आरती अंकलीकर

किशोरीताईंकडे (किशोरी आमोणकर) शिकायला जाण्याआधी कमीत कमी सात ते आठ वर्ष तरी मी रंगमंचावर कार्यक्रम करायला सुरुवात केली होती. छोटेखानी कार्यक्रम. कधी पुण्यतिथीचे, कधी जयंतीचे, कधी एखाद्या स्पर्धेची तयारी आणि मग थेट रंगमंचावर सादरीकरण. आमच्या संगीत विद्यालयाची गुरुपौर्णिमादेखील खूप उत्साहात साजरी होत असे. पं. वसंतराव कुलकर्णी सर आणि त्यांचे विद्यार्थी यांच्या गायनाचा दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असे. त्यात १००-१२५ विद्यार्थी गात. काही २-३ जणांचा ग्रुप करून, तर काही ‘सोलो’ गाणं गात.

Arvind Pilgaonkar passed away, Veteran singer-actor Arvind Pilgaonkar, Arvind Pilgaonkar ,
ज्येष्ठ गायक – अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Jessica Alba husband Cash Warren separation
२० वर्षांची साथ अन् ३ मुलं, प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याचा १६ वर्षांचा संसार मोडला?
OBC Hostels, OBC , OBC Monthly Allowance ,
‘लाडक्या बहिणी’ तुपाशी, ओबीसी विद्यार्थी उपाशी, चार महिन्यांपासून…
Technology Exponential Technology Linear Technology
पहिले पाऊल: आघातांकीय!
Tula Shikvin Changalach Dhada Director new business
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या दिग्दर्शकाने नव्या वर्षात दिली आनंदाची बातमी! सुरू केला ‘हा’ व्यवसाय, अक्षराने दिल्या शुभेच्छा

माझं गाणं सर अशा वेळी ठेवत जेव्हा हॉल भरलेला असे श्रोत्यांनी. काही दिग्गज गायक-वादकही येत कार्यक्रमाला. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत सर माझं गाणं ठेवत. मीही सदैव तयार असे गायला. हुकूम आला सरांचा, की आधी १५ मिनिटं तो राग मनात घोळवायचा आणि मग आत्मविश्वासानं सादर करायचा. सभाधीट होते मी लहानपणापासूनच. अगदी बिनधास्त होते. नकारात्मकता शिवत नसे माझ्या मनाला. रंगमंचावर बसून माझं सर्वोत्तम गाणं जाणकारांसमोर पेश करून त्यांची वाहवा मिळवण्यासाठी मी कायम आतुर असे. मनमुक्तपणे आवाज लावायचा. मनात आलेला विचार आत्मविश्वासानं मांडायचा. ना तालाचं दडपण, ना श्रोत्यांचं, ना बुजुर्गाचं, ना आवाजाचं. खरं तर तोपर्यंत खूप शिकलेही नव्हते. ६-७ वर्षच झाली असतील शिकायला सुरुवात करून. अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, तसं असेल काहीसं; पण मी आत्मविश्वासानं गात होते. जसजशी शिकायला लागले, खोल विचार करू लागले तसं तसं जीवन बदलायला लागलं पुढे.

