लग्न ठरवण्याचे निकष कोणते? मुला-मुलींना नेमकं काय हवं असतं लग्नात? सांपत्तिक स्थिती चांगली हवी इथपर्यंत ठीक, परंतु ठरावीक स्टेटसची नोकरी हवी, घरातल्या मोठय़ांची जबाबदारी नको हे निकष असू शकतात? मुख्य म्हणजे हे त्या मुला-मुलींना स्वत:ला हवं असतं की त्यांचे बोलविते धनी त्यांचे आईबाबा असतात?
एक :
मुलाचे वडील
आज सकाळी सकाळी मी एका ठिकाणी फोन केला. ‘‘आपण तेजाचे वडील का? अहो, तुमची मुलगी लग्नाची आहे ना? मी त्यासाठीच फोन केलाय.’’
‘‘हो हो. पण थांबा हं. आमच्या हिच्याकडे देतो फोन. कारण ते डिपार्टमेंट तिच्या अखत्यारीत येतं.’’ असं म्हणून त्यांनी फोन सौ.कडे दिला असावा. ‘‘हं हं, बोला बोला, मी तेजूची आई बोलतेय. पण तुमचा मुलगा गोरा आहे ना? कारण आमची तेजू दिसायला फार सुरेख आहे हं आणि शिवाय चांगला उंचिनच आहे ना? कारण तिला बुटकी मुलं अजिबात आवडत नाहीत आणि तुमची सíव्हस पेन्शनेबल आहे ना? हो, अहो, नंतर भार नको पडायला, आणि भाऊ किंवा बहीण आहे ना मुलाला? कारण आई-वडिलांचा भार नंतर एकाच मुलावर येतो.
बरं दुसरं महत्त्वाचं विचारायचंय की मुलाचं स्वत:चं घर आहे ना? आताच्या काळात घर हवंच हो! आयटी, इंजिनीअर आहे ना? म्हणजे पन्नास हजारपेक्षा जास्त पगार असेल ना? तरच भागतं हो या मुलांचं. महागाई किती वाढली आहे? आणि माझी मुलगी म्हणून नाही सांगत, पण ती इतकी हुशार आहे, कथ्थक विशारद आहे. त्यासाठी तिला पाठिंबा हवा हं. पुढेमागे तिला स्वत:चे क्लासेस सुरू करायचे आहेत. त्यासाठी जागाही लागेल.’’ तेजूची आई थांबायला तयार नव्हती.
‘‘मी नंतर करतो तुम्हाला फोन.’’  सांगून मी फोन ठेवून दिला.
ही सगळी हकीकत माझी पत्नी अलकाला सांगितली. तर म्हणाली, ‘‘कमाल आहे. आपली मुलाची बाजू असून एका मुलीची आई असं कसं काय बोलू शकते? मला तर लग्न उत्तम करून देणारी पार्टी हवीय. वरमाय म्हणून मिरवायची एव्हढी एकच संधी आहे. कारण दुसरी तर मुलगीच आहे आपल्याला. आणि आपला मुलगा म्हणजे सोनं आहे. चांगला शिकलेला, दिसायला छान, पगार चांगला, काय कमी आहे आपल्यात, म्हणून एवढं ऐकून घ्यायचं?’’
मी मात्र या फोननंतर अंतर्मुख झालो. फक्त पगार, उंची, गोरेपण, स्वत:चं घर एवढय़ाच गोष्टी लग्नासाठी महत्त्वाच्या आहेत? रसिक, सर्व माणसांचा माणूस म्हणून आदर करणारा, कोणत्याही गोष्टीत काम करताना स्वत:ला झोकून देऊन काम करणारा, निव्र्यसनी, स्वत: मिळवलेल्या पशातून दरमहा बचत करणारा, वाचनाची अत्यंत आवड असल्याने प्रगल्भ असणारा, तसंच एखादी कला आहे का त्याच्याकडे? अशा कोणत्याच गोष्टी जाणून घ्याव्याशा का वाटल्या नाहीत त्यांना? शिवाय ही तेजा तर फक्त बी.ए. झाली आहे आणि तिला पगार फक्त चार हजार रुपये आहे. तरी तिच्या अशा अटी? का या साऱ्या अटी तिच्या आईच्या असतील?
