निवृत्ती हा शब्द आपण फारच उथळपणे वापरतो असे वाटते. आपल्या नोकरीच्या, कामाच्या ठिकाणी वयोमानानुसार सन्मानाने आपल्याला बाजूला व्हावेसे वाटणे म्हणजे ‘माझ्या कामाच्या धबडग्यातून मी निवृत्त झाले- झालो’ असे आपण मानतो.
परंतु योगमार्गात प्रवृत्ती व निवृत्ती असे दोन मार्ग वर्णिले जातात. इंद्रिये ज्यामागे धावतात (म्हणजे मन इंद्रियांना घोडय़ाप्रमाणे पळविते) ती इंद्रियविषयक प्रवृत्ती, त्यांचे नेहमीचे खाद्यविषय त्यांना न देता त्यांना आतमध्ये वळविणे म्हणजे इंद्रियविषय निवृत्ती. प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्हींचा संगम, समतोल साधणे म्हणजे खरी साधना. मन इंद्रियांवर प्रचंड ताबा मिळविण्यासाठी काही काही व्यवसायांमध्ये खरोखरच मनाचा कस लागत असावा असे वाटते. नित्य व्यवहारातील या मंडळींकडे पाहताना त्यांचे जीवन म्हणजे ‘साधना’च वाटते.
उदाहरणार्थ, अत्यंत घाणीत काम करणारे सफाई कामगार, उंच मनोऱ्यावर रंगकाम करणारे कारागीर, फाशीची सजा अमलात आणणारे तुरुंगातील कर्मचारी, दिवसभर भटारखान्यांमध्ये राबणारे रसोईया, अग्निशमन दल, अतिदक्षता विभागातील डॉक्टर्स व कर्मचारी, इतकेच नव्हे तर चार घरांमध्ये काम करून पोट भरणारी कष्टकरी स्त्री! काम करताना पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिये या साऱ्यांवर ताबा मिळविणे ही खरी निवृत्ती. नोकरीतून निवृत्त होणे नव्हे.
आजच्या आपल्या साधनेत शयनस्थितीतील पाय चक्राकर फिरवून घेऊ या. याला म्हणतात सुलभ चक्रपादासन. शयनस्थितीतील विश्रांती स्थिती घ्या. शक्य असल्यास दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवा अथवा एक पाय गुडघ्यात दुमडून पाऊल जमिनीवर ठेवा.
आता दुसरा पाय गुडघ्यात सरळ ठेवून जमिनीपासून साधारण वीस ते तीस अंशांवर उचला. संपूर्ण पाय चक्राकार पद्धतीने हवेत फिरवा. टाच जमिनीला टेकवू नका. आता विरुद्ध पायाने ही कृती करा. आपल्या क्षमतेनुसार पाच ते दहा वेळा ही कृती करा. कृती करताना नियमित श्वासाची जाणीव ठेवा. अवाजवी जोर लावू नका. मानेच्या स्नायूंवर येणारा अनावश्यक ताण टाळा. बाकीचे शरीर एकदम शिथिल ठेवा.खा आनंदाने!- निंबोणीच्या झाडामागे..
वैदेही अमोघ नवाथे (आहारतज्ज्ञ)
अंगाईगीत म्हटले की आई आणि आजीची आठवण येतेच! ‘नीज नीज रे माझ्या बाळा’ म्हणत थोपटणारे माझ्या आजीचे हात अजूनही मी विसरले नाही. ते प्रेम, तो जिव्हाळा- कधीही न विसरण्यासारखा! नंतर मोठे झाल्यावर कधीतरी उणीव जाणवतेच, पण थोडेसे डोळे पाणावण्याइतपतच! शांत झोप लागण्यासाठीसुद्धा आजकाल बरेच प्लानिंग (?) करावे लागते. विशिष्ट वयानंतर सर्व जबाबदाऱ्या आपण कशा पार पाडल्या याचा विचार करताना रात्र उलटून जाते आणि मग मनात विचार येतो, ‘अरे मला निद्रानाशाचा आजार तर जडला नाही ना? औषधांची गरज आहे का, सवय तर होणार नाही, दुपारी झोपायचे टाळू या, मग रात्री झोप येईल’ वगैरे वगैरे विचार समस्त आजी-आजोबांच्या मनात येतातच! म्हणूनच तुम्हा समस्त आजी-आजोबांसाठी ‘आहाररूपी अंगाईगीत’ बघू या काम करतेय का?
निद्रानाश- सूचना १ : आपण वयाच्या अनुसार झोपेत कसे बदल होतात ते समजून घेऊ या.
वयानुसार विविध संप्रेरक पातळी शरीरामध्ये सतत बदलत राहते. त्यामुळे अनेकदा विस्कळीत झोप/ कमी झोप/ वेळी-अवेळी जाग येणे आणि मग झोप न लागणे असे प्रकार होऊ शकतात. म्हणजेच शरीरातील अंतर्गत घडय़ाळ भिंतीवरच्या घडय़ाळाशी जुळत नाही. बऱ्याच वेळा बाथरूमला जाण्यासाठी उठावे लागते आणि मग झोप येत नाही. मग अशा वेळी काय करायचे?
– तुम्हाला झोप मिळविण्यासाठी रात्री अंथरुणावर वेळेवर जावे लागेल (रात्री ९ च्या सुमारास) आणि दिवसा एक डुलकी घेऊन कमतरता भरून काढता येईल. बहुतांश व्यक्तींसाठी अशा प्रकारे ‘झोप बदल’ सामान्य आहेत आणि असे बदल समस्या सूचित करीत नाहीत.
