मनातली खंत आणि त्यातून उगम पावणारी प्रेरणा व्यक्तीच्या हातून केवढं काम घडवू शकते, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कांचन नायकवडी. वडिलांच्या मृत्यूने त्यांना एका नव्या व्यवसायाचा शोध घ्यायला भाग पाडले. वैद्यकीय क्षेत्रातील कोणताही अनुभव गाठीशी नसताना केवळ गरजूंसाठी काहीतरी ठोस करण्याच्या जिद्दीनं त्यांनी उभारलेल्या प्रिव्हेन्टिव्ह हेल्थ चेकअप क्षेत्रातील आघाडीचं नाव असलेल्या ‘इंडस हेल्थ’नं आरोग्य सेवेचं एक तप पूर्ण केलं. त्यांच्या करिअरविषयी..

वडिलांचं अचानक निधन झालं त्यावेळी मी गरोदर होते. ते कशानं गेले हे त्यावेळी माझ्यापासून लपविलं गेलं. तो आघात मी सहन करू शकणार नाही असं वाटल्याने असेल कदाचित. पण नंतर कळलंच, वडील कर्करोगाने गेले.  इतरांना कळलं तेव्हाही तो होता तिसऱ्या, शेवटच्या टप्प्यावर..
दशकापेक्षाही जुना भूतकाळ उलगडताना कांचन यांच्या आवाजातला सल आजही गहिरा   होता. वडिलांना असलेला कर्करोग वेळीच लक्षात न आल्याने पितृत्वाचे छत्र अकाली हिरावले गेले ही ती सल. आजही ठसठसणारी. वयाची पन्नाशी गाठलेल्या वडिलांची नियमित आरोग्य चाचणी केली असती तर आजही ते आपल्याबरोबर असते, असं त्यांना वाटत राहिलं आणि या विचारातूनच जन्माला आला ‘इंडस हेल्थ’ समूह.
 २००० साली सुरू झालेल्या या आजारपूर्व निदान चाचण्या करणाऱ्या ‘इंडस हेल्थ’ने हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली आणि त्यांची विविध ठिकाणी शृंखलाच निर्माण झाली. त्यातून निर्माण झालेला हा समूह आज १०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा झाला आहे. कांचन यांच्यामार्फत मुहूर्तमेढ रोवलेली ‘इंडस हेल्थ’ ही आजारपूर्व निदान चाचण्यांची मोठी साखळी असलेली भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. एरवीच्या पॅथोलॉजी लॅब आणि मानांकित रुग्णालयांमधील विविध रोगनिदान चाचण्यांच्या तुलनेत येथील सेवा माफक असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
 कंपनीच्या व्यासपीठावरील आरोग्य निदान सेवा पुण्यात लोकप्रिय असलेल्या ‘सह्याद्री’च्या सर्व रुग्णालयांमधून उपलब्ध आहेत. याशिवाय त्या – त्या शहरातील निवडक रुग्णालयांमध्येही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपोलो, वोकार्ड, रेलिगेअर या नामांकित रुग्णालयांमध्येही ‘इंडस हेल्थ’मार्फत आरोग्य निदान केले जाते. शिवाय जोडीला वैयक्तिक वैद्यकीय व्यावसायिकांचे (डॉक्टर) निदान पूर्व व उत्तर मार्गदर्शन केले जाते. इंडस हेल्थ प्लस प्रायव्हेट लिमिटेडच्या रूपात एक संचालक म्हणून हा सर्व पसारा रेटून नेणाऱ्या कांचन नायकवडी यांच्या खात्यात अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार जमा आहेत.
इंडस हेल्थ हे प्रिव्हेन्टिव्ह हेल्थ चेकअप क्षेत्रातील आजवरचं आघाडीचं नाव. पुण्यातल्या मॉडेल कॉलनीत इंडस हाऊस हे कंपनीचं मुख्यालय आहे. काही महिन्यांमध्ये आकारास आलेल्या ‘इंडस हेल्थ’चा प्रवास कांचन या अगदी काल झाल्याप्रमाणे मांडू लागतात. त्या सांगतात, ‘‘वडील रमेश बापट यांच्या कर्करोगामुळे झालेल्या अकाली मृत्यूमुळे आपल्याला या व्यवसायाची प्रेरणा मिळाली. त्याला मूळचे सीए असलेल्या पती अमोल यांची साथ, तर दोन मुलींची करिअरिस्ट आईबद्दल असलेली तेवढीच आपुलकी याची किनारही लाभली. यामुळेच आपण आज व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा अथवा पुरस्काराचा मान राखण्यासाठी साता समुद्रापार पोहोचू शकतो. प्रसंगी मानाच्या, कामाच्या ठिकाणी अनेकदा मुलींची आवर्जून असलेली उपस्थिती त्यांच्या कौतुकात भरच टाकत असते. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई अशा त्रिकोणात होणारा नित्याचा प्रवास तर मला कधीच कंटाळवाणा करीत नाही.’’
