भय हे अज्ञानाच्या अंधकाराचं अपत्य आहे, परंतु ते फार काळ टिकत नाही. तुम्ही जसं जसं शिक्षण घेत जाता तसं तसं तुम्हाला त्या गोष्टींचा वेगळा आणि सकारात्मक अर्थ लागत जातो. लहानपणापासून वाचलेल्या प्राक्कथा वा मिथक कथांमुळे निर्माण झालेल्या भयातून पुढे अभ्यासामुळे अभयाकडे प्रवास होत गेला… आयुष्यात उष:काल झाला…

भयभूती हा शब्द उच्चारताच भवभूती या संस्कृत कवीची आठवण होणं स्वाभाविक आहे. ‘भव’तालचे आणि ‘भव’तालातून मानवी मनावर जे बरे-वाईट परिणाम होतात. त्यातून जी अनुभूती येते ती आनंददायी वा भयकारी असू शकते. त्याचा प्रभाव आपण कशा रीतीने पेलून, झेलून घेतो, यावर आपलं वर्तन अवलंबून असतं. भवभूतीचं स्मरण होण्याचं आणखी एक कारण म्हणजे, त्यांनी आपल्या काव्यात केलेला भयानक या रसाचा आविष्कार! भय, भीती ही अन्य अनेक जन्मजात भावनांबरोबर असलेली एक भावना आहे. तिचा परिपोष कसा होतो, त्यावर आपल्या जीवनात त्या विशिष्ट भावनेला असलेलं प्राधान्य दिसून येतं.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट आइनस्टाइन यांचे शब्द आठवतात, ‘जीवन जगण्याच्या दोनच तऱ्हा आहेत. एक तर सारं जग चमत्कारानं भरलेलं आहे किंवा सारं जग चमत्काराविना आहे.’ त्यांच्याच शब्दात शब्द मिसळून आपण म्हणू शकतो, ‘एक तर सारं जग भयानं भरलेलं आहे किंवा भयाविना आहे आणि ते सर्वस्वी आपल्यावरच आहे.’ यात बालपणापासून आपल्यावर होणाऱ्या संस्कारांचा फार मोठा वाटा आहे. ओल्या संस्कारक्षम मनावर पडलेले लोककथा, धर्मग्रंथातील प्राक्कथा अर्थात मिथक कथा यांचे बीज बालवयात मनाच्या सुपीक जमिनीत फोफावत असतं आणि त्याची मुळं इतकी घट्ट रुतलेली असतात, की ती वयानुसार हळूहळू तळातून वर डोकावू लागतात. मग त्याला खतपाणी घालून त्यातून येणारा नकारात्मक वा सकारात्मक बहर एक तर आपलं व्यक्तिमत्त्व प्रसन्न वा विषण्ण बनवत जातो.

हेही वाचा : पुरुषाचं घर, घरचा पुरुष

u

बालपणापासून आईवडिलांकडून आणि चर्चमधील प्रवचनांतून कानावर आलेली ‘जुन्या करारातील’ प्राक्कथा म्हणजे आदाम (अॅडम) आणि एवा (इव्ह) यांची! त्यांना सापाने घातलेली भुरळ आणि ‘पारदिसा’तून त्यांची झालेली हकालपट्टी! यातील मथितार्थ कळायला उशीर झाला हे खरं, परंतु त्या वेळी दोन गोष्टींचं भय मात्र मनात रुतून बसलं… एक सापाची भीती आणि दुसरी, बाईला दुय्यम स्थान देऊन तिला दोषी, पापी ठरविण्याची भीती!

एक घटना आठवते. आमच्या गावातील मराठी माध्यमाच्या शाळेत माझं शिक्षण झालं. ही शाळा ‘कनोशिअन सिस्टरां’नी चालवलेली होती. आजही ही मराठी शाळा कार्यरत आहे. त्या वेळी गावात तुरळक प्रमाणात वीज आलेली होती. शाळेत विजेचे दिवे असल्यानं आणि अनेक मुलींना त्यांच्या घरात घासलेटच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत असल्यामुळे आमच्या मुख्याध्यापक सिस्टरांनी मुलींसाठी अभ्यासाची सोय केली होती, ती म्हणजे शाळेतले दोन वर्ग मुलींना रोज संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत खुले करून दिले जात. मीही कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करीत असे. विशेष म्हणजे कंदिलाच्या धूसर प्रकाशात पुस्तकातली अक्षरं स्पष्ट दिसत असली, तरी शाळा संपल्यावर शाळेतल्या विजेच्या प्रकाशात अभ्यास करणं यातही मोठा आनंद होता.

एकदा रात्री आठ वाजता अभ्यास करून शाळेतून परतत होतो. तळ्याच्या बांधावरून, चर्चच्या कंपाऊंडमधून पलीकडच्या बाजूने घराकडे जाण्याची वाट होती. रस्त्याच्या कडेला भलेमोठे दगड पडलेले होते. विजेच्या अंधूक प्रकाशात आम्हाला एक मोठा काळा कुळकुळीत साप रस्त्याच्या एका बाजूने निघून दुसऱ्या बाजूने जाताना दिसला. आम्ही चार-पाच मुली एकदम थबकलो. भीतीने जवळजवळ पाच मिनिटं तिथेच उभे राहिलो. साप दुसऱ्या बाजूच्या दगडाखाली घुसल्यावर इतर तीन मुली पुढे निघाल्या. मी मात्र थरथरत तिथेच उभी. वाटत होतं, की मी चालताना हा पायात आला तर काय करायचं? आधीच ‘पारादिस बागेतल्या सापाची भुरळ’ गरळ ओकत मनात दबा धरून बसली होतीच. संवेदनशीलता इतकी तरल होती की, हा साप तिथून सुटून तर आपल्यासमोर उभा ठाकला नसावा ना? असं वाटत होतं. ‘अगं चल, गेला तो साप कधीच. तुला रडत उभं राहायचं असेल तर निघालो आम्ही’, असं मैत्रिणींनी म्हणताच मनाचा हिय्या करून मी त्या रस्त्यावरून धावत सुटले…ही थरथर आणि जिवाचा उडालेला थरकाप अजूनही त्याच तीव्रतेनं जाणवतोय.

हेही वाचा : स्त्री नेतृत्वासाठी अमेरिका तयार आहे का ?

मग एकदा कधी तरी वडिलांनी ‘पारादिसा’तल्या त्या सापाच्या कथेचा वेगळा आणि नवा अर्थ सांगितला. त्या कथेत मधल्या झाडाचं म्हणजेच ज्ञानवृक्षाचं फळ खायचं नाही, असा जो देवाचा आदेश होता. त्याचा अर्थ आपण सकारात्मक पद्धतीनं लावायचा. मधल्या झाडाचं फळ म्हणजे वासनेचा उगम. नाभी हे शरीरातील गुरुत्वाकर्षणाचं केंद्र समतोल राखण्याचं स्थान. त्याचा तोल वासनेकडे, लैंगिकतेकडे झुकला तर ती सापाची पडलेली मोहिनी… आणि ज्ञानवृक्षाचा ढळलेला तोल! वडिलांचे हे बोल माझ्या मनात विजेचा लख्ख प्रकाश पाडून गेले. २००० या वर्षी नाशिकमध्ये भरलेल्या ‘ख्रिास्ती समाजीय मराठी साहित्य संमेलना’च्या वेळी अध्यक्षपदावरून दोन हजार सालापूर्वीची ज्ञानवृक्ष आणि सापाची ही प्राक्कथा नवा मुलामा देऊन सांगितली. म्हटलं, ‘जर तो ज्ञानवृक्ष आहे आणि त्याचं फळ एवानं आधी चाखलं आणि नंतर आदमला दिलं म्हणजे तिनं आधी ज्ञान प्राप्त केलं आणि नंतर आदामला ज्ञानप्रवृत्त केलं, असा अर्थ का लावला जाऊ नये? तिने फळ खाल्लं आणि तिच्या पायानं पाप चालत आलं, असा अर्थ लावून तिला दोषी का ठरवलं जातं?’ जाहीरपणे भर सभेत हे सारं सांगण्याचं धैर्य आलं ते अभ्यासामुळे.

बालपणी असलेल्या भयानंतर जसजसं आपलं शिक्षण होऊ लागतं, वाचन होऊ लागतं. अन्य धर्म, समाज, समुदाय त्यातील आपला वावर वाढत जातो यामुळे निर्भयाकडे आपली वाटचाल होऊ लागते. मग प्राक्कथेतील ज्ञानवृक्ष… खराखुरा ‘ज्ञानवृक्ष’ होऊन आपण त्याच्या छायेखाली बसून सकारात्मक विधायक विचारांची फळं चाखू शकतो आणि ती इतरांना खाण्यास प्रवृत्त करू शकतो. अर्थात हा मला भावलेला अर्थ, असे इतरही अनेकविध प्रकारचे अर्थ जो तो आपल्या मगदूराप्रमाणे लावू शकतो.

