाहिजे. मी स्त्री आहे म्हणून मी करणार नाही किंवा करू शकणार नाही असा विचारच मी कधी केलेला नाही.’’
चांगलं जिम् म्हणजे तुमच्यासाठी काय?
‘‘जिम्मध्ये येणाऱ्याला ते आपलं दुसरं घर वाटलं पाहिजे. जिम्मध्ये माणसाला घरातल्या कपडय़ांवर यायला अवघड वाटलं नाही पाहिजे. जिम् खूप सुंदर, सजलेलं असण्यापेक्षा तिथलं वातावरण खेळीमेळीचं असणं जास्त गरजेचं आहे. तक्रार करणाऱ्याचं आम्ही नेहमीच स्वागत करतो. त्यामुळे आम्हाला आमच्या चुका कळतात. हे माझ्या दृष्टीने चांगलं जिम्.’’
तुमची फिटनेसची व्याख्या काय? तुम्ही काय करता फिटनेससाठी?
‘‘फिटनेस म्हणजे माझ्यासाठी सकाळी उठताना आणि रात्री झोपताना माणसानं हसतमुख असलं पाहिजे, कोणत्याही वेदनेविरहित. माझा दिवस सकाळी साडेसहा वाजता सुरू होतो तो पॉवर योगाने. त्यानंतर मी ज्या जिम्मध्ये असेन तिथे माझं तासभराचं वर्कआऊट करते.’’
तुमच्या कामाचे काही ठराविक तास किंवा इतक्या वाजताच घरी परत जाता येईल असंही नाही. त्यासाठी घरच्यांचा पािठबा किती गरजेचा असतो?
‘‘घरच्यांच्या पािठब्याशिवाय शक्यच नाही. लग्न झाल्यावर सासुसासऱ्यांचा पूर्ण पािठबा होता. माझ्या सासुबाई ओएनजीसीमध्ये उपसंचालक होत्या. साहजिकच त्यांना अवेळी काम करणं हे काही नवीन नव्हतं, तर माझे सासरे बॉडी बिल्डर होते, त्यामुळे त्यांनाही व्यायामाचं महत्त्व माहिती होतंच. निखिल मोगरे म्हणजे माझे पती तर मला माझ्या कामात पूर्ण सहकार्य करतात. माझ्या मुलाची- अर्जुनची काय आवड आहे हे अजून कळत नाही. आत्ता तरी त्याला सिनेमालेखनात वगरे इंटरेस्ट आहे. बघू तो पुढे काय करतोय ते.’’
तुमच्याकडून इतके जण शिकून जात असतील त्यांना किंवा ज्यांना नवीन जिम् सेटअप करायचं असेल त्यांना काय सल्ला द्याल?
‘‘मेहनत अत्यावश्यक, खोटं वागू नका, फसवेगिरी करू नका, तुमचं ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने काम करा. नेहमी अपडेट राहा. त्यासाठी तुमच्या व्यवसायासंबंधी वाचन करा, चर्चा करा. देश-परदेशात कुठेही जाल तर आपल्या क्षेत्रात नवीन काय आलंय याची माहिती मिळवा. लोकांशी, मग ते तुमचे क्लाएंट असोत वा नसोत, चांगला संपर्क ठेवणं अतिशय गरजेचं आहे.’’
chaturang@expressindia.com