विचारांच्या आवर्तात माझी कोणी ‘नकुशी’नावाने आयुष्यभर वावरणारी रुग्ण आठवली. वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वत:च्या दोन वर्षांच्या भावाला सांभाळणारी व सातवीनंतर वडिलांनी सर्व मुलींचे सक्तीने शिक्षण बंद केले म्हणून हळहळणारी रीटा डोळ्यांपुढे आली. मुलगा होईपर्यंत सक्तीची अनेक बाळंतपणे भोगणारी सुमा नजरेसमोर आली. वाटलं, दरवर्षी असंच नवरात्र येणार, अशीच धामधूम होणार आणि दरवर्षी हे असेच चेहरे माझ्याभोवती आठवणींचे फेर धरून नाचणार-नावं फक्त वेगळी असतील. कथा त्याच, व्यथाही त्याच! या कल्पनेने अस्वस्थ होऊन त्या महिषासुरमर्दनिलाच मी साद घातली, ‘बये दार उघड!’
परवा मी शस्त्रक्रिया करताना माझ्या भूलतज्ज्ञाला एक फोन आला; साहजिकच मला एका बाजूचेच संभाषण ऐकू येत राहिले. तो फोनवरील व्यक्तीस सांगत होता, ‘‘नहीं नहीं, यह काम मेरे पहचान में यहाँ किसीभी सेंटर में कोई डॉक्टर नहीं करता हैं; नहीं नहीं, यह पैसे का सवाल नहीं है भाई; मने एक बार बोल दिया ना; यहाँ के सब डॉक्टर संत है, संत.’’ त्याच्या चढय़ा आवाजातील शेवटचे वाक्य ऐकून मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे रोखून पाहू लागले. एकतर्फी संवाद ऐकूनदेखील मॅडमच्या बरंच काही लक्षात आल्याचं त्याला जाणवलं. वस्तुस्थिती अशी होती की, एका रुग्णालयाचा ‘जनसंपर्क अधिकारी’ एका गरोदर स्त्रीची गर्भिलगनिदान चाचणी कुठे होईल हे त्याला विचारत होता. वारंवार तेच प्रश्न विचारून त्याच्यावर दडपण आणत होता. अर्थात तो अधिकारी यानंतर काय करणार होता ते सुज्ञांस वेगळे सांगण्याची गरज नाही. या ‘महान’कामासाठी हा माणूस त्याच्या ‘तथाकथित ओळखीच्या’ रुग्णांकडून अतिरिक्त पसेही घेतो; ही माहिती मला माझ्या भूलतज्ज्ञाकडून कळली. या घटनेने आम्ही दोघे अस्वस्थ झालो; हात काम करीत होते; पण मन मात्र घायाळ झालं होतं.
गेल्या वर्षभरातील अनेक घटना चित्रपटाप्रमाणे डोळ्यांपुढून सरकू लागल्या. वर्तमानपत्रातून स्त्री अर्भकांवर पालकांनीच शारीरिक मारहाण केल्याच्या घटना काय, स्त्री-भ्रूणहत्येचे राज्यवार आकडे काय किंवा सर्व देशाला शरमेने मान खाली घालायला लावणारी ‘निर्भया’ची बलात्काराची घटना काय! हरियाणा, राजस्थानातील खाप पंचायत काय किंवा महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातली जात पंचायत काय; स्त्रियांबद्दलची मानसिकता तीच-स्त्री ही ‘माणूस’ आहे हे सोयीस्कररीत्या विसरून तिला दुय्यम वागणूक द्यायची! प्रत्यक्षात मागच्या महिन्यात स्कॉटलंडच्या ‘एडिनबर्ग फेस्टिव्हल’मध्ये याच ‘निर्भया’वर तेथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाने सादर केलेलं नाटक पाहायचा मला योग आला. सादर करणारे विद्यार्थी व प्रेक्षक दोन्ही बाजूला कमालीचं गांभीर्य व ताण जाणवत होता. दुसऱ्या दिवशी स्थानिक वर्तमानपत्रांनीही या उत्तम सादरीकरणाची योग्य दखल घेतली होती. सातासमुद्रापलीकडे उमटलेल्या या पडसादांनी मला व्यथित केले.
गर्भिलगचिकित्सा करून स्त्री गर्भ असेल तर गर्भपात करून घेण्याची क्रूर,अनिष्ट प्रथा समाजात वाढते आहे. महाराष्ट्रदेखील त्यात अजिबात मागे नाही; हे विदारक सत्य आहे. आमच्या ‘डॉक्टरांच्या जगात’ तर काही स्त्री रुग्णांची वैद्यकीय माहिती विचारताना ‘तुम्हाला मुलं किती?’असे विचारल्यावर त्या फक्त मुलगे जेवढे असतील तेवढाच आकडा सांगतात. वास्तविक ‘बाळंतपणं किती झाली?’ असं विचारल्यावर तो आकडा त्यापेक्षा जास्तीचा असतो. म्हणजे मुलीच्या जन्माचा उल्लेखसुद्धा त्यांना करावासा वाटत नसावा. एखाद्या स्त्रीला सिझेरियन करून मुलगी झाली, तर त्या सुनेचा व बाळाचा जीव वाचल्याचा आनंद तर सोडा; पण ‘मुलगीच होती तर उगाच सिझेरियनचा खर्च कशाला केला?’अशी प्रतिक्रिया आणि मुलगा झाला तर सिझेरियन सार्थकी लागल्याचा आविर्भाव व सुनेला ‘डीलक्स रूम’मध्ये हलविण्याची तयारी! इतकी कोती मानसिकता! प्रत्यक्षात जन्माला येणाऱ्या बाळाचं िलग ठरवणं हे नाही आईच्या हातात, नाही वडिलांच्या हातात, नाही डॉक्टरच्या हातात!
