देहविक्रयाच्या व्यवसायात अडकलेल्या महिलांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पुण्यातील ‘चैतन्य महिला मंडळा’ने रात्रीचे पाळणाघर सुरू केले. त्याचबरोबर ‘आश्रय’ हे महिलांसाठी तात्पुरते निवारा केंद्र, ‘महाराणी लक्ष्मीबाई महिलांचे वसतिगृह’ तसेच ‘स्वावलंबन’ हे व्यावसायिक प्रशिक्षणगृह असे विविध उपक्रम सुरू केले. ‘एकातून नवं काम जन्माला येत होतं व त्यातून आमचे अनुभवविश्व समृद्ध होत गेले’ सांगताहेत संस्थापक ज्योती पठाणिया..
‘राजीव गांधी पाळणाघर योजने’अंतर्गत आमच्या ‘चैतन्य महिला मंडळा’ने २००४-०५ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत, देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पहिले रात्रीचे पाळणाघर सुरू केले. या वस्तीत काम करणाऱ्या इतर स्वयंसेवी संस्थांचे काम प्रामुख्याने दिवसा चालायचे, तेही आरोग्यशी निगडित प्रश्नांवर. आमचा भर ‘बाजारू लैंगिक शोषणा’ला बळी पडलेल्या महिलांचे पुनर्वसन आणि त्यांच्या मुलांचे पालनपोषण यांवर होता. मी तर इथे कुणाला ओळखतही नव्हते. सुरुवात केली तेव्हा सर्वानी एकच सूर काढला- ‘हे शक्यच नाही. त्यांची ‘मालकीण’ ऐकणार नाही.. वगैरे वगैरे.’ पण मला वाटलं, त्यांना थोडे सांभाळून घेतले, समजून घेतले तर होईल शक्य. आणि केली सुरुवात! कमर्शियल सेक्स वर्कर्स व ‘बाजारू लैंगिक शोषणा’ला बळी पडलेल्या महिला यांच्यात फरक आहे. परिस्थितीवश देहविक्रयाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या महिलांना वेश्या म्हणण्याऐवजी ‘बाजारू लैंगिक शोषणा’ला बळी पडलेल्या पीडित महिला असे संबोधणे मी पसंत करते.
‘राजीव गांधी पाळणाघर योजने’ला वर्षांला फक्त १८ हजार रुपये मिळणार होते. तर आमची जागाच ५५ हजार रुपये वर्षांला याप्रमाणे भाडेतत्त्वावर घेतली होती. दरवाजावर एक पाटी लावली, हार घालून उद्घाटन केले आणि लगेचच एक-दोन जणी मुलांना घेऊन चौकशीला आल्या. याच व्यवसायातल्या त्या होत्या. त्यांच्या मुलांची योग्य सोय होणं, ही त्यांची आत्यंतिक गरज होती, पण गरज पूर्ण करणारं कुणी नव्हतं. म्हणून ‘चैतन्य’ पुढे आले. आमच्यासाठीही हे जग, त्यांचे प्रश्न, समस्या सारंच नवं होतं. आठ वर्षांपूर्वी मीसुद्धा कधी ‘रेड लाइट एरिया’ पाहिला नव्हता. त्याचं जगणं मला माहीत नव्हतं. या निमित्ताने मी पहिल्यांदा या वस्तीत पाऊल ठेवले आणि पुढे त्यांच्यासाठी काम हा माझ्या जगण्यातला भाग झाला.
या साऱ्याची सुरुवात अगदी अनपेक्षितपणे झाली. १९९२ पासून भोसरीला आम्ही ‘चैतन्य महिला मंडळ’ चालवत होतो. अगदी छोटय़ा स्वरूपात सुरू केलेले मंडळ भविष्यात एवढे व्यापक कार्य करेल, याची आम्हालाही कल्पना नव्हती. ‘बायकांची चार डोकी एकत्र येऊन काय करणार, गप्पा मारणार व कुरापती शोधून काढणार’ अशा उपहासात्मक टीकेला आम्ही मोडून काढलं. समाजासाठी काहीतरी विधायक काम करायचे, या हेतूनेच आम्ही एकत्र आलो होतो. सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रम, सण-समारंभ, मुलांचे कौतुक समारंभ अशा निमित्तानं एकत्र यायचो. पण जाणवायला लागलं की हे आपलं उद्दिष्ट नाही. नुसतीच मजा होतेय. समाजाला त्याचा काहीच फायदा नाही. या विचारातूनच मग कौटुंबिक सल्ला केंद्र आणि मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू केलं. आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. कुटुंबातली भांडणं, आर्थिक समस्या घेऊन मदतीच्या अपेक्षेनं महिला येऊ लागल्या. तेही खूप अस्वस्थ करणारं होतं. किती प्रकारच्या समस्या होत्या महिलांच्या! अगदी सुशिक्षित, संपन्न कुटुंबांमध्येही! शक्यतो आमचा प्रयत्न कुटुंब संस्था मोडू न देण्यावर होता. त्यांच्याशी बोलून, कुटुंबीयांचे समुपदेशक करून, प्रसंगी पोलिसांची मदत घेऊन आम्ही प्रश्न सोडवायला लागलो. कधी कधी एखाद्या बाईला राहायला घरच नसायचं. मग परिसरातील डॉक्टरांशी चर्चा करून तिची तात्पुरती हॉस्पिटलमध्ये सोय करून देऊ लागलो. काम नवीन होतं, आव्हानात्मक होतं, एकातून नवं काम जन्माला घालणारं होतं. त्यातूनच आमचं अनुभवविश्व समृद्ध होत गेलं.
योगायोगानं केंद्र सरकारच्या ‘महिला व बालकल्याण विभागा’ची एक जाहिरात २००२ मध्ये प्रसिद्ध झाली. शॉर्ट स्टे होम- तात्पुरतं निवास. आम्ही अर्ज केला, मंजुरीही मिळाली आणि ‘आश्रय’ केंद्र सुरू झाले. गरजू महिलांना त्यांच्या गरजेप्रमाणे एका रात्रीपासून तीन वर्षांपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या सुविधा इथे पुरवल्या जातात. आमच्या ‘स्वावलंबन’ केंद्रात त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्टय़ा आत्मनिर्भर बनवले जाते. ज्या महिलांना नंतर पुन्हा कुटुंबात जाणे शक्य नाही, ज्या स्वतंत्र राहू इच्छितात, त्यांच्यासाठी माफक दरात ‘महाराणी लक्ष्मीबाई महिला वसतिगृह’ सुरू झाले. आज ‘आश्रय’मध्ये ३० जणी, तर वसतिगृहात १२ जणी वास्तव्याला आहेत.
‘आश्रय’च्या निमित्ताने अनेक अनुभव आले. एकेदिवशी एक मुस्लीम महिला रडतरडत कार्यालयात आली. दारू पिणाऱ्या नवऱ्याच्या जाचाला ती पार कंटाळून गेली होती. त्यांच्या धर्मातील कायद्यानुसार, नवऱ्यापासून विभक्त झाल्यास तिच्या मुलांचा ताबा त्यांच्या वडिलांकडे जाणार होता, म्हणून तिला त्याच्याकडून तलाकही नको होता. अशा स्थितीत ती आमच्याकडे मदतीसाठी आली होती. आम्ही तिला व तिच्या तीन मुलांना आमच्या संस्थेत ठेवून घेतले. नवरा यायचा, तिला सोडा म्हणून गोंधळ घालायचा. आम्ही पोलिसांची मदत घेऊन त्याला आवर घालायचो. पण पुढे हा नित्यक्रमच झाला. आम्हीही माघार घेतली नाही. दरम्यानच्या काळात, तिची सख्खी बहीण दिराला दिली होती. तिचा नवरा, भावाचा पुळका आल्याने आपल्याही बायकोला आश्रयच्या कार्यालयात घेऊन आला व म्हणायला लागला, ‘भाभीको भेजो नही तो इसको भी रखो.’ आम्ही तिच्या बहिणीला व तिच्या दोन मुलांनाही संस्थेत ठेवून घेतले. काही दिवसांनी दिराला उपरती झाली. बायकोला सोडलं नाही तर जाळून घेईन म्हणाला. मीही म्हटलं, ‘ही घे काडेपेटी, घे पेटवून.’ तसा तो चपापला. थोडा गुरगुरला, मग हातापाया पडू लागला. अखेरीस बायको-मुलांना घेऊन पुणंच सोडतो म्हणाला. काही दिवसांनी या बाईच्या नवऱ्याला बायका-मुलांची आठवण येऊ लागली. त्याने दारू न पिण्याची, बायकोला मारझोड करणार नाही, अशी शपथ घेतली. मगच आम्ही तिला नवऱ्याबरोबर जाऊ दिले. आज त्यांचा संसार सुखाने सुरू आहे. एकटय़ा बाईला कुणी आधार दिला की पुरुषी अहंकार पेटून उठतो. त्यातून आम्हाला टोकाचा विरोध होतो, पण आम्हीही ‘आश्रय’चं काम सुरूच ठेवलं.
आमचा प्राधान्यक्रम लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या महिला होत्या. मला त्याविषयी फारशी माहिती नव्हती. मग समजले की मुंबईत ‘प्रेरणा’ नावाची संस्था वेश्या वस्तीत मुलांचे रात्रीचे पाळणाघर चालवते. त्यांच्याशी संपर्क करून बुधवार पेठेतील केंद्र सुरू केले. या केंद्रात या माता रोज संध्याकाळी ६ वाजता आपल्या मुलांना आणून सोडतात. त्यांना विश्वास असतो की आपलं मूल इथे सुरक्षित आहे. ह्य़ूमन ट्रॅफिकिंगची कीड इतकी भयंकर आहे की काही जणी पुन्हा पुन्हा सांगतात, ‘आम्ही आल्यावरच मुलाला सोडा- दुसऱ्या कुणाकडे देऊ नका.’
आमच्याकडे राहणाऱ्या रिहाना, रोशनी, ओंकार.. वय वर्षे दोन दिवसांपासून १०-१२ वर्षांपर्यंतच्या. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या.. पण या सर्वाचा दिवस सुरू होतो संध्याकाळी ६ वाजता. त्यांच्या वयाची इतर मुले, विशेषत: ‘पांढरपेशा’ समाजातील मुलं, जेव्हा त्यांच्या आईबाबांसोबत घरी गप्पा मारत असतात, टी. व्ही. पाहत असतात, तेव्हा बुधवार पेठेतील वेश्या वस्तीतील ही मुलं आमच्या रात्रीच्या पाळणाघरात येतात. आमचं ‘उत्कर्ष’ पाळणाघर त्यांच्यासाठी आपुलकीचा निवारा ठरलं आहे. पूर्वी त्यांची राहण्याची सोय नसल्याने आईबरोबरच त्यांना ती जिथे जाते तेथे जावे लागायचे, त्यामुळे आईला गिऱ्हाईकासोबत पाहावे लागायचे, नाहीतर त्याच कॉटखाली त्यांना मारून-मुटकून झोपावे लागायचे.
आमच्या पाळणाघराची खोली फार मोठी नाही, पण मुलांना त्यांच्या ‘त्या’ नरकापेक्षा प्रशस्त वाटते. सुरुवातीला बिथरलेली ही मुलं हळूहळू इथं मोकळी होतात.. गाणी म्हणतात, बागडतात, खेळतात. त्यांना पौष्टिक खाऊ, जेवण दिले जाते. रात्री शांतपणे निर्धास्तपणे ती झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता सकाळचा नाश्ता करून त्यांना त्याच्या मातांसोबत परत पाठवले जाते. त्यांना मायेनं सांभाळणाऱ्या मदतनीस, भरपूर खेळणी, स्वच्छता इथे आहे. अधूनमधून बाहेर फिरायलाही नेले जाते. आज त्या पाळणाघरात ३५-४० मुले आहेत. मोठी झालेली मुले आता त्यांच्या पायावर उभी आहेत.
आम्ही करतोय ते पुरेसं आहे का? नक्कीच नाही. पण सुरुवात तर झाली आहे. जागा अपुरी आहे, लोकांचा त्रास आहे. भाडेपट्टीवर जागा घेणं महागात पडतं, म्हणून संस्थेने स्वत:चा फ्लॅट खरेदी केला, पण इथल्या लोकांनी सुरुवातीला खूप विरोध केला. समाजाला शिक्षणाविषयी आस्था असते. मुलांसाठी काही काही करायचं असतं, पण ‘या’ मुलांसाठी कुठलीच योजना नसते, कुणीच पुढं येत नाही. म्हणून ठरवलं आपल्याकडून होईल तेवढं करायचं. काम अवघड आहे खरं, पण थांबायचं नाही.