एकीकडे असे छोटे कार्यक्रम आणि दुसरीकडे विद्याग्रहण सुरू होतं. विजयाताई, आगाशे सर, वसंतराव सर, किशोरीताई. शास्त्राचा अभ्यास करतच होते. नवनवीन राग, बंदिशी, आलाप, ताना, लयकारी, बोलबनाव इत्यादी. शारीरिक तयारीसुद्धा सुरूच होती. शिकलेलं सगळं काही सुरेल गळय़ातून उमटवण्याची गाण्याची तयारी. वेगवेगळे ताल, प्रत्येक तालानुसार बदलणारी गायकी, मींड, बेइलावे, अनेक प्रकारच्या ताना, गमकयुक्त, सपाट तानाही सप्तकात फिरणाऱ्या. सरांकडे शिकत होते तोपर्यंत बाहेरच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी काही आडकाठी नव्हती. संधी आली तर मी गात असे. ताईंकडे शिकायला सुरुवात केल्यानंतर मात्र हे चित्र बदललं. बाहेर गाणं गायला जाणं मी बंदच केलं. त्या काळात ‘ताईमय’ झालेली मी. मला बाहेर गाण्यापेक्षाही ताईंकडे तालमीला बसून विद्याग्रहणाचंच वेड लागलं होतं. त्यांचा संगीतशास्त्राचा गाढा अभ्यास, जुन्या ग्रंथांचादेखील. त्यांच्याकडे शिकत असताना माझे स्वत:चे खूप कार्यक्रम केल्याचे आठवत नाहीत मला. त्यासाठी त्यांची परवानगी मागण्याची टापही नव्हती आणि खरं सांगायचं तर इच्छाच नव्हती. त्यांच्या सुरात नाहण्याचा आनंद होता, तृप्ती होती; पण त्याचबरोबरीनं आपल्याला अजून बराच खडतर प्रवास करायचाय, ही भावना वाढू लागली. इतकी, की त्यामुळे उदासी वाढू लागली. या उदासीनं हळूहळू माझ्या मेंदूतील सकारात्मकतेची जागादेखील बळकवायला सुरुवात केली होती. ज्ञानमार्गावर चालताना जितकं शिकत गेले, त्यापेक्षा आपल्याला अजून खूप शिकायचंय, करायचंय, या भावनेनं अधिक ग्रासलं. एकीकडे ज्ञान वाढत होतं आणि दुसरीकडे ‘काहीच येत नाही आपल्याला’ ही भावना.

विद्याग्रहण करून, शास्त्र शिकून, तंत्र शिकून झाल्यावर हे सगळं कलेमध्ये साकारणं ही महत्त्वाची पायरी होती. आग्रा, ग्वाल्हेर, जयपूरची गायकी शिकायची, गळय़ावर चढवायची. सगळे ठोकताळे शिकायचे, पण नंतर कलात्मकतेनं ते सादर करायचं आव्हान होतंच. सुरुवातीला २-३ राग गायचे तेव्हा सोपं वाटे गाणं. हा किंवा तो, सहजतेने गायलं जायचं; पण नंतर नंतर मात्र बरेच राग शिकले. त्यांचं शास्त्र, बारकावे. माझ्या अनेक मैत्रिणी माझ्याबरोबर बी.कॉम.ची पदवी पूर्ण केल्यावर बँकेमध्ये नोकरीला लागल्या. अकाऊंट्स, बुककीिपग सगळं काही कॉलेजमध्ये शिकल्या होत्या, तरीही प्रत्यक्ष कामावर रुजू झाल्यावर त्यांनाही काही सुधरेना, तसं काहीसं गाण्याबद्दलही आहे. गाणं तर आणखीन सूक्ष्म, सखोल.

दोन वर्ष ताईंकडे शिकून काही कारणानं माझं ताईंकडे जाणं बंद झालं. दोन वर्ष सकाळ- संध्याकाळ ताईंच्या आर्त स्वरांमध्ये भिजण्याची झालेली सवय. अचानक त्यात खंड पडला. मनात काहूर माजलं. सकाळी ९ वाजले की विलक्षण कासावीस होत असे मी. ताईंच्या ओढीनं मन हळवं होई. खूप रडू येई. आत काही तरी तुटलंय असं वाटे. असं जवळजवळ महिनाभर होत होतं. त्यांच्यात गुंतलेलं मन त्यांचा सहवास मागत होतं. पण हळूहळू मन शिकू लागलं. मी रियाझ करू लागले. तसं मन त्यांच्या सहवासात घेऊन जाऊ लागलं मला. या सगळय़ा संघर्षांच्या दरम्यान मला एका कार्यक्रमात गाण्याचं आमंत्रण आलं. महिन्याभरानंतर होणार होता तो कार्यक्रम शिवाजी पार्क भागात. एक तास गायचं होतं. मी स्वीकारलं आमंत्रण. जसजसा कार्यक्रमाचा दिवस जवळ येऊ लागला. माझ्या मेंदूत शिरलेली नकारात्मकता आता मनात भीतीचं रूप घेऊन डोकावू लागली. रियाझ करता करता मी थांबू लागले. मध्ये खूप काळ गेला होता. सुमारे दोन वर्ष गेली असावीत माझा स्वतंत्र कार्यक्रम होऊन. मी ताईंकडे शिकत होते हे बहुतेक रसिकांना माहीत होतं. किंबहुना माझं लहानपणीचं गाणं, माझा रियाझ ऐकून अनेक श्रोत्यांनी मला ताईंकडे शिकण्याचा सल्लाही दिला होता. असे श्रोते माझं गाणं ऐकायला आतुर होते. सुरवंट पाहिलेले श्रोते फुलपाखराच्या प्रतीक्षेत. फुलपाखरू मात्र अपेक्षित बदल होऊनदेखील आपण अजून सुरवंटच आहोत, याच भावनेत.
कार्यक्रमाचा दिवस उजाडला. सकाळी मी आईला म्हटलं की, माझा आवाज ठीक नाही असं वाटतंय. नकारात्मकता दर क्षणागणिक भेसूर रूप घेऊ लागली. संध्याकाळी तर मी खूपच बेचैन झाले. रात्री ८ वाजता कार्यक्रम होता. तिथे ७ वाजता पोहोचायचं होतं. माझी पावलं जड होऊ लागली. विचारांचा कडेलोट इतका झाला, की अखेर मी ठरवलं की नाहीच जायचं कार्यक्रमाला. फोन करून सांगितलं, की मी नाही येऊ शकत कार्यक्रमाला. नंतरही किती तरी वेळ अगदी शिगेला पोहोचली होती नकारात्मकता. खरं तर आज ती जखम भरून किती तरी वर्ष गेलीत, पण आजही मनातल्या एका कोपऱ्यात त्या जखमेची जाणीव आहे नाजूकशी.

