जागतिक सर्वोत्कृष्ट स्त्री बुद्धिबळपटू जुडीत पोल्गारने स्त्रियांसाठीची बुद्धिबळ खेळाची खिताबे रद्द करावीत, असे धाडसी विधान नुकतेच केले. मुळात स्त्री बुद्धिबळ खेळाडूंची संख्या कमी असताना त्यांच्यासाठीची स्वतंत्र खिताबे रद्द केली आणि त्या खुल्या गटात खेळायला लागल्या तर आहे ती संख्याही कमी होण्याची शक्यता जास्त आहे. उलट स्त्री बुद्धिबळपटू अर्थात बुद्धिबळ खेळणाऱ्या ‘राणीं’ची संख्या वाढणे ही आजची गरज आहे, सांगताहेत बुद्धिबळातील राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या, पद्मश्री भाग्यश्री साठे ठिपसे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजपर्यंतच्या जागतिक सर्वोत्कृष्ट स्त्री बुद्धिबळपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुडीत पोल्गार यांनी अलीकडेच एक खळबळजनक विधान केले आहे. त्या म्हणतात, ‘फिडे (The International Chess Federation) या जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून दिली जाणारी स्त्रियांची ‘ग्रँडमास्टर’, ‘इंटरनॅशनल मास्टर’, ‘विमेन ग्रँडमास्टर’, ‘विमेन इंटरनॅशनल मास्टर’ ही बुद्धिबळाची खिताबे (टाइटल्स) रद्द करण्यात यावीत’. हे विधान खूप धाडसाचे आणि मुलींच्या बुद्धिबळाच्या खेळावर दूरगामी परिणाम करणारे असल्याने एकूणच स्त्रियांच्या बुद्धिबळाविषयी विस्तृत चर्चा करणे गरजेचे आहे.
हेही वाचा : अवकाशातील उंच भरारी…
पोल्गार भगिनींची वाटचाल
जुडीतचे वडील लास्लो पोल्गार एक मानसशास्त्रतज्ज्ञ होते. त्यांच्या मते, एखाद्या पाल्याला आपण लहानपणापासून कोणतीही गोष्ट तंत्रशुद्ध पद्धतीने शिकवली तर त्यात ते पाल्य नक्कीच प्रावीण्य मिळवू शिकते. त्यांनी हा प्रयोग अमलात आणायचे ठरविले. त्याकरिता त्यांनी बुद्धिबळ हा खेळ निवडला आणि त्यांच्या तिन्ही मुलींना म्हणजे झुजा (सुसान), सोफिया आणि धाकटी जुडीत यांना बालपणापासूनच बुद्धिबळाचे धडे द्यायला सुरुवात केली. जुडीत सगळ्यात धाकटी. ती त्या वेळी अवघी चार वर्षांची होती. बुद्धिबळाला प्राधान्य देत त्यांनी मुलींना शालेय शिक्षणही घरातूनच द्यायचे ठरविले. तसे पाहता त्या वेळी हा निर्णय धाडसी म्हणता येईल. करिअर म्हणून बुद्धिबळाची निवड करणारे ते कदाचित पहिलेच पालक असावेत. ते त्या तिघींना विविध स्पर्धांकरिता स्वखर्चाने देशोदेशी घेऊन जात. बुद्धिबळातील उत्कृष्ट प्रशिक्षक त्यांना शिकवायला येत असत. त्या वेळी मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा मोजक्याच होत असत आणि त्या सगळ्यांसाठी खुल्या नसत. त्यामुळे त्यांनी नियमित सरावासाठी मुबलक संख्येने होणाऱ्या खुल्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. जवळजवळ १२-१३ वर्षांच्या होईपर्यंत त्या तिघीही स्त्रियांसाठीच्या स्पर्धांमध्ये खेळल्या नाहीत. जुडीतने तर कधीच स्त्रियांसाठीच्या स्पर्धेत भाग घेतला नाही याला अपवाद ‘महिला बुद्धिबळ ऑलिम्पियाड’. १९८८ आणि १९९० मध्ये हंगेरीचे प्रतिनिधित्व करत तिने ‘विमेन चेस ऑलिम्पियाड’मध्ये भाग घेतला आणि हंगेरीला सुवर्णपदक मिळवून दिले. जुडीत वगळता तिच्या इतर दोघी बहिणी नंतर स्त्रियांसाठीच्या स्पर्धांमध्ये खेळू लागल्या. सर्वांत मोठ्या सुसान पोल्गारने ‘महिला जागतिक अजिंक्यवीर’ स्पर्धा वयाच्या २७व्या वर्षी जिंकली, तर मधली बहीण सोफिया हिने ‘वुमन ग्रँडमास्टर’ किताब मिळविला. जुडीत हिने नेत्रदीपक कामगिरी केली आणि ती संयुक्त मानांकनात (रेटिंग लिस्टमध्ये) आठ सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये जाऊन पोहोचली. ही एखाद्या स्त्री खेळाडूने केलेली आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. या तिघींनाही समान दर्जाचे उत्कृष्ट प्रशिक्षण, सर्व प्रकारचे प्रोत्साहन आणि बुद्धिबळाच्या प्रगतीकरिता अत्यंत पोषक वातावरण मिळाले. असे असतानाही त्यांची कामगिरी समान पातळीवर झाली नाही. जुडीत आणि तिच्या बहिणींना मिळालेल्या प्रोत्साहनामुळे कदाचित सर्वसामान्य स्त्रियांना स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळण्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आणि आव्हानाची त्यांना जाणीव नसावी असे वाटते. म्हणूनच त्यांनी वरील विधान केले असावे.
