‘‘मला विज्ञानकथा कशी सुचते? विज्ञानाची विविधरंगी रूपे एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी पाहिली आहेत. खगोलविज्ञानात तर अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यांना ‘वास्तव कल्पनेपेक्षाही अद्भुत असते’ हे वाक्य लागू पडेल. मी सूर्य पाश्चिमेस उगवताना पाहिला. सूर्य प्रकाशत असून बाकीचे आकाश काळेकुट्ट!, सूर्य कधीकाळी फुगत जाऊन पृथ्वीला गिळून टाकेल.. अशा गोष्टी जणू काय विज्ञानकथेत जायची तयारी दर्शवतात. अशांपकी एखादी घटना मनात चकरा मारत असते. अखेर वाटू लागते की, लिहायची वेळ आली..’’ ‘कृष्णविवर’, ‘उजव्या सोंडेचा गणपती’, ‘पुत्रवती भव’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘वामन परत न आला’ अशा अनेक विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि ललित विज्ञान लेखन लिहिणारे प्रसिद्ध वैज्ञानिक जयंत नारळीकर सांगताहेत त्यांच्या विज्ञान लेखनाविषयी.
माझे पाहिलेवहिले, सामान्य वाचकांसाठीचे विज्ञान लेखन १९६३-६४ च्या हिवाळय़ात ‘डिस्कव्हरी’ मासिकासाठी झाले. त्यात नुकत्याच घडलेल्या क्वेसार्सच्या संदर्भात गुरुत्वीय अवपाताचे वर्णन होते. क्वेसार दिसायला ताऱ्यासारखे; पण ताऱ्यापेक्षा अब्जावधी पटींनी प्रकाशमान. आपली ऊर्जा इतक्या कमी घनफळात कशी निर्माण करतात? हे सर्व शास्त्र वाचकांपुढे सोप्या भाषेत विशद करून सांगण्याचे काम मला त्या लेखात करायचे होते. मी असे लेखन पूर्वी केले नव्हते. ते माझ्याकडून करवून घ्यायला डिस्कव्हरीच्या संपादकाला कोणी सांगितले देव जाणे! काही असो माझा हा पहिलावहिला लेखनप्रयोग यशस्वी झाला असे संपादकांकडून आणि वाचकांकडून कळले.
त्यानंतर इंग्लंडमधील ‘न्यू सायंटिस्ट’मध्ये माझे लेख प्रसिद्ध होत गेले. नंतर भारतातील ‘सायन्स टुडे’ नेपण मला असे लेखन करण्यास प्रोत्साहन दिले. या नियतकालिकाचा संपादक सुरेंद्र झा माझ्या मागे लागून ‘अमुक विषयावर लिहा’, ‘तमुक विषयावर भाष्य करा’ अशी आवाहनं करून माझ्याकडून लेखन करून घ्यायचा. हे लेखन करत असताना वाचकांकडून येणाऱ्या प्रतिसादावरून मला हळूहळू जाणवत गेले की, प्रकाशनाचे नफ्या-तोटय़ाचे प्रश्न काहीही असोत पण सामान्य वाचकाला विज्ञान-तंत्रज्ञान यांच्याबद्दल जिज्ञासा आहे तशी भीतीपण आहे. भीती याकरिता की, हे विषय आपल्याला समजणार नाहीत, असा त्याचा समज दृढ आहे. म्हणून ज्याला सोप्या भाषेत आणि तांत्रिक शब्दांचे अवडंबर न ठेवता लेखन करता येते त्याला या क्षेत्रात पुष्कळ वाव आहे. एखादी वैज्ञानिक कल्पना साध्या गोष्टी, उदाहरणे सांगून विशद करता येते. अर्थात ही तारेवरची कसरत असते. कारण लेखकाला मूळ वैज्ञानिक गाभ्याशी फारकत घेऊन लिहिता येत नाही व या दृष्टीने सोपे लिहिताना विज्ञानावरही अन्याय करून चालत नाही.
आणखी एक गोष्ट बहुभाषिक भारतात महत्त्वाची आहे ती म्हणजे विविध भाषांतून विज्ञानप्रसाराची असणारी नितांत गरज. जरी विज्ञानासाठी इंग्रजी ही जागतिक भाषा मानली जाते तरी सामान्य माणूस विज्ञानाची प्राथमिक माहिती मातृभाषेतून ग्रहण करणे पसंत करतो. अनेक उत्साही अशासकीय सेवाभावी संस्था देशी भाषांच्या माध्यमातून विज्ञानप्रसार करतात आणि जनसामान्यांपर्यंत पोचू शकतात. मराठीत मराठी विज्ञान पारिषद ही कामगिरी निदान चार दशके तरी बजावता आली आहे.
विज्ञानप्रसार डोळय़ांपुढे ठेवून मी माझ्या लेखनात माझ्या मार्गदर्शक फ्रेड हॉएलचा कित्ता गिरवायचा प्रयत्न करत आलोय. विज्ञानप्रसारात्मक लेखन मी तीन भाषांतून करत आलो आहे- इंग्रजी मराठी आणि िहदी. लेखांपासून पुस्तकांपर्यंत माझी उचल १९७७ मध्ये पोचली. जवाहरलाल नेहरू फेलोशिपसाठी निवडलेल्या प्रकल्पातून माझे The Structure of the Universe हे पुस्तक ऑक्स्फर्ड युनिव्हर्सटिी प्रेसने त्या वर्षी प्रसिद्ध केले. त्याला जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळाल्याने मी आणखी पुस्तके लिहिली. त्यांचे प्रकाशन ऑक्सफर्ड, केंब्रिज (युनिव्हर्सटिी प्रेस) फ्रीमन, वर्ल्ड सायंटिफिक आदी दर्जेदार विज्ञान-प्रकाशकांनी केले.
फ्रेडचे आणखी एका बाबतीत अनुकरण करावेसे वाटत होते, ती म्हणजे विज्ञानकथालेखनात. माझ्या मनात काही कल्पना घोळत होत्या ज्यांच्यावर विज्ञानकथा लिहिता येतील. पण लेखन करायचा धीर होत नव्हता. १९७४ मध्ये मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केलेली विज्ञान लघुकथांच्या स्पध्रेची जाहिरात मला दिसली. २००० शब्दांच्या मर्यादेत एक गोष्ट बसवायची होती. आपण प्रयत्न करावा असे मला वाटले. पण पेन हातात घेऊन लिहायला सुरुवात कशी आणि केव्हा करायची?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा