डॉ. वृषाली किन्हाळकर

कवयित्री अमृता प्रीतम आणि चित्रकार इमरोज यांचं सहजीवन त्या काळातच काय, पण आताच्या काळातही समाजाला सहजासहजी मान्य होणार नाही अशा प्रकारचं! अमृता-इमरोज-साहिर या भरपूर चर्चिल्या गेलेल्या समीकरणापलीकडेही इमरोज यांचं अस्तित्व होतं. अतिशय प्रेमळ आणि मानवतावादी असं त्यांचं हे रूप फारसं कुणाला ज्ञात नाही. त्यांच्या निधनानंतर (२२ डिसेंबर, २०२३) अमृता-इमरोज या जगावेगळया प्रेमकथेस जरी पूर्णविराम मिळाला असला, तरी त्याचा हिस्सा असलेलं ‘इमरोज’ हे ‘बेनाम लोकगीत’ प्रेमाचे सूर आळवत राहील.. 

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता
loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’

अमृता प्रीतमजी गेल्यानंतर माझी आणि इमरोजजींची ओळख होण्याचा योग आला, साधारणत: २००८ मध्ये. माझी मैत्रीण- लेखिका उमा त्रिलोक यांच्या घरी ‘कवीगोष्टी’ कार्यक्रमात इमरोजजींना मी प्रथम पाहिलं. परिचय झाल्यावर त्यांच्या घरी भेटायला जायच्या दृष्टीनं मी त्यांना विचारलं, ‘‘आपका घर यहाँ से कितना दूर हैं?’’

 ‘‘देखो वृषाली, जहाँ जाना तय हुआ ना, फिर वो जगह दूर नहीं होती।’’.. मी त्यांच्याकडे बघतच राहिले होते!

 त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्यातल्या अत्यंत प्रेमळ, सरळ, स्वच्छ माणसाचं क्षणोक्षणी दर्शन होत राहिलं.

 अमृताजींच्या खोलीच्या दारावर  ‘परछाईयों को पकडनेवालों,

छाती में जलती आग की परछाई नहीं होती। ’ असं लिहिलेलं आहे.

शब्द अमृताजींचे, सुलेखन इमरोजजींचं.

आज, ते दोघंही नसताना मला ते शब्द जसेच्या तसे समोर दिसताहेत..

काय असेल बरं ती आग? आपण कल्पनाही करू शकत नाही.  समाजाला मान्य नसणारं नातं त्याच उत्कटतेनं अष्टौप्रहर, वर्षांनुवर्ष अम्लान ठेवायचं, ही गोष्ट काय सोपी आहे? कसं जमलं असेल हे इमरोजजींना? त्यांच्या नावाप्रमाणे ते सतत ‘आज’मध्येच जगले का? ‘इमरोज’चा अर्थच ‘आज’ असा आहे. या क्षणी काय करायचंय तेच मन:पूर्वक करायचं. पण एक दिवस, एक आठवडा, एक महिना, एक वर्ष, नव्हे तर चक्क पन्नासेक वर्ष! आणि इमरोज कधीच डगमगले नाहीत, हे सत्य.

त्यांना मी अनेक वेळा भेटले. तेव्हा त्यांचं वय ऐंशीपार होतं, तरीही मजेत कार चालवत यायचे. कार्यक्रमात मन:पूर्वक सहभागी व्हायचे. खाण्यापिण्याचा बाऊ नाही! अगदी आईस्क्रीमदेखील मजेनं खायचे. ‘‘उदासीवाली तबीयत ही नही हैं मेरी,’’ म्हणत मस्त हसायचे. एकदा एका मैत्रिणीच्या घरी आम्ही सगळे असताना मैत्रीण म्हणाली, की ‘‘माझी कामवाली बाई भांडी नीट ठेवत नाही. स्वयंपाक झाल्यावर आवरत नाही नीट!’’ तर ते पटकन म्हणाले, ‘‘वो अपनी जिंदगीसे मोहब्बत नही करती। शायद उसकी जिंदगी में उसे मोहब्बतही नही मिलती होगी।’’ आयुष्याला प्रेमाचं आणि स्वातंत्र्याचं अधिष्ठान असावं असं मानणारे होते ते. स्वतंत्रपणे चित्रं काढायला मिळावीत म्हणून त्यांनी कधी नोकरी पत्करली नाही. त्यांचे विचार फार स्पष्ट आणि मानवतावादी  होते. स्त्रियांबद्दलचे माझ्या व्यवसायातले अनुभव मी एकदा त्यांना सांगत होते, तर ते म्हणाले, ‘‘मर्द औरत के साथ सोने की इच्छा रखता हैं, लेकिन औरत के साथ कोई मर्द जागता नहीं हैं। मर्द औरत के साथ जागरण करेगा तो जिंदगी बेहतर समझ लेगा।’’ प्रजननाबद्दलची त्यांची मतं तर फार वेगळी होती. ते म्हणायचे, ‘‘खूप छान नियोजन करून, घर सजवून, स्वत: रंगीत, छान कपडे घालून पती-पत्नी दोघांनी अगदी काया-वाचा-मने आनंदात मुलं निर्माण करायला हवीत! हीदेखील एक पूजा आहे. पण तसं घडताना दिसत नाही. पुरुषांच्या देहाभिलाषेतून त्यांच्याही ध्यानीमनी नसताना मुलं पत्नीच्या उदरात वाढतात. यामुळे निर्माण होणारी मानवी पिढी कशी बरं भव्यदिव्य होऊ शकणार?’’ मग त्यांचीच एक कविता त्यांनी सांगितली होती-

‘ये रब का कोई तजरबा हो सकता हैं, करामात नहीं की बच्चा औरत का जिस्म पैदा करे, औरत नही

करामात होती तो औरत का, उसकी मर्जी का आदर होता

वो अपनी मर्जी से बच्चे पैदा करती।’

इमरोजजी धर्माबद्दल फार सुंदर बोलायचे. ‘‘धर्म इन्सान का स्वभाव होता हैं, मजहब वह कोई भी पहन ले, जियेगा वो अपना स्वभावही।’’ 

इमरोजजींचं शिक्षण तसं कमीच होतं. आर्ट स्कूलदेखील त्यांनी अर्ध्यावरच सोडलं होतं. ते म्हणायचे, ‘‘किताबे पढने से पढना लिखना आ जाता हैं, और जिंदगी पढने से जीना।’’

अमृता-इमरोज-साहिर या त्रिकोणाबद्दल वाचायला, ऐकायला, चर्चा करायला सगळयांनाच आवडतं; कारण ते अत्यंत सोपं काम आहे. साहिरसारखी प्रेम स्वीकारू न शकणारी, पण आयुष्यभर तळमळणारी माणसं असतील, अमृता यांच्यासारखं एकतर्फी प्रेम करणाऱ्या स्त्रियादेखील असतील; मात्र इमरोज कुठेच सापडणार नाहीत! ते एकमेवाद्वितीय, दुर्लभ.  इमरोज होणं फार फार अवघड आहे. चोवीस तास जिच्या सुखांचा विचार करून आपण तिला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतो, तिचा मुलगा मात्र आपल्याला मुळीच स्वीकारू शकला नाहीये, याचा कधीच त्रास इमरोजना झाला नसेल? नवज्योत हा अमृता-प्रीतम सिंह यांचा मुलगा. वडिलांप्रमाणेच तोदेखील कधी ठोसपणे काही अर्थार्जन करू न शकलेला. त्याची मुलं मात्र इमरोजजींच्या अंगाखांद्यावर खेळत मोठी झाली. अमृतांना मानसिक, आत्मिक बळ देणारी व्यक्ती म्हणजे एकमेव इमरोज! कधीच विचलित न होता, समाजमतांना न जुमानता, त्यांची लेखणी सदैव बहरत राहावी, यासाठी ते ‘अमृता’मय झाले होते.

ऐन तारुण्यात त्यांच्या जीवनात अमृताजी आल्या. त्या काळात जी अपार उत्कटता इमरोजजींना होती, तशीच, किंबहुना त्याहून काकणभर अधिकच उत्कटतेनं त्यांनी अमृतांना अगदी शेवटच्या    

क्षणापर्यंत प्रेमाधार दिला. शेवटी शेवटी सांधेदुखीच्या आजारामुळे यातनामय झालेलं होतं अमृताजींचं जगणं. अमृताजी क्षीण आवाजात विचारत, ‘‘तू माझा कोण आहेस रे?’’ इमरोज हसत उत्तरत, ‘‘मी तुझी आई आहे, मुलगी आहे, मुलगा आहे. माझी आई माझ्या बालपणीच गेली. तू आपल्या पहिल्या-दुसऱ्या भेटीतच मला माझ्या वाढदिवसाचा केक खाऊ घातलास. तेव्हा तू माझी आई झाली होतीस. तू कविता वाचून दाखवायचीस तेव्हा मी तुझा मित्र असायचो. मी तुझ्याशी प्रेमभरल्या गोष्टी करतो तेव्हा मी तुझा प्रियकर सखा असतो. आज मात्र तुला स्वत:च्या हातानं जेवण करणंही अवघड झालंय म्हणून मी तुझी आई होऊन तुला घास भरवतोय. जेव.’’ 

अगदी शेवटी इमरोजजींना अमृताच्या असह्य वेदना पाहून वाटायचं, की मी किती असमर्थ आहे, अमृताच्या वेदना मी वाटून घेऊ शकत नाहीये आणि म्हणूनच जेव्हा अमृतांनी शेवटचा श्वास घेतला, त्यानंतर इमरोजजींनी आपल्या अश्रूंना वाहण्याची परवानगी दिलीच नाही. जे मला जमलं नाही ते मृत्यूनं केलं म्हणून मृत्यूचेच त्यांनी आभार मानले. आणि स्वत:च्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत राहिले, की ‘‘उसने जिस्म छोडा हैं साथ नही।’’ आणि ते खरंच तसंच जगले. अमृताजींच्या नंतरच्या काळातला तो प्रसंग कुणीही गलबलून जावं असाच. मैत्रीण उमा त्रिलोकनं अनुभवलेला-  एके दिवशी त्या इमरोजजींच्या घरी गेल्या. पाहिलं, तर ते बॅग भरत आहेत. उमाजींना म्हणाले, ‘‘अमृता को नैनिताल लेकर जाता हूँ। लेकीन ठंड बहोत होगी,’’ असं म्हणत अमृतांच्या खोलीत जाऊन शाल घेऊन त्यांनी ती बॅगेत ठेवली. उमाजी थक्क झाल्या! दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला, तर सून अलकानं सांगितलं, ‘‘बाबाजी तो सुबह होते ही नैनिताल चल पडे।’’ नैनितालहून परतल्यावरदेखील इमरोजजी इतके सहज स्वाभाविक, की जणू जिवंतच आहे अमृता. आणि ते दोघं नैनितालला जाऊन आलेत. वास्तवातलं एकटेपण शब्दांत, डोळयांत कुठेच नव्हतं!  प्रेमभावनेचं हे केवढं अभंग रूप आहे!

त्यांची सून अलका फार प्रेमानं त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवायची. मी एकदा तिच्याशी बोलत होते, ती अगदी मनमोकळेपणाने म्हणाली, ‘‘मैं मंदिर मे जाकर पूजापाठ नही करती, बाबाजी के लिए जो भी करती हूँ पूजा वही हो जाती हैं।’’ मला जाणवलं, इमरोजजींच्या सहवासानं ती साधी बाईदेखील आयुष्याचा अर्थ समजून घेऊ लागली आहे. निखळ माणुसकी तिलादेखील समजते आहे.

त्यांचा नातू इंजिनीयर आहे, मुंबईत राहतो. त्यानं आजोबांना आयपॉड भेट दिला होता. निसर्गसुलभ कौतुकानं मला ते दाखवत होते. नव्या जगाशी, तंत्रज्ञानाशी ते छान जुळवून घेऊन जगायचे. उत्तम रंगांचे कपडे घालायचे. त्यांच्या वाढदिवसाला (२६ जानेवारीला) मी त्यांना फोन करायची, तर ते म्हणायचे ‘‘प्यार का तो हर रोज जन्मदिन होता हैं।’’

स्वातंत्र्याबद्दल ते म्हणायचे, ‘‘दुनिया मे हर जगह लोग स्वतंत्रता दिन मनाते हैं, झंडे लहराते हैं, लेकिन जिंदगी लहराती कही नजर नहीं आती । हर आदमीने दुसरे की स्वतंत्रता का आदर करना चाहिए, जिंदगी आदर माँगती है, और कुछ नही।’’रंगात-शब्दांत रमणारा हा माणूस, त्यांचं स्वत:चं एक जीवनविषयक स्वतंत्र तत्त्व होतं. त्यांचा सहवास मला खूप शिकवून गेला.

काय नाव द्यावं त्यांना?

त्यांच्याच शब्दात सांगते,

‘मैं एक लोकगीत, बेनाम

हवा मे खडा, हवा का हिस्सा,

जिसको अच्छा लगे याद बना ले

अपना ले,

चाहे तो गा ले।’

हे दुर्मीळ लोकगीत युगानुयुगे ऐकलं जाईल..

sahajrang@gmail.com

Story img Loader