अनुपमा उजगरे
भविष्यात घडणाऱ्या चांगल्यावाईट घटनांचे संकेत अनेकदा स्वप्न देत असतात. यामध्ये काही स्वप्नं संकटांची चाहूल देणारी, काही आनंददायी, तर काही विचार करायला भाग पाडणारीही असू शकतात, माणसाचं भय दूर करण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण सकारात्मक होण्यासाठी अशा स्वप्नांचा खरंच उपयोग होतो का?

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संघर्ष असतात. त्या संघर्षांचं स्वरूप व्यक्तिगणिक भिन्न असू शकतं. त्या संघर्षांच्या काळाची लांबी, रुंदी, खोली कमी-अधिक असू शकते. मन जितकं कमकुवत तितका अधिक त्या संघर्षाशी सामना करण्याच्या भीतीचा बागुलबुवा अगडबंब!

article about psychological effects of bossy behavior on colleagues
इतिश्री : भावनांची सर्वव्यापी जाणीव
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
people with personality disorder
स्वभाव, विभाव : खुदी से इश्क किया रे…
Loksatta chaturang article about friendship
सांदीत सापडलेले…! मैत्री
sandha badaltana manprasthashram
सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम
woman in prison
स्त्री ‘वि’श्व : गजाआडच्या स्त्रियांचं जग
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय

आपल्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या जीवनात एखादा भयंकर प्रसंग घडून जातो, मात्र त्याचा परिणाम म्हणून ‘भयाची भावना’ मनामध्ये घट्ट रुतून बसते. ध्यानी-मनी-स्वप्नी तेच दिसू लागतं. परंतु ध्यानी-मनी कसलाच विचार केलेला नसतानाही स्वप्नात जर असं काही दिसलं, तर मात्र ‘भय’ वाटल्याशिवाय राहात नाही आणि स्वप्नात दिसलेलं प्रत्यक्षात घडत गेलं तर अशा स्वप्नांचंही मग ‘भय’ वाटू लागतं. असं का घडत असेल, सांगता येत नाही. असं सर्वांच्याच बाबतीत घडतं असंही नाही. भावी घटनांची कल्पना देणाऱ्या अशा स्वप्नांना ‘सूचक स्वप्न’ म्हटलं जातं.

हेही वाचा : सांदीत सापडलेले…! मैत्री

माझ्या आयुष्यातला लग्नापूर्वीचा चारेक वर्षांचा एक टप्पा असा होता की, त्या काळात मला एखादं स्वप्नं पडलं की, ते नजीकच्या काळात खरं होत असे. त्यात आनंददायी स्वप्नं नसत. संकटांचीच चाहूल असे. त्या स्वप्नावर विचार करायला माझं मन मला भाग पाडी. असं झालं तर अमुक करता येईल, तसं झालं तर हा मार्ग स्वीकारता येईल. असे पर्याय माझे मीच शोधू लागले. मला मार्गदर्शन करणारं कुणी नव्हतं. अनेक पर्यायांतून एक निवडण्याचं निश्चित केलं की, त्याची जबाबदारी अर्थातच माझी असे. आव्हानं स्वीकारणं, एकटीनं त्यांचा सामना हिकमतीनं करणं, घरचे-दारचे काय म्हणतील? यापेक्षा स्वत:चा आवाज ऐकून धडाडीने निर्णय घेणं यामुळे आत्मविश्वास येऊ लागला. त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण सकारात्मक व्हायला चांगलीच मदत झाली. संकटांच्या भयाची धारच बोथट वाटू लागली. किंबहुना माझी मीच भयाची धार बोथट केली.

माझी स्वप्नं खरी होतात म्हटल्यावर मी एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून ती तारीखवार लिहून ठेवू लागले. ती खरी झाल्याचाही तपशील त्या स्वप्नाखाली मी लिहीत असे. आता सगळे तपशील आठवत नाहीत, पण एखादं स्वप्न असायचं, मी खूप उंच शिडीवर चढतेय, पण अगदी वरच्या काही पायऱ्याच तुटलेल्या आहेत. पण स्वप्नात मी कशी कोण जाणे वर जाऊन पोहचलेली असे. जागी झाल्यावर मनात येई, शेवटी पोहोचले ना मी वर, म्हणजे मध्ये कितीही मोठी अडचण आली तरी कसून प्रयत्न केले तर यश मिळणार आहे. मग मला वाटलेल्या भयाचं रुपांतर दिलासा मिळण्यात होई. फार मोठं आभाळ कोसळणार असेल, तर एखादा अजगर फूत्कार टाकत धूळ उडवत त्वेषाने सरपटत समोरून जाई. चांगलं घडणार असेल तर फणा काढलेला पांढराशुभ्र नाग स्वप्नात दिसे. स्वप्नांनी मला काही वेळा घाबरवलं तर काही वेळा सावधही केलं.

