नवीन लग्न करून सासरी आलेल्या मुलीकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा असतात. पण त्या अपेक्षा अवाजवी असू शकतात हे लक्षात घेणं महत्त्वाचं असतं अन्यथा तिच्या वागण्याविषयी कायम प्रश्नचिन्हच निर्माण होत राहील आणि ‘ही अशी का वागतेय?’ या प्रश्नाच्या भोवऱ्यात मन अडकलं जाईल. त्यापेक्षा या प्रश्नाच्या पुढे जात ‘तेव्हा काय घडलं म्हणून ही अशी वागते? अशी तिच्या नव्हे तर आपल्याच वागण्याची शहानिशा केली तर? प्रश्न बदलून पाहण्याचं ‘वैचारिक सीमोल्लंघन’ केलं तर प्रश्नाची इतिश्री नक्कीच होईल.

‘‘आज संध्याकाळी माझ्याकडेच ये चहाला.’’ या चारूच्या मेसेजप्रमाणे स्वाती ऑफिसमधून आल्यावर थेट चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या चारूकडे पोहोचली. पंधरा वर्षांपूर्वी, या नवीन बिल्डिंगमध्ये सर्वात आधी राहायला आलेली यांची दोन बिऱ्हाडं. वरच्या मजल्यावरचा टेरेस फ्लॅट स्वातीचा. चारूची स्पृहा आणि स्वातीचा तनय सारख्याच वयाचे असल्यामुळे दोन्ही कुटुंबांची सहजच मैत्री झाली.

पहिल्यापासून स्पृहा मस्तीखोर, भटकी आणि बडबडी तर तनय अबोल, गणिताचा ‘होमी भाभा स्कॉलर’ आणि आईवेडा. त्याचे स्वत:चे एक-दोनच खास मित्र होते, पण स्पृहाच्या सगळ्या उद्याोगांत आणि मित्रमंडळींत तो असायचा. स्पृहा यथावकाश ट्रेकिंगवाल्या रजतच्या प्रेमात पडली. ‘अॅडव्हेंचर कॅम्पस’, ‘ऑफबीट टूर्स’ची कंपनी काढून लग्नानंतरही त्यांची भटकंती चालू होती.

हेही वाचा : माझी मैत्रीण : ‘आम्ही मैत्रीवर प्रेम करतो’

तनयनं ‘फायनान्शियल मॅनेजमेंट’ केलं. लहान वयातच त्याच्या नावाचा दबदबा होता. कामावरच लक्ष केंद्रित असल्यामुळे प्रेम, रिलेशनशिप तर दूरच, जोडीदाराबद्दल त्याच्या विशेष अपेक्षाही नव्हत्या. कुणाच्यातरी ओळखीतून, नागपूरच्या संपदाचं स्थळ आलं. कृषी पदवीधर आणि बागकाम, शेतीची आवड असलेल्या संपदाचा निरागस गोडवा तनय, बाबा आणि मुख्यत: स्वातीला आवडला, महिन्याभरात लग्न झालंही.

संपदा मिळून मिसळून राहणारी, प्रेमाने काळजी घेणारी पण कमी बोलणारी. हरहुन्नरी होती. या घराची भलीमोठी टेरेस पाहिल्यावर तिचे डोळे चकाकले. घरापुरता भाजीपाला, मातीविना शेती, ओला कचरा जिरवणे असे तिचे प्रयोग चालू असायचे. टेरेसमध्ये परसबाग आणि मिनी शेत झालं होतं. संपदाच्या बोलण्यातला नागपुरी लहेजा आणि स्वाभाविक सहजता चारुला आवडायची. एका ‘एनजीओ’त सचिव असल्याने महाराष्ट्रातल्या अनेक गावांशी तिचा संपर्क आणि बोलीभाषांची सवय होती. स्वाती मात्र पुणेरी, मराठीची प्राध्यापक. ती संपदाच्या बोलण्याची अनेकदा मस्करी करायची.

लग्नानंतर दोन महिन्यांनी स्वाती नवऱ्यासह अमेरिकेच्या ट्रीपवर गेली. ते परतले तेव्हा चारू कामात बुडलेली होती. अखेरीस काही महिन्यांनी आज गप्पांना निवांतपणा मिळाला असूनही स्वाती अस्वस्थ दिसल्यामुळे चारूने कारण विचारलं. ‘‘अगं, आम्ही परत आल्यापासून संपदा गप्प गप्प आहे. विचारलं तर सांगत नाही. दिवसभर टेरेसवर तिच्या बागेतच असते. तनयला विचारलं तर तो म्हणाला, ‘‘गेले तीन महिने त्याच्यावर कामाचा ताण आहे. घरी आल्यावरही तो रात्री उशिरापर्यंत काम करतो. त्यांच्यात फारसं बोलणं होत नाही. तनय बिझी असणारच, पण बायकोनं बोलायला हवं की नाही? तनयचे बाबा अबोल असूनही मी बोलतेच ना? आत्तापर्यंत कुणाला बोलले नव्हते चारू, पण त्यांच्या लग्नाच्या दिवसापासून मला संपदाच्या खूप गोष्टी खटकत होत्या. आता अति होतंय. संपदाच्या आईवडिलांशी बोलावंसं वाटतंय.’’ स्वातीने बॉम्बच टाकला.

हेही वाचा : जिंकावे नि जगावेही: विचारांची सदाबहार फुलबाग

‘‘आईवडिलांकडे तक्रार? आणि कुठल्या खूप गोष्टी खटकल्या?’’ चारूने विचारलं.
‘‘तनयच्या लग्नाला आलेले आमचे बरेचसे नातलग म्हणजे माझी आई, बहिणी, मेहुणे आणि सासूबाई, आतेसासुबाई दुसऱ्या दिवशीच्या पूजेसाठी थांबले होते, पण संपदा नीट बोललीच नाही असं म्हणाले सगळे.’’
‘‘हो. ज्येष्ठ नागरिक मेळावा तुझ्या घरी होता आणि तरुण जनतेसाठी तुम्ही हॉटेलात खोल्या घेतलेल्या. पूजा व्हायचीय म्हणून संपदा तुझ्याच खोलीत झोपली होती, आठवतंय मला. त्या २२-२३ वर्षांच्या, एका दिवसात अचानक काकू, मामी, वहिनी, सून अशी सगळी नाती अंगावर पडलेल्या, अनोळखी घर, अनोळखी नवरा यात बावरलेल्या मुलीनं सासरच्या सत्तरीतल्या लोकांशी पहिल्याच दिवशी नेमक्या काय गप्पा मारणं अपेक्षित होतं तुला? आणि कधी? नमस्कार केल्या केल्या?’’ चारूच्या तिरकस प्रश्नाने स्वाती चमकली.
‘‘माझी आई, सासूबाई सगळे जण म्हणाले गं. म्हणून…माझ्या हे लक्षातच नाही आलं.’’ ती पुटपुटली…
‘‘नवी नवरी सकाळी लगेच स्वयंपाकघरात तुझ्या मदतीलाही आली होती… तूच सांगितलेलंस…’’
‘‘हो. ती तर मजाच. ती म्हणाली, ‘आई, मी ‘मांडते’ चहा. मस्त शिजवते.’ आम्हाला अर्थच लागेना. माझ्या बहिणीच्या लक्षात आल्यावर ती हसत म्हणाली, ‘अगं, पुण्यात चहा मांडत नाहीत, करतात आणि शिजवत नाहीत, उकळतात.’ खूप हसले सगळे. तिचे एकेक विचित्रच शब्द. कोथिंबिरीला सांबर, धिरड्यांना चिले. एकदा तर ‘झामल झामल होतंय.’ म्हणाली. म्हणजे बावरल्यासारखं होतंय. माझ्या घरचे खूप चेष्टा करतात तिच्या बोलण्याची.’’ स्वाती हसत म्हणाली.

‘‘पहिल्याच दिवशी सगळे मिळून तिच्या भाषेला हसलात तुम्ही? तुमची मजा पण तिचं काय? नववधू असून मदतीला आली होती, नागपूरच्या तिच्या रोजच्या भाषेत आपलेपणानं बोलत होती. किती हिरमुसली असेल बिचारी मनात? तोंड उघडायलाच घाबरत असेल तुमच्यासमोर.’’ चारूनं संपदाची मन:स्थिती दाखवल्यावर, ‘‘बाप रे, खरंच की. असं कसं लक्षात आलं नाही माझ्या?’’ स्वाती शरमलीच एकदम. ‘‘होतं कधी कधी. आपलेच सगळे मिळून मस्करीच्या नावाखाली एखाद्याला टार्गेट करतात तेव्हा योग्य-अयोग्य तपासून पाहायचं उमजत नाही.’’