स्त्रियांची बुद्धिबळातील वाटचाल
स्त्रियांसाठीची पहिली बुद्धिबळ स्पर्धा १८८४ मध्ये ससेक्स काऊंटीमध्ये घेण्यात आली. स्त्रियांसाठीची पहिली आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा १८९७ मध्ये लंडन येथे भरविण्यात आली; परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत स्त्रियांना क्लबमध्ये किंवा खुल्या स्पर्धेत खेळायला मज्जाव होता. ‘जागतिक बुद्धिबळ संघटने’ची स्थापना १९२४ मध्ये पॅरिस येथे झाली. त्या वेळी बुद्धिबळ जगताने बुद्धिबळाचा सर्वांगीण विकास आणि प्रसार करण्यासाठी काही ठोस पावले उचलली. त्यामध्ये स्त्रियांना खुल्या बुद्धिबळ स्पर्धांत खेळण्याची अनुमती देण्यात आली. तेव्हापासून केवळ दोन वर्षांत रशियाच्या वेरा मेनचिक हिने हेस्टिंग्ज येथे झालेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याच काळात ‘फिडे’ने केवळ स्त्रियांसाठी जागतिक अजिंक्यवीर स्पर्धा घेण्याची सुरुवात केली. १९२७ ते १९४४ पर्यंत वेरा मेनचिक हिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा सातत्याने आठ वेळा जिंकली. ‘फिडे’ने १९५० मध्ये बुद्धिबळपटूंना त्यांच्या खेळातील प्रावीण्याबद्दल ‘टायटल्स’ वा खिताब द्यायला सुरुवात केली. ‘ग्रँडमास्टर’, ‘इंटरनॅशनल मास्टर’, ‘विमेन ग्रँडमास्टर’, ‘विमेन इंटरनॅशनल मास्टर’ हे चार खिताब देण्यास सुरुवात केली. जरी स्त्रियांना खुल्या वर्गातील ‘ग्रँडमास्टर’ आणि ‘इंटरनॅशनल मास्टर’ खिताब मिळवण्यास मज्जाव नसला तरीही स्त्रियांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी स्त्रियांसाठी खास खिताब ठेवण्यात आले. ‘फिडे’ने प्रोत्साहनपर केलेल्या प्रयत्नानंतर- देखील आजमितीला बुद्धिबळ स्पर्धा खेळणाऱ्या स्त्रियांची संख्या तुलनात्मक खूपच कमी आहे. (साधारण ७ ते ८ टक्के). प्रावीण्य प्राप्त झालेल्या स्त्रियांचे सुद्धा विशिष्ट वयानंतर खेळणे स्वेच्छेने कमी होत जाते. अगदी जुडीतनेही वयाच्या ३८व्या वर्षी स्पर्धात्मक खेळातून निवृत्ती घेतली.
