जगभरात कामाच्या ठिकाणी वाढणारा तणाव, हा आजच्या अत्यंत कार्यक्षम वयातल्या पिढीला खिळखिळा करून टाकणारा आजार झाला आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नुसार तो कोणत्या विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर सर्वच क्षेत्रांतले नोकरदार हा तणाव अनुभवत आहेत. म्हणूनच यंदाच्या ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’ची थीम ‘कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य’ ही आहे. आजच्या पिढीने स्वत:ला मानसिक अनारोग्यापासून वाचवायचे असेल तर, ऐकावे मनाचे आणि करावेही मनाचे…

काही दिवसांपूर्वी, एका नामवंत अकाउंटिंग कंपनीतल्या चोवीस वर्षीय तरुणीचा ऑफिसमधील कामाच्या तणावामुळे मृत्यू झाला आणि मानसिक आरोग्याचा विषय पुन्हा चर्चेत आला. जशी चर्चा व्यापक होत गेली, तसे कामाच्या तणावामुळे आयुष्य गमावलेल्यांच्या आणखी काही घटना समोर येत गेल्या. काही लोकांना काम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता, तर काहींनी कामाच्या ठिकाणी असलेल्या तणावाला वैतागून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला होता. घडलेली प्रत्येक घटना एक प्रश्न ठळकपणे विचारत होती, ‘‘आज-काल नोकरी देताना कंपन्यांकडून जीव पणाला लावण्याचीही अट घातली जाते का?’’

आज नोकरी वा कामाच्या ठिकाणी अनुभवाव्या लागणाऱ्या तणावाची ही समस्या इतकी मोठी आहे की, त्याची दखल घेण्यास ‘जागतिक आरोग्य संघटनेला’भाग पडले आहे. दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची थीम ‘मेंटल हेल्थ अॅट वर्क’ अर्थात ‘कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य’ही आहे. ‘नोकरीवर जावे, आपले काम पूर्ण करावे आणि परत यावे.’, असे सूत्र सांभाळले की झाले. असा स्वाभाविक विचार मनात येऊ शकतो. पण सध्याच्या वेगवान आणि कमालीच्या स्पर्धात्मक जगात ‘नोकरी’ आणि तेथील ‘वातावरण’ हा विषय गुंतागुंतीचा झाला आहे. नोकरी करत असताना मानसिक आरोग्य कोणकोणत्या कारणांनी बिघडते? हे सांगताना ‘जागतिक आरोग्य संघटना’ काही बाबी स्पष्टपणे अधोरेखित करते. जसे की, कौशल्यांचा कमी वापर होणे किंवा कामासाठी कुशलता कमी पडणे, जास्त कामाचा ताण किंवा कामाचा वेग आणि त्या तुलनेत कर्मचाऱ्यांची कमी संख्या, अनेक तास सलग काम, कामाच्या ठिकाणी छळ किंवा गुंडगिरी, भेदभाव, नोकरीची असुरक्षितता, घरच्या जबाबदाऱ्या आणि काम यामध्ये ओढाताण. त्याचबरोबर ‘जागतिक आरोग्य संघटने’ने हेही स्पष्ट केले आहे की, हा तणाव विशिष्ट क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. तर आज सर्वच क्षेत्रातले नोकरदार हा तणाव अनुभवत आहेत. ‘वेळ’, ‘काळ’ याचे बंधन नसलेल्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांचा तणाव तर कल्पनेच्याही पलीकडचा आहे.

हेही वाचा : माझी मैत्रीण : ‘आम्ही मैत्रीवर प्रेम करतो’

स्वत:च्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बहुतेकांना नोकरी करण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा नोकरीच्या अनुषंगाने येणारा तणाव हाताळण्यासाठी, तणावाची पातळी कमी करण्यासाठी काही परिणामकारक उपायही निश्चित आहेत. रोज किमान दहा मिनिटे तरी ‘माइंडफूलनेस मेडिटेशन’, नियमित व्यायाम, भरपूर झोप, चहा-कॉफीचे तसेच साखरेचे मर्यादित सेवन, मित्रमैत्रिणींबरोबर, कुटुंबाबरोबर संवाद, तणावाच्या क्षणी दीर्घ श्वसन, वेळेचे नेमके व्यवस्थापन अशा गोष्टींनी तणाव बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकतो, हे खरे तर आपणअनेकदा ऐकले-वाचलेले असते मात्र ते करण्यामधले सातत्य न टिकल्यानेच परिस्थिती गंभीर होत जाते.

विकसित देशात ‘मानसिक तणाव’ आणि त्याच्या ‘नियंत्रणा’बद्दल बऱ्याच प्रमाणात जागरूकता आहे, मात्र आपण भारतीय लोक या विषयात कमालीचे पिछाडीवर आहोत. ‘आपल्या मनाचेही आरोग्य असते आणि आपल्यालाच ते प्रयत्नपूर्वक जपावे लागते.’ ही गोष्ट आपल्याकडे किती जणांच्या गावी असते? ‘आरोग्यम धनसंपदा’ असं म्हणल्यावर त्यात ‘शरीर’ आणि ‘मन’ या दोघांचा विचार केला जातो का? निरोगी ‘शरीर’ कमावण्याबरोबरच ‘मन’ कणखर करण्याचा प्रयत्न किती जण करतात? आजारी माणसाचे औषध व्यक्तीनुरूप बदलते. मग तेच सूत्र वापरून मनाला ‘बरं’ करण्यासाठीही व्यक्तीनुरूप प्रयत्न करावे लागतात, याचे का विस्मरण होते?

मनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सुरुवात नेमकी कुठून होते, याचा एक बोलका प्रसंग इथे नमूद करावासा वाटतो. एक शिक्षिका निवृत्तीनंतर आपल्याच एका विद्यार्थ्याच्या घराशेजारी राहायला आल्या. विद्यार्थी एका नामांकित कंपनीत नोकरीला होता. घराशेजारी राहायला येऊन दोन महिने झाले, तरीही शिक्षिकेला मनसोक्त गप्पा मारण्यासाठी एकदाही हा विद्यार्थी भेटला नव्हता. शनिवार-रविवारीही त्याचं ऑफिसचं काम सुरूच असायचं. शिक्षिकेनं त्याची ती धावपळ बघितली. त्यात धावपळीमुळे होणारी त्याची चिडचिड त्याच्या घरातल्यांकडून ऐकली आणि एक दिवस शिक्षिका त्या विद्यार्थ्याला म्हणाली,‘‘अरे, तू गप्पा मारण्यासाठी भेटला नाहीस तरी चालेल. पण निदान स्वत:साठी तरी वेळ काढ.’’ ‘‘त्यानं काय होईल?’’ विद्यार्थ्याने मख्खपणे विचारलं.

हेही वाचा : जिंकावे नि जगावेही: विचारांची सदाबहार फुलबाग

‘‘तुला ब्रेक मिळेल. तू शाळेत असताना किती छान चित्रे काढायचास ते आठवतंय ना? आता काढून बघ… वेगळाच आनंद मिळेल.’’ ते ऐकल्यावर विद्यार्थ्याने आपल्या कपाटातून एक फोल्डर काढलं आणि त्यातून एक प्रगतिपुस्तक काढून शिक्षिकेच्या हातात देत तो म्हणाला,‘‘ज्यावर्षी मी एलिमेंटरीची परीक्षा पास झालो, त्यावर्षीचं हे प्रगतिपुस्तक. त्यात आपणच शेरा लिहिला आहे. ‘‘चित्रकलेत प्राविण्य मिळवले हे चांगले आहे. पण तो काही मुख्य विषय नाही. त्यापेक्षा गणितावर लक्ष देणे आवश्यक.’’ ‘‘ज्या गोष्टी केल्यामुळे मला आनंद मिळायचा त्या कोणत्याही गोष्टींना कधीच मार्क नसायचे. असायची ती फक्त श्रेणी आणि तीही नावापुरती. तेव्हापासून माझी चित्रकला बंद झाली. काय केल्याने मला आनंद मिळतो? समाधान मिळते? यापेक्षा काय केल्याने जास्त मार्क मिळाल्याचा शिक्का बसतो? याकडेच पूर्ण लक्ष दिले गेले. चित्र काढणं ही माझी स्वत:ची तेव्हाही गरज होती. पण मार्क मिळवण्याच्या शर्यतीत उतरल्यामुळे माझा कोणताच छंद शिल्लक राहिलेला नाही.’’ विद्यार्थ्याचे ते बोलणं ऐकून शिक्षिका निरुत्तर झाली कारण हे आजच्या शाळेचं वास्तव आहे.

मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची बहुतेकांची गोष्ट थोड्या-फार फरकाने अशीच असते. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आत्महत्या, नैराश्य, तणावामुळे तब्येतीच्या तक्रारी यासारख्या गोष्टी एक-दोन प्रसंगांतून आकार घेत नाहीत. त्याची मुळं खूप खोलवर रुजलेली असतात. अशा वेळी स्वत:कडे, स्वत:च्या समस्यांकडे भावनिक न होता त्रयस्थपणे पाहता येणं अतिशय गरजेचं असतं, मात्र प्रत्यक्षात तसं होत नाही. उलट ‘स्ट्रेस’ कमी करण्याच्या नावाखाली ज्या काही गोष्टी केल्या जातात. त्या ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ ठरतात. धूम्रपान, मद्यापान अगदी सर्रास केले जाते. काहीही गरज नसताना विकेंडला मॉलमध्ये जाऊन भरमसाट खरेदी केली जाते.‘स्ट्रेस’ कमी करतानाही ‘स्टेट्स’ सांभाळण्याच्या नावाखाली पब-डिस्कोच्याही फेऱ्या मारल्या जातात. महागड्या हॉटेलमध्ये जेवणं नेहमीचं होऊन जातं. हे कमी म्हणून इतरांशी तुलना करून त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. सोशल मीडियावर प्रतिमा सांभाळण्याची धडपड तर निराळीच. हे सगळं करताना ‘आपण कमावलेल्या पैशाचा उपयोग आपल्यालाच व्हायला हवा ना?’ या प्रश्नाचं लेबलही लावलं जातं. पण हे सगळं करून जे काही मिळतं ते त्या क्षणापुरतं टिकतं. तेवढ्या वेळापुरता तणाव दूर झाला असं वाटतं, मात्र तणावामागचं मूळ कारण तसंच राहतं. हळूहळू नैराश्य मनाचा ताबा घ्यायला सुरुवात करतं आणि मानसिक आरोग्य बिघडतं.

‘मानसिक आरोग्य बिघडलं’ म्हणजे त्या व्यक्तीला वेड लागलं, अशी एक खुळचट कल्पना आपल्याकडे अनेकांची असते. त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी अवघड होत जातो. एखाद्याने ‘मी काऊन्सिलिंग घेतले’ किंवा ‘मानसोपचारतज्ज्ञाला भेटलो’, असं सांगितलं तर त्याच्याकडे विचित्र दृष्टीनं आजही बघितलं जातं. याच कारणामुळे कंपन्यांच्या वतीने जेव्हा अशा प्रकारचे समुपदेशन आयोजित केले जाते किंवा मानसोपचारतज्ज्ञाला नियुक्त केले जाते. तेव्हा कर्मचारी त्याला जास्त प्रतिसाद देत नाहीत, असा अनुभव आहे. खरं तर शाळेप्रमाणे प्रत्येक कार्यालयात समुपदेशन सक्तीचे असणे गरजेचे झाले आहे. त्या कर्मचाऱ्याची मन:स्थिती चांगली असेल तरच तो काम मन लावून पूर्ण करेल ना. मानसोपचाराच्या चुकीच्या कल्पना हे कमी प्रतिसाद देण्याचे कारण आहेच. पण त्याचबरोबर तज्ज्ञाने आपल्या मानसिक स्थितीबाबत दिलेल्या अभिप्रायामुळे आपली नोकरी तर जाणार नाही ना? ही भीतीदेखील असते. मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असल्या तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आपणच आपल्या मनाचे संकेत न ऐकणं. यंत्र बिघडण्याच्या मार्गावर असते, तेव्हा कधी आवाजाच्या रूपात तर कधी धुराच्या रूपात आपलं बिघडणं सांगण्याचा प्रयत्न करत असते. मनाचंही तसंच आहे. मानसिक आरोग्य बिघडत आहे याचे संकेत मन देत असतं. व्यक्तीनुसार त्या संकेताचा प्रकार बदलतो. काही लोकांचे वजन फार झपाट्याने जास्त वाढते किंवा कमी होते, काहींना शरीरातील ऊर्जा कमी झाल्याची जाणीव होते, काहींना कधी नसलेली दुखणी सुरू होतात, तर काहींना आपला आवडत्या गोष्टींमधला रस कमी झाल्याचे लक्षात येते. असे संकेत ओळखणं आणि आवश्यक ती हालचाल करणं गरजेचं असतं. पण नेमकं काय करायचं? अवघड परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं? याबद्दल प्रश्न निश्चित पडू शकतात. अशावेळी मानसोपचाराचा सल्ला घेणे निर्णायक ठरते. आपल्या मानसिक आरोग्यातले बिघडलेले कच्चे दुवे जितक्या लवकर आपल्या लक्षात येतील तितक्या गोष्टी लवकर नियंत्रणात येतील. मनाचं न ऐकता मन फक्त मारत राहिलं की दुखणं वाढतं, इतका साधा हिशोब आहे. तेव्हा ‘ऐकावे मनाचे…करावे मनाचे’ हे त्यासाठीच!

हेही वाचा : स्त्री-शोषणाचा जातपंचायतीचा विळखा

नोकरी करणं, करिअर घडवणं, आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणं, आपण स्वत: स्वत:साठी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करणं या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण हे मिळवण्याच्या प्रवासात आपल्याला ‘स्वत्व’ हरवून चालणार नाही. तेव्हा स्वत:साठी, आपल्यावर ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यासाठी स्वत:चं मानसिक आरोग्य जपणं गरजेचं आहे. या जगात जसा कोणताही माणूस परिपूर्ण नाही तसंच कोणतेही कामाचे ठिकाण, कंपनी, कंपनीतील यंत्रणा परिपूर्ण नाही. तेव्हा ‘तडजोड’ हा आयुष्याचा भाग आहे. मात्र ती तडजोड करताना मानसिक आरोग्याचा ताळेबंद चुकत तर नाही ना, यावर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे. प्रसंगी काही गोष्टी सोडाव्या लागल्या, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागली तरी त्यासाठी तयार राहणं आवश्यक आहे.

आजच्या अस्थिर जगाशी, त्याच्या वेगाशी जुळवून घेताना शरीराच्या किंवा मनाच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड हा कोणत्याही परिस्थितीत उपाय असू शकत नाही. तेव्हा इतरांशी त्यांच्या सोशल मीडियावरच्या प्रतिमेशी तुलना न करता स्वत:ला नीट ओळखणे, मनाचे संकेत समजून घेणे आणि मनाप्रमाणे गोष्टी करण्याचा प्रयत्न करत राहणे हे सर्वोत्तम.
yogeshshejwalkar@gmail.com