‘‘चारू, पण तिनं ते फारसं मनावर घेतलं नसेल. ती बोलकी नसली, तरी आम्ही ट्रिपला जाण्यापूर्वी घरात हसून खेळून होती. आताच एवढी घुमी, गप्प का? तनयचं आणि तिचं नीट चाललं नसेल का? दोघांत फारसा संवाद नाही. मनाविरुद्ध लग्न, दुसरा कोणी आवडत होता असं काही तर नसेल?’’

‘‘अगं, भलतंच काय? संपदा कमीच बोलते. शब्दांपेक्षा कृतीवर भर देते. बाग कसली हिरवीगार बहरलीय तिची. मेथी, कोथिंबीर काढल्यावर मला आठवणीनं आणून देते. मध्ये एकदा तनयला ‘काय आवडतं?’ असं विचारल्यावर म्हणे की, ‘‘त्याला सगळंच चालतं, पण त्याला त्याच्या आईच्या हातच्या सगळ्या भाज्या आवडतात.’’ चारूचं संपायच्या आत स्वाती मध्येच म्हणाली, ‘‘तेच तर. तिच्या हातची चव त्याला फारशी आवडत नाही. कधी कधी वाटतं, तनय एवढा स्कॉलर, त्याच्यापुढे हिचा ‘स्मार्टनेस’ कमीच पडतो. पहिल्या वर्षी एक विषयही राहिलेला तिचा. इंग्लिशही कच्चं आहे. त्यासाठी तू प्रयत्न करायला हवेत असं तनयपण सांगतो तिला.’’

‘‘वेळात वेळ काढून तेवढं बरं बोलतो तिच्याशी? पहिल्या वर्षी एखादा विषय राहिला असेल, पण संपदाची पदवी खरी आणि मार्क चांगले आहेत याची सर्टिफिकेट पाहून तूच खात्री करून घेतलीस ना? तरीही स्वत: पसंत केलेल्या मुलीची भाषा, शिक्षण याच्याबद्दल तुमच्या मनात इतकी नाराजी असेल असं वाटलं नव्हतं. मला तर ती आवडते. माझ्याशीही कमीच बोलते पण मोकळी वागते. प्रत्येकाचा ‘स्मार्टनेस’ वेगळा असतो स्वाती. तनय स्वत:च्या विषयावर अस्खलित बोलतो, पण जनरल गप्पा किती मारता येतात? मित्र किती आहेत? विशेषत: मुलींशी बोलायची सहजता किती आहे त्याच्यात?’’ चारूनं विचारलं.

हेही वाचा : स्त्री-शोषणाचा जातपंचायतीचा विळखा

‘‘असं का विचारतेस? स्पृहाशी किती बोलायचा? तुमच्याकडे मुलामुलींचा अड्डा असायचा कायम.’’
‘‘हो, स्पृहाची आणि तनयची मैत्री नकळत्या वयात, शेजारी असल्यामुळे सहज झाली. शिवाय स्पृहा बोलकी, जगन्मित्र. बहुतेकांची मूळ मैत्री स्पृहाशीच होती. तिच्यामुळे तनय जोडला गेला. त्याचे स्वत:चे २-३च मित्र आहेत. स्पृहा गेल्यावर अड्डाही थांबला. हे तुझ्या लक्षात आलंय का? तुम्ही दोघं इथे नसतानाही संपदाशी बोलायला तनयला वेळ नव्हता याचा अर्थ, तोही बावरलेला आहे, पुढाकार घेऊन तिच्याशी मोकळा होऊ शकला नाहीये किंवा दुसरी शक्यता, तनयसाठी कामापलीकडे काहीच महत्त्वाचं नाही. नाहीतर बायको आवडीची भाजी विचारत असताना, कुठला नवरा ‘मला आईच्या हातच्याच भाज्या आवडतात.’ म्हणून सांगेल गं? सासू आणि नवरा दोघंही मराठी-इंग्रजीतल्या चुका काढत असतानादेखील कुठली मुलगी मोकळेपणाने गप्पा मारेल?’’ यावर स्वातीकडे उत्तर नव्हतं.

‘‘स्वाती, तुम्ही अमेरिकेहून आल्यापासूनच संपदाचं बिनसलंय म्हणालीस ना? पण तुम्ही येणार म्हणून ती खूश होती. येताजाताना भेटल्यावर, आई-बाबांची खोली स्वच्छ केली, कुंड्या आणि फेरी लाइट्स लावलेत, त्यांच्या आवडीचे पदार्थ करणारे वगैरे उत्साहाने सांगत होती. ‘तनय सतत कामात, आई-बाबा असल्यावर सोबत वाटते.’ असंही म्हणालेली. मग तुम्ही आल्यानंतर नेमकं काय घडलं? ओळीनं आठव बरं.’’ चारुला मार्ग सुचला.

‘‘आम्ही संध्याकाळी घरी पोचलो, संपदाने भाकरतुकडा ओवाळून टाकला, चहा केला. तेव्हा खुशीत दिसली. मग आम्ही तनयशी बोलायला लागलो. माझ्या बहिणीच्या नव्या घराबद्दल, अमेरिकेत पाहिलेल्या गोष्टींबद्दल बोललो. जेटलॅगमुळे आमच्यासाठी दिवसच होता आणि तनयही निशाचर. त्यामुळे जेवणानंतरही बोलतच होतो. मग संपदा कंटाळून झोपायला गेली. दोन दिवसांनी आमचा जेटलॅग संपल्यानंतर तिचं बिनसलेलं जाणवलं.’’
‘‘तुमची खोली सजवलेली, आवडीचं जेवण याबद्दल संपदाशी काहीच बोलला नाहीत? लक्षात तरी आलेलं का?’’ चारूने विचारलं.
‘‘ते नाही बोललो गं, घरातला बदल जाणवला होता खरं, पण…अरे हो. माझ्याच नादात माझ्या मुलाशी बोलत राहिले. सुनेकडे सपशेल दुर्लक्ष. ती समोर असूनही नसल्यासारखं झालं आणि हे एवढ्या दिवसांनी लक्षात येतंय, पण तुला कसं कळलं? संपदानं सांगितलं?’’ स्वातीला कसंतरीच झालं.
‘‘नाही, तूच नाही का ओळीनं सांगितलंस आत्ता? तू तिच्याबद्दल तक्रारी सांगत होतीस, तेव्हापासून मी कल्पनेने ती दृश्यं सिनेमासारखी डोळ्यांसमोर आणत होते. म्हणून त्यावेळी संपदाला काय वाटत असेल ते लक्षात आलं.’’ आता स्वातीच्याही डोळ्यांपुढून प्रसंग सरकत गेले.
‘‘संपदाच्या बाजूने पाहिल्यावर तेच प्रसंग किती वेगळे दिसतायत. आमच्या मनातही नसताना सासुरवास झाला गं तिला आमच्याकडून आणि मी तिच्या आईबाबांकडे तक्रार करणार होते.’’ स्वातीचा चेहरा पडलाच.

हेही वाचा : सर्जन सोहळा

‘‘असू दे स्वाती. जे झालंय ते नकळता झालंय. आता जाणीव जागी झाल्यावर ‘मला वाटलं’, ‘आई म्हणाली’ अशा सवयीच्या गृहीतकांत अडकणार नाहीस तू. संपदाच्या बाजूनं किंवा त्याही पलीकडे जाऊन बाहेरूनच गोष्टींकडे बघू शकशील. अनेक बाजू स्पष्ट दिसतील.’’
‘‘खरंय गं चारू, ‘आम्ही आल्यापासून संपदा अशी का वागतेय?’ या प्रश्नात अडकले होते. ‘तेव्हा काय घडलं म्हणून ती अशी वागत असेल?’ असा प्रश्न तू फिरवलास, म्हणून उलगडलं.’’
‘‘आपल्या नेहमीच्या मर्यादा, चाकोरीच्या पलीकडे नेणारं एक प्रकारचं ‘वैचारिक सीमोल्लंघन’च की हे. यापुढे असे योग्य प्रश्न शोधण्याची सवय करायला हवी.’’ स्वातीतली प्राध्यापिका बोलली. ‘‘ पण ते नंतर. आधी घरी जाऊन माझ्या पोरीला सॉरी म्हणते, तनयला झापते.’’ असं म्हणत स्वाती निघालीच.

neelima.kirane1@gmail.com