श्रीकांत शिधोरे
पुरुष आणि स्त्री यांच्या मधली मैत्री कितीही निखळ असली तरी त्यामध्ये अदृश्य अंतर कायम असतंच आणि त्याचमुळे ती सीमारेषा जपायला हवी याचं भानही आपसूक येतंच. पण त्याही पलीकडे जात विश्वासाने आधार मागितला आणि दिला जात असेल तर ती खरी मैत्री, अगदी रात्रीअपरात्रीसुद्धा सोबतीला असणारी!

सर्वसाधारणत: जिच्याशी एखाद्या पुरुषाची मैत्री होते, ती प्रथम कुठे भेटते? तर शेजारी, शाळा, महाविद्यालयात, कुठल्या तरी समारंभात किंवा नोकरीच्या ठिकाणी, नाही तर मग ती एखाद्या मित्राची बहीण असेल, मित्राची बायको असेल, बायकोची मैत्रीण असेल किंवा एखाद्या नातेवाईकाची नातेवाईक. पण मी माझ्या अशा एका मैत्रिणीबद्दल सांगणार आहे, जी मला एका अनोळखी ठिकाणी भेटली ती केवळ आणि केवळ आमच्यातल्या गाण्याच्या आवडीमुळे. तो काळ होता साधारण १९९८-९९च्या आसपासचा.

Loksatta chaturang article about friendship
सांदीत सापडलेले…! मैत्री
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही: यशाकडे जाण्याची शिडी
people with personality disorder
स्वभाव, विभाव : खुदी से इश्क किया रे…
mazhi maitrin
माझी मैत्रीण: फासला दोनों से मिटाया ना गया…
article about psychological effects of bossy behavior on colleagues
इतिश्री : भावनांची सर्वव्यापी जाणीव
unicff report on child sexual abuse
जगाभोवतीचा लैंगिक फास
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय

आम्ही मित्रमंडळी एका रिसॉर्टवर सहलीला गेलो होतो. आमच्या बंगल्याच्या अंगणात बसून आमच्या गप्पा चालू होत्या. शेजारीच एक बंगला होता, त्यातले चार-पाच स्त्री-पुरुष त्यांच्या अंगणात खुर्च्या टाकून गाण्यांच्या गप्पा मारत बसले होते, अचानक त्यांच्यात जरा मोठ्या मोठ्याने चर्चा सुरू झाली एका जुन्या गाण्याचा संगीतकार कोण यावरून. हा इंटरनेट पूर्वीचा काळ होता. जेव्हा फक्त खऱ्या अभ्यासू किंवा दर्दी लोकांनाच अमुक एका जुन्या हिंदी गाण्याचे गीतकार, संगीतकार कोण हे माहीत असायचं. अनेक वर्षं जुन्या हिंदी सिनेमातली गाणी ऐकायचा छंद जोपासला असल्यानं मला खरं उत्तर माहीत होतं. चर्चा कानावर आल्यावर मी अगदी अनाहूतपणे, पण जरा उत्साहानेच तिथं जाऊन त्यांना खरा संगीतकार कोण ते सांगितलं. चकित होत, त्यातली एक ‘स्मार्ट’ स्त्री पुढे आली आणि मला तिने मनापासून धन्यवाद दिले. हीच आपल्या लेखाची नायिका.

