लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. हा व्यक्तिमत्त्व विकार असू शकतो. पत्रकारिता, चित्रपटसृष्टी, फॅशन इंडस्ट्री अशा महत्त्वाच्या प्रसिद्धी माध्यमात अशा काही व्यक्ती असू शकतात. ‘अति नाटकीय भाव’ आणि ‘इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी धडपड करणारे’ अशी प्रमुख लक्षणे असणाऱ्या या व्यक्तिमत्त्व विकाराचे नाव आहे, ‘हिस्ट्रीओनिक’ व्यक्तिमत्त्व विकार. काय आहे हा विकार आणि कोणते आहेत त्यावरचे उपाय?

या सदरामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्व विकारांची माहिती करून घेत आहोत. ‘क्लस्टर ए’ विकारामधील रुग्ण संशयामुळे किंवा इतर लक्षणांमुळे घरातल्यांपासून, समाजापासून अलिप्त राहायचे, त्यांच्याशी तुटक वागायचे, स्वत:तच रममाण असायचे, पण ‘क्लस्टर बी’मधील व्यक्तिमत्त्व विकारांनी पीडित व्यक्तींचं तसं नाही. अगदी ‘क्लस्टर ए’च्या विरुद्ध असे नाटकीय किंवा कृत्रिम हावभाव, भडक असं वागणं ही ‘क्लस्टर बी’मधील व्यक्तींची लक्षणं असतात. मागच्या लेखात आपण ‘क्लस्टर बी’मधील पहिला ‘समाजविघातक व्यक्तिमत्त्व विकार’ पाहिला होता. आज आपण दुसऱ्या प्रकारावर प्रकाश टाकूया. तो आहे, ‘हिस्ट्रीओनिक’ व्यक्तिमत्त्व विकार.

Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
who was pramod mahajan
पत्रकार, भाजपाचे लक्ष्मण ते पंतप्रधानपदाचे दावेदार; कशी होती प्रमोद महाजनांची राजकीय कारकीर्द?
Adulterated food pune, Food and Drug Administration pune, Diwali, Adulterated food,
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा लाखोंचा बाजार! पुणे विभागात दसरा, दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

हेही वाचा : मेंदूचे स्वास्थ्य

या प्रकाराची माहिती वाचल्यावर तुम्हाला लगेच आजूबाजूला किंवा विशेषत: मीडियामध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती दिसू लागतील. त्या सगळ्यांना हा व्यक्तिमत्त्व विकार असेल असं नाही, पण निदान लक्षणं समजून घ्यायला तुमच्याकडे भरपूर वाव आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ‘अति नाटकीय भाव’ आणि ‘इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी धडपड करणारे’ अशी प्रमुख लक्षणे असणाऱ्या या व्यक्तिमत्त्व विकाराचे नाव आहे, हिस्ट्रीओनिक व्यक्तिमत्त्व विकार (histrionic personality disorder). लॅटिन भाषेत हिस्ट्रीओ ( histrio) म्हणजे ‘अभिनेता’ या शब्दापासून ‘हिस्ट्रीओनिक’ हा शब्द तयार झाला आहे. अभिनेता कसा पडद्यावर किंवा रंगमंचावर प्रत्यक्ष जीवनापेक्षा वेगळं अशा नाटकीय किंवा कृत्रिम भावामध्ये वागतो, तसंच हे लोक प्रत्यक्ष जीवनात वागतात. एव्हाना आपल्याला हे तर लक्षात आलेच असेल की या सर्व विकारांना ‘व्यक्तिमत्त्व विकार’ यासाठीच म्हणतात कारण तो पूर्ण व्यक्तिमत्त्व आणि तेही आयुष्यभरासाठी व्यापून टाकतो. एखाद्या ठिकाणी गरज म्हणून असे कृत्रिम हावभाव आपण समजून घेऊ शकतो, पण या विकाराने पीडित व्यक्ती कायमच अशा वागत असतात.

मनीषा, ४४ वर्षांची मध्यमवयीन स्त्री. कनिष्ठ महाविद्यालयात मराठी शिकवायची. तसं पाहायला गेलं तर कोणी काय कपडे घालावेत किंवा कोणाला कसं राहायला आवडतं हा ज्याच्यात्याच्या आवडीचा विषय आहे, पण तरीही शाळा, महाविद्यालयाच्या शिक्षकांनी कसं राहावं याचे काही सामाजिक मानदंड आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही अध्यापन करायला जाणार आहात, तिथं लग्नकार्याला जातात तसं नटूनथटून जायची काहीच गरज नसते. नीटनेटकं राहिलं तरी पुरेसं असतं. पण मनीषा रोज भडक रंगाच्या, बटबटीत डिझाइनच्या साड्या नेसून महाविद्यालयात जायची. नीटनेटकं राहायच्या नावाखाली भडक मेकअप करून वर्गात शिकवायची. हे सगळं करण्यामागे उद्दिष्ट एकच असायचं, ते म्हणजे लोकांचं लक्ष वेधून घेणं. लोकं तिच्यावर टीका करत आहेत की तिला नावं ठेवत आहेत याच्याशी तिला काही देणंघेणं नव्हतं. विचित्र कारणामुळे का होईना पण लोकं तिची दखल घ्यायचे. यातच ती खूश असायची. कधी काही कारणांनी लोकांनी तिची दखल घेतली नाही तर ती खूप अस्वस्थ व्हायची.

