आयुष्यात बरंच काही करायचं राहून गेलंय याची जाणीव, अनेकींना रजोनिवृत्तीच्या काळात होते. कारण कुटुंबांसाठी, त्यातील प्रत्येकासाठी राबलेल्या तिला, आता प्रत्येकाने आपलीही काळजी घ्यावी, असं वाटत असतं, विशेषत: नवऱ्याने. मात्र तसं होत नाही. अशा वेळी हरवलेल्या स्वत:मधल्या ‘ती’ला शोधायचा प्रयत्न केला तर?
बागेत फिरताना दोन मैत्रिणींमधला संवाद कानावर पडला. एक मैत्रीण दुसरीला सांगत होती, ‘‘लग्नाच्या आधी म्हणजे लहानपणी आई-वडिलांच्या पसंतीचं वागून झालं. लग्नानंतर नवऱ्याला काय आवडेल? सासरच्या मंडळींना काय रुचेल? समाज काय म्हणेल? मग हळूहळू मुलांना काय आवडेल? या अनुषंगानं वागून झालं. आता असं जाणवतंय की, मी कायम ‘सेकंड इनिंग’च खेळले. माझी ‘फर्स्ट इनिंग’ खेळायची बाकीच राहिली आहे. म्हणूनच मी ठरवलंय, जे मला मनापासून करायचं होतं, जे मला कधी करताच आलं नाही तसं जगून बघायचंय.’’ त्यांचं बोलणं एकून माझंही विचारचक्र सुरू झालं ते रजोनिवृत्तीतील स्त्रीच्या मनोवस्थेविषयी.
साधारणत: विवाहित स्त्रियांच्या चाळिशीच्या मागे-पुढे मुलं मोठी होत असतात, झालेली असतात. नवऱ्याचं स्वत:च्या नोकरी-व्यवसायामध्ये बस्तान बसायला लागलेलं असतं आणि कधी नव्हे तो ‘होममेकर’ आणि करिअर करणाऱ्या स्त्रियांनादेखील स्वत:साठी वेळ उपलब्ध होतो. अर्थात त्याबरोबरच वयानुसार आलेल्या काही व्याधींची सुरुवातदेखील याच वयातली. कधी रक्तदाब, कधी वाढलेली साखर, तर कधी मासिक पाळीच्या तक्रारी. मासिक पाळीदरम्यान जास्त किंवा कमी होणारा रक्तस्राव, त्याबरोबरच शेजारणींचं, मैत्रिणींचं, कुटुंबातल्या कुणाच्या कहाण्या ऐकून आपल्याला कर्करोगासारखा गंभीर आजार नाही ना होणार? अशी सतत वाटणारी चिंता. त्यात सोशल मीडियाच्या माहितीचा भडिमार आणि सगळ्याचं मिश्रण मिळून होणारी घालमेलदेखील याच वयातली.
मुलींना वयात येताना शारीरिक-मानसिक आंदोलनं जाणवू लागतात, कारण त्यांच्या शरीरातील संप्रेरकं. ‘इस्ट्रोजन’ आणि प्रोजेस्टेरॉन यांचं वाढणारं प्रमाण आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम ही आंदोलनं घडवत असतात. साधारणत: त्याच धर्तीवर हीच संप्रेरकं आता शरीरातून कमी होत जाण्याची वेळ येते. त्यामुळे त्याच प्रकारची भावनिक आणि मानसिक आंदोलनं पुन्हा सुरू होतात. वयात येणारी मुलगी आणि उतारवयाकडे सरकलेली आई यांचं हिंदोळ्यावर वर-खाली होणं एकत्रित चालू होतं.
साधारणत: चाळिशीतील किंवा पन्नाशीकडे सरकलेल्या स्त्रियांशी जेव्हा मी बोलते, तेव्हा बहुतेकींच्या शारीरिक-मानसिक तक्रारी सारख्याच असलेल्या जाणवतात. त्या ऐकून झाल्या आणि त्यांची शारीरिक तपासणी झाली की मी त्यांच्याशी गप्पा मारते तेव्हा अगदी न चुकता प्रत्येकीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू मी अनुभवलेले आहेत. आणि गंमत म्हणजे तिच्या शेजारी बसलेला तिचा नवरोबा माझा याच्याशी काही संबंध नाही, मी काहीच केलेलं नाही, हे भाव चेहऱ्यावर घेऊन इकडे तिकडे बघताना दिसतो. बहुतांशी असंच आढळतं की, तुम्ही तिला जे काही सांगत असता ते समजून घेण्याचे प्रयासही तो करत नाही.
खरं तर चाळिशीतील प्रत्येक स्त्रीची थोड्या फार फरकाने हीच कहाणी असते. या वयोगटातल्या स्त्रियांमध्ये स्वत:साठी जगायचं राहूनच गेलं आहे, ही भावना मनात तरंगायला सुरुवात होते. अगदी ती नोकरी-व्यवसाय करणारी असली तरीही. कारण मुलांना आईची पूर्वीइतकी गरज, मदत लागत नाही. आणि आपल्या समाजामध्ये प्रत्यक्ष कृतीतून किंवा बोलून दाखवण्याची संकल्पनाच अजूनही फारशी न रुजल्यामुळे नवऱ्याला आपण केलेल्या कष्टाची किंमत आहे की नाही हे स्त्रियांना कळत नाही. त्यामुळे सर्वांसाठी मी किती कष्ट केले पण माझी कोणाला पर्वा नाही, अशी एक स्पष्ट भावना अंतर्मनात सतत जाणते-अजाणतेपणे तरळत असते. त्याच दरम्यान, या उताराला लागलेल्या संप्रेरकांमुळे असे विचार नैराश्याला खतपाणी घालू लागतात. मग या मानसिक विचारांचं रूपांतर अर्थातच शारीरिक व्याधींमध्ये होऊन एखादा आजार बळावू शकतो, ज्याला वैज्ञानिक भाषेत आम्ही ‘सायकोसोमॅटिक डिसऑर्डर’ असं म्हणतो.
या काळात स्त्रिया कोणत्या मानसिक परिस्थितीतून जात आहेत, त्याची कारणं काय? हे कुटुंबीयांना माहिती असणं अतिशय गरजेचं असतं. कारण चिडायचं नाही, रागवायचं नाही हे लक्षात येऊनदेखील स्त्री कधी कधी चिडचिड करते, रागावतेही. अशा वेळी मनात अपराधीपणा वाढून स्वत:ला दोष देत उलट्या दिशेनं तिचा मानसिक प्रवास होऊ शकतो. म्हणून तिला समजून घेणं, तिच्या हातून असं का घडतं हे जाणून घेणं हे कौटुंबिक पातळीवर अतिशय गरजेचं असतं. तसंच स्त्रियांनीदेखील आपण ज्या संक्रमणातून जात आहोत त्या परिस्थितीची जाणीव करून घेणं आणि त्याला तोंड देण्यासाठी सज्ज होणं हे गरजेचं असतं.
निसर्गचक्र जसं मागे उलटवता येत नाही, त्याचप्रमाणे या बदलांना सामोरं जाण्याशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे जेवढ्या लवकर ते स्वीकारू तेवढं उत्तम. ते स्वीकारत असताना कुटुंबीयांची, आपल्या ओळखीच्या डॉक्टरांची, स्त्रीरोगतज्ज्ञांची आणि क्वचित प्रसंगी मानसिक आधार देणाऱ्या तज्ज्ञाचीदेखील गरज भासू शकते. हल्ली आपल्याला अनेक साधन-सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. पूर्वीसारखं चार भिंतींच्या आत आपल्याला थांबून राहाणं गरजेचं नसून मोकळा वेळ सत्कारणी लावता येईल, आपल्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी वापरता येईल हे जाणून घेणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं फारच महत्त्वाचं असतं. घराबाहेर काम करणाऱ्या स्त्रियांसाठी ही एक संधीच, पण पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या स्त्रियांनीदेखील आपलं वेळापत्रक ठरवून वेळेचा सदुपयोग करणं महत्त्वाचं ठरतं. नाही तर दोन तासांचं काम १२ तास पसरवून ठेवलं, तर त्याच त्या कामात आणि त्याच वातावरणात गुंतून राहिल्यामुळे एक प्रकारचा तोचतोपणा येऊन आयुष्य निरस बनवण्यासाठी कारणीभूत ठरतो, हे लक्षात घ्यायला हवं.
कोणाला चित्रकला आवडत असेल, कोणी गाण्याचे आणि संगीताचे शौकिन असेल, कधी काळी लेखिका किंवा कवयित्री बनण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं असेल. या सगळ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी हा उत्तम कालावधी असून त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास निर्मिती क्षमतेचा आनंद घेण्याची संधी परत एकदा उपलब्ध होते. नैराश्यामधून बाहेर येण्यासाठी रोज सातत्याने जाणीवपूर्वक एखादं पान लिहिणं, स्वत:ची डायरी लिहिणं, वाचन करणं, बागकाम करणं, वेळापत्रक सांभाळून ठरावीक वेळेत रोजची कामं करून उरलेला वेळ मैत्रिणींबरोबर गाणी ऐकण्यात, वाचन आणि व्यायाम करण्यासाठी,सिनेमा-नाटक बघण्यात घालवणं हे अत्यावश्यक असतं.