हेही वाचा : ऐकावे मनाचे… करावे मनाचेच…

मग एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण झाली. मी म्हणालो, ‘‘मी काही जाणकार नाही, मला तुमच्यापेक्षा एखाद-दुसरी गोष्ट जास्त माहीत असेल एवढंच.’’, तर ती म्हणाली, (आतापर्यंत मला तिचे नाव सीमा असल्याचं कळलं होतं.) ‘‘तुमच्याकडे खूपच माहिती दिसते. आता आम्हाला अशीच काही माहिती सांगा.’’ मी ‘हो’ म्हणालो, कारण विषय माझ्या आवडीचा होता. गप्पांमध्ये ती संध्याकाळ अगदी संगीतमय होऊन गेली. त्यानंतर दहा-पंधरा दिवसांनी तिने मला तिच्या उपनगरातल्या घरी बोलावलं. आमच्या जुन्या गाण्यांवर आणि आवडत्या संगीतकारांवर चर्चा झाल्या. आणि मग असाच कधीमधी तिचा फोन यायचा की आज जेवायलाच ये, अमक्या संगीतकाराची गाणी मनसोक्त ऐकू या. त्यावेळी तिचा नवरा कधी घरी असायचा, कधी नसायचा. पण आम्ही दोघेच असलो, तरी आम्हाला कधी संकोच वाटला नाही. जुनी गाणी हा आमच्यातला एकमेव दुवा होता, पण दोघांचे आवडते संगीतकार वेगळे असल्यानं कधी टोकाचे मतभेद झाले तर ती म्हणायची, ‘‘चल आता परत अर्धा कप चहा घेऊ व भांडण मिटवू.’’

तो व्हिडीयो कॅसेट्सचा जमाना होता. आमच्या हिंदी गाणी वेड्यांच्या ग्रुपमधील एका डॉक्टरने कुठून कुठून गाणी जमवून वेगवेगळ्या शीर्षकांतर्गत व्हिडीओ कॅसेटस् बनवल्या होत्या. जशा की, ‘चांद सितारोंके नगमे’, ‘मधुबालाके नगमे’, ‘ओ.पी. नय्यरके नगमे’, ‘पियानो गीत’, वगैरे वगैरे. एका मित्राच्या घरी आम्ही रविवारी दुपारी ४ ते ७ या वेळेत जमत असू व मोठ्या टीव्हीवर या व्हिडीयो कॅसेट्स बघण्याचा सपाटा लावत असू. मग त्या गाण्यात काही जण आपला सूर मिसळत, कुणी गाण्यांच्या शब्दांवर बोलत, कुणी सुरावटीबद्दल बोलत. एकूण तो माहोल गाण्यांनी भारलेला असे.

एका रविवारी एकाच्या घरी तीन तासांची ‘मधुबालाके गीत’ गाणी लावण्याचं ठरलं होतं. कुठल्याही अनोळख्या ठिकाणी जायला नाखूश असणारी सीमा मोठ्या मिनतवारीनं माझ्याबरोबर आली. पहिलं गाणं लागण्याच्या अगदी काही क्षण आधी आम्ही पोहोचलो. आणि ‘आईये मेहेरबान’ हे ‘हावडा ब्रिज’मधलं गाणं सुरू झालं. सीमा घरात शिरतच होती तेवढ्यात आतून एक सणसणीत शिट्टी ऐकू आली. जमलेले सगळे टीव्ही बघायचं सोडून आमच्याकडे बघून हसू लागले. त्यामुळे सीमाचा गैरसमज झाला की, तिला बघूनच कोणीतरी शिट्टी वाजवली. तिचा चेहेरा गोरामोरा झाला. पण स्पष्टीकरण माझ्याकडे होतंच. मी म्हणालो, ‘‘ही शिट्टी तुझ्यासाठी नसून पडद्यावर अवतरलेल्या ‘मधुबाला’साठी आहे. जेव्हा जेव्हा पडद्यावर ‘मधुबाला’चं दर्शन होतं तेव्हा तेव्हा आमच्यातले ते मागे बसलेले ६५ वर्षीय निवृत्त कर्नल तिच्याकरिता ही जोरदार शिट्टी वाजवतात.’’ तिला ते पटलं. पुढे उत्तरोत्तर रंगत गेलेला हा कार्यक्रम तिला इतका आवडला की नंतरचे दोन-तीन दिवस ती फक्त त्याबद्दलच बोलत राहिली.