अकरावी-बारावीची मुलं म्हणजे जेमतेम १७-१८ वर्षांची असतात. पण मनीषा मुलग्यांशी खूप सलगीनं वागायची. मराठीच्या कविता शिकवताना गरज नसताना लैंगिकदृष्ट्या उत्तेजक हावभाव करायची. ती पुरुष सहकाऱ्यांशीही असंच खूप द्विअर्थी आणि मादक हावभाव करत बोलायची. तिला ना तिच्या आणि मुलांमधील शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याचं भान होतं ना त्यांच्या आणि तिच्या वयातल्या अंतराचं भान होतं. पण खरी मेख पुढं आहे. ते लैंगिकदृष्ट्या उत्तेजक वागतात, पण त्यांना वास्तविक शरीरसंबंधांमध्ये काहीच रस नसतो. हे जे काही उत्तेजक हावभाव असतात, ते सेक्सच्या इच्छेपोटी नसून लोकांनी त्यांना महत्त्व द्यावं म्हणून असतात. काही मुलांनी मुख्याध्यापकांकडे तक्रारही केली होती, पण मुख्याध्यापकांच्या बजावणीनंतरही तिच्यात काही फरक पडला नव्हता.

हेही वाचा : स्वयंपाकघर ते किचन गोष्ट एका प्रवासाची

मनीषाच्या सहकाऱ्यांना आणि प्रत्यक्ष तिच्या नवऱ्यालाही तिच्या बाबतीत असा अनुभव होता की, ती कधीच खोलवर विचार करून बोलायची नाही किंवा तिच्या खऱ्याखुऱ्या भावना दाखवायची नाही. आणि हे बोलणं वरवरचं असल्यामुळे असेल कदाचित पण ती पटकन भावना आणि वागणंही बदलायची. समोरची व्यक्ती कोण आहे, हे बघून ती तिचं बोलणं बदलायचं. एकदा तिला आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला पाठवलं होतं. सोबत विद्यार्थी होतेच. त्या स्पर्धेत त्यांचं महाविद्यालय काही यशस्वी ठरलं नाही, पण ती तिच्या सहकारी शिक्षकांसमोर तिच्या साडीचं, तिच्या दिसण्याचं तिथं कसं कौतुक झालं, सगळे कसे तिच्याकडेच बघत होते याचे जोरजोरात हसून वर्णन करून सांगत होती. एव्हाना शिक्षकांना तिच्या बढाया मारण्याची सवय झाली होती. ते निर्विकारपणे तिचं बोलणं ऐकत होते. तितक्यात मुख्याध्यापक समोर आले. तिनं क्षणात आपलं बोलणं फिरवलं आणि आता डोळ्यात पाणी आणून बक्षीस न मिळाल्याबद्दल तिला किती वाईट वाटलं ते सांगायला सुरुवात केली. हे इतक्या क्षणार्धात झालं की, आधी तिचं म्हणणं ऐकणारे शिक्षक अवाक झाले. इतरांकडे आपल्या भावना व्यक्त करून, त्या पद्धतीने वागून का होईना, मान्यता मिळवणं हे तिच्यासाठी अतिरिक्त महत्त्वाचं होतं.

स्वत:च्या राहणीमानाव्यतिरिक्त हे लोक घराचे बांधकाम, फोन, एखादी वस्तू, दागिने यातल्या कशाचा तरी उपयोग अशा पद्धतीने करतात की लोकांचं त्यांच्याकडे लक्ष जाईल. पदवीच्या तिसऱ्या वर्षाला जाणारी सई दोन पोनी, रंगीबेरंगी रिबिन्स लावून कार्टून असलेली बॅग घेऊन महाविद्यालयात जायची. सगळे तिची टिंगल करायचे, पण तिला वाटायचं ती निरागस, छोटीशी दिसते म्हणून सगळे तिला लहान मुलासारखं वागवतात. पण तसं नव्हतं.

