या वर्षीच्या ऑलिम्पिक सामान्यांमध्ये अल्जेरियाची इमाने खेलिफ आणि इटलीची अँजेला कारिनी यांच्यातील सामन्यामुळे क्रीडा क्षेत्रातील लिंगभावाचा प्रश्न पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपात चर्चिला गेला. पारंपरिकरीत्या जे ‘पुरुषी’ मानलं जातं ते स्त्रीमध्ये नसावं, असा अट्टहास क्रीडाक्षेत्रातही दिसतो. तिच्याकडे जास्त ताकद वा वेग असेल तर तिच्याकडे संशयाने पाहिलं जातं म्हणूनच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या गुणसूत्रांची चाचणी करणं १९८०च्या सुमारास सुरू झालं आणि आता टेस्टोस्टेरॉनची मात्रा लक्षात घेतली जाऊ लागली आहे. अशा ‘वेगळ्या’ असलेल्या तरीही मुख्य प्रवाही गटांमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींकडे आपण कसं पाहणार आहोत?
या वर्षीचे ऑलिम्पिक सामने वेगवेगळ्या कारणांसाठी गाजले. विशेषत: अल्जेरियाची इमाने खेलिफ आणि इटलीची अँजेला कारिनी यांच्यातील सामन्यामुळे बरंच वादळ उठलं. इमानने अतिशय जोरात लगावलेल्या ठोश्यांनंतर अँजेला कारिनीने ४६ सेकंदांत सामन्यातून माघार घेतली. एखादी स्त्री खेळाडू इतक्या ताकदीने खेळू शकते, यावर कोणाचा विश्वास बसेना. आणि मग तिथून वर्षानुवर्षे चालत आलेला क्रीडाक्षेत्रातील लिंगभावाचा प्रश्न पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपात चर्चिला जाऊ लागला. इमाने ही जन्माने स्त्री आहे की पारलिंगी आहे यावरून वादविवाद झडले.
इंटरनेटवर कशाचीही शहानिशा न करता उलटसुलट प्रतिक्रिया देणाऱ्यांची जणू स्पर्धाच लागली. एक मात्र निश्चित झालं. या प्रकरणामुळे संपूर्ण जगातला ‘ट्रान्सफोबिया’ (पारलिंगी व्यक्तींबद्दल असलेली नकारात्मकता, भीती) आणि स्त्रीवादी-लिंगभाव समावेशक दृष्टिकोनांबद्दलचा आकस उफाळून आलेला दिसला. त्याचसोबत स्त्री खेळाडूंकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोन अजूनही कसा प्रचलित आहे, याची साक्षही मिळाली. आधी म्हटल्याप्रमाणे लिंगभावविषयक चर्चा आणि विवाद हे क्रीडाक्षेत्राला नवीन नाहीत. विशेषकरून एखादी स्त्री अथवा पारलिंगी व्यक्ती जेव्हा मैदानात उतरते, तेव्हा तिच्याकडून काही विशिष्ट अपेक्षा ठेवल्या जातात. या अपेक्षा ‘तिने कुठले कपडे घालावेत’ इथपासून ‘तिची खेळाडू म्हणून ताकद किती असावी आणि तिने ती कशी प्रदर्शित करावी’ इथपर्यंत असू शकतात. प्रत्येक क्षेत्रात आज स्त्री-पुरुष समानता आलेली आहे, असं म्हणताना हे विसरून चालणार नाही, की अजूनही स्त्रियांना आणि विशेषत: समलिंगी आणि पारलिंगी स्त्री-पुरुषांना समान अवकाश मिळवण्यासाठी बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. तुमचं ‘जेंडर’ (Gender) काय आहे आणि ते तुम्हाला जन्मत: मिळालेल्या लिंगाशी मिळतंजुळतं आहे का? म्हणजेच त्या त्या जेंडरसाठी ठरवलेली सामाजिक नियमावली तुम्ही पाळताय का? तुमचं वर्तन त्यानुसार आहे का? या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जर स्त्री असाल तर पारंपरिकरीत्या स्त्रीचे जे गुण मानले जातात. (जसं शालीनता, काळजी घेण्याची वृत्ती, हळवेपणा, मातृत्वाची आस) ते तुमच्यात नसतील किंवा तुम्ही ते तसे प्रदर्शित (परफॉर्म) करू शकत नसाल, तर ती एक मोठीच समस्या मानली जाते. हे कुठल्याही क्षेत्रात घडू शकतं, पण विशेषत: क्रीडा क्षेत्रात अधिक प्रकर्षाने जाणवतं. वर उल्लेख केलेल्या सामन्यात असंच काहीसं घडलं. एखादी स्त्री इतका जोर लावून खेळू शकते, यावर कोणाचा विश्वास बसत नाही. त्यामुळे तिचं स्त्रीत्वच पणाला लावलं गेलं. फारसे काही पुरावे नसतानाही ती पारलिंगी व्यक्ती आहे, स्त्री नसून पुरुष आहे, अशा गृहीतकावर बातम्या छापल्या गेल्या. पारलिंगी व्यक्तींसाठी स्पर्धांमध्ये वेगळी तरतूद केली जावी, अशी मागणीही पुन्हा जोर धरत आहे. थोडक्यात, तुमचं स्त्रीत्व सिद्ध करायचं असेल, तर तुम्ही सुंदर, नाजूक, लहानखुरं असणं अधिक समाजमान्य आहे. तुमच्या विशिष्ट शरीररचनेमुळे तुम्ही तशा नसाल, तर ती एक अडचण ठरू शकते.
खेळाडू स्त्रियांवर असं ‘स्त्री’ म्हणून दिसण्याचं-वागण्याचं दडपण असतं का? याचं उत्तर होकारार्थी द्यावं लागेल. काही वर्षांपूर्वी अमेरिकी गिर्यारोहक बेथ रोडेन हिनं एका मुलाखतीत म्हटलं की, फोटोशूट करताना तिला तिच्या ‘सिक्स पॅक’ शरीरामुळं थोडं आक्रसायला होतं. जेसिका एनीस-हिल या ऑलिम्पिक खेळाडूला काही वर्षांपूर्वी ‘जाडं’ म्हणून हिणवण्यात आलं. २०१४ वर्षीच्या प्रकाशित झालेल्या ‘बी.टी. स्पोर्ट्स सर्व्हे’मध्ये ११० ब्रिटिश स्त्री खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यातल्या ८० टक्के स्त्रियांनी त्यांच्यावर विशिष्ट शरीरयष्टी राखण्याचा मानसिक ताण असतो, हे नमूद केलं. २०१७मध्ये स्वीडनमध्ये झालेल्या एका अभ्यासात स्त्री खेळाडूंना दणकट तरीही नाजूक, खेळाला अनुरूप तरीही ‘फॅशनेबल’ राहण्याचं दडपण असतं, असं म्हटलं गेलं. २०२२मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, बरेच कोच स्त्रियांना त्यांच्या शरीरावरून टोमणे मारत असतात, हे उघड झालं. अनेक फुटबॉल खेळणाऱ्या मुलींमध्ये वजन वाढण्याच्या भीतीने ‘कार्बोहायड्रेट फिअर’ (कर्बोदकांची भीती) निर्माण झालेला आहे, असंही अनेक अभ्यास वा त्यांचे अभ्यासक सांगतात. एकूणच, पाश्चिमात्त्य जगात पारंपरिकरित्या जे ‘पुरुषी’ मानलं जातं ते स्त्रीमध्ये नसावं, असा अट्टहास क्रीडाक्षेत्रातही दिसतो. यात हे विसरलं जातं की, माणसाचं शरीर हे भौगोलिक व सामाजिक परिस्थिती आणि संस्कृतींनुसार वेगळं असतं. सुदृढ असण्याचे आणि शरीराच्या ठेवणीचे एकच एक निकष सगळीकडे लागू होत नाहीत आणि स्त्रीत्व आणि पुरुषत्वाची व्याख्याही त्यामुळेच प्रदेशानुसार निरनिराळी असते. परंतु हा दृष्टिकोन पुरेसा विकसित न झाल्यामुळे अनेक स्त्री खेळाडू विनाकारण भरडल्या जातात. त्याचा परिणाम असा की, अनेक स्त्री खेळाडू त्यांच्या ‘आक्रमकतेचा’ आणि ‘स्त्रीत्वा’चा समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. या बाबतीत जगप्रसिद्ध टेनिसपटू सेरेना आणि व्हीनस विल्यम्स, फुटबॉलपटू मिया हॅम, मार्शल आर्ट खेळणाऱ्या गिना कारानो वगैरेंचं उदाहरण दिलं जातं. आताच्या ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदकं आणि एक रौप्यपदक मिळवलेल्या अमेरिकी जिम्नॅस्ट सिमॉन बाइल्स हिलाही ती ‘पुरुषी’ असल्याच्या आरोपांना सामोरं जावं लागलं होतं. नैसर्गिक आक्रमकता आणि स्त्रीत्व यांचा असा समतोल राखण्याचं दडपण मोठं असतं आणि त्यासहित आपल्या खेळातही सातत्य राखण्याची तारेवरची कसरत करावी लागते. ही कसरत आणखी कठीण होते, ती पारंपरिकरीत्या ‘पुरुषी’ समजल्या जाणाऱ्या खेळांमध्ये जसं की बॉक्सिंग. पुरुष बॉक्सर्सनी आक्रमकता दाखवणं फारसं अडचणीचं ठरत नाही. परंतु तेच बळ स्त्रीनं दाखवल्यावर वादंग उठतात. पारंपरिकरीत्या ‘बायकी’ समजले जाणारे खेळ खेळताना पुरुष खेळाडूंनाही अशाच प्रकारच्या अडचणी येतात. परंतु स्त्री खेळाडूंबाबतचे वाद जसे घृणास्पदरीत्या रंगतात, त्या पातळीवर पुरुषांबाबतीतल्या चर्चा केल्या जात नाहीत
हेही तितकंच खरं.
अंगमेहनतीच्या खेळात वर्षानुवर्षं केवळ ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ या दोन लिंगभावी ओळखी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. लिंगभावाबाबतीतलं चर्चाविश्व बरंच पुढे गेलं असूनही त्यात भरीव सुधारणा होताना दिसत नाहीत. ऑलिम्पिक खेळांबाबत असं म्हटलं जातं की, १९२८मध्ये प्रथमच ‘पुरुषी’ बळाने आणि वेगाने खेळणाऱ्या स्त्रियांकडे संशयाने बघितलं गेलं. त्या स्त्रीशरीरातल्या पुरुष तर नाहीत ना, अशी शंका उपस्थित केली गेली. १९४८ यावर्षी ‘वर्ल्ड अॅथलेटिक संस्थे’ने स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्त्री खेळाडूंना त्या स्त्री असल्याचं प्रमाणपत्र द्यायचं बंधनकारक केलं. १९६०च्या सुमारास अशाही घटना घडल्या जिथे स्त्रियांची शारीरिक तपासणी करून त्या स्त्रीच आहेत ना, हे तपासलं गेलं. त्यात स्त्रीरोगतज्ज्ञांची मदत घेतली जाऊ लागली. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या गुणसूत्रांची (क्रोमोझोम्स)ची चाचणी करणं हे १९८०च्या सुमारास सुरू झालं. याला कारणीभूत ठरली ती स्पॅनिश खेळाडू मारिया मार्टिनेझ-पॅटिनो. तिच्याविषयी शंका घेऊन तिला क्रोमोझोम चाचणी घेण्यास भाग पाडलं गेलं. त्यातून असं तात्पर्य काढण्यात आलं की, सामान्य स्त्रीहून तिची शरीररचना निराळी आहे आणि त्यामुळे या पुरुषी बळाचा ती गैरफायदा घेऊ पाहते आहे. तिला स्पर्धेतून काढून टाकल्यानंतर तिने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. १९८८मध्ये या खटल्याचा निकाल लागून मारिया जिंकली. परंतु तोपर्यंत तिचं स्त्रीत्व, स्वातंत्र्य आणि खासगीपणाचा अधिकार हे सगळंच दावणीला लागलं होतं. काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकी धावपटू कॅस्टर सेमेनिया हिच्या बाबतीतही अशाच शंका उपस्थित केल्या गेल्या आणि तिला ऑलिम्पिकमधून हद्दपार केलं गेलं. यासाठी तिने भरलेल्या खटल्यांचा निकाल २०१९ आणि २०२०मध्ये तिच्या विरोधात लागला. तरीही तिने जिद्द सोडली नाही. अखेरीस २०२३मध्ये युरोपीय मानवी अधिकारांच्या न्यायालयात तिच्या बाजूने निर्णय दिला गेला. तिच्यात नैसर्गिकरीत्या अधिक प्रमाणात असलेल्या ‘टेस्टेस्टेरॉन’ला अखेरीस अधिमान्यता मिळाली. तिच्या बाबतीत झालेल्या अन्यायाला तिने कृष्णवर्णीय असणंही कारणीभूत आहे, अशा चर्चा झाल्या. एकूणच या सगळ्या वादाला ठळक वंशवादाचीही किनार असते हे विसरून चालणार नाही. आपल्या, भारतीय द्याुती चांदलाही अशाच आरोपांचा सामना करावा लागला. कॉमनवेल्थ खेळांमधून तिला काढण्यात आलं. परंतु तिनेही याविरोधात खटला भरून विजय मिळवला. अखेरीस एकूणच धोरणात बदल होऊन शरीरात ‘टेस्टेस्टेरॉन’ची मात्रा जास्त असणाऱ्या स्त्रियांनाही स्त्रियांच्याच गटात खेळण्याची परवानगी मिळाली.
मायकल वॉटर्स या पत्रकाराने ‘द अदर ऑलिम्पियन्स: फॅसिझम, क्वीअरनेस अँड द मेकिंग ऑफ मॉडर्न स्पोर्ट्स’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी एका अशा झेक खेळाडूची कथा सांगितली आहे, जिने १९३४मधल्या ऑलिम्पिकमध्ये लांब उडीच्या स्पर्धेत स्त्रियांच्या गटांतून तीन पदकं मिळवली. परंतु त्याच्या पुढच्याच वर्षी तिने आपण पुरुष असल्याचं जाहीर केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, समाजात तिच्या या निर्णयाचं स्वागतच झालं. स्त्री म्हणून तिने मिळवलेल्या पदकांवर कोणीही आक्षेप घेतले नाहीत. १९३०च्या दरम्यान समाजात लिंगभावाप्रती असलेला मोकळेपणा हळूहळू नष्ट होऊ लागला तो नाझींच्या काळात. त्यांच्या काळात झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांवर त्यांनी कडक नजर ठेवली होती. त्यांचा वंशशुद्धीचा आग्रह आणि पारलिंगी समूहांबद्दलचा द्वेष तिथेही अधोरेखित केला गेला. वॉटर्स असं निरीक्षण नोंदवतात की, दुसऱ्या महायुद्धानंतरही अशाच पद्धतीचा दृष्टिकोन कायम राहिला. सध्याच्या ऑलिम्पिक समितीने बऱ्यापैकी सर्वसमावेशक धोरणं राबवण्याचा प्रयत्न तर केला आहे, पण प्रत्येक देशातल्या राजकीय परिस्थितीचा तिथल्या खेळाडूंवरही परिणाम होत असतो हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच ‘वेगळी’ लिंगभावी ओळख असणाऱ्या व्यक्तींना अजूनही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
इमाने खेलिफ प्रकरणात आपली मतं काहीही असोत. पण त्यानिमित्ताने अशा ‘वेगळ्या’ असलेल्या तरीही मुख्य प्रवाही गटांमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्यांबद्दल काय वाटतं, हे पडताळून पाहता येईल. त्यावर आपण समाजमाध्यमांवर कसे व्यक्त होतो, याचाही सारासार विचार करता येईल.
gayatrilele0501 @gmail. com
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतर आपल्या कोचसह आनंद साजरा करणारी इमाने खेलिफ