हेही वाचा : हात धुता धुता…

पण पुढे मात्र तिच्या भिडस्त स्वभावामुळे परत तिथे कधीच आली नाही, तरी हा कार्यक्रम दाखवल्याबद्दल नंतर बरेच दिवस ती मला ‘धन्यवाद’ देत राहिली. एकदा तिचा मला फोन आला, ‘‘अरे, माझ्या नवऱ्याची तब्येत काल रात्रीपासून बरी नाहीये आणि मला काही महत्त्वाची कागदपत्रं देण्यासाठी आजच्या आज पुण्याला जाणं अगदी गरजेचं आहे. तू माझ्याबरोबर येशील का? संध्याकाळपर्यंत लगेच परत येऊ.’’ मी माझी गाडी घेऊन तिच्या घरी गेलो. नवरा तिला अनेक सूचना देत होता. मी त्याला म्हणालो, ‘‘अरे, काही काळजी करू नकोस. तुझ्या बायकोला मी पळवून नेत नाहीये, संध्याकाळी तिला सुखरूप आणून सोडतो.’’ तो म्हणाला. ‘‘अरे पळवून बघच… मला खात्री आहे. चोवीस तासांच्या आत कंटाळून तू तिला परत आणून सोडशील.’’

एरवी जगात वावरताना ती धीट असली, तरी आजाराला मात्र फार हळवी होती. जरा जरी तब्येत बिघडली तरी घाबरून जायची. एकदा तिचा मला रात्री नऊ वाजता फोन आला.

‘‘ मला सणकून ताप भरला आहे आणि हा कोलकाताला गेलाय. रात्रीची फ्लाइट चुकली आहे व उद्या सकाळपर्यंत पुढची फ्लाइट नाहीये. घरी मी एकटीच आहे. माझी बहीण व माझा पुतण्या दोघेही खूप लांब राहातात. आता येऊ शकत नाहीयेत. औषध आणलं आहे, सकाळपर्यंत ताप उतरेल असं डॉक्टर म्हणालेत पण एकटीच असल्यानं जाम भीती वाटतेय. तू आज रात्री आमच्या घरी राहायला येशील का? उद्या सकाळी दहापर्यंत नवरा येईल आणि नऊ वाजता घरी काम करणारी बाई येईल त्यानंतर तू जा.’’ यानेच सांगितलं आहे, ‘‘श्रीकांतला बोलवून घे. कारण इथे आमची शेजाऱ्यांशी ओळख आहे, पण कुणाला घरी राहायला बोलावण्याइतकी नाही.’’

तो घरी नसताना रात्रभर थांबायला मला जरा संकोच वाटला. मी म्हणालो, ‘‘मी बायकोला पाठवून चालेल का? बाई माणूस असलेलं बरं.’’ तर म्हणाली, ‘‘अरे, अशी काही बाईमाणूस असण्याची गरज लागणार नाही. पण रात्री जर ताप खूपच वाढला आणि बाहेर जाऊन औषध आणायची वेळ आली तर तू पटकन आणू शकशील, म्हणून तुला बोलावतेय.’’ आमची कितीही चांगली मैत्री असली, तरी रात्रभर एकट्यानंच थांबायला संकोचत होतो. मी फोनवर आढेवेढे घेतोय असं दिसल्यावर ती मला म्हणाली, ‘‘तुझ्या मनात काय चाललंय ते ओळखण्याइतकी मी हुशार आहे. मला आत्ता जास्त बोलवत नाहीये. ताबडतोब निघ.’’ मग माझा नाईलाज झाला. रात्री एक नंतर तिला झोप लागली. मी रात्रभर दर दोन तासांनी तिचा ताप बघत होतो. पहाटे चारनंतर ताप उतरायला लागला. तिला झोपही शांत लागली. तिची बाई आल्यावर मी घरी निघून आलो.

दुसऱ्या दिवशी रात्री तिचा फोन आला, ‘‘मी आता बरी आहे. पण मी तुला ‘थँक्स’ म्हणणार नाहीये. कारण माहितेय? मी बोलावल्यावर तू संकोच केलास. पटकन ‘हो’ न म्हणता बायकोला पाठवतो म्हणालास. का? तुझा माझ्यावर विश्वास नव्हता की स्वत:वर?’’ मी म्हटलं, ‘‘ए बाई, काही सीमारेषा अस्पष्ट असतात आणि मी त्या पाळतो. आणि आता तू मला यावरून झाडणार आहेस का?’’ माझ्या बायकोला जुनी गाणी फारशी आवडत नसल्यानं ती आमच्याबरोबर कधी नसायची, पण सीमाला आमच्या घरी येण्याचा मात्र आग्रह करत असे. पण माहीत नाही का, इतक्या वर्षांत सीमा फक्त एकदाच आमच्याकडे आली.

