मनात अशुभाची, काही वाईट घडण्याची भीती असली की, त्या भीतीमागे किती तरी गृहीतकं निर्माण होतात. असं झालं काय तर तसं झालं काय या भावनेच्या गदारोळात योग्य निर्णय घेण्याचीच मग भीती वाटायला लागते. त्यावर उपाय कोणता?

‘‘तुझी गायत्री आलीय गं आशू इथे…’’ आईचं एवढंच वाक्य ऐकून अश्विनी खूश झाली.
‘‘ अरे वा. किती वर्षांनी आम्ही दोघी इथे भेटणार. लग्नानंतर सणावारांना यायचो इथे. त्यानंतर एकदम आत्ताच.’’
‘‘ अगं, चार दिवसांपूर्वी गायत्रीची आई गेली आशू, म्हणून आलीय ती. गायत्रीचे बाबा गेल्यापासून त्या बरेचदा आजारीच असायच्या. मी समाचाराला जाऊन आले. आज तू येणारच होतीस म्हणून तुला फोनवर सांगून डिस्टर्ब केलं नाही.’’
अश्विनीचे डोळे भरून आले. ती आणिगायत्री दोघी शाळेतल्या बेस्टीज. कायम एकत्र. एकीच्या कुणाच्या तरी घरी पडलेल्या असायच्या. नंतर गायत्री सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग करण्यासाठी मुंबईला गेली, तिथेच वर्गातल्या सुखविंदरच्या प्रेमात पडली. मूळचा दिल्लीचा सुखी, वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे तेव्हा मुंबईत होता. गायत्रीच्या घरचे, विशेषत: तिचा भाऊ गौरव त्यांच्या लग्नाबद्दल थोडा नाखूश होता, पण गायत्रीने आग्रह धरल्यानंतर त्यांनी विरोध केला नाही. पुढे सुखीने गुरुग्राममध्ये जॉब घेतला. गायत्रीलाही तिकडेच नोकरी मिळाली. आता गेली पंधरा वर्षे ती दिल्लीकर होती. नोकरी आणि अंतर यामुळे माहेरी येण्याचं प्रमाण कमी झालं.

हेही वाचा : स्वभाव – विभाव : लक्ष वेधून घेण्याची धडपड

अश्विनी एम. कॉम. झाल्यावर लग्न करून कोल्हापूरला गेली. तिच्या नवऱ्याच्या व्यवसायांची अकाउंट्स बघायला लागली. संसाराचे व्याप वाढत गेले तशी तिचंही माहेरी नाशिकला येणं कमी होत गेलं. पण त्यांच्या मनातल्या मैत्रीला सतत भेटण्याची गरज नव्हती.

गायत्रीला भेटल्यावर काका-काकूंच्या आठवणींनी दोघी भावूक झाल्या, रडल्या. त्यानंतरही अश्विनी बराच वेळ गायत्रीकडेच असायची. तिच्याबरोबर आलेला सुखी नंतर दिल्लीला परत गेला. गायत्री राहणार होती, तिच्यासाठी अश्विनीनेही मुक्काम वाढवला. गौरवला आपल्याशी काहीतरी बोलायचं असावं, असं अश्विनीला जाणवत होतं. एकदा दोघंच असताना, ‘‘आशू, मला गायत्रीशी घराबद्दल वगैरे बोलायचंय गं, पण ती फार ताणात दिसतेय. मोकळेपणी बोलतच नाहीये. हे विधी आणि पाहुण्यांच्या गर्दीमुळे जमतही नाहीये,’’ एवढंच तो बोलला, तेवढ्यात कुणीतरी आल्यामुळे विषय अर्धवट राहिला. दुसऱ्या दिवशी गायत्रीनेच, ‘आशू, थोडी मोकळी हवा खाऊन येऊ गं,’ असं म्हणून तिला बाहेर काढलं. जवळच्या बागेतल्या त्यांच्या जुन्या कट्ट्यावर जाऊन बसल्यावर गायत्री म्हणाली, ‘‘आई जाण्याचा अर्थ कणाकणानं कळतोय गं मला आशू. आईसोबत लहानपण संपतं, तसंच माहेरसुद्धा संपतंच का गं? खूप पोरकं वाटतंय. आता या गावात आपलं काहीच नाही, कोणीच नाही, प्रचंड रडायला येतंय.’’
तिला जवळ घेऊन थोपटत अश्विनीनं शांत केलं. मग विचारलं, ‘‘आई गेल्याचं दु:ख अवघडच गं. पण माहेर का संपेल? गौरव, वहिनी आहेत ना? की काही घडलंय घरात?’’ गायत्री गप्प झाली. मग म्हणाली, ‘‘काल गौरव म्हणाला, तू असेपर्यंत घराची लीगल डॉक्युमेंट्स करून घेऊ. तेव्हापासून मला सुचेनासं झालंय. एवढ्या लगेच? आई-बाबांच्या घराचा म्हणजे माहेराचाच कायमचा निरोप घेण्याची भावना येतेय.’’
‘‘ काहीही काय बोलतेस?’’
‘‘ आई गेल्यामुळे घर आमच्या दोघांच्या नावावर आलंय, ते गौरवच्या नावाने ट्रान्सफर करण्यासाठी मी सही देणं अपेक्षित आहे. माझ्या लग्नात बराच खर्च झाला होता आणि मध्यंतरी बाबांनी वाटणी केल्यासारखे मला बरेच पैसे गिफ्ट केले होते, घर गौरवच्या नावावर असेल असं ते तेव्हा म्हणालेले.’’
‘‘हं. या नंतरच्या गोष्टी कठीणच असतात. जरा घाई होतेय हे खरं, पण हरकत काय आहे? व्यवहार महत्त्वाचे असतातच. तुझ्या कामाचं आणि रजेचं स्वरूप पाहता आत्ताच चार दिवस मुक्काम वाढवणं बरं पडेल असं वाटलं असेल गौरवला.’’

हेही वाचा : मेंदूचे स्वास्थ्य

‘‘ तो म्हणाला, त्याच्याही मनात लगेच हा विषय काढायचा नव्हता, पण आत्या म्हणाली म्हणे, त्यांच्या शेजारच्या जोशींचा थोरला मुलगा अमेरिकेत असतो. जोशी गेल्यावर इथे दोन आठवड्यांसाठी आलेला. व्यवहाराचं पुढच्या वेळी बघू म्हणाला आणि त्यानंतर चार वर्षं झाली, आलेलाच नाहीये. त्याच्या बायकोने अडवून काही मागण्या केल्यात म्हणे. इथल्या धाकट्याच्या ताब्यात जागा आहे पण थोरल्याच्या सहीशिवाय त्याला पुढे काहीच करता येत नाहीये.’’ गायत्रीने सांगून टाकलं.
‘‘तुझी आत्या एक नारदमुनी. काड्या घालण्यात पटाईत. पण गौरव काय म्हणाला?’’
‘‘तो काही तसं बोलला नाही, पण वर्षभरापूर्वी गौरव एकदा कुठल्या तरी बिल्डरला भेटायला गेला होता, असं आत्यानं मला सांगितलं. या घराची किंमत आता काहीच्या काही वाढलीय असंही म्हणाली.’’
‘‘गौरवच्या मनातलं त्याच्याशीच बोलून कळणार ना? ‘आत्या म्हणते’ कशाला पाहिजे मध्ये?’’ यावर गायत्री गप्प बसली.
‘‘काय अडचण आहे गायत्री? घराचा निम्मा हक्क हवाय का तुला?’’
‘‘ नाही. तसा वाटा नकोय मला. बाबांच्या इच्छेप्रमाणेच होईल. तसंही बाबांचं शेवटचं आजारपण, आईची आजारपणं आणि तिला सांभाळणं यात माझ्यापेक्षा गौरव आणि वहिनींनीच खूप केलंय. मला त्रास होतोय तो, ‘आत्ताच गायत्रीच्या सह्या करून घेतलेल्या बऱ्या, नाहीतर सुखी किंवा त्याच्या घरचे वाटणी मागू शकतील अशी गौरवच्या मनातली भीती मला दिसतेय. दुसरं म्हणजे या घराशी, गावाशी जी भावनिक गुंतवणूक आहे, त्यामुळे आपल्या दोन खोल्या तरी इथे हव्यात असं वाटतं.’’

‘‘हं. खरंय. आणखी?’’ आशूला गायत्रीच्या इतक्या तगमगीमागचं कारण शोधायचंच होतं.
‘‘ सुखीचं आणि माझं नातं छान आहे, एकमेकांशिवाय अजून तरी करमत नाही, पण तरी कधी कधी असुरक्षित वाटतं. तो मनमौजी आहे. कुठल्याही जॉबला लवकर कंटाळतो. अर्थात त्याला पाहिजे तेव्हा नवा जॉबही मिळतो पण त्याच्या या धरसोडीची भीती वाटते. शिवाय त्यांच्या घरात ड्रिंक्स, मजा मस्ती खूप सहज असते, जे माझ्या मध्यमवर्गीय मराठी मनाला अजूनही झेपत नाही. त्यांची राहणी मला उधळपट्टीची वाटते. त्यामुळे काही बाबतीत जेव्हा आमचे टोकाचे वाद होतात, तेव्हा हे नातं कधीतरी तुटूही शकतं अशीही भीती वाटते. आणि सगळ्यात ताण सुखीच्या रॅश ड्रायव्हिंगचा असतो. कोणत्याही क्षणी अपघात होईल, काहीही घडेल अशी धास्ती सतत मनात असते. समजा काही अघटित घडलंच तर मी सासरी दिल्लीत नाही राहू शकणार असंही आहे.’’ आशू ऐकतच राहिली.

‘‘माझ्या मनातल्या अशुभाच्या भीतीमुळे मला नाशिकला घर हवंय असं मी सुखीला सांगू शकत नाही. गौरवला तरी कसं सांगू? ‘सुखीशी लग्न करू नको असं मी तुला सांगत होतो,’ असं तो म्हणाला तर मला आवडणार नाही आणि ते न सांगता या घराबद्दल काही बोलले, तर मला हाव सुटलीय, असं गौरवला वाटेल का? मी स्वत:ला कणखर समजते, पण या काल्पनिक भीती मला अचानक पॅनिक का करतात? त्यासाठी इथल्या घराच्या आधाराची गरज का वाटावी? याचाही त्रास होतो. वर ‘आता माहेर संपलं का? खरंच पोरकी झाले का मी? या सगळ्यात गरगरतेय. आई का गेली?.’’ गायत्री व्याकुळ झाली.
‘‘काही शक्यतांची भीती वाटते, त्यासाठी आधार हवासा वाटतो. त्यात एवढं काय? गौरव तुझा सख्खा भाऊ आहे. तू त्याच्याशी मनातलं स्पष्ट बोलायला हवंस.’’
‘‘त्याने गैरसमज करून घेतला तर?’’

हेही वाचा : स्वयंपाकघर ते किचन गोष्ट एका प्रवासाची

‘‘तुमच्यात एकमेकांशी बोलण्याचा विश्वास असेल तर गैरसमजही बोलून मोकळे करता येतात. अन्यथा तुझ्या आत्यानं त्याला शेजारच्या जोशांची गोष्ट सांगितलीय आणि तुझ्या डोक्यात घराची आजची किंमत, गौरव बिल्डरला भेटला होता हे ओतलंय. ‘गायत्री या घराच्या सध्याच्या किमतीबद्दल विचारत होती.’ असं काहीतरी बोलून गौरवच्याही डोक्यात ती शंकासुर भरवू शकते.’’
‘‘हो. आत्या एक्स्पर्ट आहे असल्या उद्याोगांत.’’
‘‘मुद्दा असा, की तुमच्यात विश्वासाचा संवाद असेल तरच आत्याचं चालणार नाही. त्यामुळे मनातले भीती-कल्लोळ जरा वेळ बाजूला ठेव, शांतपणे विचार करून मला दोन वाक्यांत सांग, तुला नेमकं काय हवंय?’’ आशूने विचारलं.
‘‘गौरव घर असंच ठेवणार असेल तर मला जमेल तेव्हा वर गच्चीवर एक छोटा ब्लॉक माझ्या खर्चाने बांधून घेण्याची इच्छा आहे. त्याने एखाद्या बिल्डरसोबत स्कीम करायची ठरवली आणि किंमत चांगली आली, तर एक छोटा ब्लॉक माझ्यासाठी ठेवावा, वरचे पैसे लागणार असतील तर मी घालेन.’’ गायत्रीने थोडक्यात सांगितलं.
‘‘छान. मग हे बोलण्यात अवघड काय आहे?’’
‘‘काहीच नाही खरं, जमेल बोलायला. आपल्याच जागेत थोडे पैसे घालून माझ्या नावानं ब्लॉक होतोय हे सुखीला सांगणंही सोपं आहे मला.’’ गायत्रीला हलकंच वाटलं.
‘‘पण गौरव तुझ्या प्रस्तावाला ‘नाही’ म्हणाला तर?’’ आशूनं मुद्दाम विचारलं.
‘‘… तर मला वाईट वाटेल, पण तेवढ्यासाठी मी भांडून कोर्टात नक्कीच जाणार नाही. पण गौरवशी बोलले नाही तर ते मात्र मनात राहून जाईल. तो ‘हो’/ नाही’ काहीही म्हणाला तरी बोलणं झाल्यावर मला शांत वाटेल बहुतेक.’’
‘‘अचानक एवढा नीट, तर्कशुद्ध विचार कसा जमायला लागला तुला? मग मघाशी एवढी का गरगरत होतीस?’’ आशूनं तिला डिवचलं.
‘‘आईचं जाणं झेपत नाहीये. तिच्या वियोगाची भीती सुखीबद्दलच्या भीतीत मिसळली. एकटेपणा, पोरकेपणा… हळवी झाले होते. त्यात आत्याची बडबड, घराशी संबंध तुटेल अशी टोकाची भीती वाटली आणि तेव्हाच गौरवने लग्नाला केलेला विरोध आठवला. मी आणि सुखी दोघांनाही पैशांचा लोभ नाही हे कसं पटवू? अशुभाच्या भीतींबद्दल बोलणं तर वेडेपणाच. त्यामुळे अगतिक वाटलं, गुंता वाढतच गेला गं. तू दोन वाक्यांत सांग म्हणालीस ना, तेव्हा नेमक्या शब्दांत आल्यावर स्पष्ट झालं गं. ’’ गायत्री मनात एकेक धागा सोडवत होती.

हेही वाचा : सांधा बदलताना : चुकांचा स्वीकार

‘‘तुला कळतंय का? तुझ्याच मनातल्या भीतीमागे किती गृहीतकं होती… ‘घराची कागदपत्रं करून घेऊ’ याचा अर्थ गौरव तुला घरातून काढतोय, सुखीबद्दल त्याच्या मनात राग आहेच, आपल्याला लोभीच समजेल. काहीही. एक विसरू नकोस राणी, आत्ता गौरवच्याही मनावर ताण, शंका, भीती, एकटं, पोरकं वाटणं आणि दु:ख. तुझ्यासारख्याच भावनांचा गदारोळ आहे. त्यालाही तुझ्या आधाराची गरज आहे. मनात कलकलणारे शंभर प्रश्न घेऊन त्याच्याशी बोलायला गेलीस तर अस्पष्ट गोलगोल काहीतरी बोलणं, तक्रार, आरोप, चिडचिड, रडारड अगदी सहज होईल, म्हणजे तुमची आत्या जिंकेल.
त्याऐवजी, ‘आई-वडिलांची इतकी जबाबदारी घेणारा भाऊ, आपल्याशी बोलल्याशिवाय घराबद्दलचे निर्णय घेणार नाही, तुझ्यासमोर सुखीच्या निवडीबद्दल नापसंती दाखवली तरी त्याच्याशी कायम मैत्रीनेच वागला, माझ्या भावाशी मी मोकळेपणी बोलूच शकते अशी वस्तुनिष्ठ गृहीतकं मनात असतील, तर संवाद सहज होईल गायत्री, आणि भावंडांचं प्रेम जिंकेल.’’ आशूकडे बघून गायत्री प्रेमाने हसली आणि न बोलता तिचा हात धरून घराच्या दिशेने निघाली.
neelima.kirane1@gmail.com