माझा मुलगा गेल्या वर्षी इंजिनीअर झाला. नोकरी लागून अवघं दीड वर्ष झालंय त्याला, इतक्यात कसं होऊ शकतं स्वत:चं घर ? आणि शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज परत करायचं आहे अजून.
मी आणि अलका दोघांनी नोकरी करून आमचं छान दोन बेडरूमचं घर उभं केलं होतं. शून्यापासून सुरुवात होती आमची. एक मुलगा इंजिनीअर झाला, दुसरी धाकटी मुलगी पुढच्या वर्षी डॉक्टर होईल. या मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला किती काटकसरीत राहावं लागलं. आमची हौसमौज सगळी बाजूला ठेवावी लागली. कितीतरी वेळा कर्ज काढावं लागलं. इतके दिवस माझा मला अभिमान वाटत होता. दोन्ही मुलं शिकली म्हणून. माझं शिक्षण तसं बेतास बात होतं. पण आजच्या या फोनमुळे हा माझा अभिमान क्षणात गळून पडला.
अशाच प्रकारचे अनुभव मी गेल्या काही दिवसांत घेतले आहेत. मुलाचं लग्न किती अवघड आहे याचा अनुभव मला पदोपदी येत आहे आणि त्यामुळे मन निराशेने भरून गेलंय.

दोन :
मुलीची आई
मला सुजाताचा खूप अभिमान वाटला होता. वाटलं होतं माझे संस्कार फळाला आले. पण गेले काही दिवस मात्र मी चिंतेत आहे. सुजाताची आई म्हणून मला तिची काळजी वाटते. सुजाताचं स्थळ कितीतरी मुलं नाकारत आहेत. काही महिन्यांपूर्वी माझी लेक सुजाता आणि माझा भाऊ यांच्यातला संवाद जसाच्या तसा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो.
‘‘तुला टीचिंग लाइनमध्ये जायचंय? अग आयटीमध्ये गेलीस तर धो धो पसे कमावशील. हे कुठले भिकेचे डोहाळे?’’
‘‘नाही पण मामा, मला मुलांना शिकवायचं आहे. मला प्रोफेसर व्हायचं आहे. बाबा वर वर चढत मुख्याध्यापक झाले. आईपण शाळेत शिक्षिका आहे. आईला केवढा मान आहे. गेल्या महिन्यात आम्ही एके ठिकाणी गेलो होतो, तिथे बाबांचा एक विद्यार्थी भेटला होता, आता डॉक्टर झाला आहे. भर रस्त्यात त्यानं बाबांना वाकून नमस्कार केला. तुमच्यामुळेच मी डॉक्टर झालो सर, असंही म्हणाला तो. गेली कित्येक वर्षे आई-बाबा विद्यादानाचं काम करतायेत.’’
‘‘अगं पण पशाशिवाय या जगात कोणी विचारत नाही तुम्हाला. इतकी वर्षे आई-बाबांनी नोकरी केली, पण स्वत:चं घर नाही घेऊ शकले ते.’’
‘‘हो, तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे. पण माझी महत्त्वाकांक्षा प्रोफेसर होण्याचीच आहे.’’ इति सुजाता.
पण मामा जे म्हणत होता तेच मुलांच्या आया म्हणत आहेत. पण परवाच एक मुलगा तिला भेटायला तयार झाला. पण त्याची अट होती की पहिली भेट बाहेरच व्हायला पाहिजे. खरंतर माझा या गोष्टीला विरोध आहे. पहिली भेट घरी झाली की आमच्या दृष्टिकोनातूनपण मुलाशी बोलता येतं. शिवाय त्याचे आई-वडीलही असतात त्या वेळी. एकूणच घरची संस्कृती समजते. पण या मुलाची ती अट असल्याने मी फारसा विरोध केला नाही.
सुजाता आणि तो दोघेही भेटले बाहेर. पण या मुलानेही तिला मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करायचा आग्रह केला. ती म्हणाली, ‘‘तुला आधीच माहीत होतं ना मी शिक्षण क्षेत्रात आहे. तू भेटायला का आलास?’’