हेही वाचा : सांधा बदलताना : या भवनातील गीत पुराणे?

काळ आपल्यापरीने पुढे जातच होता. मधल्या काळात मीही माझ्या आयुष्यात व्यग्र होतो. आणि अचानक एकदा काहीतरी निमित्त होऊन सीमा अचानक हे जग सोडून गेल्याचं कळलं. मी तेव्हा मुंबईत नव्हतो त्यामुळे तिला शेवटचं पाहताही आलं नाही. पण मला अनेकदा तिची आठवण येत असते.

आपल्या मैत्रीबद्दल कोणाला काही सांगू नकोस, हे वचन तिनं माझ्याकडून घेतलं होतं. (माझ्या बायकोशिवाय ‘ती’ कोणालाच माहीत नाहीये). आमची मैत्री अगदी स्वच्छ असूनही तिने ही अट का घातली असावी? हे आजतागायत मला समजलं नाही. चांगली मैत्रीण कोण होऊ शकते? तर आर्थिक स्थिती समान नसली, तरी बौद्धिक पातळी एक असेल, एखाद्या कलेची आवड असेल, नात्यात-वागण्यात पारदर्शकता असेल तर आणि मुख्य म्हणजे मैत्री निरपेक्ष असेल तर कधी आपल्या मनात एखादी प्रापंचिक अडचण, प्रासंगिक भीती असते. ती आपण बायकोजवळ व्यक्त करून तिला आणखी काळजीत टाकू इच्छित नाही, पण मैत्रिणीकडे बोलून दाखवली, तर ती तटस्थपणे त्याकडे पाहून कदाचित काही उपाय सुचवू शकते. किंवा किमान थोडा धीर तरी देऊ शकते, जो कधी कधी पुरुषाला पण आवश्यक असतो. म्हणून आपण जे बायकोबरोबर बोलू शकत नाही आणि जे बहीण किंवा वहिनीबरोबरही बोलू शकत नाही, ते जिच्याकडे बिनधास्त बोलू शकतो अशी खास मैत्रीण.

अशा मैत्रिणीशी आपण निरर्थक गॉसिपही करू शकतो. काही निमित्त नसतानाही तिच्याकडे चहा प्यायला किंवा एखादा पदार्थ खायला येतोय असं हक्कानं सांगू शकतो. तिच्या स्वयंपाकघरात बेलाशक शिरू शकतो. एखाद्या प्र्रसंगी तिनं अडीअडचणीला आपल्याला मदतीला बोलावलं व आपण खरोखरच काही खऱ्या/ठोस कारणासाठी मदतीला येऊ शकलो नाही, तरी ती आपल्याला समजून घेईल, अशी खात्री असते आणि दोन-तीन आठवडे फोनवर बोललो नाही तर तिची हमखास आठवणी येते ती आपली ‘खरी मैत्रीण’ असं मला वाटतं. एक सच्ची मैत्रीण प्रत्येकाला मिळतेच असं नाही. क्वचित कधी मैत्रिणीचा नवरा घरी नसताना आपण तिच्या घरी गप्पा मारत बसलो आहोत, याचं तिच्या नवऱ्याला काही वावगं वाटू नये, हे तेव्हा शक्य होतं, जेव्हा तिच्या नवऱ्याचा (आणि आपल्या बायकोचाही) आपल्यावर विश्वास आहे, याची आपल्याला खात्री असते.

सीमा असताना, बायको कधी कधी सांगायची, ‘‘अहो, तुमच्या खास मैत्रिणीचा फोन आला होता. तिला फोन करा.’’ मग मी म्हणायचो,‘‘अगं माझ्या सगळ्याच मैत्रिणी खास आहेत.’’ तर ती म्हणायची, ‘‘असतीलही. तरी पण त्यातल्या त्यात खास. तुम्हालाही माहिती आहे कोणाचा असेल फोन…!’’ मग मी हळूच हसायचो.

shrikant.shidhore@gmail.com

Story img Loader