नियमितपणे खालील लक्षणे दिसली तरच झोप ‘समस्या’ असू शकते.
आपल्याला थकवा जाणवत आहे का?
रात्रीच्या झोपेनंतर सकाळी ताजेतवाने वाटत नाही?
दिवसभरात चिडचिड होते किंवा निवांत वाटत नाही?
झोपेच्या गोळ्यांवर अवलंबून राहावे लागते?
पुढील भागात झोपेची समस्या का निर्माण होते आणि त्यावर आहारातून उपाय काय, याविषयी आपण बोलूयाच.
आजचा निद्रा-मंत्र :
झोपायच्या ३० मिनिटे आधी १/२ कप कोमट दूध, हळद आणि जायफळ घातलेले घेणे हा उत्तम पर्याय.
संगणकाशी मत्री : फेसबुकवरील इतर पर्याय
संकलन-गीतांजली राणे – rane.geet@gmail.com
यापूर्वी आपण फेसबुकचे अकाउंट (खाते) कसे सुरू करावे याची माहिती घेतली, (५ एप्रिल) आज आपण फेसबुकवर काम करताना वापराव्या लागणाऱ्या इतर पर्यायांची माहिती घेणार आहोत.
१.फेसबुकचे अकाउंट लॉगिन (सुरू) केल्यावर आपल्यासमोर टाइमलाइनचे पान सुरू होते. तुम्हाला जर तुमच्या मनातील एखादा विचार फेसबुकवर टाकायचा असेल तर whats on your mind? असे लिहिलेल्या ठिकाणी तो लिहून post या बटणावर क्लिक करा. समजा तुम्हाला एखादा व्हिडीओ किंवा फोटो फेसबुकवर टाकायचा असेल तर add photos/videos या बटणावर क्लिक करून जिथे फोटो ठेवलेले असतील त्या फोल्डरमधून ते निवडून तुमच्या अकाउंटवर पोस्ट करा.
२. तुम्ही फेसबुकवर अपलोड केलेल्या या फोटोंवर, विचारांवर तुमच्या खात्यामधील मित्र प्रतिक्रिया देऊ शकतात किंवा लाइक करू शकतात. कोणाच्याही पोस्टवर (फेसबुकच्या भाषेत आपण खात्यावर अपलोड करीत असलेल्या गोष्टीला ‘पोस्ट’ असे म्हटले जाते) किंवा फोटोवर स्वत:चे मत (comment) देण्याकरता तुम्ही त्या पोस्टच्या किंवा फोटोच्या खाली असलेल्या comment या चिन्हावर क्लिक करा. लाइक करण्यासाठी ‘हाताचा अंगठा वर केलेले चिन्ह’ असलेल्या चित्रावर क्लिक करा.
३. तुम्ही अपलोड केलेले फोटो किंवा पोस्ट काही ठरावीक लोकांनीच पाहाव्यात असे जर तुम्हाला वाटत असेल तर public असे लिहिलेल्या चौकटीच्या खाली निळ्या अक्षरात update status असे लिहिलेला पर्याय असेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर मित्र, मित्रांचे मित्र, जवळचे मित्र, फक्त मी असे अनेक पर्याय सुरू होतात. त्यापकी आपल्याला हवा असलेला पर्याय निवडा.
४. एखाद्या फोटोत किंवा पोस्टमध्ये तुम्हाला खात्यामधील व्यक्तीला जोडून घ्यायचे असेल (टॅग करायचे असेल) तर public असे लिहिलेल्या चौकटीच्या खाली अधिकचे चिन्ह असलेली मानवी छाया दिसेल त्यावर क्लिक करून अपेक्षित व्यक्तीचे नाव टाइप करा. असे केल्यावर त्या व्यक्तीच्या खात्यावरही तुमची पोस्ट/ फोटो दिसू शकतो.
५. फेसबुक सुरू केल्यानंतर अगदी वर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला काही चिन्हं दिसतील, तुम्हाला प्रश्न पडला असेलच ही चिन्हं आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विविध पर्यायांचा उपयोग काय? home या पर्यायाच्या शेजारी असलेल्या दोन मानवी छाया असलेल्या चिन्हांवर (हे चिन्ह peoples you may know या पर्यायाचे असते) क्लिक केले असता find friends, settings हे पर्याय दिसतील. त्यापकी find friends या पर्यायामध्ये आपल्या ओळखणाऱ्या लोकांची यादी असेल त्यातील ज्या व्यक्तीला आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची असेल त्या व्यक्तीच्या नावापुढे असलेल्या add friend या पर्यायावर क्लिक करा. settings च्या पर्यायावर क्लिक केले असता तुम्हाला कोणी ‘मित्र विनंती’ पाठवावी किंवा पाठवू नये याची नोंद तुम्ही करू शकता. तुम्हाला समोरून आलेल्या मित्र विनंत्यांची यादीही याच मानवी चिन्हांखाली दिलेली असते. त्यापकी तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीच्या नावापुढील confirm friend हा पर्याय निवडून तुम्ही मित्र विनंती स्वीकारू शकता. जर तुम्हाला ती व्यक्ती खात्यात नको असेल तर तुम्ही delet friend request चा पर्याय निवडू शकता.
आजी आजोबा आजच्यापुरती फेसबुकची शिकवणी इतकीच, पुढच्या वेळेस आपण फेसबुकच्या इतर पर्यायांची माहिती करून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आज शिकलेल्या टिप्स वापरून तुमच्या जुन्या सवंगडय़ांना शोधा, आणि तुमच्या नातवंडांनाही friend request पाठवून सुखद धक्का द्या!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा