वैद्यकशास्त्रातील प्रगत तंत्रज्ञानातील नव्या अध्यायामुळे, बीजांडदान केल्यामुळे अनेक स्त्रियांना मातृसुखाची प्राप्ती होत आहे, हे चांगलंच आहे, मात्र त्याच बरोबर अनेक गरजू स्त्रिया एका नव्या आव्हानाला सामोऱ्या जात आहेत. झटपट मिळणाऱ्या पैशांसाठी स्त्रिया-मुली आरोग्याची काळजी घेण्यात कमी पडतायत का ? की यातल्या धोक्यांपेक्षा पैशाचे प्रलोभन त्यांना भुरळ पाडतेय, वस्तुस्थिती काय व किती गंभीर आहे, यावर चर्चा करणारा लेख, खास आजच्या  
जागतिक महिला दिनानिमित्ताने.
सुषमा पांडे या उंचापुऱ्या, देखण्या आणि मुख्य म्हणजे निरोगी किशोरवयीन मुलीसाठी एका क्लिनिकमध्ये काही तास ‘व्यतीत’ केल्याच्या बदल्यात २५ हजार रुपये मिळणार असतील तर हा सौदा नक्कीच आकर्षक होता, तिला त्याचा मोह पडलाच, पण नंतर मात्र यातून उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे तिला जीव गमवावा लागला आणि या सगळ्याच प्रकरणातले गांभीर्य समोर आले.
  ही घटना घडली मुंबईतील एका प्रसिद्ध वंध्यत्वनिवारण क्लिनिकमध्ये. यामुळे बीजांडदान वा एग डोनेशनच्या प्रक्रियेतील काही दुर्लक्षित बाबी अधोरेखित झाल्या. गेल्या दशकात भारतात वेगाने विकसित झालेली वंध्यत्वनिवारण क्लिनिक्स म्हणजे प्रजोत्पादन क्षेत्रातली कोटय़वधी रुपयांची उलाढाल करणारी ‘इंडस्ट्री’ बनली आहे! त्यामुळे अनेक मुली, तरुणी व मध्यमवयीन स्त्रिया यांच्यासाठी सरोगेट माता होणं किंवा स्त्री-बीजदाता होणं हा ‘नफेदार’ मार्ग खुला झाला आहे. परंतु यातून मिळणाऱ्या झटपट पैशांमुळे अनेक तरुणी आपल्या आरोग्याशी पर्यायाने स्वत:च्या जिवाशी खेळतायत, ही जाणीव तरी त्यांना आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
अलीकडे सरोगसीवर आलेले ‘फिलहाल’सारखे काही चित्रपट व मालिकांमधील कथानकामुळे हे विषय चर्चेत आले आहेत. ‘विकी डोनर’ या चित्रपटामुळे तर वीर्यदाता असलेल्या नायकामुळे, अनेक निपुत्रिक जोडप्यांच्या आयुष्यात आलेल्या अपत्य प्राप्तीच्या आनंदाचे रसभरित वर्णन आलेले आहे. अशा विविध माध्यमांमुळे पुरुषांनी वीर्यदान (sperm donation)  करणं किंवा स्त्रियांनी स्त्री-बीजदान (egg-donation) करणं हे कितपत सुरक्षित आहे अशा चर्चा व्यासपीठांवर झडल्या नसल्या तरी कुजबुज होण्याइतपत जागरूकता नक्कीच पसरली आहे.
पण दुर्दैवाने स्त्री-बीज किंवा पुरुष-बीज डोनेट करणं या विषयीचं शास्त्रशुद्ध ज्ञान जनमानसापर्यंत पोहोचलेलं नाही. मुख्य म्हणजे या संदर्भातील ‘द असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नोलॉजी बिल, २०१०’ या विधेयकाचे अजून कायद्यात रूपांतर न झाल्यामुळे वंधत्वनिवारण क्लिनिक्स व बीजांडदात्या यांना अद्याप कायद्याचे संरक्षण नाही.
वांद्रे येथील वंध्यत्वनिवारण क्लिनिकमध्ये बीजांड दान केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत, १७ वर्षीय सुषमा पांडेचा (२०१०मध्ये)अकस्मात झालेला मृत्यू व गेल्याच महिन्यात २९ जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या एका युवतीचा मृत्यू यामुळे सामाजिक गरज म्हणून जन्माला आलेल्या या इंडस्ट्रीविषयी काही मूलभूत प्रश्न उभे ठाकले आहेत. अद्यापही कोणत्याही व्यवस्थेच्या नियमनाखाली न आलेल्या या इंडस्ट्रीमध्ये, त्या त्या आयव्हीएफ क्लिनिकमध्ये बीजांड दान करणाऱ्या महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात का याचा शोध घेणं अपरिहार्य झालं आहे. यातून मिळणाऱ्या सहज पैशांमुळे स्त्रिया अनैसर्गिक दिशेने जाऊन आरोग्याबाबत धोका स्वीकारण्यासाठी तयार आहेत हे शोधणे गरजेचे आहे.
 बहुतांश वेळा, स्त्री-बीज वा पुरुष-बीज दाता हा आर्थिकदृष्टय़ा निम्नस्तरात मोडणारा असतो. तर दुसरीकडे आपल्याला हव्या असलेल्या बाळाविषयीच्या पालकांच्या कल्पना, त्यांचं प्राधान्य वेगळं असतं. म्हणूनच बीज दाता स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मातेचा अंश गर्भापर्यंत पोहोचवण्याच्या महत्त्वाच्या कार्यानंतर बीज दात्याला त्यावरचा अधिकार सोडावा लागतो. इथपर्यंतही ठीक होतं. मात्र परिस्थिती चिंताजनक असल्याचे दाखले देणारी माहिती स्पष्ट होते आहे. वैद्यकीय कायदेतज्ज्ञ म्हणून काम पाहणाऱ्या अ‍ॅड. शिवानी शहा यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितलं, ‘पालक होऊ इच्छिणारे व बीजांडदाता स्त्रिया यांच्यात कोणताही करार होत नाही. मात्र जी एजन्सी दाता मिळवून देते, ती एजन्सी व पालक होऊ इच्छिणाऱ्यांमध्ये लेखी करार होतो. म्हणजे बीजांडदाता स्त्रीविषयी वाच्यता होत नाही. तिची ओळखही गुलदस्त्यात ठेवली जाते. काही केसेसमध्ये बीजांडदात्या स्त्रीचा फोटो पालकांना दाखवला जातो. मात्र तिचं नाव, तिची इतर माहिती याबाबत गुप्तता बाळगली जाते.’
या प्रकरणातली मेख येथेच आहे. कारण पालकांना त्यांच्यासाठी बीजांडदात्या स्त्रीचा फोटो दाखवला जातो, मात्र बीजांडदात्या स्त्रीला तिचे स्त्री-बीज कुणासाठी वापरले जाणार, याची कल्पना दिली जात नाही.  स्त्री-बीज तिच्या शरीरातून घेतल्यानंतर तिचा त्यावरचा हक्क संपुष्टात येतो आणि ती संबंधित क्लिनिक वा एजन्सीची ‘प्रॉपर्टी’ होते. तसेच बीजांडदान केल्यानंतर झालेले मृत्यू इतकाच फक्त काळजीचा मुद्दा नसून त्या अनुषंगाने होणारे त्या स्त्रीच्या आरोग्यावर संभवणारे दूरगामी परिणाम हा सुद्धा उपस्थित होणारा प्रश्न आहे.
भारतीय वैद्यकीय संघटनेच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात  एकूण ३५०० वंध्यत्वनिवारण क्लिनिक्स आहेत. यापैकी ५०० क्लिनिक्स ही एकटय़ा मुंबईत आहेत. तसेच बीजांडदाते मिळवण्यासाठी या क्लिनिक्सची भिस्त ही मोठय़ा प्रमाणावर ‘एजन्सी’ वर अवलंबून आहे. तरीही याची नोंद ठेवणारी कोणतीही केंद्रीय व्यवस्था नसल्याने बीजांडदात्याचा नेमका आकडा अजूनही प्रकाशात आलेला नाही.