आज ‘इंडस हेल्थ’ची आठ जणांची टीम आहे. हे आठ म्हणजे कांचन-अमोल आणि त्यांचा महाविद्यालय स्तरावरचा मित्र परिवार. विशेष म्हणजे ज्यांच्या प्रमुख पुढाकाराने ‘इंडस हेल्थ’ अस्तित्वात आले त्या कांचन या त्याच्या संचालक आहेत. पुण्यातून सुरू झालेला ‘इंडस’चा प्रवास दिल्लीपर्यंत आणि आता संपूर्ण देशव्यापी होत आहे.
६ ऑगस्ट १९७२ चा जन्म असलेल्या कांचन यांचे शालेय शिक्षण उटीसारख्या निसर्गसंपन्न वातावरण झाले आहे, तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आहे. १९९३ मध्ये त्यांनी ‘ट्रेड विंग’चे मार्गदर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. इंडसमध्ये त्या आज उत्कृष्ट खजांची व्यवस्थापक, मनुष्यबळ विकास संचालक तसेच कर्मचाऱ्यांप्रती उत्तम प्रशासक आणि मैत्रीपूर्ण मालक आहेत. येथे त्यांना एक महिला असल्याचा चांगला फायदा होतो. त्या म्हणतात, एकाचवेळी अनेक कामे करण्याची आमच्या अंगी असलेली कला मला इथे उपयोगी पडते. शिवाय एक कर्मचारी म्हणून त्यांच्या समस्या, विशेषत: महिला कर्मचाऱ्यांची घर व नोकरी दरम्यानची तारेवरची कसरत मीच चांगली अनुभवू शकते.
एक स्त्री म्हणून गृहिणी आणि करिअरिस्ट यांच्याकडे त्या समानतेने पाहतात. संसारासाठी आपल्या आवडी-निवडी, शिक्षण, कौशल्य याची कुर्बानी त्यांना मुळीच अभिप्रेत नाही. सर्वसामान्य गृहिणी-कर्मचारी म्हणून त्या कार्यालयातल्या अनेक स्त्रियांचे दाखले देतात. पण नायकवडी कुटुंबातील एक गृहिणी आणि ‘इंडस हेल्थ’च्या प्रमुख या नात्याने त्यांनाही घर-व्यवसाय या ध्रुवांवर करावी लागणारी कसरत त्या विसरत नाहीत. ‘परदेशातील एका परिषदेला मला उपस्थित राहणे गरजेचे होते. हाही व्यवसायाचाच एक भाग होता. मात्र तेव्हा माझी मुलगी अवघ्या महिन्याचीच होती. पण माझा नाईलाज झाला. तरीदेखील मी या परिषदेला जाऊ शकले. कारण माझी आई यावेळी माझ्यामागे उभी राहिली. ‘इंडस हेल्थ’ची प्रमुख म्हणून मला असे काही इव्हेन्ट नाकारता येत नाहीत. पण वेळोवेळी माझे कुटुंब पुढे येतं. मग पती असो किंवा सासरची इतर मंडळी.’
कांचन म्हणतात, वडिलांच्या मृत्यूने मला वेगळा विचार करायला लावला. संकटांशी सामना करणं मी यातून शिकले. त्यातूनच ‘इंडस हेल्थ’ जन्माला आली. माफक दरात गुणवत्तापूर्ण सेवा हेच आमचे ब्रीद आहे आणि ते अखेरपर्यंत राहील. आज ३.२ कोटी लोक हे दारिद्र्यरेषेखाली आहेत; तर त्यांचा ७० टक्के खर्च आरोग्याशी संबंधित घटकांवर होतो. ५० टक्क्यांहून अधिक मृत्यूमागील कारण हे हृदयविकार, मधुमेह, कर्करोग हे असते. आज आपण आपल्याच प्रकृतीबाबत जागरूक नाही. मला कशाला काही होतंय, या भ्रमात ऐनवेळी उद्भवणाऱ्या संकटांकडे टाळलं जातंय. वेळेपूर्वी निदान केलं असल्यास प्रसंगी बळावणाऱ्या आजारावरही मात करता येते.