कॉलेजला जायचं असेल, तर मला पहाटे उठून सगळी कामं करून मगच जाण्याची परवानगी असे. मीच स्वयंपाक करत असले, तरी सुखवस्तू कुटुंबातल्या माझ्या पोटात तीन तीन दिवस अन्नाचा एकही कण जाणार नाही, असा बंदोबस्त सावत्र आईने केलेला असे. तिच्या जाचाला कंटाळून अखेर मी एक निर्णय घेण्याचं मनाशी ठरवत होतं. त्या सुमारास माझ्या स्वप्नात माझी आई धाय मोकलून रडते आहे आणि त्यामुळे तिची कबर गदागदा हलते आहे, असं मला स्वप्नात दिसलं. कबर, कबरीवर फुलं वाहणं, मेणबत्ती लावणं हे मी शाळकरी वयातच डोळसपणे नाकारलं होतं. त्यामुळे बरीच बोलणी मला खावी लागली होती. मी दोन वर्षांची असताना माझी आई वारली. पण माझ्यासाठी जिचा ‘जीव तुटावा’ अशी ती एकटीच होती. ती जिवंत नाही, गेल्या बावीस वर्षांत तिचा मातीचा देह मातीला मिळूनही गेलेला असेल, हे मला कळत होतं तरी माझ्या स्वप्नात ती कबर तिच्या रडण्यानं गदागदा हलताना बघून मी हादरले. भीतीची एक लाट मनाला ढवळून गेलीच. क्षणात मी माझा निर्णय बदलला आणि काय सांगू, थोड्याच दिवसांनी निरंजन (उजगरे)शी लग्नगाठ बांधली गेली. ‘आंधळ्याच्या गाई राखायला’ एक समर्थ माणूस मिळाला म्हणून की काय, हळूहळू मला पडणाऱ्या या स्वप्नांचं प्रमाण कमी होत गेलं, पण त्यांना पूर्णविराम मात्र मिळाला नाही.

हेही वाचा : आईपण नको रे देवा?

आता कधी तरी पुढच्या पिढीच्या आयुष्यातल्या भावी घटनांची चाहूल स्वप्नं देऊन जातात. दुसऱ्या दिवशी फोन करून अंदाज घ्यावा, तर स्वप्नाला अर्थ होता हे समजतं. रक्ताच्या किंवा जिवलग नात्यातल्या व्यक्तीविषयी असे अनुभव येणं स्वाभाविक असू शकतं. पण एखाद्या व्यक्तीशी रोज संबंध येत नसला, तरी चांगले संबंध आहेत अशांच्याही बाबतीत काहीच विचार केलेला नसताना कधी तरी एखादं सूचक स्वप्न का पडावं? एकदा एक दिवंगत सुप्रसिद्ध साहित्यिक माझ्या स्वप्नात आले. स्वत:च्या कन्येविषयी त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं, ‘तिचं खूप चांगलं होणार आहे.’ त्यांनी हे मला माझ्या स्वप्नात येऊन सांगण्याचं काय कारण असावं, मला कळेना. त्यांचं एक पुस्तक मला अतिशय आवडल्याचं मी त्यांना पत्रानं कळवलं होतं, पण प्रत्यक्षात माझं त्यांचं कधी बोलणं झालेलं नव्हतं. मुळात त्या काळात मी साहित्य वर्तुळापासून कोसभर लांबच होते. निरंजनने आग्रह धरला, ‘‘स्वप्न चांगलं आहे तर तू तिला अवश्य सांग. आपल्या वडिलांचे आपल्याविषयीचे उद्गार ऐकून आनंदच होईल तिला.’’ माझी तयारी नव्हती. उगाच कशाला आपल्या सूचक स्वप्नांचा बभ्रा करायचा असं मला वाटत होतं. पण तिला सांगितलं. अन् काही दिवसांतच तिचा घटस्फोट झाला. स्वप्न प्रथमच खोटं ठरलं होतं. उगाच सांगितलं अशी रुखरुख वाटत राहिली. भीतीही वाटली, पण नंतर जे होतं ते भल्यासाठी होतं म्हणतात, तसं झालं. तिच्या वडिलांनी उच्चारलेलं तिच्याविषयीचं भविष्य खरं झालं. ती मुलगी आज खूप सुखात आहे. माझ्या मनातली खंतही त्यामुळे दूर झाली.

एक मात्र इथं नमूद करणं आवश्यक वाटतं, मी माझ्या संकटकाळी किंवा संघर्षकाळी मार्गदर्शन म्हणून कधी स्वप्नांची वाट पाहिली नाही किंवा त्यांच्यावर अवलंबूनही राहिले नाही. निद्रावस्थेत पाहिलेल्या स्वप्नांकडेही मी डोळसपणेच पाहिलं. एखाद्या अभ्यासकाला माझ्या स्वप्नांच्या डायरीचा उपयोग झाला असता पण ती जपून ठेवण्याइतकं अप्रूप मला अजिबात वाटलं नाही. पण भय निर्माण होणं आणि भयाचा निचरा होणं या दोन्ही गोष्टी या स्वप्नांनी झाल्या.

