‘एक समजूतदार गाव’ हा आरती कदम यांचा लेख (६ जुलै) सर्वानाच विचार करावयास लावणारा आहे. संस्कृत सुभाषितात म्हटल्याप्रमाणे ‘जो जगत असताना दुसऱ्यालाही जगवतो, तोच खऱ्या अर्थाने जगला, एरवी कावळादेखील आपल्या चोचीने पोट भरीत नाही का?’
जवळजवळ सर्वच नद्यांनी रौद्ररूप धारण करून, सर्व काही गिळंकृत करून सर्वत्र हाहाकार माजविलेला असताना प्रतिकूल परिस्थितीतही गावातील लोकांच्या मदतीने जेवण शिजवून दररोज सुमारे ९०० ते १००० लोकांच्या मुखी घास भरवण्याचं मोलाचे कार्य पुष्पा चौहान नावाच्या महिलेने केले, ही निश्चितच कौतुकास्पद अशी बाब आहे. अर्थात, याचे श्रेय तिच्याबरोबरच गणेशपूर या गावालाही जाते. पुरस्कारासाठी याचा विचार होणे आवश्यक वाटते.
पूर्वी गावागावातून अशा प्रकारचे ‘गावपण’ जपले जात होते. सुख-दु:खाच्या प्रसंगाबरोबरच काही नैसर्गिक आपत्तीच्या वेळीदेखील हे ‘गावपण’ जपले जात असताना दिसून येत होते, आता मात्र राजकारणामुळे ही स्थिती राहिलेली नाही, कारण कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना ‘श्रेय’ लाटण्यासाठी सध्या चढाओढीच जास्त दिसून येत आहेत. १९४८ साली वादळाने तडाखा बसलेल्यांनादेखील गावागावांतून मंडळींनी एकत्र येऊन अन्नदानाचे भरीव कार्य केले होते, याचे स्मरण होते.
दासबोधाने तारले
‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान!’ ६ जुलै च्या अंकातील लेखिका वंदना अत्रे यांच्या ‘मनाच्या किनाऱ्यावरून’ हा लेख वाचल्यावर पूर्वस्मृती उफाळून आल्यामुळे हा पत्रप्रपंच!!
माझ्या आयुष्यातील अत्यंत हृदयद्रावक प्रसंग. माझा ४० वर्षांचा अत्यंत बुद्धिमान आयआयटी इंजिनीअर विवाहित मुलगा कॅन्सर झाल्यामुळे ३५ वर्षांची सुविद्य पत्नी, ५ वर्षांची कन्या व दीड वर्षांचा सुकुमार मुलगा यांना दु:खसागरात लोटून कायमचा निघून गेला. मन सैरभैर झाले. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या अवस्थेत सर्व नातेवाईक मित्रपरिवार यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून दु:खातून बाहेर येण्यासाठी अविरत प्रयत्न केले. परंतु दु:खाने विदीर्ण झालेल्या मनाचा दिवसेंदिवस तोल जाऊन दु:खाचा कडेलोट होत होता.
चेंबूर येथे समर्थ दासबोध मंडळ आहे. त्यातील एका सभासदाने आमच्या घरी येऊन प्रेमाने दु:खावर फुंकर घालून मला त्या मंडळाची सभासद करून घेतले. महिन्यातून तिसऱ्या शनिवारी सारे दासबोध भक्त ४ वाजता येतात. प्रथम नित्यपाठाचे ५ श्लोक, रामरक्षा, १०८ वेळा रामनामाचा जप करतात. नंतर मंडळाचे प्रमुख एक समास वाचून त्यावर निरूपण करतात. वर्षांतून दोनदा ‘दासनवमी’ व ‘गुरुपौर्णिमा’ या दोन दिवशी समारंभ साजरा करतात. अभ्यासू प्रथितयश विद्वानांना बोलावतात. वर्तमानकाळातील जटिल प्रश्न यांचाही अंतर्भाव करून समर्थाच्या दासबोधाचे महत्त्व मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात.
दासबोधातील मौलिक विचारांच्या मदतीने मी दु:खसागरातून बाहेर येऊ शकले. दासबोधात मृत्यू तर एक पूर्ण समास आहे. माझ्या अति दुर्धर संकटातून दासबोधानेच मला तारले!
– दासबोधाने तरून गेलेली एक दुर्दैवी महिला.