हेही वाचा : माझी मैत्रीण : सहजसुंदर नातं
स्त्री बुद्धिबळपटूंपुढील आव्हाने
बुद्धिबळ स्पर्धांत सहभागी होण्यासाठी स्त्रियांना बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. बुद्धिबळाच्या स्पर्धा साधारण ९ ते १० दिवस चालतात. अशा स्पर्धांना एकट्या मुलीला पाठविणे पालकांना सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर एका तरी पालकाला, बहुतेक वेळेला आईला जाणे आवश्यक असते. प्रत्येक वेळी पालकांना जाणे शक्य नसते. यामुळे मुलींचा स्पर्धात्मक सहभाग अनियमित आणि कमी होतो असे आढळून आले आहे. आणि मग साहजिकच हळूहळू त्यांची खेळातील गोडीसुद्धा कमी होत जाते. याचा परिणाम म्हणून त्यांचा बुद्धिबळाचा दर्जा मुलांच्या तुलनेत कमी झालेला आहे. बुद्धिबळात प्रावीण्य मिळवण्याकरिता बरीच वर्षे लागतात. अनेक वर्षे सातत्याने मेहनत घ्यावी लागते, नियमितपणे स्पर्धांत भाग घ्यावा लागतो. यासाठी पालकांना बराच आर्थिक बोजाही उचलावा लागतो. अनेकदा ते त्यांना परवडणारे नसते किंवा त्यासाठी त्यांची तयारी नसते.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट स्त्री विजेत्यांना मिळणारी पुरस्काराची रक्कम ही त्या स्पर्धेतील विजेतेपदाच्या रकमेच्या केवळ १० ते १५ टक्के असते. ही तफावत फारच मोठी आहे. त्यामुळेही
पालकांचा आपल्या मुलींना अशा स्पर्धा खेळवण्याकडे कल नसतो का?
खरे तर या स्पर्धांमध्ये मुलग्यांबरोबरच जास्तीत जास्त मुलींनीही भाग घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. या खेळाकडे आकृष्ट करण्याकरिता फक्त मुलींसाठी स्थानिक पातळीवर स्पर्धा घेतल्या जाव्यात. त्यामुळे त्यांना खेळणे सोयीचे होऊ शकेल. तसेच स्पर्धांकरिता आकर्षक बक्षिसे ठेवावीत जेणेकरून स्पर्धकांची संख्या वाढू शकेल. जोपर्यंत नियमित स्पर्धात्मक खेळणाऱ्या मुलींची संख्या वाढत नाही तोपर्यंत त्यांच्या खेळण्याच्या स्तरामध्ये वृद्धी होणार नाही.
जुडीत पोल्गार यांचे विधान
जुडीत पोल्गार यांचे स्त्रियांसाठीची खिताबे रद्द करावीत हे विधान अयोग्य यासाठी वाटते, कारण आजमितीला पुरुषांमध्ये २००० ग्रँडमास्टर आहेत आणि केवळ ३२६ वुमन ग्रँडमास्टर आहेत. नियमित खेळणाऱ्या स्त्रियांची अत्यल्प संख्या हेच यासाठी कारणीभूत आहे. या ३२६ वुमन ग्रँडमास्टरपैकी फक्त४२ स्त्री खेळाडूंना खुल्या विभागातील ‘ग्रँडमास्टर’ खिताब मिळवण्यात यश मिळाले आहे.
गेली अनेक दशके स्पर्धात्मक खेळामध्ये ‘अत्यल्प प्रतिसाद’ ही स्त्रियांच्या बुद्धिबळ खेळातील एक चिंतेची बाब समजली जाते. २०२२ मध्ये महापबलीपुरम येथे झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये खुल्या गटात १६ वर्षीय डी. गुकेश याने कार्लसन, अरोनियान अशा दिग्गज खेळाडूंना मागे टाकत वैयक्तिक सुवर्णपदक मिळविले. ‘महिला ऑलिम्पियाड’मध्ये मात्र पहिल्या पटावर वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी पिया र्क्यामलिंग ही खेळाडू तब्बल ५९ वर्षांची होती. तरुण मुली बुद्धिबळाकडे आवश्यक त्या संख्येने वळत नाहीत याचेच हे द्याोतक आहे. त्यामागील विविध कारणांचा शोध घेण्याचे काम ‘फिडे’ आणि ‘फिडे’च्या अनेक समित्या अनेक वर्षे करीत आहेत आणि नवीन प्रोत्साहनपर योजना आणत आहेत.
हेही वाचा : सांदीत सापडलेले : काळजी
कोनेरू हम्पी हिने नुकतीच एका मुलाखतीत स्त्रियांच्या बुद्धिबळाच्या वर्तमान आणि भविष्यासंदर्भात खूप परिपक्व प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, स्त्री बुद्धिबळ खेळाडूंची संख्या कमी असण्याचे मुख्य कारण हे केवळ स्त्रियांसाठी असणाऱ्या चांगल्या स्पर्धांचा अभाव आहे. मी हम्पीच्या मताशी पूर्ण सहमत आहे. जर जुडीतच्या म्हणण्यानुसार स्त्रियांसाठीची खिताबे काढून टाकली तर स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्त्रियांची संख्या आणखीनच कमी होईल.