एका कार्यक्रमादरम्यान माझ्या भाषणात एका सैन्य दलातील अधिकाऱ्याची गोष्ट मी सांगितली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी पहिल्यांदा त्यांच्या कार्यालयीन पार्टीला आलेली असते. साहजिकच कनिष्ठ अधिकाऱ्यांना तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अतिशय उत्सुकता असते. तिच्याभोवती सगळ्यांचा गराडा पडतो आणि अगदी खोदून खोदून प्रश्न विचारत ते तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करतात. ‘तिचा नवरा तिच्याशी कसं वागतो? तिची काळजी घेतो की नाही? तिला कसा सांभाळतो?’ सगळ्यांचे एकामागोमाग आलेले ते प्रश्न ऐकून अखेर ती उत्तर द्यायला उभी राहते. प्रत्येक शब्द ठामपणे मांडत ती सांगते, ‘‘नाही. माझा नवरा मला आनंदी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही. माझी काळजी घेत नाही.’’ मी हे कार्यक्रमात सांगत असताना सभागृहातल्या स्त्रियांची उत्सुकता जागृत झाली. मी त्या अधिकारी पत्नीचं बोलणं सांगू लागले, ‘‘त्याचं कारण मी माझी स्वत:ची काळजी घेते आणि स्वत:ला आनंदी ठेवते. त्याच्यासाठी मी माझ्या नवऱ्यावर अवलंबून राहत नाही. राहण्याची आवश्यकता मला वाटत नाही.’’या गोष्टीचा माझ्या श्रोत्यांवर हमखास परिणाम होतो. अनेक स्त्रिया कार्यक्रमानंतर आवर्जून भेटतात. आणि आपल्या अशा वागण्याचे दुष्परिणाम सांगत त्या अधिकारी स्त्रीसारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं सांगतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:च्या पलीकडे, कुटुंबापलीकडे जाऊन दुसऱ्यासाठी जगून बघण्यातील मजा अनुभवायला हवी. मॉलमध्ये साहित्य विकत घेऊन, चित्रपट बघून आनंद मिळू शकतो, समाधान नाही. दुसऱ्यासाठी काही तरी करून बघितलं तर ते समाधान तुम्हाला कुठल्याही मॉलमध्ये मिळणाऱ्या आनंदापेक्षा वेगळं असेल.
अनेक रुग्णांशी या अनुषंगाने माझं बोलणं होत असतं. त्यातील काही जणींनी माझं हे बोलणं मनावर घेतल्याचं काही कालावधीनंतर लक्षात आलं. एका ग्रामीण भागातील गृहिणीनं तिथल्या वंचित मुलांसाठी चालवलेल्या वर्गाबद्दल कळलं. दुसरीनं तिची बेकरीची आवड जोपासण्याचा प्रयत्न केला. त्यातून तिची बेकरी व्यवसायात यशस्वी ‘चेन ऑफ शॉपी’ सुरू झाली.
एका कार्यक्रमात आम्ही दोघी भेटलो. तेव्हा ती आपल्या या शॉपीबद्दल भरभरून बोलत होती, ते बघून खूपच समाधान वाटलं. ती अगदी आवर्जून सांगत होती, ‘‘आता मला निराश होण्यासाठी वेळच नाही, इतका माझा व्याप वाढला आहे.’’ एके काळी नवऱ्याला, मुलांना माझ्यासाठी वेळ नाही हे सांगणारी, त्यामुळे सतत उदास असणारी ती स्त्री आता किती समाधानी आहे हे पाहून खूप आनंद झाला.
अशा पद्धतीनं ‘मी’ सापडल्याचा आनंद प्रत्येकीच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यात येऊ शकेल, निरनिराळ्या प्रसंगांतून येऊ शकेल. पण एकदा का तुम्ही स्वत:ला सापडला की मग जगण्यातली ऊर्मी, आनंद, ऊर्जा हे तुम्हाला कायम आनंद देत राहील. जगणं सार्थकी लागल्यासारखं वाटेल आणि वयाने जरी ही ‘सेकंड इनिंग’ असली तरी ‘फर्स्ट इनिंग’चा अनुभव तुम्हाला मनाने तरुण करेल.