‘समाजविघातक व्यक्तिमत्त्व विकार’ हा एक मानसिक आजार आहे. अशा व्यक्तीमध्ये बेजबाबदारपणा, खूप रागीट, आक्रमक असणं, आपल्या वाईट कृत्याचा पश्चात्ताप न होणं, बेदरकारपणा अशी स्वभाववैशिष्ट्ये दिसतात. मुख्य म्हणजे अशा व्यक्ती फक्त कुटुंबीयांसाठीच नाही तर समाजासाठी घातक ठरू शकतात. काय आहे हा विकार नेमका?

व्यक्तिमत्त्व विकार किंवा मानसिक आजारांचे वर्गीकरण, स्पष्टीकरण करण्याचे आणि नवीन संशोधनानुसार त्यात बदल करण्याचे काम APA म्हणजे ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’ ही संस्था करत असते. जगभरातील डॉक्टर्स याच्याच आधाराने आपल्या रुग्णांचे निदान करतात. व्यक्तिमत्त्व विकारांचं त्यांच्या लक्षणसमूहांनुसार तीन वर्गांत वर्गीकरण केलं जातं. ‘क्लस्टर ए’, ‘क्लस्टर बी’ आणि ‘क्लस्टर सी’. यातील ‘क्लस्टर ए’ समूहातील तीन विकारांची माहिती आपण मागच्या लेखांमध्ये घेतली. ज्यामध्ये प्रामुख्याने विचित्र आणि विक्षिप्त वर्तनाची लक्षणे दिसली. आता पुढे जाऊन आपण ‘क्लस्टर बी’मधील व्यक्तिमत्त्व विकारांची माहिती करून घेऊ या. ‘क्लस्टर बी’मधील व्यक्तिमत्त्व विकारांच्या समूहामध्ये अति भावनिक, अंदाज न करता येण्यासारख्या भाव किंवा वर्तन आणि अति नाटकीय अशा लक्षणांचा अंतर्भाव होतो. या लक्षणांमुळेच या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्ती समाजात लगेच लक्षात येतात.

achieving life goals steps to be successful in life
सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
concept of house husband
स्त्री ‘वि’श्व: ‘हाऊस हसबंड’ असणं!
family, old women, attention to old women,
मनातलं कागदावर: दुधातील साखर…
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
women empowerment challenges women experience in society
स्त्रियांचं नागरिक असणं!
chaturang transgender Berlin No Border Festival Gender discrimination Ideology
स्वीकार केव्हा होईल?
vandana gupte article Freedom only for freedoms sake
‘ती’च्या भोवती…! स्वातंत्र्य केवळ स्वातंत्र्यासाठीच!

‘क्लस्टर बी’मधील पहिला व्यक्तिमत्त्व विकार आहे, ‘समाजविघातक व्यक्तिमत्त्व विकार’(Anti social personality disorder). बाकी कोणत्याही व्यक्तिमत्त्व विकारांचा अप्रत्यक्ष परिणाम हा फक्त त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींवर, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर होऊ शकतो, पण या व्यक्तिमत्त्व विकाराचा परिणाम समाजातील कोणत्याही घटकावर होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना सांभाळणं हे कुटुंबातल्या व्यक्तींना मनस्ताप देणारं ठरत असतं.

अठरा वर्षांखालील ज्या मुलांवर कोणताही कायदा तोडल्याचा आरोप होत असतो, पूर्वी त्यांना ‘बाल गुन्हेगार’ ही संज्ञा होती. पण त्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचा शिक्का मारला जातो. तसे होऊ नये म्हणून आता या मुलांना ‘विधिसंघर्षग्रस्त बालक’ ( child conflict with law) म्हणजे चित्रपटांच्या भाषेत बोलायचं तर ‘ज्याने कायदा हातात घेतला आहे असे बालक,’ असं म्हटलं जातं. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक ‘बाल न्याय मंडळ’ असतं, तिथे अशा मुलांच्या केसेस चालवल्या जातात. बऱ्याच वेळा इथे येणारी मुले पहिल्या केसमधून सुटतात, बाहेर जातात, परत काही महिन्यांनी नवीन काही तरी गुन्हा करून आत येतात. हे त्यांच्या किशोरावस्थे-पासून १८ वयापर्यंत चालूच राहते. खरे तर एका केसमधून जामीन मिळताना होणारा मनस्ताप, पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी, शैक्षणिक वर्षाचे नुकसान हे सगळं अनुभवल्यानंतर एखादं मूल धडा घेऊन आपल्या वर्तनात बदल करेल, पण काही मुलांना हे जमतच नाही. ते सातत्यानं खोटं बोलणं, चोरी, मारामारी, व्यसनाधीनता यात अडकलेलेच राहतात, तेव्हा या मुलांचं निदान ‘कंडक्ट डिसऑर्डर’(conduct disorder) असं केलं जातं.

ठाण्याच्या निरीक्षणगृहात समुपदेशनाचं काम करताना मला भेटलेला ‘परश्या’ आठवतो. टाळेबंदीचं निमित्त होऊन त्याची शाळा सुटली ती सुटलीच. मग आता हातात असलेल्या दिवसभराचं करायचं काय? मग मित्रांनी गांजा ओढण्यात कशी मजा आहे हे शिकवलं. गांजासाठी पैसा कुठून येणार? मग चोरी सुरू झाली. नशेत असला की हा परश्या एटीएम मशीनशी छेडछाड करायचा. छोट्या-मोठ्या चोऱ्यांपेक्षा एकदाच एटीएम मशीन घेऊन येऊ असं वाटायचं त्याला. बरं वाटण्यापर्यंत ठीक आहे, ते आपल्याला जमेल असं का वाटायचं हे मात्र नवल होतं. मग एटीएमशी छेडछाड केली की अलार्म वाजायचा, पोलीस हजर व्हायचे आणि परश्या परत निरीक्षणगृहात! त्याला हे कायद्याने चूक आहे, हा गुन्हा आहे असं सांगितलेलं पटायचंच नाही. बरं, निरीक्षणगृहात तरी हा शांत असायचा का? तर नाही, इथेही मुलांमध्ये भांडण लाव, मुलांकडच्या सामानाची चोरी कर असे प्रकार चालूच असायचे. त्याच्या घरच्यांनी त्याच्यासमोर हात टेकले होते. परश्याचं निदान मानसोपचारतज्ज्ञांनी ‘कंडक्ट डिसऑर्डर’ असं केलं होतं. तर अशा ज्या मुलांचं त्यांच्या किशोरावस्थेत ‘कंडक्ट डिसऑर्डर’ असं निदान झालं असेल किंवा तशी लक्षणं दिसलेली असतील आणि हीच लक्षणं पुढेही दिसत राहिली तर अठरा वर्षांनंतर या व्यक्तींचं ‘समाजविघातक व्यक्तिमत्त्व विकार’ असं निदान केलं जाऊ शकतं. व्यक्तिमत्त्व विकारातील वयाचा हा निकष इतर कोणत्याही व्यक्तिमत्त्व विकारांमध्ये दिसून येत नाही. एखादा मोठा गुन्हा किंवा खून केलेल्या एखाद्या गुन्हेगाराला लगेच हा ‘समाजविघातक व्यक्तिमत्त्व विकार’ आहे असं म्हणू शकत नाही. गुन्हा किती मोठा केला आहे यावरून निदान न करता यांच्या वर्तनामध्ये बालपणापासून किंवा किशोरावस्थेपासून अटक होण्याच्या शक्यता असलेले वर्तन दिसून आल्यानंतर, तसेच प्रौढावस्थेतही तेच कायम राहिलं आणि इतर लक्षणंही ठळकपणे दिसून आली तरच या व्यक्तिमत्त्व विकाराचं निदान केलं जाऊ शकतं.

सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे या व्यक्तींना समाजाचे नियम किंवा कायदा मान्यच नसतो. आपल्या मनाला येईल आणि त्या क्षणी त्यांना जे फायद्याचे आहे त्याच गोष्टी हे लोक करतात. त्यांना पैशाची गरज आहे तर पैसा कसा कमवता येईल यापेक्षा सोप्या मार्गाने चोरी करून तो मिळवणं यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. प्रवीणच्या शाळेपासूनच खोड्या, मस्ती, चुकीची संगत हे सगळं चालूच होतं. कशीबशी दहावी पूर्ण करून त्यांनी शाळा सोडली. त्याच्या घरच्यांना तो कोणाबरोबर असतो, काय करतो, काहीच माहीत नसायचं. वयाच्या २४व्या वर्षापर्यंत त्याला पोलिसांनी चार वेळा अटक केली होती. कधी पुराव्याअभावी तर कधी पैसे भरून पण तो चारही वेळा सुटला होता. आई-वडिलांना सतत काळजी वाटायची की हा कधी तरी मोठ्या प्रकरणात अडकून आयुष्याचं नुकसान करून घेईल. पण याला समजावून सांगायला गेलं की हा मोठमोठ्या लोकांची नावे घेऊन, हे लोक माझ्या पाठीशी आहेत, मला कोणी हातही लावू शकत नाही, अशा काही तरी वल्गना करायचा. कधी आईने शपथ दिल्यावर, ‘मी हे काम पूर्ण सोडून दिलंय आणि गॅरेजमध्ये नोकरी करतोय’, असं सांगायचा. पण पुढच्या काही दिवसांत नवीन भानगड समोर यायची आणि पोलीस याला उचलून न्यायचे. सोप्या पद्धतीने पैसा कमवण्याच्या नादात तो अमली पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम करत होता. याचे परिणाम पुढे काय होतील यापेक्षा आज हातात पैसा खुळखुळतोय हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. एकदा त्याच्या वडिलांना त्याच्या बॅगेत पिस्तूल सापडलं. आता प्रकरण हाताबाहेर गेलंय. आपण काहीच करू शकत नाही, या विचाराने आणि त्या ताणानं त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्रवीणच्या केसवरून खोटं बोलणं, धोका देणं हे दुसरं लक्षण या व्यक्तिमत्त्व विकार असलेल्या व्यक्तींमध्ये सहजच दिसून येतं. नैतिक-अनैतिकतेची फारशी चाड नसल्यामुळे खोटं बोलून आपण काही चूक केलीए असं त्यांना मुळीच वाटत नसतं. घरच्यांना, मित्रांना, जवळच्या लोकांना असं कोणालाही ते त्यांच्या तात्पुरत्या फायद्यासाठी धोका देऊ शकतात, याचं कारण त्यांच्या तिसऱ्या लक्षणांमध्ये आहे. परिणामांचा विचार न करता मनात येईल त्याप्रमाणे उत्स्फूर्त वागणं ( impulsivity) हे आहे ते तिसरं लक्षण. प्रवीणला कोणी सांगितलं की, नशेचे पदार्थ पोहोचवताना पोलिसांची गाडी मागे लागली तर सरळ पिस्तूल चालव तर प्रवीण तात्काळ तसं करू शकतो. कारण प्रत्यक्ष पोलिसांच्या गाडीवर पिस्तूल चालवणं किती महागात पडू शकतं एवढा विचारच त्याने केलेला नसतो. तसंच आपल्या वडिलांना आपण सतत ताण देतोय, त्यांच्या म्हातारपणी त्यांना हे झेपेल का? त्याचे काय परिणाम होतील? एवढा खोल विचार त्याने केलेलाच नव्हता. या विकाराचे निदान करण्यासाठी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्यांना केलेल्या चुकीबद्दल कधी पश्चात्ताप होत नाही (lack of remorse). खरे तर असा पश्चात्ताप झाला असता तर ते परत परत बेकायदेशीर गोष्टींमध्ये किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेच नसते. तुरुंगात असताना जेव्हा प्रवीणचं समुपदेशन चालू होतं तेव्हा त्याला विचारलं की, तू जे नशेचे पदार्थ कॉलेजच्या मुलांना पुरवायचास त्यामुळे आपल्या तरुण मित्रांवर किती गंभीर परिणाम होतील, याची तुला कल्पना होती का? त्या गोष्टीचा तुला पश्चात्ताप होतोय का?’ त्यावर प्रवीण म्हणाला, ‘‘मी काहीही देईन, खायचं की नाही याची त्यांना अक्कल नको का? मी काही चूक केलीये असं मला वाटत नाही. मला पैसे मिळायचे, मी माझं काम करायचो.’’ यांच्यामध्ये बेजबाबदारपणा (irresponsible ) हे लक्षणही प्रामुख्याने आढळून येतं. घर, बायको, मुलं, पालक, देश, समाज कशाचीही जबाबदारी त्यांना घ्यायची नसते. या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्ती खूप चिडचिड्या आणि रागीट, आक्रमक स्वभावाच्या (irritable and aggressive ) असतात. त्यांना काहीही समजावून सांगायला गेलं किंवा त्यांच्या चुका दाखवायला गेलं की, ते समोरच्याच्या अंगावर धावून येतात. घराच्या बाहेरसुद्धा ते छोट्या छोट्या कारणांवरून मोठी भांडणं करतात. आपल्याला प्रवीणच्या केसवरून आणखी एक गोष्ट लक्षात येईल. या व्यक्तींना स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्या जिवाच्या सुरक्षेची अजिबात पर्वा नसते. सामान्य व्यक्तींना आपल्या जिवाची भीती, काळजी असते म्हणून तर ते वाट्टेल तसा धोका पत्करत नाहीत. पण या विकाराच्या व्यक्ती मात्र या लक्षणांमुळे जिवावर उदार असतात. ज्यांना जिवाचीच भीती नसते ते कोणतेही कृत्य करताना मागेपुढे कशाला बघतील?

वर सांगितलेल्या सहा-सात लक्षणांपैकी किमान तीन लक्षणं जर एखाद्या व्यक्तीमध्ये आढळून आली आणि त्यांच्या किशोरावस्थेत १५ वयाच्या आसपास जर ‘कंडक्ट डिसऑर्डर’ची लक्षणे दिसून आली तर त्यांचं निदान ‘समाजविघातक व्यक्तिमत्त्व विकार’ असं होऊ शकतं. मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीनं थोडीफार मदत होऊ शकते, पण या व्यक्तींना तज्ज्ञापर्यंत पोहोचवणं आणि औषधोपचार नियमित घ्यायला लावणं ही दोन्ही महाजिकिरीची कामे आहेत, या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्तींशी संबंधितांनी किंवा कुटुंबातील लोकांनी स्वत:ची सुरक्षा बघणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. समाजातील अस्वस्थता, चित्रपट, वेब सिरीजमधून दाखविली जात असते. त्यातील हिंसाचार असो किंवा तणावपूर्वक आव्हानात्मक जीवनशैली यातली कारणे काहीही असो या व्यक्तिमत्त्व विकाराची समाजातील टक्केवारी वाढत चाललेली आहे हे मात्र नक्की.

(तळटीप – या लेखातील माहितीचा वापर स्वत:च्या किंवा आप्तस्वकीयांच्या निदानासाठी कृपया करू नये. योग्य निदानासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.) trupti. kulshreshtha@gmail.com