हिरा आणि खडा यांतला फरक अचूक ओळखणाऱ्या त्या रत्नपारखी, त्यांना माणसं पारखण्याचीही अचूक नजर लाभली म्हणूनच या सपोर्ट सिस्टमच्या बळावर नोकरी करता करता आज त्यांनी याच क्षेत्रात आपली ‘पॅनजेम लॅबोरेटरी’ आणि ‘पॅनजेम टेक’ ही संस्था उभी केली. रत्न व मौल्यवान खडे यात डॉक्टरेट करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवलेल्या जेमॉलॉजिस्ट डॉ. जयश्री पंजिकर यांच्या या लखलखत्या करिअरविषयी..
‘‘दिवाळीत एक जोडपं माझ्याकडे आलं होतं. नवऱ्याने मोठय़ा प्रेमाने बायकोला हिऱ्यांच्या कुडय़ा भेट दिल्या होत्या. पण कानात घातल्यावर लक्षात आलं की त्या कुडय़ा चमकतच नाहीत. मी त्या तपासल्या तर लक्षात आलं की ते हिरे नसून साधे अमेरिकन डायमंड आहेत.’’
 रत्न आणि मौल्यवान खडे अर्थात जेम्स स्टोन्सवर डॉक्टरेट करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवलेल्या जेमॉलॉजिस्ट डॉ. जयश्री पंजिकर सांगत होत्या..
कोणतंही रत्न दिसायला सुंदर दिसतं, पण त्यामागचं शास्त्र आपल्याला कळत नाही आणि आपली अशी फसवणूक होऊ शकते. त्यासाठीच आवश्यकता असते ती विश्वासू रत्नपारखींची. रत्नांची आवड तर आपल्याला असते, पण त्यांची किंमत जास्त असल्यामुळे ही रत्नं पारखूनच घ्यावी लागतात. म्हणून तर त्यांना मौल्यवान खडे, असं म्हटलं जातं. हे खूपच वेगळं क्षेत्र आहे आणि यातले अनुभवही वेगळे आहेत. मुळात या रत्नांविषयी फारशी माहिती नसल्यामुळे अनेकदा घरात काही खडे असतात किंवा आपल्या पूर्वजांनी घरात काही रत्न म्हणून जपून ठेवलेली असतात, पण त्यातलं नेमकं अस्सल कोणतं तेच कळत नाही.
जयश्रीताईंकडे अशी अनेक मंडळी खडय़ांच्या निरीक्षणासाठी नेहमीच येत असतात. काही वर्षांपूर्वी घडलेली एक गोष्ट, एका व्यक्तीकडे अनेक वर्षांपासून जपून ठेवलेले अनेक खडे होते. ते घेऊन तो जयश्रीताईंकडे आला. निरीक्षण केल्यावर त्या सगळ्या खडय़ांतून फक्त एकच खडा अस्सल निघाला. ज्याची त्या काळी किंमत होती दीड लाख रुपये पर कॅरेट. एलॅक्झांड्राइट होता तो!
एकदा एका माणसाने एक शिवलिंग आणलं होतं. वर वर पाहता साध्या स्फटिकातला एखादा प्रकार असेल असं वाटलं होतं. पण तो अख्खा पुष्कराज निघाला. एका कुटुंबात अनेक वर्षांपासूनचा पाटा वरवंटा होता. त्या वरवंटय़ाने छान गुळगुळीत वाटलं जायचं. पण मधेच तो चमकायचा. त्याची परीक्षा केल्यावर लक्षात आलं की तो थोडय़ा खालच्या दर्जाचा पण माणिक होता.
 जयश्रीताईंकडे असे अनेक किस्से आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘एकदा एक गृहस्थ खूप जुना डबा घेऊन माझ्याकडे आले. ते म्हणाले, ‘या डब्यात एक खडा आहे. माझ्या आजोबांनी मला तो जपून ठेवायला सांगितला होता.’ मी तो खडा पाहिला पण तो काही फार किमती खडा नव्हता. मी ते त्याला सांगितलं आणि तो खडा त्या ‘अ‍ॅंटिक’ डब्यात ठेवला. पण डबा बंद करताना लक्षात आलं की त्या डब्याची कडी जी आहे ती गोलाकार आहे. सहज ती कडी मी हातात घेतली आणि माझ्या लक्षात आलं तो ब्लू सफायर म्हणजे नीलम आहे. म्हणजे आजोबांनी खडा नाही तर डबा जपून ठेवायला सांगितला होता.’’