बीजांडदाता हवी असल्याच्या जाहिराती या साधारणपणे स्त्रीवर्गाकडून वाचली जाणारी मासिकं, दैनिकं किंवा इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांवर दिल्या जातात. http://www.surrogatefinder.com  यासारख्या आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांवर एग डोनर वा स्पर्म डोनर तसेच सरोगेट माता व इच्छुक पालकांची मोफत नोंदणी केली जाते.
महत्त्वाची बाब म्हणजे, या संकेतस्थळावर भारतातील ५,३५६ डोनरची नोंद आहे (ज्यात एग व स्पम्र्स डोनर दोघांचाही समावेश आहे) मात्र या संकेतस्थळावर असणाऱ्या एकूण १४९ देशांमधील दातांच्या नोंदीत भारतातील दात्यांची संख्या सर्वाधिक आहे. पाठोपाठ अमेरिका (१५१४) व ब्रिटन (७४८) यांचा क्रमांक लागतो! यातही विशेष बाब म्हणजे आपल्या देशातून झालेल्या ५३५६ नोंदणीकृत दात्यांपैकी ११२५ दाते हे महाराष्ट्रातील आहेत. तर ५९५ दिल्लीचे, ४५२ कर्नाटकचे आहेत. महाराष्ट्रातील एकूण नोंदींपैकी ३५७ हून अधिक दात्यांनी मुंबईतून नोंदणी केली आहे. तर पुण्यातून २५५ जणांनी नोंद केली आहे. यात एग  व स्पर्म डोनर दोहोंचा समावेश आहे. मात्र कुडाळ, इचलकरंजी, अकोला, फुरसुंगी अशा तुलनेने लहान ठिकाणांहूनही स्पर्म डोनरनी नोंदणी केली आहे, हे विशेष.
अर्थातच स्त्री-बीजाची मागणी मोठी असल्याची कबुली आयव्हीएफमधील तज्ज्ञ देतात. ‘बिकमिंग पॅरेंट्स’ या सरोगसी, एग व स्पर्म डोनेशनशी निगडित आंतरराष्ट्रीय कंपनीचे संचालक गौरव वानखेडे म्हणतात, की कोणतीही अधिकृत यंत्रणा या डोनरची संख्या मोजण्यासाठी नसल्याने याची नेमकी आकडेवारी कळू शकणार नाही. मात्र, मुंबईतील आयव्हीएफ सेंटर्समधील परिस्थिती पाहिली तर त्यांना प्रत्येक आठवडय़ाला एका डोनरची गरज असते. त्यांच्या सेंटर्सवर येणाऱ्या दोनपैकी एका जोडप्याला डोनरची मदत लागणार असते, असा हा मामला आहे.
तर आयव्हीएफमधील तज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर यांनी ही वैद्यकीय क्षेत्रासाठीचीही निकड असल्याचे वास्तव अधोरेखित केले. ‘माता-पिता होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना अनेक कारणांमुळे डोनरची गरज असते. त्यात वाढलेले वय, प्री-मॅच्युअर ओवरियन फेल्युअरने त्रस्त असणाऱ्या स्त्रिया, जेनेटिक समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या स्त्रिया किंवा अनेक शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रिया, अशांना आई होण्याचा आनंद घेण्यासाठी एग डोनरची मदत लागते. अनेकदा कर्करोगावरील केमोथेरेपीसारख्या उपचारांदरम्यान, ओव्हरीज तयार होत नाहीत. अशा वेळी एग डोनर लागतोच.’
प्रत्येक निरोगी स्त्रीच्या अंडाशयात दर महिन्याला एक स्त्री-बीज तयार होते. मात्र, उत्तेजक औषधे शरीरात सोडल्याने एकापेक्षा अधिक स्त्री-बीजांची निर्मितीसुद्धा शक्य होते. दाता स्त्रीच्या अंडाशयात पक्व झालेले स्त्री-बीज भूल देऊन योनीमार्गातून काढले जाते. मात्र, एकापेक्षा जास्त स्त्रीबीजनिर्मितीसाठी केले जाणारे वैद्यकीय इलाज हा महिलांच्या आरोग्याशी खेळ नाही का, हा प्रश्नही नजीकच्या काळात गंभीर व्हायची शक्यता आहे.
