भारतातील स्त्री चळवळीने १९७५ मध्ये पुन्हा उभारी घेतली असली तरी तिची पाळेमुळे शंभरापेक्षा जास्त वर्षांआधीच रुजायला सुरुवात झाली होती. परदेशात तर ‘फेमिनिझम’ची दुसरी, तिसरी, चौथी लाट स्त्रियांनी अनुभवली. त्यामध्ये अनेक जणींचा मोलाचा सहभाग होता. आपल्याकडे सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पं. रमाबाई, रमाबाई रानडे अशा अनेकींनी केलेले कार्य स्त्रीवादाला चालना देणारेच ठरले. १९७५ नंतरच्या स्त्री चळवळीतील स्त्रियांचे कार्य अभ्यासण्यापूर्वी या पूर्वसुरींचे आभार मानायलाच हवेत. आजचा लेख सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी…
वर्ण-जातिव्यवस्था आणि पितृसत्तेच्या पायावर अधिष्ठित असलेल्या भारतीय समाजामध्ये शेकडो वर्षं स्त्री-शूद्रातिशूद्रांना ज्ञानबंदी होती. विशेषत: स्त्रियांनी शिक्षण घेतल्यास अनर्थ घडेल, स्त्रियांना शिक्षण व स्वातंत्र्य असू नये, कारण स्त्री शिकली तर ती कुमार्गाला लागून कौटुंबिक सुखाचं वाटोळं करेल असा गैरसमज त्या काळात प्रचलित होता. महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या सहचारिणी सावित्रीबाईंनी या चुकीच्या समाजमान्य रूढींच्या विरोधात जाऊन, सार्वत्रिक शिक्षणाची चळवळ उभारली आणि ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली.
ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणं हे समाजविरोधी समजलं जात होतं, अशा काळात महात्मा फुले यांनी स्वत:चं कुटुंब, सगेसोयरे आणि समाजाचा रोष पत्करून सावित्रीबाईंना शिक्षित केलं. सावित्रीबाईंनी (जन्म ३ जानेवारी १८३१, मृत्यू १० मार्च, १८९७) जिद्दीनं शिक्षण पूर्ण करून, तत्कालीन समाजमान्य स्त्रीशिक्षणबंदीचे आदेश धुडकावून लावत व्यक्तिगत पातळीवर पहिली विद्रोही कृती केली. त्या केवळ तिथेच थांबल्या नाहीत तर, पुढील काळात त्यांनी स्वत: शिक्षणाच्या जनचळवळीचं नेतृत्व केलं. सर्व जातिधर्मातील मुली शिकल्या पाहिजेत, स्वावलंबी झाल्या पाहिजेत याकरिता त्यांनी अपार कष्ट घेतले. महात्मा फुले यांना जेव्हा मुलींच्या शाळेमध्ये शिकवण्याकरिता अध्यापक मिळत नव्हता अशा वेळी त्या स्वत: शिक्षिका म्हणून शाळेत उभ्या राहिल्या. सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं हे पहिलं पाऊल, म्हणजेच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होय. त्यांच्या या विद्रोही कृतीमुळे सनातनी धर्मव्यवस्था आणि बहुजन जाती यातील पुरुषप्रधानता यांनी संमत केलेल्या व स्त्रीवर लादलेल्या अन्यायकारक श्रमविभागणीच्या विरोधातही उचललेलं हे पहिलं महत्वाचं पाऊल होय.
भारतीय जातीपितृसत्ताक समाजानं स्त्रियांचं समाजातील दुय्यम स्थान, अवलंबित्व आणि पुरुषी नियंत्रण कायम राहावं याकरिता स्त्री-पुरुषांच्या कार्यक्षेत्राची ‘खासगी’ आणि ‘सार्वजनिक’ अशी ठळक विभागणी केली. ‘सार्वजनिक जग’ हे पुरुषांचं कार्यक्षेत्र, तर ‘खासगी जग’ हे स्त्रियांचं क्षेत्र. त्यामुळे स्त्रियांनी खासगी ठरवल्या गेलेल्या ‘घर’ नावाच्या चार भिंतींआडच कार्य करावं. जसं, अपत्य जन्माला घालणं, त्यांचं संगोपन, पती व वडीलधाऱ्यांची सेवा-शुश्रूषा. घरकाम करावं आणि त्यातच आपल्या जन्माचं सार्थक मानावं. सावित्रीबाई फुले घराचा उंबरठा ओलांडून जेव्हा पुण्याच्या वस्त्यांमधून आणि कर्मठ स्त्री-पुरुषांच्या घरांसमोरून मुलींना शाळेमध्ये शिकवण्यासाठी जात, तेव्हा या धर्मसंमत, जातिसंमत, पुरुषी कुटुंबसंमत असलेल्या खासगी आणि सार्वजनिक आधारावर संमत असलेल्या श्रमविभागणीचा भंग करीत जात. त्यामुळे सावित्रीबाईंची ही कृती म्हणजे भारतीय स्त्रीमुक्तीचा एल्गार मानायला हवा.
भारतीय इतिहासामध्ये स्त्री-शूद्रांच्या शिक्षणासंदर्भात सावित्रीबाईंनी केलेलं कार्य अनन्यसाधारण आहे. शिक्षणाचं कार्य करताना अनेकदा त्यांना प्रस्थापितांच्या मानसिक, शारीरिक छळाचा सामना करावा लागला. सनातन्यांच्या विरोधानं, त्रासानं आणि सावित्रीबाई तसूभरही आपल्या कार्यापासून ढळल्या नाहीत. पावलोपावलीची छळवणूक, बदनामी, शेण-दगड-धोंडे-चिखल-मातींचा मारा त्यांच्यावर होई. त्यामुळे शाळेत जाताना त्यांना आपल्याबरोबर दोन साड्या न्याव्या लागत. रस्त्यानं जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्यावर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही हे सर्व सहन करत स्त्री-शूद्रांच्या उद्धाराचं आणि अक्षरज्ञानाचं कार्य त्यांनी आयुष्यभर सुरू ठेवलं. सर्व स्त्री-पुरुषांनी शिक्षण घ्यावं यासाठी त्या आग्रही होत्या. त्यांनी मुलींच्या अध्यापनाबरोबरच समाजामध्ये शिक्षणाची जागृती व्हावी याकरिता लिखाणही केलं.
शिक्षणाच्या जागृतीबद्दल ‘काव्यफुले’ या काव्यसंग्रहात सावित्रीबाई म्हणतात, ‘‘ज्ञान नाही विद्या नाही। ते घेण्याची गोडी नाही। बुद्धी असुनी चालत नाही। तयास मानव म्हणावे का?’’ म्हणजे सावित्रीबाईंच्या मते, शिक्षण हेच आपलं अज्ञान नाहीसं करून अमानुष वर्तनाला हद्दपार करून आपल्याला एक माणूस बनवतं. अशा प्रकारे शिक्षणविषयक व्यापक दृष्टिकोन मांडणाऱ्या आणि मानवासाठी शिक्षण हा मूलभूत विचार आहे, हे त्यांच्या कृती आणि लेखणीतून प्रत्ययास येतं.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे शिक्षणाला समाजपरिवर्तनाचं साधन मानत होते. शिक्षणाचा अर्थ केवळ अक्षरओळख नाही तर विचार करायला लावणारा, माणसाच्या मनात विवेक उत्पन्न करणारा विद्याभ्यास असा आहे. शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे; स्त्रिया ज्ञानी, स्वतंत्र आणि चिकित्सक बनाव्यात अशा आशयाच्या शिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. ज्यामुळे तत्कालीन प्रस्थापित जातपुरुषसत्तेला आव्हान देणारं, प्रतिप्रश्न करणारं लिखाण सावित्रीबाईंची विद्यार्थिनी मुक्ता साळवे करू शकल्या. फुले दाम्पत्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यापासून प्रेरणा घेत ताराबाई शिंदे यांनी मुक्तीदायी ज्ञानाचं राजकारण पुढे आणलं. त्यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ (१८८२) या निबंधामध्ये स्त्रिया व पुरुष यांत साहसी कोण? हे स्पष्ट करून दाखवताना केवळ स्त्रियांची बाजू घेऊन पुरुषांच्या विरोधात लेखन केलं नाही तर, स्त्रियांना ‘बाई’ म्हणून आपलं आयुष्य जगताना, एक ‘व्यक्ती’ म्हणून कसं नाकारलं गेलं याचंही चिंतन केलं आहे. धर्म, जाती आणि पुरुषसत्तेने स्त्रियांवर केलेल्या अमानुष अन्याय-अत्याचाराच्या विरोधात भूमिका घेत त्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी पुरुषसत्तेने कशा प्रकारे स्त्रियांना शिक्षणाचा, ज्ञानाचा अधिकार नाकारून धार्मिक कर्मकांड आणि परंपरांच्या जाळ्यात अडकवलं हे स्पष्ट केलं आहे. तसेच, आधी उल्लेख केल्याप्रमाणे सावित्रीबाईंची विद्यार्थिनी असलेल्या मुक्ता साळवे या दलित (मातंग) मुलीने १८५५ मध्ये ‘ज्ञानोदय’मध्ये ‘मांग-महाराच्या दु:खाविषयी निबंध’ लिहिला. ज्यामध्ये तिने जातिव्यवस्थेच्या अगदी खालच्या पायरीवर असलेल्या समाजाच्या दु:ख, दैन्य आणि मानहानीची कैफियत मांडली. तिने या छोटेखानी निबंधात मांग-महारांचं दु:ख, त्यांच्या दु:खाची कारणं आणि त्याला जबाबदार असलेल्या सनातनी, सामाजिक विषमतेवर सडकून टीका केली. यावरून मुक्तासारख्या दलित, प्रज्ञावंत विद्यार्थिनीला घडवणाऱ्या सावित्रीबाई या खऱ्या अर्थानं एक समाजशिक्षिका होत्या याचा प्रत्यय येतो.
सावित्रीबाईंनी स्वत:ला केवळ शिक्षणकार्यासाठीच वाहून घेतलं नाही तर, त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. सामाजिक जीवनातील आणि सार्वजनिक चळवळीतील सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत त्यांनी नवीन वहिवाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या केवळ महात्मा फुले यांच्या अर्धांगिनीच नव्हत्या, तर स्वयंप्रज्ञ विचाराच्या आणि कृतीच्या धनी होत्या. त्यांनी स्वत: स्त्री-शूद्रांच्या शिक्षणाबरोबरच तत्कालीन हिंदू उच्च जातींमधील प्रथा, परंपरांमुळे स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात जागृतीचं कार्य केलं. त्या काळी ब्राह्मण सवर्ण जातींमध्ये विधवांचं स्थान अत्यंत दयनीय होतं. पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या स्त्रीला दुसऱ्यांदा विवाह करण्यास बंदी होती. मुलींचे विवाह बालवयात होत असत आणि ‘जरठ-कुमारी विवाहा’ची प्रथा मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. त्यामुळे बालवयात विधवा होणाऱ्या मुलींना तिची कोणतीही चूक नसताना आयुष्यभर वैधव्याच्या मरणयातना सोसाव्या लागत असत. तसेच अनेकदा अशा विधवांवर घरातल्या आणि काही प्रसंगांमध्ये बाहेरच्या पुरुषांकडून लैंगिक अत्याचार होत होते. असा प्रसंग ओढवल्यावर स्त्रियांना अब्रुरक्षणाकरिता नाइलाजास्तव गर्भपात करून बालहत्या कराव्या लागत. अशा अवनत परिस्थितीत अडकलेल्या स्त्रियांना आधार देण्याकरिता त्यांनी विधवा आश्रम सुरू केले. त्याचबरोबर स्वत:च्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. पुणे शहरामध्ये भित्तिपत्रक लावून- ‘विधवांनो येथे येऊन गुप्तपणे व सुरक्षितपणे बाळंत व्हा.’ असा प्रचार करण्यासाठी त्यांनी महात्मा फुले यांना साथ दिली. इतकंच नाही तर, अशा अनेक फसवल्या गेलेल्या स्त्रियांची बाळंतपणे पोटच्या मुलींप्रमाणे स्वत: सावित्रीबाईंनी केली.
१८७४ मध्ये अशाच काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी त्याचा सांभाळ केला. त्याला वैद्याकीय शिक्षण देऊन डॉक्टर बनवलं. पुढे याच दत्तक घेतलेल्या मुलाचा (डॉ. यशवंत) मिश्र व सत्यशोधक पद्धतीनं विवाह लावून ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीला सार्थ ठरवत कर्मठ, सनातनी विचारांना जोरदार धक्के दिले.
तसेच, केशवपनासारख्या स्त्रीशोषण व गुलामगिरीच्या बेड्या घट्ट करणाऱ्या रूढींना सावित्रीबाईंच्या प्रयत्नामुळे सुरुंग लागला. विधवा केशवपनाच्या अघोरी प्रथेच्या विरोधात पुणे येथे नाभिकांचा संप घडवून आणला. या संपाचे नेतृत्व कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलं. त्यामागची प्रेरणा सावित्रीबाईच होत्या. या आगळ्यावेगळ्या संपाचं कौतुक जगभरात झालं. परदेशात विशेषत: इंग्लंडमधील स्त्रीवादी चळवळीकडून याची दखल घेतली गेली.
सावित्रीबाईंनी आपल्या संपूर्ण आयुष्यात स्त्रीमुक्ती व शूद्रातिशूद्रांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याची अशी एक ना अनेक उदाहरणं देता येतील. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये महात्मा फुले यांच्या बरोबरीनं योगदान दिलं. इतकंच नाही तर, महात्मा फुले यांच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाच्या तत्त्वप्रसाराचं कार्य अविश्रांत केलं. पदोपदी प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करत स्त्रीमुक्ती आणि समाजउद्धाराच्या कार्यात आलेल्या प्रत्येक संकटाचा धैर्यानं सामना करत सामाजिक क्रांतीचं कार्य न डगमगता आयुष्यभर पेललं. सावित्रीबाईंनी जीवनाचा क्षणन् क्षण समाजासाठी झिजवला.
आयुष्यभर सावित्रीबाई ज्या समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीकरिता प्रयत्न करत राहिल्या, तोच विचार भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीचा आत्मा राहिला आहे. म्हणूनच सावित्रीबाईंचा समाजक्रांतीचा विचार आणि त्यांचा आदर्श भारतीय स्त्री चळवळीसाठी मुहूर्तमेढ ठरला, याबद्दल नक्कीच कुणाचं दुमत असणार नाही.
(लेखक पुणे येथील ‘सावित्रीबाई फुले विद्यापीठात’ ‘स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभागा’त साहाय्यक प्राध्यापक आहेत.) lbhaware@gmail.com