मुळात हे शास्त्र समजून घेणंही तसं कठीण पण जयश्रीताईंनी ती कला अवगत करून घेतली आणि जवळजवळ ३५ वर्षांपूर्वी या वेगळ्या क्षेत्राची करिअर म्हणून निवड केली. जेमॉलॉजी म्हणजे नसíगक रत्न आणि कृत्रिम खडे यांचं शास्त्र. या रत्नांचं परीक्षण आणि मूल्यमापन करणारे ते रत्नपारखी. बहुतेक रत्नांना विशिष्ट संस्करण केलेलं असतं. त्यामुळे रत्नांची किंमत कमी-जास्त होत असते.
 खाणीत तयार झालेला हिरा आपल्या हातात येईपर्यंत त्यावर खूप मोठी प्रक्रिया घडत असते. साहजिकच ही सगळी माहितीही मोठी रंजक असते. जयश्रीताई सांगतात, ‘‘एक कॅरेट हिरे शोधण्यासाठी खाणीत जवळजवळ २५० टन मातीचं खोदकाम करावं लागतं. ते हिरे बाहेर काढून आकारमानाप्रमाणे ते वेगळे करावे लागतात. त्यांना ठराविक आकार देऊन पलू पाडावे लागतात. रंग, पलू, पारदर्शकता आणि वजन यांच्या आधारे त्यांची प्रतवारी ठरवावी लागते. त्यातले फक्त ५ टक्के हिरे अतिशय चांगले असतात, जे सगळ्यांना परवडत नाहीत. २० टक्के बरे असतात, ज्यांची किंमत तशी जास्तच असते आणि ७५ टक्के उत्तम नसतात ज्यांच्यावर प्रक्रिया करावी लागते आणि मग ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही मौल्यवान खडय़ाला आम्ही जेव्हा दागिन्यांमधे घालतो किंवा त्या दागिन्यांचं डिझाईन बनवतो तेव्हा त्या खडय़ावरची प्रक्रिया तो दागिना कोण घालणार, कधी घालणार, कोणत्या दागिन्यात कोणता खडा चांगला दिसेल या सगळ्याचा विचार करावा लागतो. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रत्नपारखी म्हणून ते खडे योग्य दर्जाचे आहेत ना ते तपासून घ्यावं लागतं.’’
लहानपणी वेगवेगळ्या आकाराचे दगड गोळा करण्याचा छंद असलेल्या जयश्रीताईंनी काही चाकोरीबाहेरचं करण्याच्या प्रेरणेतूनच हे वेगळं क्षेत्र निवडलं. त्यांचं लहानपण पुण्यात गेलं आणि त्यांच्यासमोर आदर्श होता त्यांच्या मोठय़ा भावाचा. त्यांना चार भाऊ. सगळ्यात मोठा भाऊ डॉ. प्रमोद तलगेरी त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठा. जेव्हा त्याला जर्मन सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती जिद्दीच्या बळावर पुढची वाटचाल करून बरोबर २५ वर्षांनी जयश्रीताईंनाही जर्मन सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी रत्नशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. तत्पूर्र्वी त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पुण्यात फग्र्युसन कॉलेजला झालं. भूगर्भशास्त्र या विषयात विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर ‘जेमॉलॉजिकल असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटन’मधून त्यांनी एफजीए केलं. जर्मनीतून जेमॉलॉजीतला डिप्लोमा केला आणि नंतर तिथल्या हेडलबर्ग विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. एवढंच नाही तर या विषयावर डॉक्टरेट करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. भारतातल्या जवळजवळ सगळ्या जेमॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट्स आणि संस्थांच्या सल्लागार आणि तज्ज्ञ म्हणून तर त्यांनी काम केलंच आहे पण त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक देशांतल्या जेमॉलॉजिकल परिषदांमधे त्यांनी त्यांचे संशोधनपर प्रबंध सादर केलेत आणि जगभरातल्या अनेक नामवंत जेमॉलॉजिकल संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ३० र्वष त्यांनी नॅशनल रिसर्च सेंटर फॉर डायमंड्स अ‍ॅण्ड जेमस्टोन्सच्या संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख म्हणून तसंच जेमॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या मुख्य रत्नपारखी आणि कोर्स कोऑíडनेटर म्हणून अत्यंत यशस्वीपणे आपली कामगिरी केली.
