आरती अंकलीकर

‘आजचा लेख त्या जोडप्याविषयी आहे, ज्यांची मी जवळची साक्षीदार आहे. ‘सरला-मोहन’चं पंचकोनी कुटुंब.. पहिलंच मूल ‘डाऊन सिंड्रोम’ असलेलं, तर इतर दोन अपत्यं ‘नॉर्मल’. त्या दोन मुलांना त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खणखणीतपणे उभं राहायला मदत करत असतानाच वयाच्या ६० व्या वर्षी ‘लहानच’ असलेल्या आपल्या या मुलावर कायमच निरतिशय, निरपेक्ष प्रेम करत पालकत्वाचा आदर्श घालून देणाऱ्या, वयाची ८० गाठूनही ‘तरुण’ राहणाऱ्या सरला-मोहनविषयी.. ’

Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
pune crime news in marathi
पुणे : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांचे अपहरण, हडपसर पोलिसांकडून अपहृत वडिलांची १२ तासांत सुटका
Police solve problem of relationship between daughter mother and mothers boyfriend
मुलगी आणि प्रियकराच्या नात्यात अडकले आईचे मन, अखेर मुलीनेच…
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…

कर्नाटकात असलेलं धारवाड हे एक सुंदर शहर. ‘शहर’ आता झालंय. त्या वेळी मात्र शहर म्हणता येईल की नाही असं गावच होतं, लालबुंद मातीचं. सगळीकडे दाट हिरवीगार झाडी, कौलारू घरं, त्यांच्याभोवती गुलमोहोर, वड, पिंपळ, आंबा, फणस आणि कडुलिंब.
अशा धारवाडमध्ये एका टुमदार कौलारू घरात जमखंडी कुटुंब राहात असे. आण्णा जमखंडी जिल्हा न्यायालयात न्यायाधीश आणि त्यानंतर धारवाडमधले नामवंत वकील. त्यांच्या घरी मोठया मुलाच्या जन्मानंतर मुलीनं जन्म घेतला. घाऱ्या डोळय़ांची, गोरीपान सरला. धारवाड शहरामध्ये चुणचुणीत सरला वाढू लागली, शिकू लागली. गळा गोड, लवचीक होता सरलाचा. गळयामध्ये मुरक्या, हरकती छान येत असत. लहानपणीच गाणं शिकायला सुरूवात केली सरलानं. उत्तम गात असे, पण तालाला घाबरत असे! गुरुजींबरोबर तबलावादक दिसला, की खोलीत लपून बसत असे. तिची गाण्याची तालीम मात्र सुरूच राहिली. त्यानंतर कॉलेजमध्ये टेबल टेनिस चॅम्पियन झाली सरला. ‘लॉजिक’मध्ये तिनं सुवर्णपदक जिंकलं होतं. खूप बुद्धिमान, अभ्यासात हुशार, खेळातही उत्तम. विणकाम-भरतकामही सुंदर करत असे. जमखंडी कुटुंबाला निंबाळचे गुरुदेव रानडे यांचा अनुग्रह लाभलेला होता. त्यामुळे त्यांचं निंबाळला अनेकदा येणं-जाणं होत असे. एकदा गुरुदेवांची तब्येत बिघडली असताना त्यांना भेटायला जाताना आण्णा सरलालाही त्यांच्या ब्यूक गाडीत बसवून घेऊन गेले. परकर-ब्लाऊज, दोन वेण्या, घारे डोळे, कानात लोंबते डूल, गोरीपान सरला निंबाळला निघाली. तिथे उपस्थित असलेल्या विजापूरच्या एका साधकांनी आण्णांना विजापूरला येण्याची विनंती केली. तिथेसुद्धा सरला आण्णांबरोबर गेली.

