दरवर्षी देशात स्तनांच्या कर्करोगाचे दोन लाखांपेक्षा अधिक नवीन रुग्ण सापडतात आणि त्यात ३० टक्के रुग्ण ४० वर्षांच्या खालचे असतात. स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणं सहज ओळखता येण्याजोगी असतात, मात्र अजूनही आपल्याकडे आजाराच्या ‘अॅडव्हान्स्ड स्टेज’मध्येच डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. हे टाळायचं असेल, तर स्त्रियांनी जागरूक व्हायला हवं. ऑक्टोबर हा स्तन-कर्करोगासाठीचा जनजागृती महिना मानला जातो. या ‘पिंक ऑक्टोबर’च्या निमित्तानं त्याचा सांगावा सांगताहेत, गेली २० वर्ष स्तन कर्करोगावर उपचार करणाऱ्या डॉ. राजश्री केळकर.
अमेरिकेतून सुट्टीसाठी आलेली उमा तिच्या आईला दाखवायला घेऊन आली ते वर्ष होतं २००९. आईच्या ब्लाऊजवर तिला रक्ताचे डाग दिसले होते. आईला विचारलं, तेव्हा कळलं की आईच्या स्तनाग्रातून २-३ महिने रक्त येत होतं. पण काहीच त्रास होत नाही म्हणून आईनं कुणाला सांगितलं नव्हतं. पूर्ण तपासणीअंती स्तनांच्या कर्करोगाचं निदान झालं. तो पहिल्याच पातळीचा (स्टेज- १) होता आणि पूर्ण उपचारांनंतर आता ती ठणठणीत आहे. गेली १४ वर्ष उत्तम जीवन जगत आहे. असे किती तरी रुग्ण माझ्या पाहण्यात आहेत, जे लवकर निदान झाल्यामुळे स्तनांच्या कर्करोगाच्या उपचारानंतर १०-१५ वर्षांनंतरदेखील आनंदानं आयुष्य जगत आहेत.१० वर्षांपूर्वी मी सोनालीला तपासलं होतं. एका नामांकित रुग्णालयातच ती काम करत होती. त्या वेळी ती हिवतापासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल झाली होती. तेव्हा तिनं डॉक्टरांना सांगितलं, की तिला एका काखेत गाठ जाणवते आहे. आवश्यक चाचण्यांनंतर ती स्तनाच्या कर्करोगाची गाठ असल्याचं समोर आलं. तिला त्रास होत नव्हता म्हणून तिनं तिच्या कामाच्या ठिकाणी कुणा डॉक्टरला दाखवलं नव्हतं. स्तनाचा छोटा भाग काखेत असतो आणि त्यातसुद्धा कर्करोग होऊ शकतो.
अलीकडेच ३-४ रुग्ण अशा बघायला मिळाल्या, ‘स्तनामधे पू झाला आहे,’ अशी त्यांची तक्रार होती. तत्पूर्वी त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना प्रतिजैविक ( antibiotics)औषधं देऊन झाली होती. तरी इन्फेक्शन (जंतुसंसर्ग) बरं होईना, म्हणून त्या माझ्याकडे आल्या होत्या. स्तन संपूर्ण लाल झाले आहेत अणि खूप सूज आलीय, हे दिसत होतं. आणखी वेळ न घालवता तपासण्या करून घेतल्यावर या स्त्रियांना ‘इन्फ्लेमेटरी’ स्तन कर्करोगाचं निदान झालं. या प्रकारचे कर्करोग खूप वेगानं वाढतात. कुठे गाठ आहे, हे हाताला लागतच नाही. केमोथेरपी हेच त्यावर उत्तर आहे. नंतर शस्त्रक्रिया करता येते. मात्र प्रत्येक वेळी लाल झालेले अणि सूज असलेले स्तन म्हणजे ‘इन्फेक्शन’ असं समजणं चुकीचं आहे. औषधानंतरही जंतुसंसर्ग बरा होत नसेल, तर नक्कीच स्तन चिकित्सकाचा त्वरित सल्ला घ्यावा. हे ‘इन्फ्लेमेटरी’ स्तन कर्करोग खूप कमी प्रमाणात दिसतात, परंतु ते फारच धोकादायक असतात. म्हणूनच जागरूक असायलाच हवं.
आरती माझ्याकडे आली, तेव्हा तिला बाळ होऊन दीड वर्ष झालं होतं. तिनं बाळाला स्तन्यपान करणं थांबवलं होतं. बाळ झाल्यानंतर २-३ महिन्यांतच तिला उजव्या स्तनात गाठ जाणवत होती. पण घरचे सगळे म्हणाले, की ‘दुधाची गाठ असेल, नको लक्ष देऊ’. स्तन्यपान बंद केल्यानंतर ही गाठ जाईना, तेव्हा ती फॅमिली डॉक्टरांकडे गेली होती. मी तिला पाहिलं तेव्हा तिला उजवा हात उचलता येईना. तपासणी केल्यावर तिला कर्करोग आहे अणि तो काखेत पसरलाय हे लक्षात आलं. जसे ‘इन्फ्लेमेटरी’ कर्करोग धोकादायक असतात, तसेच गरोदरपणात आणि बाळाला स्तन्यपान करताना होणारे कर्करोगही धोकादायक शकतात. तेव्हा कुठल्याही गाठीचं निदान तातडीनं होणं अतिशय आवश्यक आहे.
एका अस्थिरोगतज्ज्ञानं सरिताला माझ्याकडे पाठवलं होतं. ती त्यांच्याकडे पाठदुखीसाठी गेली होती आणि औषधं देऊनही फायदा होत नव्हता. त्यांनी तपासण्या केल्यावर समजलं, की सरिताचा स्तनाचा कर्करोग मणक्यामधे पसरला आहे. ( Bone Metastasis)ही तिच्या कर्करोगाची खूपच पुढची अवस्था होती. २५ वर्षांच्या सिमरनला स्तनांचा कर्करोग झाला. तिचे स्तन वाचवून शस्त्रक्रिया करण्यात आली. केमोथेरपी आणि रेडिएशन पूर्ण झालं. २-३ वर्षांनी तिचं लग्न झालं. सगळं छान चाललं होतं. पण वयाच्या ३० वर्षांनंतरही तिला मूल होईना, म्हणून तिनं कुणालाही न सांगता मूल होण्यासाठी उपचार चालू केले. या उपचारांत हॉर्मोन्सचा वापर केला जाऊ शकतो. तिच्यावर त्याचा परिणाम झाला अणि कर्करोग परत होऊन ( relapse) तो लिव्हर आणि फुप्फुसात पसरला.
देशात स्तन कर्करोगाचं प्रमाण वाढतंय. स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक प्रमाण स्तन आहे. दरवर्षी भारतात दोन लाखांपेक्षा अधिक स्तनांच्या कर्करोगाचे नवीन रुग्ण सापडतात आणि त्यात ३० टक्के रुग्ण ४० वर्षांच्या खालच्या वयाचे असतात. अजूनही आपल्याकडे कर्करोगाच्या ‘अॅडव्हान्स्ड स्टेज’मधल्या रुग्ण स्त्रिया अधिक प्रमाणात दिसतात. तसंच भारतात दिसणारे स्तन कर्करोग हे झपाटय़ानं वाढणारे असू शकतात.
यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा, की यातल्या बहुतेक स्त्रियांना आपल्या स्तनामध्ये गाठ आहे हे माहिती असतं. पण त्रास होत नाही म्हणून त्या कोणत्याही डॉक्टरला दाखवत नाहीत. मग गाठ मोठी होत जाते. स्तनामधील सर्वच गाठी कर्करोगाच्या नसतात, परंतु संपूर्ण तपासणीनंतरच गाठ कशाची आहे याचं निदान होतं.
स्तनामधली न दुखणारी गाठ, स्तनाग्रातून होणारा रक्तस्राव, स्तनाचा आकार बदलणं, स्तनाग्र खेचलं जाणं (Nipple retraction)स्तन लाल होणं, ही स्तनांच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. कधी तरी काखेत गाठ असते, तेही कर्करोगाचं लक्षण असू शकतं. अशा वेळी जास्त वाट न बघता ताबडतोब डॉक्टरांना दाखवायला हवं आणि चाचण्या करायला हव्यात. साधारणपणे प्रथम डॉक्टरांकडून तपासणी (clinical examination),, मग ‘मॅमोग्राफी’ आणि नंतर ‘बायोप्सी’ या पद्धतीनं निदान केलं जातं. Triple Assessment कर्करोग म्हटल्यावर त्या रुग्णाचं आणि कुटुंबीयांचंही मनोबल खच्ची होतं. ‘मलाच का?..’ याचं दु:ख, पुढच्या तपासण्या, उपचार, केस गळणं, केमोथेरपी याची भीती वाटते. खर्च, आपल्यामुळे कुटुंबाला त्रास होतोय, हे सर्व चित्र डोळय़ासमोर येऊन स्त्रिया हतबल होतात. पण हाच महत्त्वाचा टप्पा असतो. तुम्ही सकारात्मक राहून, धीरानं उपचार घेतलेत, तर मानसिक त्रास कमी होईल. परिणामी उपचारांचा अधिक चांगला परिणाम होऊ शकेल, हे लक्षात ठेवायला हवं. प्रत्येक रुग्णासाठी उपचार वेगळे असतात. त्यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिऐशन, हॉर्मोन्स थेरपी असू शकते.
कर्करोग प्राथमिक अवस्थेत लक्षात आला, तर अनेक रुग्णांमध्ये स्तन काढायची गरजही लागत नाही. स्तन कसे वाचवता येतील यावर डॉक्टरांचा भर असतो. कधी कधी गाठ मोठी असेल, तर आधी केमोथेरपी देऊन, गाठ लहान (—-झाल्यावर) मग स्तन वाचवलं जातं. तसंच उत्तम ‘ब्रेस्ट रीकन्स्ट्रक्शन’ही करता येतं. ही शस्त्रक्रिया म्हणजे कर्करोगाच्या शस्त्रक्रियेबरोबरच प्लास्टिक सर्जरी करून स्तनाची गोलाई पूर्ववत करणं. यात बऱ्याच प्रकारच्या शस्त्रक्रिया करता येतात. त्याला local flap असं म्हटलं जातं. या शस्त्रक्रियेमुळे स्त्रीत्वाची भावना जपता येते. अशा शस्त्रक्रियेनंतर पूर्ण स्तन काढायला लागले, तरी त्यावर उपाय आहेत. ‘ब्रेस्ट प्रॉस्थेसिस’/ ‘फ्लॅप सर्जरी’/ ‘ब्रेस्ट इम्प्लांट’ आदी गोष्टींचा त्यात समावेश होतो.
सगळय़ांत महत्त्वाचं हे, की आपल्याला स्तनामध्ये गाठ आहे हे लवकरात लवकर लक्षात यायला हवं. हल्ली असं दिसू लागलं आहे, की अनेक स्त्रिया गाठ १-२ सेंटीमीटर असेल तेव्हा येतात. यांपैकी जवळपास सर्व प्रकरणांत त्यांचं निदान आणि उपचार होऊन स्तन आणि आयुष्य दोन्ही निश्चितच वाचवता येतं.
गाठ आहे किंवा स्तनाग्रामधून रक्तस्राव होतोय, हे लवकर समजण्यासाठी स्तनाची स्व-तपासणी म्हणजेच ‘ब्रेस्ट सेल्फ एग्झॉमिनेशन’ (बीएसई) शिकून घेऊन ती नियमित करणं आवश्यक आहे. इंटरनेटवरसुद्धा ही तपासणी कशी करायची याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. ही स्व-तपासणी प्रत्येक स्त्रीनं वयाच्या १८ व्या वर्षांपासून आयुष्यभर करायला हवी. महिन्यातून ही तपासणी एकदाच करायची असते. त्यासाठी पाच मिनिटं द्यायलाच हवीत. ती स्वत: करायची कशी ते शिकून घ्या आणि आजूबाजूच्या स्त्रियांनाही ‘बीएसई’ कशी करायची ते शिकवा. कोणत्याही कर्करोगाचे उपचार खर्चीक असतात. त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला योग्य ठरेल असा वैद्यकीय विमा जरूर घ्यायलाच हवा.
ऑक्टोबर महिना स्तनांच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठीचा मानला जातो. या निमित्तानं सांगायचा मुद्दा हाच, की स्तनांच्या बाबतीतल्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका. लक्षणं जाणवली तर दुर्लक्ष न करता थेट जाऊन ब्रेस्ट-सोनोग्राफी करा. म्हणजे काही करणं गरजेचं आहे किंवा नाही, ते तरी तुम्हाला समजेल ‘मला काही होत नाहीये, तर मी कशाला डॉक्टरांकडे जाऊ?’ असं करू नका. तुमच्या समस्येचं कारण शोधा. स्तनांच्या सर्व समस्यांवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कर्करोग लवकर लक्षात आला आणि त्याचे पूर्ण उपचार झाले, तर तुम्ही पूर्ण बऱ्या होऊ शकता. स्तनांच्या समस्यांबद्दल जागरूक व्हा, नियमितपणे स्व-तपासणी करा, स्वत:ची उत्तम काळजी घ्या आणि सकारात्मक राहून उत्तम आयुष्य जगा!
(डॉ. राजश्री केळकरMS, FRCS,, ब्रेस्ट सर्जन म्हणून गेले २० वर्ष मुंबईत प्रॅक्टिस करत आहेत.)
rajashri19@yahoo.co.uk