माझ्या स्त्रीरोगतज्ज्ञ मत्रिणीला आलेला एक अनुभव तर अतक्र्य आहे. एका बाळंतिणीला रुग्णालयातून सोडण्याची वेळ आली व तसे तिला सकाळी राऊंडच्या वेळेस सांगण्यात आले; पण तिच्या चेहऱ्यावर काही घरी जाण्याचा आनंद दिसेना. सगळ्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना जरा आश्चर्य वाटलं. शेवटी न राहवून माझ्या मत्रिणीने संध्याकाळच्या राऊंडच्या वेळी तिला विचारलं, ‘‘ताई, तुला घरी सोडणार आहोत, तू तयारी कशी केली नाहीस अजून?’’ यावर ती उत्तरली, ‘‘डॉक्टरीणबाई, ही माझी बाळंतपणाची पाचवी खेप, पहिल्या चार मुलींवर हा मुलगा झाला. पण मला आत्ता दाखल करताना नवऱ्याने दम दिला होता; की यावेळेस मुलगीच झाली तर तुला घरी नेणार नाही, कुठे जायचं तिकडे जा! तोच विचार सकाळपासून घोळतो आहे; की हा मुलगा झाला नसता तर मी आज कुठे गेले असते? काय केलं असतं? घरी माझ्या मुलींचं काय झालं असतं? अशा माणसांच्या घरी जावंसंदेखील वाटत नाही मला आज. काय करू तुम्हीच सांगा.’’
जन्मापासून मुलीच्या वाटेला आलेली िलगभेदाधारित वागणूक, तिच्यावर घातलेली बंधने, भीती; घरातील संस्कारांचे ‘वळण’ कायम ‘सरळ’ ठेवण्याची जबाबदारी; हुंडा व तद्सदृश गोष्टींची उघड किंवा छुपी अपेक्षा, माहेरच्यांची अवहेलना, निर्णयस्वातंत्र्याची व अर्थस्वातंत्र्याची गळचेपी, तिच्या आत्मसन्मानाची उपेक्षा, तिच्यावर हक्काने लादलेल्या गोष्टी, मूल होत नसेल तर तिलाच दोष व त्यातून मुलगा होत नसेल तर तिचा मानसिक, शारीरिक छळ या सर्व दबावामुळे स्त्रीचीदेखील अशी मनोधारणा होत असावी की जे मला भोगावं लागलं ते माझ्या मुलीला भोगायला लागू नये आणि मला तिचं दु:ख पाहायलाही लागू नये, त्यापेक्षा मुलगी जन्मालाच न आली तर बरं! ही परिस्थिती दुर्दैवाने या काळातही खूप घरांमध्ये दिसून येते.
मुळात ‘स्त्री-भ्रूणहत्या’ ही जन्मदात्या आई-वडिलांनी केलेली लांच्छनास्पद गोष्ट आहे, तो एक सामाजिक कलंक आहे. पण ज्या रूढी-परंपरा िलगभेदावर आधारित असून (उदा. मुलगा म्हणजे ‘वंशाचा दिवा’, ‘मरणोत्तर पाणी पाजणारा’,वंशाचं नाव कायम राखणारा वगैरे) शतकानुशतके समाजाने स्वीकारलेल्या आहेत, त्यासंबंधीची मानसिकता बदलण्यासाठी आपण प्रयत्न करतो का? या सर्वाचा परिणामच स्त्री-भ्रूणहत्येला प्रवृत्त होणाऱ्या जोडप्यांच्या मानसिकतेत परावíतत होताना दिसत नाही का?
सामाजिक परिवर्तन हे कायद्याच्या बडग्याने होत नसते, तर समाजाच्या मानसिक क्रांतीतून होत असते. गेल्या दोन-तीन वर्षांत सोनोग्राफीच्या, गर्भपाताच्या अधिकृत केंद्रांवर धाडी घालून तपासण्या, आवश्यक ती रजिस्टर्स भरली नाहीत तर डॉक्टरांवर कारवाई, सोनोग्राफी मशीनना सील लावणे, औषधांच्या दुकानातील विशिष्ट गोळ्यांचा खप कुठे, किती झाला याची नोंद ठेवणे वगरे उपाययोजना सरकारतर्फे स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी चालू आहेत. यामागील उद्देश स्तुत्य असला तरीपण या उपायांची अंमलबजावणी मात्र अतिशय विसंगत व सदोष आहे. यातूनच डॉक्टरांकडून जास्त पसे उकळून सोनोग्राफी मशीन सोडवून देणे, वैद्यकीय परिभाषा न कळणाऱ्या माणसांना एका पोलिसाबरोबर पाहणीसाठी पाठवून रुग्णालयाच्या प्रतीक्षा कक्षात आरडाओरडा करणे, रजिस्टर भरण्यात काही त्रुटी असल्यास डॉक्टरांना स्त्री-भ्रूणहत्येचे आरोपी म्हणून तुरुंगात टाकणे अशा अन्याय्य घटनाही घडत आहेत. िलगनिदान व स्त्री-भ्रूणहत्या या संदर्भात सर्वच डॉक्टर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नसतीलही; जे दोषी सिद्ध झाले, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी;पण सरसकट डॉक्टरांना दोषी धरून गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच प्रॅक्टिसमधून उठवायचे हा कुठला न्याय? सोनोग्राफी करणारा डॉक्टर व कायदेशीर संमत गर्भावस्थेपर्यंत गर्भपात करणारा डॉक्टर या दोन भिन्न व्यक्ती असतात. कित्येक वेळा ही जोडपी गर्भपातासाठी आíथक असुरक्षेचे कारण पुढे करतात. सोनोग्राफीने बाळ मुलगा की मुलगी हे कळायला तेरा आठवडे तरी जावे लागतात, त्यानंतर गर्भपाताच्या पद्धती बदलतात; ज्याची सर्व स्त्रीरोगतज्ज्ञांच्या केंद्रांना परवानगी नाही. तसेच गर्भपात डॉक्टरेतर अयोग्य व्यक्तीकडून करून घेण्यामध्ये जंतुसंसर्ग व आईच्या जिवाला फार मोठय़ा प्रमाणात धोका असतो, हे अशिक्षित लोकांना समजत नाही. गर्भधारणेच्या दुसऱ्या त्रमासिकातल्या गर्भपातांची फक्त सरकारी रुग्णालयात शहानिशा व अंमलबजावणी करावी; म्हणजे कदाचित सरकारची व या वाटेला न जाणाऱ्या सामान्यांची प्रत्येक खासगी डॉक्टरकडे बघण्याची पूर्वग्रहदूषित दृष्टी बदलेल. निसर्गाच्या संतुलनावर या प्रकारच्या गर्भपातामुळे होणारे दूरगामी विपरीत परिणाम बघता डॉक्टरांसकट सर्वानीच या गोष्टीकडे जास्त संवेदनशीलतेने, सदसद्विवेकबुद्धीने व आíथक व्यवहारापलीकडे जाऊन बघावे अशी अपेक्षा आहे.
प्राण्यांमध्ये हा िलगभेद नाही. मांजरी तिच्या भयंकर प्रसववेदनांनंतर भुकेने कासावीस होऊन स्वत:चेच एक पिल्लू खाते, पण त्यात ती िलगभेद करत नाही. मनुष्यप्राण्याचे मात्र दाखवण्याचे आणि चावण्याचे दातच वेगळे! बुद्धीची देवी सरस्वती, संपत्तीची देवी लक्ष्मी, शक्तीची देवी दुर्गा या विविध स्त्रीरूपांची एकीकडे पूजा करायची, नवरात्रात याच स्त्रीशक्तीचा उत्साहात जागर करायचा आणि प्रत्यक्षात त्याच स्त्रीशक्तीला, ऊर्जेला जन्म नाकारायचा -अस्सल दांभिकपणा!
याविषयी कितीही लिहिलं तरी ते कमीच! विचारांच्या या आवर्तात माझी कोणी ‘नकुशी’ नावाने आयुष्यभर वावरणारी रुग्ण आठवली. वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वत:च्या दोन वर्षांच्या भावाला सांभाळणारी व सातवीनंतर वडिलांनी सर्व मुलींचे सक्तीने शिक्षण बंद केले म्हणून हळहळणारी रीटा डोळ्यांपुढे आली. मुलगा होईपर्यंत सक्तीची अनेक बाळंतपणे भोगणारी सुमा नजरेसमोर आली. वाटलं, दरवर्षी असंच नवरात्र येणार, अशीच धामधूम होणार आणि दरवर्षी हे असेच चेहरे माझ्याभोवती आठवणींचे फेर धरून नाचणार- नावं फक्त वेगळी असतील. कथा त्याच, व्यथाही त्याच! या कल्पनेने अस्वस्थ होऊन त्या महिषासुरमर्दनिीलाच मी साद घातली, ‘‘बये दार उघड! तुझ्या सामर्थ्यांचं, न्यायाचं, समाजजागृतीचं दार उघड! आता अंधार फार झाला, बास,तू दार उघड! तुझ्या अस्तित्वाच्या प्रकाशाचं दार उघड, बये, आता तरी दार उघड!’’
vrdandawate@gmail.com
‘बये दार उघड!’
विचारांच्या आवर्तात माझी कोणी ‘नकुशी’नावाने आयुष्यभर वावरणारी रुग्ण आठवली.
First published on: 05-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cases of pregnency and abortion