भारतीय बुद्धिबळ खेळाडू
१९७२ मध्ये फिशर-स्पास्की यांच्यातील झालेल्या जागतिक विजेतेपद स्पर्धेच्या अनुषंगाने १९७१ पासूनच सर्व माध्यमांतून बुद्धिबळाला खूपच प्रसिद्धी, लोकप्रियता आणि मान्यता मिळाली. यामध्ये मुंबईच्या मराठी वर्तमानपत्रांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. त्या वेळी भारतीय बुद्धिबळात महाराष्ट्र अग्रणी होता, त्यामुळे महाराष्ट्रात तसेच भारतभरातील अनेक मुलींना बुद्धिबळ खेळायची आवड निर्माण झाली. ‘महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना’ आणि ‘अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना’ यांना स्त्रियांसाठी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्याची आवश्यकता वाटू लागली. १९७४ मध्ये बंगळूरु येथे पहिली स्त्रियांसाठीची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा भरविण्यात आली. त्या वेळी बुद्धिबळात महाराष्ट्र अग्रणी असल्यामुळे या स्त्रियांसाठीच्या स्पर्धादेखील महाराष्ट्राने गाजविणे स्वाभाविक होते. पहिल्या २० राष्ट्रीय स्पर्धांपैकी महाराष्ट्राच्या आम्ही पाच जणींनी म्हणजे खाडिलकर भगिनी, मी स्वत: आणि अनुपमा अभ्यंकर गोखले यांनी तब्बल १९ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकाविले. तसेच १९७८ ते १९९५ पर्यंत झालेल्या ‘आशियाई महिला बुद्धिबळा’चे विजेतेपददेखील भारतीय मुलींनीच पटकावले. आणि विशेष म्हणजे त्या सगळ्या महाराष्ट्राच्याच होत्या. त्यानंतर मात्र हळूहळू महाराष्ट्राचे वर्चस्व कमी होत गेले. आणि इतर राज्यांतूनही गुणी खेळाडू पुढे येऊ लागल्या. तमिळनाडूची विजयालक्ष्मी आणि आंध्र प्रदेशची कोनेरू हम्पी, तेलंगणाची हरिका यांचा या क्षेत्रात उदय झाला. महाराष्ट्राची सौम्या स्वामिनाथन हिने २००९ मध्ये जागतिक जुनिअर महिला स्पर्धा जिंकली, तर नुकत्याच अहमदाबाद येथे पार पडलेल्या ‘जागतिक जुनिअर महिला स्पर्धे’चे विजेतेपद महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने जिंकले. २०२३-२०२४ मध्ये दिव्याने अनेक स्पर्धा जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तमिळनाडूच्या वैशालीनेही मागील वर्षात ‘ग्रँड स्विस’ ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली आणि जागतिक विजेतेपदाच्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरली.
हेही वाचा : ‘भय’ भूती : भयाचा तप्त ज्वालामुखी
आज बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या ४५ व्या ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’मध्ये भारताच्या महिला संघात डी. हरिका, आर. वैशाली, दिव्या देशमुख, तानिया सचदेव आणि वंतिका अगरवाल या स्त्रिया टीमचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांच्या ‘फिडे’ गुणांकनामुळे टीमला पहिले मानांकन मिळाले आहे. ही खूप अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. स्त्रियांच्या या प्रगतीला केवळ खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे योगदान कारणीभूत आहे, असे मला नमूद करावेसे वाटते. २०२२ मध्ये महाबलीपुरम येथे झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला संघात पाचपैकी फक्त एकच खेळाडू (आर वैशाली) तिशीच्या आतली होती, पण २०२४ मध्ये आपल्या संघात तीन खेळाडू पंचवीसपेक्षाही लहान आहेत. हा बदल स्वागतार्ह आहे. तो टिकायला हवा.
इतर देशांच्या तुलनेत भारतीय युवा महिला खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत आणि विशेषत: गेल्या दोन वर्षांत खूपच प्रगती केली आहे. असे आशादायक चित्र असतानाही भारतात तरुणींचा बुद्धिबळातील सहभाग तरुण बुद्धिबळपटूंच्या तुलनेत केवळ ७ ते ८ टक्केच आहे. जोपर्यंत ही संख्या मुलांच्या बरोबरीस येत नाही तोपर्यंत पुरुष आणि स्त्रिया यांच्या दर्जातील अंतर कमी होण्याची शक्यता धूसर दिसते.
अशा परिस्थितीत केवळ स्त्रियांसाठी जास्त संख्येने आकर्षक स्पर्धांचे नियमित आयोजन करून त्यांना स्पर्धेत सहभागी करण्यासाठी प्रोत्साहित करणे हाच उत्तम मार्ग ठरेल.
bthipsay@gmail.com