भूल देऊन स्त्री-बीज योनीमार्गातून काढले जाते. याआधी त्यासाठी दात्याची लेखी परवानगी घेतली जाते. या फॉर्ममध्ये बीजांड देण्यातील धोक्यांची कल्पना दिलेली असते. स्त्री-बीज काढण्याच्या प्रक्रियेसाठी काही औषधं दिली जातात, त्यामुळे थकवा जाणवू शकतो. एकाहून अधिक स्त्री-बीजनिर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे सुस्ती येणं किंवा ओटीपोटात त्रास होणं संभवू शकते. स्त्री-बीज काढण्यासाठी शिराशामक (intravenous sedatives) दिली जातात, त्यामुळे अ‍ॅलर्जी किंवा श्वसनात अडथळे निर्माण होऊ शकतात.
 अल्पवयीन सुषमा पांडे, तिच्या मृत्यूवेळी तिसऱ्यांदा बीजांडदान करत होती. तिने स्वाक्षरी केलेल्या फॉर्मवर स्पष्टपणे लिहिले होते, ‘स्त्रीबीज काढताना योनीमार्गातून अंडाशयाला सुई टोचावी लागते व या सुईमुळे रक्तवाहिन्यांना तसेच इतर भागांना इजा होण्याची शक्यता असल्याची मला पूर्ण माहिती आहे. यासाठी क्वचित अतिरिक्त वैद्यकीय मदतीचीही गरज लागू शकते.’ सुषमाने हे नक्की वाचलं होतं का किंवा ते वाचल्यावर तिचं गांभीर्य तिला कळलं होतं का, हा प्रश्नच आहे. म्हणूनच दात्यांना संबंधित धोक्यांची पूर्वकल्पना दिली जाते का, की हा मुद्दा पुरेसा गांभीर्याने न घेता त्यांची दिशाभूल केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
गर्भशास्त्रतज्ज्ञ डॉ.शेरल मॅस्करेन्हस यांनी याबाबत खुलासा केला. ‘बीजांडदात्याच्या बाबतीत उद्भवणारा मोठा धोका हा अंडाशयाच्या अतिउत्तेजित अवस्थेमुळे होऊ शकतो. यामुळे उलटय़ा होणं, जीव घाबरा होणं, श्वासोच्छ्वासात अडथळे, डोकेदुखी आणि वेदना संभवतात. मात्र स्त्री-बीज काढून घेतल्यानंतर त्या कमी कमी होत जाऊन पूर्णपणे थांबतात. हे खरं असलं तरी बीजांड देण्यामुळे उद्भवणाऱ्या दीर्घकालीन परिणामांचा कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास आपल्याकडे उपलब्ध नाही. मात्र पुन:पुन्हा बीजांड देण्यामुळे स्त्री-बीजासाठी पोषक स्थितीवर नक्कीच परिणाम होतो. म्हणूनच तीन महिन्यांतून एकदाच बीजांड दान करणं हितावह आहे.’ मात्र अशा नियमांचं पालन होतं का, हे पाहणारी कोणतीही व्यवस्था सध्या तरी अस्तित्त्वात नाही. याच्याही पुढचं म्हणजे कोणतीही स्त्री तिच्या संपूर्ण आयुष्यात फक्त सहा वेळा बीजांडदान करू शकते. मात्र एखादी स्त्री किती वेळा बीजांडदान करते याची नोंद नसल्याने, याचं खात्रीशीर उत्तर देणं अवघड आहे,’ असंही मॅस्कॅरेन्हस यांनी स्पष्ट केलं. हे खरं असेल तर १८ र्वषही पूर्ण न केलेली सुषमा तिसऱ्यांदा बीजांडदान करत होती, ही किती भयावह बाब आहे, हे लक्षात येईल.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दाता हा २१ ते ३५ र्वष या वयोगटातला असला पाहिजे. मात्र अनेक क्लिनिक ३० वर्षांखालील डोनर घेण्याला प्राधान्य देतात. आधी अपत्य झालेल्यांना ही अनेकदा पहिली पसंती दिली जाते, कारण त्यांची प्रजोत्पादन क्षमता सिद्ध झाल्याने ते ‘सिद्धहस्त दाता’ ठरतात. तर काही वेळा पालकांच्याच बीजांडदात्याविषयी काही अपेक्षा असतात-उदा- दिसण्यातील साम्य, बुद्धिमत्ता, पाश्र्वभूमी, वर्ण किंवा धर्म अशा   ठरावीक बाबतीत पालक आग्रही असतात. त्यानुसार दाता निवडला जातो.