ते बंड नव्हेच
६ जुलैच्या पुरवणीत ‘तेजस्वी शलाका’ या रोहिणी गवाणकर यांच्या नव्याने सुरू होणाऱ्या सदराची माहिती आपण दिली आहे. या सदरातून देशातील विविध स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेल्या पण नंतर अज्ञात व उपेक्षित राहिलेल्या महिलांची व त्यांच्या कार्याची आपण माहिती देणार आहात. हे वाचून खूप बरे वाटले. सुरुवातीलाच येसूवहिनींची दिलेली माहिती खूपच चांगली आहे. पुढच्या अनेक महिला स्वातंत्र्यवीरांची माहिती वाचायची उत्सुकता लागून राहिली आहे.
पण एक गोष्ट खटकली! सदराची माहिती देताना आपण १८५७ चं बंड असा उल्लेख केला आहे. एव्हाना बहुतेक साऱ्या इतिहासाच्या अभ्यासकांनी हे मान्य केले आहे की, १८५७ साली भारतात जे घडलं ते इंग्रजांनी वर्णन केल्याप्रमाणे शिपायांचे बंड नव्हते, तर तो एक स्वातंत्र्याचा तेजस्वी लढा होता. तुम्ही बंड हा शब्द वापरून नकळतपणे पुन्हा त्या स्वातंत्र्यवीरांची अवहेलनाच केली आहे. तसे होऊ नये.
– श्रीनिवास गडकरी, पेण.
‘सावधान’ तरुणांनो
शनिवार ८ जूनच्या पुरवणीमधील ‘डस्टबिन’ ही कथा मला इतकी आवडली की मनातील विचारांना चालना मिळाली व त्याच वेळी खूप राग व नैराश्य आले, दु:ख झाले. म्हाताऱ्यांना, विशेषत: घरातील वृद्ध सासू-सासऱ्यांना घरातील अडगळ, कडेला पडलेले जुने सामान रद्दी म्हणजे वाया गेलेले सर्व सामान अशा प्रकाराने संबोधायचे. हे समजल्याने मनाला अत्यंत खेद झाला. या भन्नाट विचारांच्या, उर्मट वागणाऱ्या मुलींना एकतर आईबापाचे वाईट संस्कार, वळण तरी कारणीभूत आहे किंवा स्वातंत्र्याचा उदोउदो करीत रसातळाला नेणारे वागणे तरी कारणीभूत आहे. नवविचारांचा पगडा मनावर असल्याने असली विक्षिप्त विचारसरणी निर्माण झाली आहे. ज्यांचा ‘डस्टबिन’ म्हणून उल्लेख केला जातो त्यांच्या मनाला किती इंगळ्या डसल्या असतील याची त्यांना जाणीवच नसेल! त्यांना पण कालपरत्वे ‘डस्टबिन’मध्येच यावे लागेल हे त्यांनी जाणले पाहिजे अथवा आजूबाजूच्या लोकांनी त्यांना छान समज दिली पाहिजे. इतके दिवस म्हणत की मुलगी दोन घरांना म्हणजे सासर व माहेरला जोडून ठेवते. पण इथे तर लग्नाआधीच सासरच्या माणसांना, त्या नातेसंबंधांना, अडाणीपणाने असंस्कृत आणि मस्तीतल्या विचारांनी तोडूनच टाकले आहे व याची लाज या नवविचारांच्या तरुणींना वाटत नाही याचे खूप वैषम्य वाटते.
-उषा खैराटकर, ठाणे.