हेही वाचा : कौटुंबिक जखमेवरची मलमपट्टी

विजापूरच्या घरात २५-३० मंडळी होती. सर्व वयाची माणसं. तिथल्या ५-६ तरुण मुलांपैकी एक मोहन. त्या दिवशी त्याचं लग्न सरलाशी ठरलं. सरलानं मोहनला नीट पाहिलंही नव्हतं. आण्णा जमखंडी आणि मोहनचे वडील या दोघांनी ठरवूनदेखील टाकलं लग्न; पण तो काळ वेगळा होता. १९५७ चं वर्ष. सरला १९ वर्षांची. ‘बी.ए.’चं एक वर्ष बाकी होतं तिचं आणि दोन-तीन महिन्यांत लग्न झालं. सरला आणि मोहन मुंबईला राहायला आले. मोहनला तिथे नोकरी मिळाली. मोहन अत्यंत प्रेमळ, पण रागीट. शीघ्रकोपी म्हणा ना! लवकर राग येत असे; पण थोडयाच वेळात मावळतही असे. रागाच्या आवेशात तोंडातून निघून गेलेल्या वाग्बाणाबद्दल माफी मागायलाही लगेच तयार होई मोहन. खूप माणसांच्या मोठया घरातून आलेले सरला-मोहन मुंबईच्या छोटयाशा फ्लॅटमध्ये राहू लागले. सरलानं ‘बी.ए.’ची पदवी मिळवली आणि त्यानंतर काहीच महिन्यांत राजूचा जन्म झाला. जन्मानंतर मुंबईच्या एका प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांनी त्याला पाहून सांगितलं, ‘‘तुमच्या मुलाला डाऊन सिंड्रोम आहे. ‘स्पेशल नीड्स चाइल्ड’ आहे हा. याच्यावर खूप प्रेम करा. याच्याकडून कधीही कोणतीही अपेक्षा करू नका. निव्र्याज, निरपेक्ष प्रेम करा. ते प्रेम करणं हेच तुमचं फळ असेल.’’ सरला-मोहनला त्या वाक्यांमधलं गांभीर्य, खोली त्या वेळी लक्षात आली असेल की नाही कोणास ठाऊक! राजू मोठा होऊ लागला आणि दीड वर्षांतच आरतीचा जन्म झाला. आरतीही वाढू लागली. काही महिन्यांतच सरलाच्या लक्षात येऊ लागलं, की आरतीची वाढ होतेय, त्या वेगानं राजूची वाढ होत नाहीये. आरती चालूदेखील लागली; पण राजू जेमतेम बसू शकत होता. आरती चुरुचुरु बोलू लागली, गाऊ लागली, सगळीकडे धावू लागली, खेळू लागली. हसरा राजू मात्र आरतीचा खेळ, तिच्या लीला बसून बघण्यातच खूश असे. जसजशी आरती वाढू लागली, तसतसं सरला-मोहनला आपल्यासमोर असलेली आव्हानं लक्षात येऊ लागली. राजूदादाची लहान बहीण आरती त्याची ‘ताई’ झाली नकळत! त्याची सुरक्षारक्षक, त्याची पालक, शिक्षिका आणि राजूच्या दरबारातली गायिकादेखील झाली आरती. घरातल्या प्रशस्त हॉलमध्ये राजू राजासारखा बसलेला असे त्याच्या दरबारात आणि त्याच्यासमोर बसून गाणारी दरबारी गायिका आरती!

हेही वाचा : नवीन वर्षांचे स्वागत करताना.. वेळेचे व्यवस्थापन : घटिका गेली.. पळे वाचवू..