तो म्हणाला, ‘‘मी कदाचित तुला आग्रह केला आणि तू तुझा विचार बदललास तर? मला तू पसंत आहेस. आपण पुढे जाऊ शकतो. आम्ही कॉलेजमध्ये असताना तरुण प्रोफेसरची इतकी टिंगल करायचो, आणि मॅडमवर तर कितीतरी मुलं लाइन मारतात. हे मला माहीत आहे. तर अशी मुलगी कशी चालेल मला?’’
स्पष्ट नकार देऊन सुजाता घरी आली आणि तेव्हा तिचा कमालीचा संताप झाला होता.
माझ्या एका मत्रिणीची मुलगी वकील आहे, तर तिचेही लग्न जमत नाहीये. तिचा वकिलीचा पेशा लग्नाच्या आड येतोय. एका मुलाने तिला तोंडावरच सांगितलं की वकील मुली नेहमी कायद्याच्या भाषेत बोलतात, आणि हल्ली सगळे कायदे महिलांच्या बाजूचे आहेत. तेव्हा हे स्थळ नकोच. मग तिने त्याला विचारले, ‘‘भेटायला कशाला आलास?’’ त्यावर तो थंडपणे म्हणाला, ‘‘तुझे कंपनी कायद्यात स्पेशलायझेशन आहे, असं माझा ग्रह झाला होता म्हणून आलो. तरीही माझे एकूण वकील क्षेत्राबद्दल फारसे चांगले मत नाही.’’ हे ऐकून गप्प बसणारी ती नव्हती. लगेच फाडफाड बोलली, ‘‘तुझे जर हे मत होते तर मला भेटायचेच कशाला? टाइमपास? का मला भेटून हेच सांगायचे होते? तुम्हा मुलांचे काही खरे नाही. स्वत: काही प्रोफाइल वाचणार नाहीत. मग आई म्हणाली भेट हिला, की भेटणार. सगळे ममाज् बॉइज!’’
असे वागणे माझ्या सुजाताला काही कधी जमणार नाही. ती राग काढणार तो आमच्यावर किंवा स्वत:वर.
 समाजाची तथाकथित उच्चशिक्षित वर आणि त्यांचे पालक यांची मानसिकता पाहून अगदी कीव करावीशी वाटते. वाटते, तुम्ही ज्या डिग्य््राा मिळवल्यात त्यात तुमच्या शिक्षकांचा काहीतरी वाटा होता ना? सुजाता तर एका ध्येयाने भारलेली आहे. कसं सांगू तिला की लग्नासाठी तुझी ध्येय बदल. काय करू काही सुचत नाहीये..
एकदा वाटते आपणच मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. लागू दे वेळ. थांबावे तिला हवा तसा जोडीदार मिळेपर्यंत.
पण वय वाढत आहे. आताच थोडी थोराड दिसायला लागली आहे. वजनही वाढले आहे. त्यात सासूबाई म्हणतातच, सुजाताचं लग्न झाले की मी डोळे मिटायला मोकळी..
दोन्ही बाजूने विचार येतात. काय करावं, हाच खरा प्रश्न आहे.    
    

Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
children passport loksatta news
पालकांच्या वादात अल्पवयीन मुलांना पारपत्रापासून वंचित ठेवता येणार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा
mentally challenged woman , mother,
आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न
Minor girls unsafe in Raigad district 74 rape cases
रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुली असुरक्षित; वर्षभरात ७४ प्रकरणे उजेडात
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य,उच्च न्यायालयाची टिप्पणी; मुलगी गतिमंद असल्याच्या दाव्यावरूनही ताशेरे
Couples who are ineligible for marriage due to age restrictions are eligible to live-in
वयाच्या अटीमुळे लग्नास अपात्र जोडपे लिव्ह-इन करता पात्र!
young man killed brother over illicit relationship with sister in law
वहिनीचे प्रेम मिळविण्यासाठी युवकाने केला भावाचा खून…
Story img Loader