समाजच कारणीभूत
८ जूनच्या अंकातील कृ. ज. दिवेकर यांचा ‘डस्टबिन’ हा लेख वाचला. मुलींची ‘डस्टबिन किती?’ यासारखी वक्तव्यं ऐकल्यावर आम्हा एकच पिढी मागे असलेल्या स्त्रियांचं मन चिंताग्रस्त झालं. मुलींचा ‘डस्टबिन’ हा शब्द नक्कीच चुकीचा आहे. पण मुलींना या सीमेपर्यंत पोहोचवणारं दुसरं-तिसरं कोणी नसून समाजच याला कारणीभूत आहे. कारण आमच्या पिढीने वर पक्षाचे हरतऱ्हेचे अपमान अगदी ‘मुलगी दाखविणे’ या कार्यक्रमापासून ते त्या घरात लग्न करून प्रवेश केल्यावर वय होईपर्यंत, माहेरच्यांना दूषणे देणारी बोलणी सहन करताना याच भावी पिढीच्या मुलींनी बघितली किंवा ऐकली आहेत. मुलगी बघायला जाणे यात तर मुलाने अनेक अपमान केलेत. अनेक चीड आणणाऱ्या गोष्टी घडल्यात. आज जेवढा गवगवा मुलींच्या या आगाऊपणाचा केला जातोय तोच आगऊपणा मुलांनी केल्यावर (त्याकाळी) त्याच्या पागोटय़ात मानाचा तुर्राच खोवला गेला. आमचा मुलगा म्हणजे बंदा रुपया, लाखात एक स्थळ, पन्नास मुली बघितल्यात. सुंदरच हवी, गोरी हवी, पैसेवाली हवी, कमवती हवी-वर घरादारातल्या माणसांचं तसंच सणवार करणारी हवी. माहेरच्या माणसांना पाठीमागच्या दारचे पाहुणे आणि वधू पक्षाला नगण्य मानणारा, लग्नात अनेक प्रकारांनी छळणारा वर पक्ष बघून आजच्या स्वकर्तृत्ववान मुलींनी मुलांसारखेच धडे गिरवले तर आजच्या वर पक्षाला ते मुळीच खटकायला नकोत! कारण जिथे अन्यायाची परिसीमा कोणत्याही बाबतीत ओलांडली जाते तिथेच हा बॅलन्स नसलेला समाज तयार होतो. म्हणूनच समाजाने मानसिकता बदलावी व स्त्रियांना घरादारात ‘सर्व’ बाजूने योग्य मानसन्मान द्यावा. तरच एक सकस समाज तयार होईल व पुढची समाजाची हानी टळेल.
– सुप्रिया गडवे, नागपूर.
..तर वाचनसंस्कृती वाढेल
शनिवार ६ जुलैच्या ‘चतुरंग’मधील सगळेच लेख चांगले आहेत. ‘एक समजूतदार गाव’मधील पुष्पा चौहान व ‘सुवर्णोत्सव ‘तिच्या’ अवकाश भरारीचा’ हे लेख विशेष उल्लेखनीय वाटले.
नव्याने सुरू झालेले ‘तेजस्वी शलाका’ हे सदर. कितीतरी कर्तृत्ववान स्त्रियांचे दर्शन या सदरातून होणार आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आपण सुरू करत आहात त्याबद्दल धन्यवाद.
असे वाटते अशा स्त्रियांवर जर दूरदर्शन मालिका दाखवल्या तर त्या स्फूर्तिदायक ठरतील. शाळांमध्येसुद्धा प्रत्येक वर्गामध्ये असे लेख वाचण्याचा १ तास ठरविला तर मुलांनाही वाचनाची गोडी लागेल, विशेषत: पालक व शिक्षक यांनी जर या गोष्टीमध्ये रस घेतला तर मुले नक्कीच वाचावयास उद्युक्त होतील व वाचनसंस्कृती वाढेल.
– निर्मला पेंडसे, नाशिक.
उद्बोधक लेख
२० जुलैच्या पुरवणीमधील ‘माताजीं’वरील रोहिणी गवाणकर यांचा लेख उद्बोधक आहे.
‘चित्रशाळेचे’ (पुणे) वासुकाका जोशी यांच्या चरित्रग्रंथात खालील उल्लेख सापडतात :
* खाडिलकर व वासुकाका नेपाळास गेले. माताजींच्या नेपाळमधील ओळखींमुळेच हे शक्य झाले. खाडिलकर कृष्णभटजी या नावाने नेपाळात राहिले.
* राजवाडय़ावर नवीन कौले घालण्याचे काम त्यांनी मिळविले व कौलांचा कारखाना काढला. त्यात छुपा उद्देश शस्त्रास्त्रे बनविण्याचा होता. वासुकाका लोकमान्य टिळकांचे परममित्र होते आणि खाडिलकर ‘केसरी’चे सहसंपादक होते. या उद्योगाला लोकमान्यांचा आशीर्वाद असला पाहिजे.
* काडतुसे बनविण्याचे यंत्र चार हजाराला जर्मनीहून आणवले. यात माताजींचा सहभाग होता.
* पुढे कटात सामील असलेल्या एका व्यक्तीकडून अजाणता गौप्यस्फोट झाला व सर्व बारगळले.
– प्रकाश शरच्चंद्र गोखले, दहिसर, मुंबई.