हा जूनचा सुमार असावा, १९८२ मधला. दुसरा दिवस उजाडला. तो मात्र टर्निग पॉइंट ठरला. उठले तीच दृढ निश्चयानं. यातून बाहेर पडण्याचा निश्चय. माझी सकारात्मकता मिळवण्याचा निश्चय. ताईंचं डोक्यात साठवून ठेवलेलं गाणं गळय़ातून साकारण्याचा निश्चय. तानपुरा घेतला हातात. जुळवला सुरात. जोडाच्या तारा सुरेख मिळाल्या. खर्ज झंकारू लागला. स्वयंभू गंधार ऐकू येऊ लागला. मी डोळे मिटले. मी ‘ताई’ झाले. माझं शरीर ताई, मन ताई, माझा आवाज ताई, माझे हातवारे ताई. नकळत प्रतिक्षिप्त क्रियेसारखं ताईंचं गाणं माझ्या गळय़ातून उमटू लागलं.

दाराआडून माझा रियाझ ऐकणाऱ्या माझ्या आईच्या डोळय़ांत आनंद, आशा, अभिमान दाटून आला. मी परत डोळे मिटले. रियाझ चालूच ठेवला. आता मी डोळे मिटले, की मला ताईंच्या म्युझिक रूममध्ये जाता येऊ लागलं. त्यांचे आलाप, ताना, बंदिशी सगळं काही गळय़ातून उमटू लागलं. मिळवलेली विद्या, शिकलेलं शास्त्र आणि तंत्र या सगळय़ाच्या साथीनं मी सुरवंटाच्या कोषातून बाहेर पडून कलाकार होण्यासाठी सज्ज झाले..

१९८३ वर्ष उजाडलं. रियाझ सुरूच होता. आमच्याकडे फोन नव्हता तेव्हा. शेजारी बाबांच्या आत्याचा बंगला होता. तिच्याकडे होता फोन. सकाळी तिकडून हाक आली, ‘फोन आलाय आरतीला.’ मी आणि बाबा धावत गेलो. ‘सवाई गंधर्व महोत्सवा’साठी आमंत्रित करायला आला होता फोन. मी नि:शब्द. इतका मोठा रंगमंच. रथी-महारथींनी गाजवलेला. जाणकार श्रोते, दिग्गज गायक- वादकही ऐकायला येणार. डोळय़ासमोर सारं चित्र उभं राहिलं. मी लगेच होकार दिला.

२० वर्षांची मी, घरी आले. तानपुरा काढला. रियाझ सुरू केला. खालून मैत्रिणींच्या हाका ऐकू येत होत्या. मी निरोप दिला आईकडे. ‘रियाझ कर रही हैं’ आईनं सांगितलं त्यांना. मी डोळे मिटले आणि ‘ताई’ झाले.

aratiank@gmail.com

Story img Loader