डॉ. नंदू मुलमुले

आयुर्मान वाढलेली ज्येष्ठांची पिढी आणि आजची पन्नाशीची वा त्याच्या वरची मधली पिढी आपल्या कनिष्ठ पिढीसह घराघरांत दिसू लागली आहे. काळाबरोबर मूल्यव्यवस्था बदलली, जगण्याची शैली बदलली आणि विचारांची पद्धती बदलली. त्याचा ताण नात्यांवर येणं साहजिक आहे. मधली पिढी आणि वरिष्ठ पिढी यांच्यातल्या कधी संघर्षांच्या तर कधी आंबट-गोड नात्यांच्या कथा दर पंधरवडयाने.

Success story of Pratiksha Tondwalkar who once worked as a sweeper and now holds the SBI AGM post
शौचालय साफ करून पूर्ण केलं शिक्षण, २० व्या वयातच सुटली नवऱ्याची साथ; वाचा SBI अधिकारी प्रतीक्षा तोंडवळकर यांचा संघर्षमय प्रवास
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Success Story Of Sandeep Jain
Success Story Of Sandeep Jain :कठीण विषय शिकवला सोप्या भाषेत, ब्लॉगचे झाले ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर; वाचा संदीप जैन यांची गोष्ट
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Success Story Of Shashvat Nakrani In Marathi
Success Story Of Shashvat Nakrani : डिजिटल पेमेंटच्या अडचणी पाहून ‘भारतपे’ची सुचली कल्पना; १९ व्या वर्षी सुरू केली कंपनी अन्… वाचा, शाश्वत नाक्राणीची गोष्ट
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : सद्गुणांवर आधारित नैतिक मांडणी

भारतातली मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्था एका अनोख्या स्थित्यंतरातून जाते आहे. गेली दोन दशकं हे स्थित्यंतर इतकं वेगवान झालं आहे की, आयुष्य बदलतंय हे लक्षात येईपर्यंत त्यात नवा बदल घडून येतो आहे. काळाच्या लाटा इतक्या अनावर आहेत, की त्याविरुद्ध पोहणं अशक्य आहे,अन् त्यासह पोहणं हे प्राक्तन.

स्थित्यंतराचे पडघम पहिले उमटतात शहरांमध्ये. पूर्वीच्या काळी शहरं मोजकी. त्यातही शहरांवर खेडयांचा प्रभाव होता. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा ठाम समज होता. त्याला पहिला धक्का बसला एका सर्वस्वी परक्या संस्कृतीच्या आगमनानं. त्यांची सामाजिक, कौटुंबिक मूल्यं वेगळी होती, चालीरीती परक्या होत्या, देव-धर्मविषयक धारणा भिन्न होत्या.

आणखी वाचा-मधल्या पिढीचं ‘लटकणं’!

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थिरावलेल्या पाश्चिमात्य संस्कृतीचा आमच्याशी कुठलाच मेळ बसत नव्हता. ते व्यक्तीवादी, आम्ही समष्टीवादी. ते प्रागतिक, आम्ही अ-गतिक. ते ‘ज्ञान-विज्ञान’मयोसी, आम्ही विज्ञानाचा कासरा सोडून हजार वर्ष उलटलेली. मुळात आम्ही पौर्वात्य संस्कृतीचे पाईक. धर्म, जातिज्ञाती आणि पिढयानपिढयांपासून चालत आलेल्या चालीरीतींनी बांधलेल्या समाजाचे घटक. इथं समाज हाच केंद्र, व्यक्ती दुय्यम. कुटुंबाची उपजीविका शेती. सारा गावगाडा त्याभोवती फिरणारा. त्यामुळे कुटुंब, समाज आणि अर्थव्यवस्था, तिन्हीचा आधार कृषी. विस्तारित कुटुंब, एकत्रित कुटुंब हे सगळं शेतीसाठी गरजेचं. कष्ट सामाईक, मिळकत सामाईक, कुटुंब सामाईक; तेच परवडणारं. अर्थातच कुटुंबप्रमुख हा कर्ता, धर्ता, हर्ता. कुटुंबाच्या अंतर्गत कुरबुरी असतील, पण वेगळं फुटून निघणं हा विचारही अशक्य. त्यामागे थोडंबहुत प्रेम, बरंचसं परंपरेचं जोखड आणि मुख्य म्हणजे आर्थिक वास्तव. घरापासून तुटून निघणं-वाळीत टाकलं जाणं, आर्थिक सुरक्षेस मुकणं आणि जाति- ज्ञातीबाहेर फेकलं जाणं. ते म्हणजे मरणच.

ही सगळी व्यवस्था कोलमडण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे समाजाला बसलेला दुसरा धक्का- तंत्रज्ञानाच्या आगमनाचा. रेल्वे, तारायंत्र आणि छपाईतंत्र आलं. पत्रानं दूरसंवाद शक्य झाला, रेल्वेनं माणसं जवळ आली आणि छपाईमुळे चहुबाजूनं ज्ञानाचा प्रसार सोपा, सहज, जलद होऊ लागला. वैचारिक क्रांती घडणं शक्य झालं. ज्ञानाच्या प्रसारानं लोक प्रश्न विचारायला लागले. परंपरेला प्रश्न झेपत नाहीत, कारण बदलणं किंवा नष्ट होणं हीच त्याची उत्तरं आहेत. परंपरा चांगल्या की वाईट, याचं उत्तर शोधणाऱ्या चर्चा रंगवणाऱ्यांनी रंगवल्या, हमरीतुमरीवर आणल्या, पण तंत्रज्ञानाच्या आगमनानं त्या कधी संदर्भहीन होऊन गेल्या हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही. गोपाळ गणेश आगरकर लिहितात, अनेक संतांच्या शिकवणुकीने आणि असंख्य विद्वानांच्या व्याख्यानांनी आणली नसेल इतकी समानता आगगाडी आणि हॉटेलं यांच्यामुळे आली! विसावं शतक सरतासरता माहिती तंत्रज्ञान आणि संगणक अभियांत्रिकीच्या त्सुनामीत सारं बदललं. कुटुंबव्यवस्थेतला शतकानुशतकं साचलेला गाळ ढवळला गेला. पाणी गढूळलं. मूल्यं बदलली, एकशे ऐंशी कोनातून फिरली, काही नष्ट झाली. अनेक मूल्यांना मूल्य उरलं नाही! त्यात भर आपल्या समाजातील पुरुषसत्ताक पद्धतीची. पितृसत्ताक म्हटलं जातं, मात्र इथं प्रश्न फक्त पित्याचा नाही, घरातील आणि घराबाहेरील प्रत्येक पुरुषाचा आहे. स्त्रिया शिकल्या, आर्थिक पायावर स्वतंत्र उभ्या झाल्या, अनेक क्षेत्रांत व्यवस्थेच्या शिखरावर पोहोचल्या हे महत्त्वाचं स्थित्यंतर, मात्र पुरुषसत्ताक कुटुंबव्यवस्थेला अजूनही हे बदल पचवता आलेले नाहीत हे सत्य.

आणखी वाचा-कौटुंबिक जखमेवरची मलमपट्टी

बदल अटळ आहे, असतो. प्रश्न आहे बदलाच्या वेगाचा. जे बदल घडायला पन्नास वर्ष लागत होती, ते आता पाच वर्षांत घडू पाहतंय. ज्याला पाच वर्ष लागत होती, ते पाच महिन्यांत घडू लागलं आहे. वेग, जो आजवर सहन होण्याजोगा होता, तो सहनशक्तीची परीक्षा घेणारा. या बदलाचा कुटुंबांवर होणारा परिणाम हा या लेखमालेचा विषय. त्यातही, या बदलाचा भार ज्या पिढीला वाहावा लागतो, त्या मधल्या पिढीचा प्रतिनिधी हा महत्त्वाचा. ही पिढी ‘मधली’ केव्हा झाली? विसावं शतक संपता संपता, अंदाजे २००१ मध्ये, सर्वसाधारणपणे माणसं साठी-पासष्ठीपलीकडे जगायला लागली होती.. १८५० मध्ये बालमृत्यूचं प्रमाण प्रचंड असल्याने फार कमी माणसं आयुष्याचं जेमतेम अर्धशतक गाठत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळीदेखील भारतीयाचं सर्वसाधारण आयुर्मान कमीच होते. आता ते सत्तरीच्या पलीकडे पोहोचलं आहे. आज प्रत्येक कुटुंबात सर्वसाधारणपणे तीन पिढया नांदतात. त्यातल्या जुन्या आणि नव्या पिढीच्या मध्ये फसलेली वा अडकलेली पिढी ही ‘सॅन्डविच जनरेशन’. मध्यस्थ पिढी. रुळाचे सांधे जिथे बदलतात, रेल्वेला एक नवी दिशा मिळते, तो हा सांधा.