हा सगळा व्याप सांभाळण्यासाठी त्यांना रोजच्या रोज पुण्याहून मुंबईला यावं लागे. म्हणजे सलग ३० र्वष पुणे-मुंबई करत स्वत:चं घर-संसार सांभाळत जयश्रीताईंनी आपलं हे वेगळं करिअर उभं केलं. त्या म्हणतात, ‘‘३० र्वष पुणे-मुंबई अपडाऊन करताना माझी स्ट्राँग सपोर्ट सिस्टम माझ्या कामी आली. माझे पती, माझी दोन्ही मुलं, माझे सासू-सासरे यांच्या बरोबरीने माझ्या घरी दूध आणून देणारा दूधवाला, भाजीवाला, डबेवाला, किराणावाला, केमिस्ट, मुलांना शाळेत सोडणारा रिक्षावाला, धोबी, घरात काम करणाऱ्या बाई या सगळ्यांची मदत नसती तर मी हे सगळं करू शकले नसते. पुण्यात राहिल्यामुळे पोळ्यांची बाई मिळणं किंवा प्रसंगी भाज्या चिरून मिळणं हे शक्य झालं. सकाळी घरी येणारा दुधवाला ब्रेड, अंडी, लोणी सगळं घेऊन येणारा मिळाला. माझा भाजीवाला घरात येत असे फ्रिजमध्ये काय आहे-नाही ते पाहून त्याप्रमाणे भाजी ठेवून जात असे. माझे सासू-सासरे सहा महिने आमच्याकडे असत आणि सहा महिने त्यांच्या मुलीकडे असत. एखाद् दिवशी मुलांचा डबेवाला आला नाही आणि सासू-सासरे आमच्याकडे नसतील तर माझ्या शेजारणी माझ्या माहेरी फोन करून मुलांच्या डब्याची काही तरी सोय करायच्या. साडेआठ वाजता मुलं शाळेत जायची तेव्हा नवरा त्यांची तयारी करून द्यायचा आणि चार वाजता मुलं शाळेतून येताना मात्र बाई घरी असायची. कधी सासू-सासरे असायचे. त्यामुळे घराच्या पलीकडेही माझं खूप मोठं कुटुंब तयार झालं होतं. आमच्या लग्नाला जेव्हा २५ र्वष पूर्ण झाली तेव्हा त्या छोटय़ाशा घरगुती समारंभात आमच्या नातेवाईकांबरोबर माझा भाजीवाला, डबेवाला, रिक्षावाला अशी सगळी मंडळी होती कारण ते माझं कुटुंबच होतं. माझ्या मुलाच्या लग्नातही ही सगळी मंडळी आमच्या घरच्यांच्याच पंक्तीत बसलेली होती.’’
खरं तर घराबाहेरच्या व्यक्तींवर एवढा विश्वास कसा काय ठेवता आला. असा प्रश्न माझ्या मनात आला. पण जयश्रीताईंचा मात्र विचार वेगळा होता. त्या म्हणाल्या की, आपण सकारात्मक विचार केला की माणसंही तशी मिळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही रत्नपारखी आहोत. तेव्हा फक्त रत्न पारखून कशी चालतील, माणसंही पारखता आली पाहिजेत. शिवाय जर कधी थोडी फसवणूक करणारी माणसं भेटली तर त्यांचा थोडा वेगळा विचारही करता येतो. म्हणजे माझी एक मोलकरीण घरातल्या काही गोष्टी माझ्या मागे तिच्या घरी घेऊन जायची. कधी भाजी ने, कधी साखर ने असं करायची. तिला वाटायचं मला कळत नाही. मला माहिती होतं. पण मी विचार केला, जसा मी माझ्या मुलांचा विचार करते- त्यांना चांगल्या गोष्टी कशा देता येतील ते पाहाते. तसं तीही तिच्या मुलांसाठी करते. कदाचित मी तिला जे देत होते ते तिला कमी पडत असेल म्हणून ती मला न सांगता नेते, असा विचार करून मी तो विषय सोडून देत असे. अर्थात ती माझं काम नीट करत होती.
जयश्रीताईंच्या या विचारानेच आणि त्यांनी अनेकदा केलेल्या मदतीमुळेच कदाचित त्यांची खूप माणसं जोडलेली आहेत. किंबहुना याच मोलकरणीच्या मुलाला जेव्हा मॅनेंजायटिस झाला तेव्हा हॉस्पिटलचे सगळे पसे स्वत: भरायलाही जयश्रीताईंनी मागे-पुढे पाहिलं नाही. शिवाय त्यांना मिळाणारा घरचा पािठबा तोही मोठा होता. दिलीप पंजिकरांचा मेटल कािस्टगचा कारखाना होता. आता ते त्याच संदर्भात मोठमोठय़ा कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून काम करतात. त्या दोघांचं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा जयश्रीताई जेमॉलॉजिस्ट झाल्या होत्या. परंतु लग्नानंतर डॉक्टरेट करण्यासाठी आणि मुंबईतल्या नोकरीसाठी खरं प्रोत्साहन कुणाचं असेल तर ते त्यांच्या पतींचं. अर्थात घरातल्या अडचणीही त्यांना आल्याच. अनेकदा जेवणाची बाई येणार नसेल तर सकाळी साडेचार वाजता उठून स्वयंपाक करूनही त्यांना मुंबईला येण्यासाठी निघावं लागे. त्या म्हणतात, ‘‘मुलांच्या शाळेत कधी पालकसभा असेल तर सगळ्या वेळा सांभाळून मी त्यासाठी आवर्जून जात असे. मुलांना क्वांटिटी टाइमऐवजी क्वालिटी टाइम देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. रोज सकाळी साडेसहा वाजता मला घर सोडावं लागत असे आणि रात्री घरी यायला साडेआठ वाजत असत. त्यामुळे माझ्या संस्थेकडे  (ॅकक) मी एक विशेष सवलत मागितली होती. माझ्या बाकीच्या सुट्टय़ा मी घेतल्या नाहीत पण आठवडय़ातून दोनदा गुरुवारी आणि रविवारी मी सुट्टी घेत असे. माझ्या पतीला गुरुवारी सुट्टी होती आणि मुलांना रविवारी. त्यामुळे गुरुवार माझ्यासाठी होता ँ४२ुंल्ल ििं८ आणि रविवार होता २ल्लिं८. मुलांच्या सगळ्याच गोष्टींना मला प्राधान्य देता आलं आणि तुमच्या ते मनात असेल ना तर नियतीसुद्धा तुमच्या बाजूने असते याचाही प्रत्यय मला आला. म्हणजे माझ्या मोठय़ा मुलाच्या शाळेच्या प्रवेशासाठी जो आमच्या मुलाखतीचा दिवस होता तेव्हा मी गरोदर होते आणि माझे दिवस अगदी भरले होते. म्हणजे ३१ मार्चला मी त्याचा प्रवेश घेतला आणि १ एप्रिलला मी बाळंत झाले. त्यामुळे मला वाटतं करण्याची उमेद असली ना की बळ येतं आपोआप. धाकटा मुलगा तीन महिन्यांचा झाल्यावर सुट्टी संपवून मी पुन्हा कामावर जायला लागले तेव्हा त्याला फीिडगची आवश्यकता असल्याने जवळजवळ तो दीड वर्षांचा होईपर्यंत झाशीच्या राणीसारखी त्याला बरोबर घेऊन मी निघत असे. या प्रवासात माझ्या डेक्कन क्विनमधल्या मत्रिणींचीही मला खूप मदत झाली. माझ्या सपोर्ट सिस्टममध्ये या माझ्या मत्रिणींना मी विसरूच शकत नाही. अडचणी आल्या पण खऱ्या अर्थाने मी माझ्या कामातला आनंद घेतला एवढं म्हणेन.’’
जयश्रीताईंनी जेव्हा ॅकक मध्ये नोकरीला सुरुवात केली तेव्हा ती एक अत्यंत छोटीशी एका खोलीत सुरू झालेली संस्था होती. आज ती आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त अशी संस्था आहे. भारत सरकारच्या एका विभागाचा उपक्रम म्हणून ही संस्था नावारूपाला आली. त्यात अर्थातच जयश्रीताईंचंही खूप मोठं योगदान आहे. आजपर्यंत त्यांनी या क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडवले आणि आजही त्यांचं ते काम चालू आहेच. आता मुंबई-पुणे प्रवास संपलाय. आता त्यांची स्वत:ची ‘पॅनजेम लॅबोरेटरी’ ही टेिस्टग लॅब आणि ‘पॅनजेम टेक’ ही संशोधन संस्था आहे. याचा सगळा कारभार त्या पुण्यातूनच पाहतात. या क्षेत्रातले प्रशिक्षण अभ्यासक्रमही त्यांच्याकडे घेतले जातात. या कामात त्यांचा इंजिनीअर असलेला धाकटा मुलगा अतिषही आता त्यांच्याबरोबर आहे. मोठा मुलगा चिरागही इंजिनीअर आहे. त्याची बायको वकील आहे. त्यांचं स्वतंत्र कामही चालू आहे. आईने केलेल्या मेहनतीची जाण असल्याने त्यांना आईचा अभिमानही आहे.
मुळात जयश्रीताईंकडे समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची खूप चांगली हातोटी आहे. त्यामुळेच ॅत्यांच्या सुरुवातीच्या दिवसात संस्थेसाठी मिळवलेली आठ ते दहा लाख रुपयांची मोठी रक्कम असेल किंवा जागतिक बँकेकडून मिळवलेली ‘ग्रँट’ असेल अशा अनेक गोष्टी त्या आत्मविश्वासाने करू शकल्या. या सगळ्यामागे जयश्रीताईंच्या मते त्यांच्या वडिलांचे संस्कार खूप महत्त्वाचे होते. त्या म्हणाल्या, ‘‘त्यांनी लहानपणापासून आम्हाला चांगल्या सवयी लावल्या. ते म्हणत, ‘दर वर्षी एखादं चांगलं पुस्तक विकत घेत जा.’ त्यांची ती सवय आज माझी स्वत:ची संस्था उभी करताना इतकी उपयोगी पडली की, आज त्याच पुस्तकांची एक लायब्ररी तयार झाली. त्यांनी नेहमीच धाडसाने पुढे जाण्याचाच मंत्र दिला. ते नेहमी म्हणायचे की, काही वाईट होणार नाही यावर विश्वास ठेव, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असतो. आणि एक लक्षात ठेव आपली विद्या आणि आपली श्रद्धाच आपल्याला पुढे घेऊन जात असते.’’
मला वाटतं त्यांच्या वडिलांच्या या प्रेरणेच्या बळावर जयश्रीताईंच्या प्रवासात ज्या काही अडचणी आल्या त्यावर त्या मात करू शकल्या. आणि रत्नांच्या या दुनियेतली खरी रत्नं जी माणसांच्या रूपातही त्यांना भेटली त्यांनाही त्या अचूकतेने पारखू शकल्या.’’

wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Suvarnadurga Fort marathi news
दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
Tata Hospital, Genetic Counseling Centre,
टाटा रुग्णालय अनुवांशिक समुपदेशन केंद्र उभारणार, निधीसाठी खासगी कंपनीशी करार
Swami Kevalananda Saraswati Narayanashastri Marathe the founder of Prajnapathshala
तर्कतीर्थ विचार: गुरू : स्वामी केवलानंद सरस्वती
actor naseeruddin shah and actress ratna pathak shah in ratnagiri for natya mahotsav
नाट्य महोत्सवासाठी अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि अभिनेत्री रत्ना पाठक शहा पहिल्यांदाच रत्नागिरीत
Deepshikha in investigative journalism Nellie Bly
शोधपत्रकारितेतील दीपशिखा
Gondwana University PhD notification, PhD ,
चंद्रपूर : पीएचडीसाठीची गोंडवाना विद्यापीठाची जाचक अधिसूचना रद्द
Story img Loader