मला आणखी एक भय होतं. ते म्हणजे भाषेसंदर्भातलं. आम्ही वसईतील पिढीजात मराठी भाषक ख्रिास्ती. त्यामुळे आमची नावं तद्दन ख्रिास्ती. गावातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत माझं शिक्षण झालं. महाविद्यालयात इंग्रजी माध्यम. पण आमच्या मराठी बोलण्यात, मराठीचीच एक पोटभाषा वाडवळी बोलीचा हेल होता. विद्यापीठ पातळीवर शिक्षण घेताना माझं नाव ख्रिास्ती आणि ही मराठी बोलते, हिने एम. ए.साठी मराठी विषय कसा घेतला असावा? हिचं बोलणं मिशनरींचं मराठी आहे का? अशा विविध शंका उपस्थित होऊ लागल्या. खरं तर मिशनऱ्यांनी केलेली मराठीची सेवा मराठी वाङ्मयाच्या इतिहासात वाचायला मिळालेली होतीच. हे सारं असलं तरी माझं मराठी ‘मिशनरी मराठी’ कसं काय? हा प्रश्न मला भेडसावू लागला आणि त्यासंदर्भातील भय मनात दबा धरून बसलं. आपण बोलतोय ते बरोबर आहे का? खरं तर मराठी विषय घेऊन मी ‘विद्यावर्धिनी’च्या वर्तक महाविद्यालयातून प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. पण हे भय मनात इतकं रुतून बसलं की, कित्येकदा प्राध्यापकांशी बोलताना, मराठी मैत्रिणींशी बोलताना मला भीती वाटायला लागली. सभेत बोलण्याची आणि स्वत:ला मराठीतून अभिव्यक्त करण्याची गोष्ट तर दूरच! अर्थात हे सारं सुरू झालं, पण खूप नंतर… हे मात्र खरं! ते दिवसच तसे होते धर्म आणि भाषा यांचा संबंध जोडण्याचे!

आज मागे वळून पाहताना आठवतं ते ऋग्वेदातील ‘रात्रीसूक्त!’, रात्रीबरोबर अंधार येतो, पण जसजशी रात्र चढत जाते तसतसं तिचं तारामंडळ प्रकाशित होऊ लागतं आणि अंधकार क्षीण होऊ लागतो. येशू ख्रिास्त यांनीही ‘अंधारातून प्रकाशा’कडे जाण्याचा मार्ग दाखविला. ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल’, असं कविवर्य कुसुमाग्रजांनी म्हटलं आहेच, किंबहुना सर्वच धर्मात अंधारयुग दाटलेलं असताना प्रकाशाची तिरीप कधी ना कधी तरी एखाद्या शलाकेसारखी बाहेर येतेच, असं म्हटलेलं आहेच. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय, ‘जोपर्यंत जगात नवीन बालक जन्मास येतंय तोपर्यंत मी जीवनाविषयी निराश झालेलो नाही.’

हेही वाचा : सांदीत सापडलेले…! अवधान

भय हे अज्ञानाच्या अंधकाराचं अपत्य आहे. परंतु ते फार काळ टिकत नाही. कारण ते रोगट असतं आणि आपली वाढ खुंटवतं. परंतु या अंधाराच्या कालखंडाला अंत असतोच. यात दडलेल्या प्रकाशाचा दिवस उगवतोच. तो निर्भयाचा दिवस असतो. तो आपलं आयुष्य अधिक समृद्ध करीत जातो. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ‘पारादिसांतील ‘त्या’ सापाचे डंख आणि डूख विविध रूपांत साक्षात होताना दिसले. परंतु ‘ज्ञानवृक्षा’चं फळ चाखलं असल्याकारणानं त्यावर काही प्रमाणात का होईना मात करू शकले.

मिशनरी मराठीच्या ठपक्यापासून प्रमाण मराठीतून साहित्यनिर्मितीची ठिपक्या-ठिपक्यांची रांगोळी घालू शकले. त्यावर बोलींची नक्षी रेखाटू शकले. भयाचं दाट पटल दूर झालं आणि ज्ञानाचा प्रकाश लख्ख होत गेला. ‘पारादिसा’तही एवा किंवा ‘इव्ह’ आता केवळ ‘संध्याकाळ’ म्हणून नव्हे तर ‘पहाट’ होऊन काळासमोर लखलखीतपणे उभी आहे. भयाकडून अभयाकडे असलेला हा प्रवास. मला समृद्ध करणारा!

drceciliacar@gmail.com