एक :
मुलाचे वडील
आज सकाळी सकाळी मी एका ठिकाणी फोन केला. ‘‘आपण तेजाचे वडील का? अहो, तुमची मुलगी लग्नाची आहे ना? मी त्यासाठीच फोन केलाय.’’
‘‘हो हो. पण थांबा हं. आमच्या हिच्याकडे देतो फोन. कारण ते डिपार्टमेंट तिच्या अखत्यारीत येतं.’’ असं म्हणून त्यांनी फोन सौ.कडे दिला असावा. ‘‘हं हं, बोला बोला, मी तेजूची आई बोलतेय. पण तुमचा मुलगा गोरा आहे ना? कारण आमची तेजू दिसायला फार सुरेख आहे हं आणि शिवाय चांगला उंचिनच आहे ना? कारण तिला बुटकी मुलं अजिबात आवडत नाहीत आणि तुमची सíव्हस पेन्शनेबल आहे ना? हो, अहो, नंतर भार नको पडायला, आणि भाऊ किंवा बहीण आहे ना मुलाला? कारण आई-वडिलांचा भार नंतर एकाच मुलावर येतो.
बरं दुसरं महत्त्वाचं विचारायचंय की मुलाचं स्वत:चं घर आहे ना? आताच्या काळात घर हवंच हो! आयटी, इंजिनीअर आहे ना? म्हणजे पन्नास हजारपेक्षा जास्त पगार असेल ना? तरच भागतं हो या मुलांचं. महागाई किती वाढली आहे? आणि माझी मुलगी म्हणून नाही सांगत, पण ती इतकी हुशार आहे, कथ्थक विशारद आहे. त्यासाठी तिला पाठिंबा हवा हं. पुढेमागे तिला स्वत:चे क्लासेस सुरू करायचे आहेत. त्यासाठी जागाही लागेल.’’ तेजूची आई थांबायला तयार नव्हती.
‘‘मी नंतर करतो तुम्हाला फोन.’’ सांगून मी फोन ठेवून दिला.
ही सगळी हकीकत माझी पत्नी अलकाला सांगितली. तर म्हणाली, ‘‘कमाल आहे. आपली मुलाची बाजू असून एका मुलीची आई असं कसं काय बोलू शकते? मला तर लग्न उत्तम करून देणारी पार्टी हवीय. वरमाय म्हणून मिरवायची एव्हढी एकच संधी आहे. कारण दुसरी तर मुलगीच आहे आपल्याला. आणि आपला मुलगा म्हणजे सोनं आहे. चांगला शिकलेला, दिसायला छान, पगार चांगला, काय कमी आहे आपल्यात, म्हणून एवढं ऐकून घ्यायचं?’’
मी मात्र या फोननंतर अंतर्मुख झालो. फक्त पगार, उंची, गोरेपण, स्वत:चं घर एवढय़ाच गोष्टी लग्नासाठी महत्त्वाच्या आहेत? रसिक, सर्व माणसांचा माणूस म्हणून आदर करणारा, कोणत्याही गोष्टीत काम करताना स्वत:ला झोकून देऊन काम करणारा, निव्र्यसनी, स्वत: मिळवलेल्या पशातून दरमहा बचत करणारा, वाचनाची अत्यंत आवड असल्याने प्रगल्भ असणारा, तसंच एखादी कला आहे का त्याच्याकडे? अशा कोणत्याच गोष्टी जाणून घ्याव्याशा का वाटल्या नाहीत त्यांना? शिवाय ही तेजा तर फक्त बी.ए. झाली आहे आणि तिला पगार फक्त चार हजार रुपये आहे. तरी तिच्या अशा अटी? का या साऱ्या अटी तिच्या आईच्या असतील?
माझा मुलगा गेल्या वर्षी इंजिनीअर झाला. नोकरी लागून अवघं दीड वर्ष झालंय त्याला, इतक्यात कसं होऊ शकतं स्वत:चं घर ? आणि शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज परत करायचं आहे अजून.
मी आणि अलका दोघांनी नोकरी करून आमचं छान दोन बेडरूमचं घर उभं केलं होतं. शून्यापासून सुरुवात होती आमची. एक मुलगा इंजिनीअर झाला, दुसरी धाकटी मुलगी पुढच्या वर्षी डॉक्टर होईल. या मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला किती काटकसरीत राहावं लागलं. आमची हौसमौज सगळी बाजूला ठेवावी लागली. कितीतरी वेळा कर्ज काढावं लागलं. इतके दिवस माझा मला अभिमान वाटत होता. दोन्ही मुलं शिकली म्हणून. माझं शिक्षण तसं बेतास बात होतं. पण आजच्या या फोनमुळे हा माझा अभिमान क्षणात गळून पडला.
अशाच प्रकारचे अनुभव मी गेल्या काही दिवसांत घेतले आहेत. मुलाचं लग्न किती अवघड आहे याचा अनुभव मला पदोपदी येत आहे आणि त्यामुळे मन निराशेने भरून गेलंय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा