प्रोत्साहन हवे
‘लेखिकांचे प्रमाण कमी का?’ (चतुरंग ५ जानेवारी ) लेख वाचला. खरेतर महिलावर्ग चांगले लिहू शकतो, पण शाळेतील निबंध लेखन त्यानंतर काही होत नाही. अनेक कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक बंधने असताना आणि बदलत्या परिस्थितीत आपल्या लिखाणाने कोणाला काय वाटेल ही धास्ती! त्यांना लिहिण्यासाठी प्रोत्साहनच मिळत नाही. लिखाण छंद जोपासना सोपी नाही, त्यासाठी वेळ कुठून देणार? घरातील स्त्रीने मोबाइलवर जास्त वेळ बोलले तरी टीकाटिप्पणी होते हे सर्वसामान्य स्त्रियांबाबत आहे, त्यामुळे लिखाण म्हणजे गॅस कधी आला? किराणा सामानाची यादी कॅलेंडरवर केलेल्या नोंदी! या परिस्थितीतही अनेक लेखिका लिहितात त्यांना धन्यवाद. विलक्षण जिद्दीनेच या गोष्टी शक्य आहेत असे वाटते. अनेक माध्यमे सध्या उपलब्ध आहेत त्यामुळे लिखाण वाढेल असे वाटले होते, पण ..
– अर्चना काळे, नाशिक
दुसरी बाजू
५ जानेवारीच्या अंकातील ‘पारंपरिक मूल्यव्यवस्था कारणीभूत’ या लेखातील डॉ. सुधीर रसाळ यांचे विवेचन वादातीत आहे. कथा, कविता, कादंबरी यापलीकडे स्त्री साहित्यिकांनी फारशी मजल मारलेली नाही. विनोदाच्या बाबतीत तर आनंदीआनंद आहे. त्याची कारणे काहीही असोत!
या प्रश्नाला दुसरीही एक बाजू आहे, जी मी स्वानुभवावरून (व औचित्यभंगाचा दोष पत्करून!) सांगू शकते. माझ्या औद्योगिकजगतातील संशोधनातून एक गमतीदार वळण घेऊन मी २००५ मध्ये ‘व्यवस्थापनातील रेघोटय़ा आणि कोलांटय़ा’ हे विनोदी पुस्तक लिहिले. त्याला प्रकाशक मिळता मिळेना. नंदिनी प्रकाशनने अनिल उपळेकरांकडून चित्रे काढून घेऊन ते अतिशय देखण्या स्वरूपात २००६ मध्ये प्रसिद्ध केले. त्याची पहिली १००० प्रतींची आवृत्ती वर्षांत संपली. पण सगळीकडे परीक्षणासाठी पुस्तक पाठवूनही कोणीही संपादकांनी त्याची दखल घेतली नाही. विनोदावर लेख आणि पुस्तक लिहिणाऱ्यांनीही ते अनुल्लेखाने टाळले. त्यानंतर २०१० मध्ये या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली हे कुणाच्या गावीही नाही.
त्यानंतर गेले वर्षभर ‘माझ्या ऑफिसचे महाभारत’ (कारखान्यातील विश्वाचे विनोदी चित्रण) व कामाचा हसरा दिवस (विनोदी चित्रमालिका) यांच्या प्रकाशनासाठी अथक प्रयत्न केले. सांगायचा मुद्दा हा की वेगळ्या प्रकारच्या विनोदाला प्रकाशक आणि समीक्षक मिळणे कठीण. याला सन्माननीय अपवाद प्रा. दीपक घारे यांचा. त्यांनी माझ्या ‘स्माइल अॅट वर्क’ या पुस्तकावर अतिशय मार्मिक परीक्षण लिहिले. म्हणजे चांगल्या आणि वेगळ्या विनोदाचे परीक्षण करणारे, ते प्रसिद्ध करणारे संपादक हेही तितकेच महत्त्वाचे. माझा हा अनुभव फक्त ‘मी स्त्री आहे म्हणून’ या चौकटीतला नाही हे कोणासही पटावे.
– माणिक खेर
तरुण पिढीलाही मार्गदर्शक
विद्याताई,
‘अजूनी येतो वास फुलांना’ (५ जानेवारी) यालेखातून तुमच्या मनाच्या बकुळ फुलांचा वास माझ्यापर्यंत पोचला. शारीरिक वयोमानामुळे शरीराच्या हालचाली संथ झाल्या, शरीर थकले तरी तुमच्या चार आश्रमांची जी संकल्पना आहे त्यातील वानप्रस्थाश्रमात इतरांशी बोलण्याची सवय कमी करत स्वत:शी संवाद साधणे, स्वत:च्या आत बघणे, लोकांना काय आवडते यासाठी न धडपडता स्वत:च्या आवडीचा विचार करून आपल्या मनाने जो कौल दिला त्याप्रमाणे वागून जगणे हे पुढील पीढीसाठी आदर्श आहे. कोणत्या कामामुळे पैसा, प्रतिष्ठा यापलीकडचा आनंद मिळतो तसेच परंपरेपलीकडच्या कामात मिळणारा आनंद घ्यायचा, हे आपले निर्णय शेवटपर्यंत सोबत करणारी वाट ठरू शकते. हा आपला अनुभव आपल्या पुरता न राहता पुढच्या पिढीला मार्गदर्शक आहे असे मला वाटते. मन व शरीर यातील अतूट नाते जपण्यासाठी आपल्याला झेपतील ते व्यायाम तुम्ही वयाच्या या टप्यावर पण करता, तसेच आपल्या शरीराने आपल्याला साथ द्यावी यासाठीची तुमची प्रार्थना अनुकरणीय आहे. मनाला दिलेली अॅनिमल प्लॅनेटवरील माकडाची उपमा मजेशीर पण योग्यच वाटते. विद्याताई तुमचा मेंदू, शरीर शेवटपर्यंत साथ देत राहो, ही माझी शुभेच्छा. व्हेजिटेटिव्ह जगणे नाही जगायचे यासाठी एकजूट होऊन सरकारदरबारी आपले मागणे मागतच रहायचे हे तुमचे मत योग्यच आहे.
हा लेख फक्त वयोवृद्ध व्यक्तींनी नाही तर तिशी चा़ळिशीच्या व्यक्तींनी वाचावा असा आहे. विद्याताई, तुमच्या फुलांचा सुवास वाचकांपर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद.
– सुधा गोखले, गोवंडी, मुंबई
पत्र लिहिणाऱ्यांसाठी
वाचकहो, चतुरंग पुरवणीतील लेखांवर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया पाठवत असता त्याबद्दल धन्यवाद. ही पत्रे प्रसिद्ध व्हावीत यासाठी काही सूचना–
पत्र मराठीतून (देवनागरी) असतील तरच ती प्रसिद्ध केली जातील. केवळ लेख छान आहे, आवडला, पटला, अशी एका शब्दांची, वाक्यांची पत्रे प्रसिद्ध केली जाणार नाहीत. एखाद्या लेखावर मत मांडणारी, चर्चा घडवून आणणारी पत्रे आम्हाला निश्चितच प्रसिद्ध करायला आवडतील. इमेलवरील लेख पीडीएफ तसेच ओपन, आरटीएफ किंवा डॉक्स फाईल्स मध्ये असावा हस्तलिखित पत्रं पाठवण्यासाठी आमचा पत्ता : ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई – ४००७१० किंवा chaturang@expressindia.com अथवा chaturangnew@gmail.com यावर लेख पाठवावेत.