दरम्यान, मोशी गावात कर्ज काढून जागा घेतली आणि संस्थेची कायमस्वरूपी इमारत उभी केली. त्या कर्जा ताण सतत असतो. सरकारी अनुदान पुरेसं नसतं. पैशाचं सोंगही आणता येत नाही. आम्ही सभासद दमडीही न घेता काम करतो, पण केंद्रातील प्रशिक्षक, समुपदेशक यांना मानधन द्यावच लागतं.
हा सगळा व्याप सांभाळण्यात दिवस कसा निघून जातो कळत नाही. सकाळी मोशी, दुपारी भोसरी आणि संध्याकाळी बुधवार पेठ. तरीही मन समाधानी असतं. घरचं पाठबळ सतत असतंच. ‘बाकी सगळं सोडून याच राहिल्या होत्या का?’ अशी तक्रार करणाऱ्या आईचाही विरोध हळूहळू मावळला. अजून खूप काम बाकी आहे. पुनर्वसनाच्या कामाला आता कुठे सुरुवात झालेय. पुणे महानगरपालिकेच्या एका योजनेखाली आम्ही २० महिलांना ब्युटी पार्लर आणि फॅशन डिझाइनिंगचे प्रशिक्षण दिले. मोशी केंद्रावर सॅनिटरी नॅपकिन बनविण्याचे प्रशिक्षणही सुरू आहे.
पुनर्वसनासोबत वेश्या व्यवसायाला मुलींनी बळी पडूच नये, यासाठी जागृती आणि समुपदेशनाची
मोठी गरज भासते आहे. एवढी प्रलोभने आहेत की किशोरवयीन मुली, तरुणी सहज फसू शकतात.
एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आले, त्यांची १४ वर्षांची पुतणी बेपत्ता असल्याचे सांगत. तिचे आईवडील प्रचंड चिडले होते. पळून गेली कुणाचा तरी हात धरून, आता मेली आम्हाला. मी म्हणाले, ‘तिला फूस लावून कुणीतरी पळवले असेल, फसवले असेल. आधी पोलिसांत तक्रार करा-’ मी सतत पाठपुरावा केला. सहा महिन्यांनंतर माझ्याकडे
येऊन ते म्हणाले, ‘मुलगी सापडली. बांगलादेशात पाठवली जाताना पोलिसांनी ताब्यात घेतले.’ तिला भेटले, घरात आईवडिलांच्या रोजच्या भांडणाला कंटाळलेली ती मुलगी प्रियकराच्या भूलथापांना फसली होती. मग मात्र आईवडिलांनी आनंदाने तिला घरात घेतले.
हे वास्तव आज बऱ्याच घरांत दिसते. वेळीच सावध झाले तर हे टाळता येईल. म्हणूनच मानवी व्यापाराविरुद्धची मोहीम आम्हाला व्यापक करायची आहे. प्रतिबंध आणि समुपदेशन दोन्हीची गरज आहे. बाजारी लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांमध्ये ९० टक्के मुली मानवी व्यापाराची शिकार आहेत. ही जनजागृती विशेषत: ग्रामीण भागातील युवावर्गापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.
हे काम आव्हानात्मक आहे. पैसा तर हवाच आहे, पण समुपदेशक, प्रशिक्षक आणि या महिलांना पोलीस, डॉक्टर्सकडे सोबत करण्यासाठी स्वयंसेवकही हवे आहेत. समाजातील या उपेक्षित वर्गासाठी ‘चैतन्य महिला मंडळा’चा हा खारीचा वाटा आहे.
(शब्दांकन-सुप्रिया शेलार)
संपर्क -ज्योती पठानिया, चैतन्य महिला मंडळ, १३/ १,गुरुराज सोसायटी, भोसरी, पुणे ४११ ०३९.
भ्रमणध्वनी-९४२२० ०४१५२
इमेल- jyoti.pathania@cmmpune.org
वेबसाइट-www.cmmpune.org
स्वावलंबी आश्रय
देहविक्रयाच्या व्यवसायात अडकलेल्या महिलांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पुण्यातील ‘चैतन्य महिला मंडळा’ने रात्रीचे पाळणाघर सुरू केले.
आणखी वाचा
First published on: 28-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya mahila mandal