स्वप्नांपलीकडे वास्तवात जेव्हा कधीतरी अचानक काही प्रसंग येऊन उभे ठाकतात की, तेव्हा आपण गांगरतो, भयग्रस्त होतो. यातून सुटका कशी करून घ्यायची हे सुचत नाही. मी नववीत असताना होस्टेलमधून दिवाळीच्या सुट्टीसाठी नागपूरला घरी चालले होते. मनमाड स्टेशनला ट्रेन थांबली. मी गाडीच्या डब्याच्या दारात उभी होते आणि तेवढ्यात मला आमचे किरणा दुकानवाले काका दिसले. त्यांनीही मला पाहिलं. एकमेकांना बघून आम्हाला खूप आनंद झाला. काकांनी नेहमीसारखी प्रेमाने विचारपूस केली. नंतर ते म्हणाले, ‘‘मी मुंबईला चाललोय. तू पाहिलीस का मुंबई?’’ मी म्हटलं, ‘‘नाही अजून.’’

‘‘मग चल माझ्याबरोबर.’’

मी म्हटलं, ‘‘वडील मला स्टेशनवर घ्यायला येणार आहेत.’’

‘‘तू माझ्याबरोबर असल्याचं आपण तार करून कळवू त्यांना. चल, तुला मुंबई दाखवतो. आपण छानपैकी हॉटेलमध्ये राहू. मज्जा करू. जिवाची मुंबई करू आणि येऊ परत. दोन दिवसांनी काय फरक पडतो?’’

हेही वाचा : जगाभोवतीचा लैंगिक फास

मला प्रश्न पडला, काकांना नाही म्हणायचं कसं? घरगुती संबंध होते. एक मन म्हणत होतं, घरी कळलं तर म्हणतील, ‘काकांनी एवढं म्हटलं तर जायचं ना मुंबई बघायला. सुट्टी काय इथे घालवायची होतीच.’ दुसरं मन म्हणे ते म्हणतील, ‘काकांनी म्हटलं म्हणून तू लगेच कशी गेलीस आमची परवानगी न घेता?’मनाची प्रचंड चलबिचल सुरू झाली होती. खरं म्हणजे काकांच्याबरोबर एकटीने हॉटेलमध्ये राहण्याच्या कल्पनेचीच मला भीती वाटू लागली होती. माझ्या वयाची त्यांची मुलगी, बाली सोबत असती तर एखादे वेळी चाललंही असतं. आणि ‘जिवाची मुंबई करू’ म्हणजे ते काय करणार? हेही कळेना. मनाने इशारा दिला, ते म्हणालेत खरं, घरी फोन करून, तार करून कळवू. पण त्यांनी तार केलीच नाही तर? किंवा तार करून वडिलांना ती मिळालीच नाही तर? एकेक प्रश्न म्हणजे एकेक मोठा अक्राळविक्राळ काळाकुट्ट ढग माझ्या मनावरती दाटून येत होता. काकांना कुठल्या शब्दात नकार देऊ? हे त्याक्षणी मला सुचत नव्हतं. त्यावर ताण म्हणजे, हे सगळं मी माझ्या बाबांना सागितलं तर ते माझ्यावर विश्वास ठेवतील याची खात्री होती, पण या माणसाने जर माझ्या सावत्र आईचे कान भरले आणि म्हटलं की, ‘हिनेच हट्ट केला म्हणून हिला घेऊन गेलो तर?’ एका मगोमाग एका विचार मला अस्वस्थ करत होते. मनामध्ये भीतीचं काहूर दाटून आलं. पावसाळ्यात सगळीकडे काळे ढग दाटून आले, विजा कडाडू लागल्या की, मला भयंकर भय वाटतं. तसंच आताही वाटायला लागलं. आधारासाठी जवळ कोणीच नव्हतं. कशी सुटका करून घ्यायची? माझी प्रत्येक शंका निवारायला त्यांच्याकडे तोडगा दिसत होता आणि कसंही करून ते मला मुंबईला घेऊन जाणारच असं त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं. पण क्षणात वीज चमकावी तसा एक विचार मनात आला आणि मी त्यांना म्हटलं, ‘‘काका, मी नाही येणार तुमच्याबरोबर! तुमच्या बालीला जर असं कोणी म्हटलं असतं की,‘‘चल, जिवाची मुंबई करायला तुला नेतो, तर तुम्हाला चाललं असतं?’’ त्यांच्या मनात काय चाललंय याचा मला अंदाज आलाय हे त्यांनी बहुतेक ताडलं. त्यांचा चेहरा खरर्कन उतरला. आणि काही न बोलता ते पाठमोरे होऊन त्यांच्या ट्रेनच्या दिशेने चालू लागले. आणि मला माझ्या मनाचं आकाश एकदम निरभ्र झालं.

समोर कितीही जवळची आणि मोठी व्यक्ती असली तरी न घाबरता, न भिता आपल्याला ठामपणे ‘नाही’ म्हणता तर आलंच पाहिजे. त्यात काही कठीण नसतं, आपण हे सहज करू शकतो की, हे मला या प्रसंगाने नुसतं कळलं नाही तर, भविष्यातल्या अज्ञात प्रसंगांसाठी बळही देऊन गेलं!

anupama.uzgare@gmail.com