आणखी एक लक्षण यांच्यामध्ये दिसतं ते म्हणजे बढाया मारणं. म्हणजे एखाद्या छोट्याशा गोष्टीतलं छोटसं यश ते असं काहीतरी खूप मोठ्ठं यश मिळवलंय अशा पद्धतीनं दाखवतात. कधी कधी तर त्यांना प्रत्यक्षात यश मिळालेलंही नसतं. मनीषा महाविद्यालयातील जेवणाच्या सुट्टीत तिच्या डब्यातील भाजी तिच्या लेकाला आणि नवऱ्यालाच नाही, तर अख्ख्या सोसायटीतील लोकांना किती आवडते, ते तिच्याकडे भांडं घेऊन ‘आम्हाला पाहिजे, आम्हाला भाजी पाहिजे,’ म्हणून कसं मागे लागतात, हे रंगवून रंगवून सांगायची. त्यामुळे तिला किमान दोन किलो भाजी करावी लागते अशाही बढाया मारायची. हे सगळं ऐकून नवीन माणसाच्या रसना जाग्या व्हायच्या आणि ते भाजीची चव घ्यायला यायचे. त्या नवीन माणसाचा कसा भ्रमनिरास होत असेल हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल.

लक्ष वेधून घेणं या प्रमुख लक्षणाच्या अंतर्गतच त्या लक्षणपूर्तीसाठी अजून एक उपलक्षण आहे, ते म्हणजे त्यांची ‘बोलण्याची पद्धत’. त्यांची बोलण्याची पद्धत खूप स्टायलिश असते. मराठी बोलतानाही ते वरच्या पट्टीत खणखणीत किंवा किनऱ्या आवाजात बोलतील किंवा इंग्रजी उच्चारांचे परदेशी हेल काढून बोलतील. ऐकणाऱ्यांपैकी काहीजणांना ते खूप आत्मविश्वासपूर्ण आहे असंही वाटू शकेल, काही जणांना ते आवडणारही नाही पण दोन्ही मतप्रवाहांचे लोक त्यांची दखल घेतात हे मात्र नक्की. बोलताना फारसा विचार न करता ते वादग्रस्त विधान करतात. बरं, ती विधानं करताना खूप विचारपूर्वक केलेली नसतात. उगीचच काहीतरी खळबळजनक करण्याच्या नादात परिणामांचा विचार न करता असे प्रकार केले जातात. त्यामुळे बऱ्याचदा ते अडचणीतही सापडतात.

हेही वाचा :सांधा बदलताना : चुकांचा स्वीकार

आपल्याकडे ‘हलक्या कानाचा’ असा शब्दप्रयोग आहे. कोणी काहीही सांगितलं की, या विकाराच्या व्यक्ती पटकन समोरच्यावर विश्वास ठेवतात. वरवर पाहता सगळी लक्षणं वेगवेगळी असली तरी खरं तर ती एकमेकांशी संबंधितच आहेत. उदाहरणार्थ ‘कोणत्याही गोष्टीचा खोलवर परिणाम न करणं’ हे लक्षण असेल तर समोरच्याच्या बोलण्याचा शांतपणे विचार केला जाणारच नाही. तो म्हणेल त्याची शहानिशा न करता त्यांना तेच वास्तव आहे असं वाटतं. आणखी एक शेवटचं लक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्व विकार असलेल्या व्यक्ती त्यांच्या नातेसंबंधांचे वर्णन नेहमी वास्तवात आहे त्यापेक्षा जास्त जिव्हाळ्याचं आणि जवळचं आहे असं सांगतात. यात बढाया मारण्याचं लक्षण डोकावतंच.

अशा या साधारण आठ लक्षणांपैकी किमान पाच लक्षणं आढळून आली, तर एखाद्या व्यक्तीचे निदान ‘हिस्ट्रीओनिक व्यक्तिमत्त्व’ विकार असं करता येऊ शकतं आणि अर्थातच इतर व्यक्तिमत्त्व विकारांप्रमाणे व्यक्तीचं वय १८ वर्षे पूर्ण असल्याशिवाय निदान केलं जाऊ शकत नाही. यामध्ये ‘अँटी अँक्झिएटी अँटी डिप्रेशन’ औषधांचा वापर लक्षणानुसार केला जाऊ शकतो, पण मुख्यत्वे सायकोथेरपी दीर्घकाळपर्यंत घेणं हे या उपचार पद्धतीत सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. खूप रंगीबेरंगी, उत्साही, बहिर्मुखी असा हा व्यक्तिमत्त्व विकार आहे. या लोकांच्या उथळ आणि उच्छृंखल वागण्यामुळे लोक त्यांना वैतागून टाळण्याचा प्रयत्न करतात. बहुतेक वेळा हा व्यक्तिमत्त्व विकार ‘फॅशन इंडस्ट्री’ आणि ‘चित्रपटसृष्टी’ या क्षेत्रात जास्त पाहायला मिळतो. त्रासदायक, वैतागवाणे असले तरी, या व्यक्तिमत्त्व विकाराने पीडित व्यक्ती कोणत्याही प्रकारे धोकादायक निश्चितच नसतात.

(तळटीप या लेखातील माहितीचा वापर स्वत:च्या किंवा आप्तस्वकीयांच्या निदानासाठी कृपया करू नये. योग्य निदानासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.)

trupti.kulshreshtha@gmail.com