-रोहन नामजोशी
महाविद्यालयीन काळात एखादी मुलगी आवडली की तिच्याशी मैत्री करावी असं वाटणं आणि त्यासाठी निमित्त शोधत राहणंही तेवढंच स्वाभाविक. पण एकदा का मैत्रीची भट्टी जमली की एक एक पायरीनं ती वाढत जाऊन लोणच्यासारखी मुरते. पुढे आयुष्याच्या वाटा कधी जाणीवपूर्वक बदलल्या, की मात्र प्रत्येकाला आयुष्य स्वतंत्रपणे जगावंच लागतं. मात्र अशा वेळी ‘ती आहे’चा विश्वास पुरुषांना वेगळंच बळ देणारा ठरतो.
वर्ष २००५. मी बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षाला होतो. एके दिवशी पांढराशुभ्र ड्रेस घालून एक लाजरीबुजरी मुलगी कॉलेजमध्ये येताना दिसली. तिच्याकडे माझं गेलेलं ‘लक्ष’ माझ्या एका मैत्रिणीनं लगेच हेरलं. मला म्हणाली, ‘‘मी तिला ओळखते. आपल्याला ज्युनिअर आहे ती.’’ मग काय, तिच्याशी मैत्री करण्यासाठी निमित्त शोधू लागलो. अखेर ‘नोट्सची देवाणघेवाण’ हे अत्यंत उत्तम निमित्त मला सापडलं. माझ्या नोट्स अगदी सढळ हस्ते तिला दिल्या. तिनं लगोलग ५० रुपये हातात ठेवले. मी नको, नको म्हणत असतानाच ती निघून गेली.
हेही वाचा…शिल्पकर्ती!
पूर्वाशी झालेला माझा हा पहिला संवाद. त्यानंतर हळूहळू ओळख वाढत गेली, पण प्रत्येक वेळी तिच्यात काही तरी वेगळं आहे हे मला जाणवत गेलं. ते काय होतं हे आजही सांगता येणार नाही. पण तरी वाटलं होतं. कॉलेजसुलभ वयात मुलींशी मैत्री वाढवण्याची कारणं हवीच असतात. तशी ती मिळत गेली आणि आम्ही कधी एकमेकांचे चांगले मित्र झालो हे कळलंच नाही. आता कदाचित पूर्वालाही आश्चर्य वाटेल पण तिच्यासमोर आपलं चांगलं इम्प्रेशन पडावं याची मी फारच काळजी घ्यायचो. मग लक्षात आलं, की विरुद्धलिंगी मैत्रीची पहिली पायरीच आदर्शवादी संवाद असतात. मग मैत्रीची एक एक पातळी गाठली की ही सगळी स्वत: घातलेली बंधनं गळून पडतात आणि मैत्रीचं लोणचं मुरतं.
आज मागे वळून पाहताना पूर्वाशी मैत्री होणं ही तरीही एक परीक्षाच होती हे मला जाणवतं. सुरुवातीच्या काळात अभ्यासाची चर्चा हा त्यातला मोठा भाग असायचा. मग मजल-दरमजल करत मैत्रीची ही भट्टी एकदाची जमली ती आज २० वर्षांनंतरही कायम आहे. पूर्वा आणि मी एकमेकांना भेटलो तेव्हा आमच्या आयुष्यात काहीच मनासारखं होत नव्हतं. दोघंही बारावीच्या अपयशाचं ओझं घेऊन वावरत होतो. त्यामुळे आयुष्यात काही तरी ‘बाप’ करायचं या एकाच भावनेनं त्या वेळी जगत होतो. सतत काही तरी चांगलं करणं, स्वप्नं पाहणं, सतत उत्तमाचा ध्यास घेणं, हेच आमचं चाललेलं असायचं. या सर्व गोष्टींमुळे आमच्यातील संवादाचा पट आणखीच विस्तारला. नोट्सची देवाणघेवाण हा आमचा वार्षिक कार्यक्रम झाला. नोट्सचे पैसे तिनं फक्त पहिल्या वर्षीच दिले. नंतर कधी ते आमच्या मनातही आलं नाही, म्हणजे मैत्री आता मुरली आहे असा मी निदान माझ्यापुरता अर्थ घेतला. त्याच्या जोडीला पुस्तकांची आवड, थोडं अध्यात्म, नातेसंबंध असे कोणतेच विषय वर्ज्य नव्हते आमच्यात. पुढे एम.एस्सी.ला असताना आमचं कॉलेज बदललं. ती पुन्हा माझ्या कॉलेजमध्ये यावी अशी माझी इच्छा होती, पण तसं काही झालं नाही. त्यामुळे अर्थात मैत्रीत खंड पडला नाही. वैचारिक देवाणघेवाण, अध्येमध्ये फोन हे सगळं सुरू राहिलं. पुढे मी पुण्याला गेलो आणि साहजिकच अंतर पडलं. हळूहळू आमच्या दोघांचंही विश्व स्वतंत्रपणे विस्तारलं आणि आम्ही आपापल्या वाटेला लागलो.
हेही वाचा…सांधा बदलताना : सोबतीचे बळ!
२०११ मध्ये तिचं लग्न झालं. पुरुषांच्या आयुष्यात मैत्रिणीचं लग्न होणं ही एक विचित्र भावनिक घटना असते. हे पूर्वाच्याच बाबतीत नाही, तर माझ्या काही अन्य मैत्रिणींच्या बाबतीतही मला जाणवलं. तुम्ही कितीही नाकारलं तरी विशिष्ट पोकळी जाणवते. शिवाय ‘बायकोचा मित्र’ ही संकल्पना मैत्रिणीच्या नवऱ्याला आवडतेच असं नाही. त्यामुळे तो अंदाज यायला बराच वेळ लागतो. त्यामुळे साहजिकच पूर्वा आणि माझ्यात ‘अंतराचं अंतर’ पडलं, तरी आजतागायत हा मैत्रीचा सिलसिला कायम आहे. भेटी होत नसल्या तरी सोशल मीडियामुळे एकमेकांच्या आयुष्यातल्या अपडेट्स कळत असतात. आपण लिहिलेल्या पोस्टवर तिच्या कमेंट्स आल्या किंवा अगदी लाइक आलं तर मला आजही आनंद होतो.
पुरुष आणि स्त्रीच्या मैत्रीचे आयाम काळानुरूप बदलत असतात. माझ्या आणि पूर्वाच्या मैत्रीचेही ते बदलले. एका विशिष्ट टप्प्यावर मला ती आयुष्यभराची जोडीदार व्हावी असंही मनापासून वाटलं होतं. तसं मी तिला विचारलंही होतं. तिनं त्याला नम्रपणे नकार दिला. मीही त्याचा स्वीकार केला. तो नकार किती सार्थ होता हे मला नंतरच्या आयुष्यात कळलं. प्रत्येक नात्याची एक रेसिपी असते. त्यात भलते पदार्थ टाकले तर त्याची चव बिघडते. पूर्वानं नकार दिला त्यामुळे आमची मैत्री आणखी टिकली असं आज मला वाटतं. कॉलेजवयीन विश्वात सगळंच छान छान वाटत असतं. पण नंतर आपलीच आपल्याशी नवीन ओळख होत जाते आणि पूर्वायुष्यातील काही प्रसंग घडले म्हणून आपणच देवाचे आभार मानतो. या बाबतीतही असंच झालं.
हेही वाचा…‘एका’ मनात होती : ‘फोमो’चं उत्तर ‘जोमो’?
या १९-२० वर्षांच्या प्रवासात सगळंच गोड गोड होतं असंही नाही. अनेकदा चहाच्या पेल्यातली वादळंही आली. तिच्या आयुष्यातील काही गुंतागुंतींमुळे ती मला फारसा फोन करायची नाही किंवा मेसेज करायची नाही, तेव्हा मी बरेचदा काही ग्रह करून बसायचो. पण माझे समज हे गैरसमज आहेत, हे सिद्ध करण्यात ती कायमच यशस्वी ठरली. तिचं लग्न झालं तेव्हा मी पुण्यात ‘स्ट्रगल’ करत होतो. त्या दिवसांबद्दल बोलावं, तिची मदत घ्यावी, असं मला बऱ्याचदा वाटायचं. पण मी स्वत:ला थोपवायचो. तीसुद्धा तिच्या नव्या विश्वात रममाण झाल्यामुळे फारसे फोन वगैरे करायची नाही. त्यामुळे आता ती ‘आपली राहिली नाही’ ही भावना अनेकदा प्रबळ व्हायची. तरी ‘ती आहे’ ही भावना सुखावणारी असायची.
पूर्वा आणि मी आता आपापल्या आयुष्यात सेटल झालो आहोत. ती तिच्या क्षेत्रात उत्तम काम करतेय. आम्ही दोघंही मायक्रोबायॉलॉजी शिकलो, पण दोघंही त्या क्षेत्रात काम करत नाही. तेव्हा इतकी बडबड का केली देव जाणे! ती माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान असल्यामुळे तिनं वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आणि उमटवते आहे. तिला तिच्या आयुष्याचा मार्ग सापडलाय असं मला तरी वाटतंय. माझी अवस्था मात्र अजूनही दुरुस्त न होणाऱ्या रस्त्यावरच्या खाचखळग्यांसारखी आहे.
हेही वाचा…स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
माझी आणि पूर्वाची मैत्री झाली तो काळ आजच्यासारखा पुढारलेला नव्हता. तेव्हा मैत्री व्हायची पण आजइतकी लगेच मोकळीढाकळी व्हायची नाही. मैत्री दर्शवण्यासाठी फोटो, स्टोरीज, रील्स, व्हॉट्सअॅप असं काही नव्हतं. एसएमएस आणि फोन हीच माध्यमं होती. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीचा वेळ किंवा फोनवरचा वेळ हीच काय ती नातं दृढ करण्याची माध्यमं होती. त्यात एक विशिष्ट प्रकारची ओढ होती.
मैत्रीण ही संकल्पना कॉलेजमध्ये गेल्यावर नवीन असते. आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा मुलींशी बोलायचे विषयही वेगळे होते. पूर्वा त्याला अपवाद होती. या सगळ्या वैचारिक देवाणघेवाणीमुळे तिचं व्यक्तिमत्त्व मला नीट कळलं, मैत्री घट्ट झाली. आज हे वाचताना ‘इतकं काय त्यात?’ असं वाटू शकतं. पण वर्ष २००० च्या काळात हे खरोखरीच वेगळं होतं. पुरुष आणि स्त्रियांच्या मैत्रीत एक वेगळा जिव्हाळा आणि आपुलकी असते. एकमेकांची काळजी घेण्याची वृत्ती या मैत्रीत जास्त असते. मित्र रात्री फोन करून रडला तर आपण त्याला दोन शिव्या देऊन हाडतूड करू शकतो. मैत्रिणींचं तसं होत नाही. आवाज खोल गेला तरी मुलं मैत्रिणींचा मूड ताळ्यावर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पूर्वाच्या बाबतीत लग्नापूर्वी हे प्रसंग काही वेळा घडले. तिनंही मला अनेक प्रसंगांत आधार दिला. कमी बोलून जास्त व्यक्त होणाऱ्यांपैकी ती असल्यामुळे बऱ्याचदा माझ्या भावना तिला कळताहेत की नाही असं मला वाटायचं पण तिला ते कळायचं.
हेही वाचा…इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
तिचं इंग्रजीवर जबरदस्त प्रभुत्व आणि मराठीवरही. त्यातही भाषेच्या बाबतीत आम्ही अत्यंत काटेकोर. त्यामुळे मला आजही तिला इंग्रजीत मेसेज करायचा असेल तर मी आधी गूगलवर व्याकरण तपासतो. एकमेकांना भाषा शिकवण्याचा मक्ता आम्ही कॉलेज काळापासून घेतला आजतागायत तो सुरू आहे.
पूर्वा आणि मी एकमेकांचे मित्र झालो ही माझ्या आयुष्यातली खूप आनंदाची आणि महत्त्वाची घटना होती. तिच्या असण्यामुळे कॉलेजच्या कठीण आणि अस्वस्थ काळात एक दिशा मिळाली. मुलींशी बोलण्याची भीड चेपली. मुलींचं भावविश्व मला नीट समजून घेता आलं. एकूणच स्त्रीजातीकडे पाहण्याची माझी दृष्टी प्रचंड बदलली, त्यांच्याबद्दल आदर कैकपटीनं वाढला. मनानं मी स्थिर झालो. माझ्या जाणिवा विस्तारल्या. तिच्याबरोबर बोलताना नेहमीच काही तरी नवीन शिकायला मिळतं. अशा वेळी अंतर, आपल्या फार भेटी होत नाहीत, वर्षं-वर्षं फोन नाही, हे सगळे मुद्दे अवचित गळून पडतात. जगात काहीही झालं तरी या विश्वाच्या एका कोपऱ्यात आपली एक मैत्रीण आपल्यासाठी आहे, ही भावना कोणत्याही पुरुषाला प्रचंड बळ देणारी असते.
हेही वाचा… ‘भय’भूती : भय अशाश्वतीचे
मलाही हे बळ देणारी व्यक्ती या जगात आहे, याबद्दल मी सृष्टीच्या निर्मात्याचा कायमच ऋणी आहे.
rohannamjoshi86@gmail.com
पुरुष वाचकहो, तुम्ही मांडायचे आहेत तुमचे अनुभव! आहे का तुमची एखादी अशी निखळ मैत्रीण, जिच्याबरोबरचं नातं ना तुम्हाला कधी लपवावंसं वाटलं, ना तुम्हा दरम्यानचं अंतर तोडावंसं वाटलंय? अर्थात भिन्नलिंगी मैत्रीण म्हणून वाटलंच असेल ‘वेगळं’ आकर्षण, तर त्या भावनेची वासलात कशी लावलीत? काय आहे तुमच्या दोघांच्या घट्ट नात्याचं रहस्य? काय आहे तुमच्या नात्यातलं चुंबकत्व? आणि हो, होऊ शकते का अशी निखळ मैत्री? आम्हाला सांगा. महत्त्वाचं, या सदरात फक्त पुरुषांनीच आणि तेही आपल्या मैत्रिणीविषयी, त्यांच्यातल्या नात्याविषयी मनमोकळेपणानं लिहिणं अपेक्षित आहे. आम्हाला पाठवा ते अनुभव तुमच्या प्रत्यक्ष मैत्रीच्या उदाहरणांसह ५०० किंवा १००० शब्दांत. आमच्या ईमेलवर chaturang.loksatta@gmail.com