आरती दोन वर्षांची झाल्यावर गोबऱ्या गालांचा, कुरळया केसांचा, सावळा, मोहक चेहऱ्याचा अरविंद जन्माला आला. सरला तीनही मुलांना वाढवण्यात, येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या पाहुणचारात रमली. राजूला रोज बोरीबंदरच्या शाळेत न्यावं लागे तिला ट्रेननं आणि संध्याकाळी त्याला घेऊन येत असे ती परत माटुंग्याला. आल्यावर आरती-अरविंदचा अभ्यास घेणं, आरतीकडून गाण्याचा रियाझ करून घेणं आणि अर्थातच स्वयंपाक. सरला मोठी सुगरण. बोरीबंदरहून घरी आल्यावर आरती-अरविंदला स्वयंपाकघरात बसवूनच त्यांचा अभ्यास घेत असे. कांदे, बटाटे, टोमॅटो, भेंडी, इतर भाज्या या सगळयाच्या सहाय्यानं गणितं शिकवत असे. मुलांच्या संगोपनात वेळोवेळी सरलाची बुद्धिमत्ता डोकावत असे. घरी डायनिंग टेबल होतं, सहा माणसं बसू शकतील एवढं. खूप मोठं नाही आणि खूप लहानही नाही. कॉलेजनंतर सरलानं थांबवलेलं टेबल टेनिस तिच्या फ्लॅटच्या डायनिंग रूममध्ये परत सुरू केलं तिनं! अभ्यास झाला, की त्याच टेबलाच्या मध्यभागी पुस्तकांचं नेट तयार होई आणि मग आरती-अरविंदच्या मित्र-मैत्रिणींसह सरलाचा टेबल टेनिसचा खेळ रंगत असे. आरतीचा रियाझ चाले दुसऱ्या खोलीत. तो रियाझ झाल्यानंतरच तिला टेबल टेनिस खेळण्याची परवानगी होती.

एका संध्याकाळी मोहन घरी आला. टेबल टेनिसचा खेळ रंगात आला होता. मित्र-मैत्रिणी जमा झालेले. आरतीही खेळत होती. मोहननं येताच तिला विचारलं, ‘‘रियाझ झाला का?’’ आरती म्हणाली, ‘‘नाही.. आज केला नाही.’’ मोहनला खूप राग आला. कोपऱ्यात ठेवलेली छडी त्यानं हातात घेतली आणि आरतीला त्याचा प्रसाद दिला. ‘‘उद्यापासून रियाझ केल्याशिवाय जेवण मिळणार नाही,’’ हा नवीन नियम सांगितला. आरती रडून झोपली आणि सकाळी उठून शाळेत गेली. मोहनही ऑफिसमध्ये गेला. संध्याकाळी मोहन ऑफिसमधून परत आल्यावर सरलानं मोहनचा डबा उघडून पाहिला, तर त्यात पोळी-भाजी तशीच होती. खाल्लाच नव्हता डबा मोहननं! सरलानं विचारलं, ‘‘काय हो, का नाही खाल्ला डबा आज? वेळ नाही का मिळाला?’’ तेव्हा मोहन म्हणाला, ‘‘काल आरतीला मारलं मी. त्याचं खूप दु:ख झालं मला. त्यामुळे डबा खावासाच वाटेना. चुकलं गं सरला माझं काल..’’ असा हा शीघ्रकोपी, पण हळवा मोहन.

आरती गाणं शिकू लागली, स्पर्धा जिंकू लागली, कार्यक्रम करू लागली, तशी मोठी विद्वान गायक मंडळी त्यांच्या घरी येऊ लागली. कधी सी. रामचंद्र, कधी प्रभाताई अत्रे, कधी माणिकताई वर्मा, पं. भीमसेनजी जोशी,
सुरेश वाडकर.. राजूला संगीताची प्रचंड आवड. सारखा रेडियो ऐकायला आवडत असे त्याला. रेडियोवर ‘कामगार विश्व’मध्ये मराठी गाण्यांचा कार्यक्रम तो कधीही चुकवत नसे. ‘गीतरामायण’देखील खूप आवडत असे राजूला. सुधीर फडक्यांचा मोठा चाहता तो! तसाच पं. भीमसेनजींचादेखील. त्यांची संतवाणी, पुरियाधनाश्री, पुरिया, अभोगी, अत्यंत आवडीनं ऐकत असे. शेकडो गाणी राजूला पाठ. अगदी त्या गाण्यांमधल्या संगीतासकट. लिहिण्या-वाचण्यात अजिबात रस नव्हता त्याला, पण संगीत समजून घेण्याची बुद्धी मात्र विलक्षण होती. (‘डाऊन सिंड्रोम’ असलेल्या बहुतेक मुलांना संगीतात खूप रुची असते हे नंतरही पाहतेय मी..) धाकटा अरविंद बारावीला होता, सायन्सला. त्याचा किचकट अभ्यास सरला घेत असे. ती कष्टाळूच. राजूला इतक्या दूर शाळेत न्यायचं, त्याचं संगोपन करायचं. त्याला वाढवणं अत्यंत आव्हानात्मक होतं. त्याच्या न होणाऱ्या प्रगतीत आनंद मानायचा, समाधान मानायचं. त्याचे बोबडे बोल.. अगदी तो २५ वर्षांचा झाला तरीही ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. अरविंदचा अभ्यास घ्यायचा, आरतीचा रियाझ.. आणि हे सगळं झाल्यावर रात्री रगडयावर (कानडीत त्याला ‘रुब्बू कल्ल’ म्हणत असे सरला!) इडलीचं पीठ वाटून (रुब्बून) उशिरा झोपणारी सरला आरती आणि अरविंदच्या अभ्यासासाठी पहाटे ४ वाजता उठून बसत असे. स्वेटर विणत.

हेही वाचा : शोध आठवणीतल्या चवींचा! : खांडोळीची भाजी ते घुळणा!

मोहन कडक शिस्तीचा होता. हिरवे मणी असलेला एक डबा मोहनकडे होता. १००-१५० मणी असावेत त्यात. (मागेही मी एकदा घरातल्या रियाझाच्या या शिस्तीबद्दल लिहिलं होतं.) तो डबा घेऊन आरतीसमोर मोहन बसत असे आणि तिच्याकडून तानांचा रियाझ करून घेई. सरला-मोहन राजूवर निरपेक्ष, नितांत प्रेम करत. त्यांचं राजूवर प्रेम करणं पाहणं हाही एक सुखानुभवच. राजू मोठा झाला. साठ वर्षांचा. त्याचं शारीरिक वय साठ. आरतीचं केव्हाच लग्न झालं. ती शास्त्रीय गायिका झाली. लोकप्रिय झाली. तिचा नवरा उत्तम अभिनेता आहे. मुलगीदेखील आहे आरतीला एक. राजू साठ वर्षांचा झाला असला, तरीही त्याचं बौद्धिक वय नऊ किंवा दहा वर्षांचंच असावं.. आणि ते आता वाढणारही नाहीये. तरीसुद्धा सरला-मोहन त्याला सगळीकडे घेऊन जातात, प्रत्येक गाण्याच्या कार्यक्रमाला. आरती जेव्हा राजूला सभागृहात येताना पाहते, तेव्हा त्याला खूण करून पहिल्या रांगेत बसायला सांगते. राजू खूप खुश होतो. पहिल्या रांगेत बसून गाण्याचा पुरेपूर आस्वाद घेतो, आनंद घेतो, दादही देतो. राजू ६० वर्षांचा झाला असला, तरी सरला-मोहन मात्र ९-१० वर्षांच्या राजूचे
३०-३२ वर्षांचे पालकच आहेत अजून. त्यांचं शरीर ८० वर्षांचं, पण मन ३० वर्षांचं. राजूनं त्यांना कायम तरुण ठेवलंय!

आरतीसारख्या हुशार मुलीचं पालकत्व निभावण्याचं मोठं काम सरला-मोहननं केलंच, पण त्याहूनही महत्त्वाची भूमिका राजूच्या पालकत्वाची. यशस्वी गायिकेच्या पालकांच्या भूमिकेइतकीच, किंबहुना जास्त महत्त्वाची भूमिका ती. त्याच्यावर नि:स्वार्थी-निरपेक्ष प्रेम करण्याची. अगदी त्याच्या प्रगतीची अपेक्षाही न ठेवता त्याच्या बोबडया बोलण्याचं, निरागसतेचं कौतुक वाटत-करत त्याच्यात ईश्वर पाहून जीवन आनंदात घालवणारे सरला-मोहन..!
aratiank@gmail.com

Story img Loader