आपल्याच शरीराबाबत काळजी घेण्याच्या शिक्षणात, त्याबाबतच्या प्रसारात आपणच कमी पडतो, याची खंत कांचन यांना आहे. दसरा-दिवाळीला होणाऱ्या वस्तू, कपडय़ांच्या खरेदीसाठी जागरूक असलेले आपण अशा निमित्तानेही स्वत:ची काळजी घेणार आहोत की नाही, असा सवालच त्या करतात. पुन्हा ‘इंडस हेल्थ’कडे वळताना त्या म्हणतात, माझा व्यवसाय, माझे उत्पादन हे एक ‘पुश प्रॉडक्ट’ आहे. तुम्ही त्याबद्दल ग्राहकांना महत्त्व पटवून देऊ शकता; मात्र त्याचा आग्रह लादता येणार नाही. शेवटी हे प्रत्येकाच्या भल्यासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी फायद्याचे आहे. लोकांच्या लक्षात आणून द्यावयाची ही बाब आहे. तुमच्या दीर्घायुष्यासाठी हा एक गरजेचा पर्याय आहे. आज माझ्या कुटुंबातही प्रत्येकाची नियमित आरोग्य चाचणी होते. गंभीर आजारासारखं येणारं एखादं संकट संपूर्णत: धुडकावून लावता येईल की नाही, हे सांगता येत नाही; हा. पण त्याचा जिकिरीने सामना करण्याचे बळ यामुळे नक्कीच येतं.
या अनोख्या व्यवसायातील आव्हाने, यावर बोलताना कांचन म्हणतात की, आम्ही जेव्हा हा व्यवसाय सुरू केला तेव्हा फार कुणी या क्षेत्रात नव्हते. त्यामुळे कुणाला ‘फॉलो’ करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे सुचत गेलं तसा व्यवसाय करीत गेलो. अडचणी आल्या तशा त्यावर मार्गही काढत गेलो. आज दहा वर्षांनंतरही नवे शिकत जातो, नव्या कल्पना राबवत जातो. त्यात सुधारणेला वाव असतो. अनुभव, चर्चा, मार्गदर्शन यांचं ‘अपग्रेडेशन’ही असतं. आपल्या या व्यवसायास कुणी स्पर्धक नसल्याने अनुकरण करता न येणे हे त्या एक आव्हान मानतात; संकटे नाहीत.
मुंबई, पुणे, नगर, अकोल्यासह महाराष्ट्रातील १४ शहरवजा जिल्ह्य़ांमध्ये कंपनीची कार्यालये आहेत. शिवाय शेजारच्या गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेशमधील अनेक शहरांपासून ते थेट दिल्ली-एनसीआरमध्येही (नॅशनल कॅपिटल रिजन) त्यांनी पाय रोवले आहेत. आज अपोलो हॉस्पिटलनेही ‘टाय-अप’साठी हात पुढे केला आहे. शिवाय मुंबई, नागपूर, नाशिक, गोवा इथं विभागीय कार्यालयेही आहेत. प्रिव्हेन्टिव्ह हेल्थ चेकअप स्पेशालिस्ट म्हणून कंपनीने आयएसओही प्राप्त केलं आहे. अव्हेलेबल, एक्सेसेबल आणि अ‍ॅफोर्डेबल या तीन ‘ए’नं सुरू केलेल्या प्रवासानं नुकतंच एक तप पूर्ण केलं आहे.
मार्गदर्शक उद्योगपती काका सदानंद बापट आणि पुण्याच्याच ‘सह्य़ाद्री’ हॉस्पिटलचे संचालक डॉ. आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इंडस हेल्थ’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. निवडक नातेवाईक, मित्र यांच्या गोतावळ्यातून अवघ्या ८ कर्मचाऱ्यांसह पुण्याच्या इडन हॉलमधील ३ हजार चौरस फूट जागेत सुरू झालेल्या या व्यवसायाने सात वर्षांत एक लाख, तर पुढील तीन वर्षांत दोन लाख ग्राहकांचा टप्पा सहज पार केला. कर्मचारी आणि जागा यांचा आकडा अनुक्रमे २२५ आणि १५ हजार चौरस फूट होतानाच कंपनीचे आजवर ३.४५ लाखांहून अधिक समाधानी ग्राहक झाले आहेत. २३ शहरे आणि ५७ केंद्रांचे जाळे तयार झाले आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक १०० किलोमीटरच्या परिसरात ‘इंडस हेल्थ’ची ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे. चागलं आरोग्य हा प्रत्येकाचाच अधिकार आहे, मात्र त्यासाठी तपासणीची नियमितता राखणं हे आपल्याच हाती आहे हे ‘इंडस हेल्थ’ सांगतं.

Story img Loader