‘मात्र याबाबतीतली भारतीय मानसिकता थोडी वेगळी असते, आपल्याकडे पालक दिसण्याविषयी फार आग्रही असतात तर परदेशातून भारतात बीजांडदात्याच्या शोधात येणाऱ्या पालकांना निरोगी बाळाचा आग्रह असतो. धर्म आणि दात्याचा चेहरा याबाबतही भारतीय पालक कमालीचे आग्रह असतात, असे ‘सरोगसी इंडिया’चे डॉ. सुधीर अज्जा यांनी सांगितले.
यातली आणखी एक विशेष बाब म्हणजे, समाजातील उच्चभ्रू व सुशिक्षित वर्गातून येणाऱ्या एग डोनरना ‘दिवा डोनर’ असं संबोधलं जातं. क्लिनिक्स पालकांच्या जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण करतील, असा बीजांडदाता शोधण्याचा प्रयत्न करतात. कारण पालकांना त्यांचं अपत्य त्यांच्यासारखंच दिसायला हवं असतं. ही भावना नैसर्गिक आहे. म्हणूनच दात्याची शैक्षणिक पाश्र्वभूमी व दिसण्याबाबतही ते आग्रही असतात,’ अशी माहिती हिरानंदानी हॉस्पिटलमधील आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. केदार गान्ला यांनी दिली.
आपल्याकडे अजूनही वंधत्वाला भावनिक असहायतेची लांच्छनास्पद किनार आहे. म्हणूनच अनेक पालक आयव्हीएफची मदत घेत असल्याचं गुपितच ठेवतात. म्हणूनच आयव्हीएफनंतरही बाळ आईसारखंच दिसायला हवं याबद्दल ते कमालीचे आग्रही असतात. ‘अनेक पालक तर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे दाता मिळण्यासाठी दोन वर्षांहूनही अधिक काळ वाट पाहायला तयार असतात. पण वाट पाहूनही उपयोग होत नाही, त्या वेळी नाइलाजाने ते कोणत्याही दात्याची मदत घ्यायला तयार होतात,’ असं वानखेडे म्हणाले.
कदाचित गोऱ्या कांतीकडे असणाऱ्या उपजत ओढीमुळे असेल भारतीय जोडप्यांमध्ये ‘कॉकेशियन डोनर्स’ लोकप्रिय आहेत. तसंच शारीरिक ठेवणीत भारतीयांशी साधम्र्य असणाऱ्या मेक्सिकन डोनर्सनाही आपल्याकडे मागणी आहे. साधारणपणे डोनरला मिळणारी रक्कम २५ ते ३० हजार रुपयांच्या घरात असते. मात्र युक्रेन किंवा रशियामधील दात्यासाठी सहा लाख रुपयेही मोजावे लागतात, त्यात त्यांचा प्रवासी खर्च व राहण्या-खाण्याचा खर्चही समाविष्ठ असतो, अशी माहिती वानखेडे यांनी दिली.
संसर्ग किंवा जेनेटिक आजारांशी संबंधित काही चाचण्या केल्यानंतर दात्याची नोंदणी केली जाते. त्यानंतर कायदेशीर व मानसोपचारतज्ज्ञांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतरच पुढे जाता येतं. परदेशी दात्यांना वैद्यकीय व्हिसा मिळणं आवश्यक असतं व त्यांच्या देशातील डॉक्टरांनी दिलेलं फिटनेस प्रमाणपत्र लागतं. अर्थातच आणखी काही चाचण्या केल्यानंतरच आपल्याकडे बीज दान करण्याची त्यांना पात्रता मिळते, असं शहा यांनी स्पष्ट केलं.
http://www.surrogatefinder.com या संके तस्थळावर नोंदणी करणाऱ्या बीजदात्याची तपशीलवार माहिती घेतली जाते. त्यांचं राष्ट्रीयत्व, वंश, वय, वैवाहिक स्थिती, उंची, वजन, डोळ्यांचा आणि केसांचा रंग, शिक्षण, तसंच ते धूम्रपान करतात किंवा नाही याची माहिती दिली जाते. यासह त्यांची शारीरिक वैशिष्टय़ं, त्यांचे छंद, आवडीनिवडी आणि परदेशात जाण्याची इच्छा वा क्षमता यांच्यासह बीजदाता होण्याची कारणंही विशद केली जातात.