साहजिकच सांधे बदलताना होणारा खडखडाट पचवू पाहणारी ही पिढी. ते दरवेळी जमतंच असं नाही. कुठे दिशाबदल सहज, कुठे खडखडाट, कुठे डबे रुळावरनं घसरण्याची नौबत! ही पिढी जुन्याच्या तुलनेत नवी, नव्याच्या तुलनेत जुनी! लुप्त होत चाललेली मूल्यं जपण्याचा प्रयत्न करणारी, आधुनिक मूल्यं अंगीकारण्याची कोशिश करणारी. पॅन्ट-शर्टमध्ये वावरणारी, महानागरी किंवा निमशहरी, नव्या बदलांना थोडया नाखुशीनं का होईना, सामावून घेणारी. तिलाही जुनी पिढी म्हणावं लागतं, हे बदलाच्या वेगाचं द्योतक.

कनिष्ठ अर्थात तरुण पिढी म्हणजे मिलेनियल पिढी. विसाव्या शतकाअखेरीस जन्मलेली. ही पिढी संगणकासोबत जन्मली आणि मोबाइलबरोबर वाढत गेली. दोन शतकांच्या सांध्यावर जगात आलेल्या या पिढीला नैसर्गिक बुद्धी आणि ते वापरत असलेल्या संगणकाला कृत्रिम बुद्धी येण्याची एकच गाठ पडली. लॅपटॉप- म्हणजे मांडीवर घेतलेलं तंत्रज्ञान डोक्यावर बसलेली पिढी. ही जनरेशन ‘ग्लोबल’, मात्र त्यात उदात्त हेतू वगैरे काही नाही, तर चाकरीच्या शोधात पायाला चाकं लागलेली ही पिढी. यातले काही शरीरानं ‘एनआरआय’, तर बहुसंख्य मनानं. दूरसंचार क्रांतीनं ते कधीचेच जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलेले. आता प्रत्यक्षात जाण्याचंही अप्रूप न उरलेली ही पिढी.

आणखी वाचा-समकालीनतेचे  प्रतिसादरूप!

या दोहोंच्या मधली पिढी हा कुतूहलाचा विषय. ती आपल्या लहानग्यांना पाळणाघरात सहज ठेवते, मात्र आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यास कचरते. मुलांना पंख देते, मात्र ते उडून दूर जाऊ नयेत अशी मनोमन इच्छा बाळगते. सून उच्चशिक्षित असावी, वाटल्यास नोकरी करावी, मात्र घर सांभाळणं तिचीच जबाबदारीस, असा दंडक पाळते. या मधल्या पिढीला प्रगती हवी असते, मात्र ती गतीला घाबरते. पण गती हा आयुष्याचा नियम. स्थिती आणि स्थित्यंतराच्या मध्ये खरा संघर्ष दडलेला असतो. संक्रमणाच्या काळात खरी कथा घडताना दिसते. त्या संक्रमणाचे वाहक या पिढीचं प्रतिनिधित्व करतात. समाज जेव्हा कूस बदलतो, तेव्हा पडझड अपरिहार्य. त्या पडझडीत कालबाह्य मूल्यं झडणं अपरिहार्य. एखादी पिढी ‘जुनी’ का ठरते? ती अशा कालविसंगत मूल्यांना पकडून ठेवण्याचा अट्टहास धरते तेव्हा. मग त्या पिढीचं वय कितीही असो. माणसं बरोबर किंवा चूक नसतात, ती कालसुसंगत असतात किंवा कालबाह्य. कर्मकांडी चालीरीतींचा आंधळा जयघोष करणारा तरुण ‘जुन्या पिढीचा’ ठरतो, आणि नव्याचं खुलेपणानं आणि खुल्या मनानं स्वागत करणारा वृद्ध ‘मिलेनियल तरुण’! अशा वेळी पिढयांची आणि वयाची उलथापालथ होते. दोन पिढयांची कावड खांद्यावर घेऊन आयुष्याची वाट चालणाऱ्या या मधल्या पिढीच्या श्रावणकहाण्या भेटीला येतील दर पंधरा दिवसांनी!

nmmulmule@gmail.com

Story img Loader