याच संकेतस्थळावर भारतीय बीजदात्याने दिलेली कारणं कुतूहल चाळवणारी होती. एकीने आर्थिक अडचणीमुळे कुटुंबाच्या गरजेसाठी हा मार्ग पत्करल्याचं  लिहिलं होतं. तर दुसरीने उच्चशिक्षणासाठी आर्थिक तरतूद म्हणून बीजांडदानाचा पर्याय निवडला होता. तर एकीने यातून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद पसरवण्याचा मक्ता घेतला होता. या इंडस्ट्रीतले व्यावसायिक सांगतात की कउटफ या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दात्याची ओळख गुप्त ठेवण्याचं सुचविलं आहे.
मुंबईतील बहुतांशी हॉस्पिटल्सनी योग्य दाता शोधण्याची जबाबदारी सध्या तरी एजन्सींच्या खांद्यांवर सोपवली आहे. गान्ला म्हणतात, ‘अनेक मेडिकल सोशल वर्कर्स किंवा कॉर्डिनेटर्स महिलांना याबाबत माहिती देतात किंवा बीजांडदानासाठी इच्छुक स्त्रियांना पुढे आणतात.’ पण खरं तर अशा को-ओर्डिनेटर्ससाठी कोणतेही निकष नाहीत. ‘अनेकदा तर पूर्वीच्या बीजांडदात्या वा सरोगेट माता याच एजन्टसारखे काम करतात. साधारणपणे एजन्टमार्फत या दात्यांची नोंदणी होते. व त्याला क्लिनिककडून १०-१५ हजार रुपयांचं कमिशन मिळतं.’ आयव्हीएफमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पांडे प्रकरणामध्ये, नूरजहाँ मुनीर ही एजन्ट सुषमाला लोकल ट्रेनमध्ये भेटली होती व तिनेच त्या कोवळ्या वयातील सुषमाला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. ती अशिक्षित होती मात्र तिनेही पूर्वी बीजांडदान केलं होतं.
म्हणूनच या स्वयंनियंत्रित इंडस्ट्रीत मोठय़ा प्रमाणावर दुर्घटना घडल्याची किमान नोंद जरी नसली तरी भविष्यात होणाऱ्या धोक्यांचा विचार करता नियंत्रणव्यवस्थेची निकड ही काळाची गरज आहे. यामुळे इच्छुक दात्यांची दिशाभूल होण्याला प्रतिबंध बसू शकेल. कारण वैद्यकशास्त्रातील प्रगतीचा गैरफायदा घेतला जाणं सर्वथा अयोग्यच आहे, तोही निव्वळ काही हजार रुपयांसाठी. असं म्हणतात, की ‘वंध्यत्व पर्यटन’ हे परकीय चलन मिळवण्याचं मोठं साधन बनलं आहे. म्हणूनच तर या क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नियामक असण्याची गरज अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर ताओरी यांनी म्हटलं आहे- राज्यातील वंध्यत्व क्लिनिकसाठी परिषदेने यापूर्वीच काही मार्गदर्शक तत्त्वं तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे. तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनीही यासाठीची धोरणं तातडीने राबवता येणार नाहीत कारण, त्यावर चर्चा, वादविवाद होण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
थोडक्यात काय, वैद्यकशास्त्रातील प्रगत तंत्रज्ञानामुळे, बीजांडदान केल्यामुळे अनेक स्त्रियांना मातृसुखाची प्राप्ती होते आहे, हे चांगलच आहे, मात्र त्याच बरोबर अनेक गरजू  एका नव्या आव्हानाला सामोऱ्या जातायत का, या प्रश्नाचीही गंभीरपणे दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. स्त्रीच्या जीवनातील या आणखी एका अध्यायावर विचार मंथन व्हायला हवंय.
आजचा अंक जागतिक महिला दिन विशेष असल्याने नेहमीची काही सदरे प्रसिद्ध होऊ शकली नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा