देवेंद्र गावंडे

हतबल, हरलेला शेतकरी आत्महत्या करतो; त्याची विधवा मात्र त्याच परिस्थितीत ताठ मानेने जगायचा प्रयत्न करते. पण आज ३५ वर्षांनंतरही सरकारदरबारी आत्महत्या हीच दखलपात्र बाब ठरते आणि शेतकऱ्याच्या विधवेचे आयुष्य अदखलपात्रच राहते. त्यांना संघटित करून ठोस आर्थिक मार्ग शोधणे आणि त्यांचा मान-सन्मान टिकणे गरजेचे आहे, कारण आजही दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि त्यांच्या विधवा अदखलपात्र होतच आहेत..

Atul Subhash Suicide
Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
Magnav taluka , Four people drowned, Kundalika river,
रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

वैशाली येडे, यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील निरझडा गावातली शेतकरी विधवा. ही तीच वैशाली, जिच्या हस्ते काही वर्षांपूर्वी यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले होते. यासाठी पुढाकार घेतला होता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम फाऊंडेशन’च्या स्थानिक स्वयंसेवकांनी.

यामागे उद्देश होता, की विदर्भ आणि मराठवाडयात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरच्या काळात अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या विधवांच्या प्रश्नाकडे लक्ष जावे. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. जेव्हा प्रातिनिधिक स्वरूपात वैशालीची निवड करण्यात आली, तेव्हा ती सासरी चक्क गोठयात राहत होती. ‘तुझ्यामुळे आमचा मुलगा मेला. तूच पांढऱ्या पायांची. तुझा अवगुण लागला,’ हे सासरच्यांचे टोमणे तिच्या वाटयाला गोठयातले जीवन घेऊन आले होते. ‘नाम’चे लोक तिच्या घरी पोहोचले, तेव्हा उद्घाटनासाठी मंचावर शोभतील असे कपडेही तिच्याकडे नव्हते. अखेर याच स्वयंसेवकांनी धावपळ करून नवीन साडी आणून दिली. संमेलन संपेपर्यंत वैशाली थोडीफार चर्चेत राहिली. गावातील मुलींसाठी अत्युच्च शिक्षण म्हणजे बारावी. तेवढेच शिकून शेतात राबणाऱ्या वैशालीला माध्यमांसमोर बोलण्याचा, व्यथा मांडण्याचा सराव नव्हताच. त्यामुळे थोडयाफार प्रसिद्धीच्या पलीकडे तिच्या आणि या समस्येच्या हाती काही लागले नाही. संमेलन संपताच पुन्हा गोठाच तिच्या जगण्याचा आधार बनला. समाजाच्या नजरेतून वैशाली विस्मृतीत गेली, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे राजकारण करण्यात पटाईत झालेल्या राजकारण्यांकडून नाही. याचा प्रत्यय तिला लगेच वर्षभराने आला. कायम चमकोगिरीलाच राजकारण मानणाऱ्या बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ पक्षाने वैशालीला थेट लोकसभा लढण्याची गळ घातली. ही २०१९ ची गोष्ट. तिने नकार देताच कडूंच्या कार्यकर्त्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना पटवले. पूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शवली. पैशाचा मुद्दा येताच सारे झटकन तयार झाले. सासरचे लोक तिच्याशी गोड बोलू लागले. गोठयातून तिला घरात आणले गेले. निवडणूक हरो की जिंको, किमान यामुळे तरी सगळे सन्मानाने वागवतील या आशेने वैशाली मैदानात उतरली. बच्चू कडूंनी या उमेदवारीचा नेहमीप्रमाणे मोठा गाजावाजा केला. शेतकऱ्यांच्या, विधवांच्या प्रश्नांवर आपण कसे कटिबद्ध आहोत हे वारंवार सांगितले. प्रत्यक्ष रिंगणात उतरल्यावर वैशालीच्या मदतीला ‘प्रहार’चे मोजके कार्यकर्ते वगळता कुणी धावून आले नाही. पुरुषकेंद्री समाजाला यात केवळ नाटय़ दिसले, व्यथा नाही. परिणामी वैशालीचा प्रचार अर्ध्यातच थांबला. अपेक्षेप्रमाणे तिची अनामत रक्कमही जप्त झाली. दुसरीकडे कडूंच्या पक्षाने या कृतीचा भरपूर फायदा उठवला. त्याची नायिका असलेल्या वैशालीशी त्यांना काही घेणेदेणे नव्हते हे नंतर वारंवार सिद्ध होत राहिले. निवडणूक हरताच सासरच्यांनी पुन्हा वैशालीकडे पाठ फिरवली. घराऐवजी पुन्हा तिच्या नशिबात गोठा आला. राजकीय मुद्दा म्हणून जिचा आपण वापर केला तिचे किमान आयुष्य तरी सुखकर करावे असे ‘प्रहार’ला वाटले नाही. आपण केवळ वापरले गेलो या भावनेने ती आणखी खचत गेली. अखेर ‘नाम’च्या कार्यकर्त्यांनी तिच्यासाठी वर शोधणे सुरू केले. त्यात त्यांना एक समजूतदार बिजवर भेटला आणि वैशाली नव्याने संसार थाटण्यासाठी परगावी निघून गेली. आजही ती शेतीच करते, तीही नवऱ्याच्या संगतीने. किमान याने तरी आत्महत्या करू नये, असा धावा देवाजवळ करत!

राज्याच्या कापूसपट्टयात वैशालीसारख्या अंदाजे ३० हजार विधवा आहेत. यातल्या प्रत्येकीची कथा वेगवेगळी असली तरी त्यातला समान धागा आहे तो जगण्यातील दु:खाचा. प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे हे केवळ बोलण्या-लिहिण्यापुरते उरलेले मूल्य. या विधवांच्या जगण्यातून हा सन्मानच हरवलाय. तो देता यावा यासाठी ना समाज प्रयत्न करत, ना सरकार. सारेच असंवेदनशीलतेच्या जातकुळीतले. सरकारी पातळीवर तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हीच दखलपात्र बाब समजण्याचा रिवाज पडून गेलेला. पण त्याच्या मृत्यूनंतर त्या विधवेला काय यातना सहन कराव्या लागतात याच्याशी सरकारला काही देणेघेणेच नाही, ही समस्या उद्भवून आज ३५ वर्षे होत आली तरी.

यवतमाळचीच मंदा अलोणे ही आणखी एक अभागी स्त्री. ‘भोंडया कपाळाची’ म्हणून गावभर हिणवली गेलेली. तिची कथाही अशीच विलक्षण, पण त्याचा शेवट इतर विधवांना प्रेरणा देणारा. नवऱ्यानं आत्महत्या केल्यावर तिचा सासरी छळ सुरू झाला आणि त्याचा शेवट झाला तिला घराबाहेर काढण्यात. दोन मुलांना घेऊन ती एका झोपडीत राहू लागली. घर सोडले, पण तिने शेतीवरचा हक्क जाऊ दिला नाही. त्यासाठी ती लढली. अखेर त्याच शेतीच्या बळावर तिने दोन्ही मुलांना शिकवले. ती विधवा होऊन आज अठरा वर्षे झाली. तिची मुलगी अभियांत्रिकीची पदवी मिळवून आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते, तर मुलगा ‘आयटीआय’ झालाय. ज्या शेतीने नवऱ्याला कर्जबाजारी केले, जीव घेतला, तीच शेती मंदाचा आधार बनली. जे पुरुषाला जमले नाही ते एका स्त्रीने करून दाखवले, म्हणून समाजाने तिचे कौतुक करायला हवे होते. ते तर वाटयाला आलेच नाही. आली फक्त अवहेलना आणि पुरुषांच्या ‘भुकेल्या’ नजरा. बाजार समितीत माल घेऊन जाताना, तिथे क्रमांक लागेपर्यंत वाट बघताना याचा सामना तिला सतत करावा लागला. पण मंदाने हार न मानता जिद्द कायम ठेवली. दरम्यान याच काळात काळाचे फासे उलटे पडायला लागले. ज्या सासूसासऱ्यांनी मंदाला घरातून हाकलून दिराला घराची सूत्रे दिली, त्यानेच त्यांना घराबाहेर काढले. ते पांढरकवडयाच्या रस्त्यावर भटकताहेत असे कुणी तरी सांगताच कसलीही कटुता न ठेवता मंदाने त्यांना घरी आणले, आधार दिला. आज मंदा ४५ वर्षांची आहे. विधवा म्हणून जगतानाची कुतरओढ थोडी कमी झाली असली तरी तिचा संघर्ष अजून संपलेला नाही. आणि तो कधी संपेल याची कुणीच खात्री देऊ शकत नाही. 

कविता ढोबळे ही विधवा देखील संघर्ष करत आता  एकल महिलांच्या चळवळीतली आघाडीची कार्यकर्ती झाली आहे. तिने स्वत: शेती केली आणि ग्रामपंचायतीच्या राजकारणात, ग्रामविकासाच्या चळवळीतही पुढाकार  घेऊन स्वत:ला सिद्ध केलं.

ग्रामीण भागात मुलींची लग्ने अल्पवयात होतात. त्यातही त्यांना एक-दोन मुले झालेली असतात. या काळात जर त्यांच्या नवऱ्याने आत्महत्या केली, तर अशा तरुण विधवेचे जिणे समाज असह्य करून सोडतो. या समाजाच्या व्याख्येत सारे आले, घरचे आणि बाहेरचेसुद्धा. वर्ध्यातील अलकाला (बदललेले नाव) तर थेट दिराच्याच मुलाने संबंध ठेव म्हणून जबरदस्ती केलेली. त्याचा पिच्छा सोडवता सोडवता तिची इतकी दमणूक झाली की सांगायची सोय नाही. राळेगावातील एकीला बस स्थानकावर गेली की लोक ‘थेट’ विचारायचे. असे प्रसंग सासरी सांगितल्यावर होणारा जाच पुन्हा तिलाच. पावडर, कुंकू लावायचे नाही. चांगली साडी नेसायची नाही. मुख्य म्हणजे चांगले दिसायचे नाही. जाचातल्या या अटींची पूर्तता करता करता या विधवा त्रासून जातात. अनेकदा तर जीव द्यावासा वाटतो, पण पदरच्या लेकरांकडे बघून तीही हिंमत होत नाही. नागपूरजवळ रामटेकच्या एका विधवेने शेती नावावर करून मागितली. सासरच्यांनी त्याला नकार दिला. पुढे हा वाद इतका वाढला की एकमेकांच्या तक्रारी सुरू झाल्या. यात अख्खे गाव उभे राहिले ते सासरच्या बाजूने. एक विधवा विरुद्ध शेकडो गावकरी अशी लढाई सुरू झाली. तरीही ही स्त्री हार मानत नाही हे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी चेटकीण ठरवून तिची धिंड काढली. माध्यमांतून याचा गवगवा झाल्यावर प्रशासन हलले. इतर ठिकाणचे कार्यकर्ते मदतीला धावले. दबाव वाढताच सासरच्यांनी माघार घेतली आणि शेती नावावर करून दिली. आज ती उत्तम पद्धतीने शेती करते. भाजीपाला पिकवते, मुलांना सांभाळते. मात्र गावकरी पराभव विसरले नाहीत. येता-जाता त्यांचे टोमणे सुरूच असतात. एकटया स्त्रीसाठी हे जगणे किती कठीण असते याचा अनुभव ती रोज घेते.

‘नाम’ फाऊंडेशनने यातील काही विधवांना किराणा दुकान थाटून दिले, काहींना शेळयामेंढया दिल्या. याच माध्यमातून पशुपालनात उतरलेल्या वर्ध्यातील एका विधवेने चारच्या आठ शेळया होताच त्यातल्या दोन त्याच गावातल्या दुसऱ्या विधवेला दिल्या. असे औदार्य केवळ संकट झेलणारी स्त्रीच दाखवू शकते.

केवळ ‘नाम’च नाही, तर आणखीही बऱ्याच संस्था या कापूसपट्टयात विधवांसाठी काम करतात. त्यातल्या काहींनी या विधवांचे पुनर्विवाह घडवून आणले, पण हे प्रमाण एकूण संख्येच्या तुलनेत अगदीच अत्यल्प. सध्या राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे विधवांच्या संख्येत रोज सातने भर पडते. गेल्या २५ वर्षांपासून शासन अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबाची दखल घेत  त्यांना एक लाख रुपयांची मदत देते, तीही ती आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरली तर. हे पात्रतेचे प्रमाण साठ टक्क्यांच्या आसपास. म्हणजे चाळीस टक्के कुटुंबांना काहीही मिळत नाही. ज्यांना ती मिळते, त्या कुटुंबांतील विधवेच्या नावाने सरकारी धनादेश निघतो, तोही ३० हजारांचा. उर्वरित ७० हजार मुदत ठेवीच्या स्वरूपात मिळतात.

या ३० हजारांसाठी अनेकदा सासरच्यांकडून विधवेचा अक्षरश: छळ केला जातो. अनेकदा तर ‘व्रिडॉवल स्लिप’वर तिची स्वाक्षरी आधीच घेतली जाते. यातून प्रामुख्याने तिच्या नवऱ्याच्या तेराव्याचा खर्च भागवला जातो. तीन महिन्यांनी ठेवीचे उर्वरित पैसे तिच्या खात्यातून काढून खर्च झाले की तिचा छळ सुरू. ‘आमचा मुलगा असा नव्हता, तुझ्यामुळेच त्याला व्यसन लागले, त्यातून शेती बुडाली आणि तो मेला. आता तू घर सोडून निघून जा.

मुलांनाही घेऊन जा. तुला पोसण्याची जबाबदारी आमची नाही. शेतीवरचा तुझा हक्क आता गेला,’ हे तिला ऐकावे लागते. दुसरीकडे माहेरचे दारसुद्धा तिच्यासाठी कधीचेच बंद झालेले असते. अशी सर्व बाजूंनी कोंडी झाल्यावरही तिला जगण्याचा निर्धार कायम ठेवावा लागतो, तोही केवळ मुलांसाठी. अशा विधवांची संख्या आज झपाटयाने वाढत असताना सरकारच्या लेखी अजूनही ही समस्या नाहीच. त्यांच्या दृष्टीने आत्महत्या हीच समस्या. या विधवांसाठी काही ठोस करायला हवे हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नसेल का?

या विधवा संघटित नाहीत. त्या संघटित झालेल्या समाजाला आवडणारे नाही. त्यामुळे कायम कुचेष्टा, बदनामी, अपमान त्यांच्या वाटयाला येतो. यात नुसता सरकारला दोष देऊन चालणार नाही. पुरुषसत्ताक समाजाचा दोषही तेवढाच मोठा. यांचे जगणे अजून व्यवस्थेने स्वीकारलेलेच नाही. या हिवाळी अधिवेशनात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करा अशी मागणी केली गेली, पण कुणीही या विधवांचा मुद्दा उचलला नाही. विधिमंडळात मोठया संख्येने स्त्री आमदार असूनसुद्धा! संघटित नसलेल्या या विधवा मोर्चे काढून स्वत:च्या मागण्यांकडे लक्ष वेधू शकत नाहीत. त्यांचे जगणे ग्रामीण समाजासमोर भेडसावणारा मोठा मुद्दा. पण तो कुणी मान्यच करायला तयार नाही. नवरा जीव देऊन मोकळा झाला; पण या विधवांनी कधी जीव दिला नाही. जिद्दीने त्या समाज आणि व्यवस्थेशी दोन हात करताहेत.

राहुल गांधींनी कलावती या विधवेची भेट घेऊन या विषयाला वाचा जरूर फोडली. तेव्हाही आत्महत्या हाच मुद्दा चर्चिला गेला, विधवांचा नाही. त्यालाही आता १७ वर्षे होत आलेली. मात्र या ‘पांढऱ्या कपाळाच्या’ म्हणून कायम हिणवल्या गेलेल्या स्त्रियांचे दु:ख कायम आहे; नव्हे त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे.

जगण्याची जिद्द दाखवणाऱ्या या विधवांसाठी काही करावे असे समाजालाही वाटत नाही. आदर्श कुटुंबव्यवस्था आणि प्रगतीचे गोडवे गाणाऱ्या समाजासाठी या विधवांचे जिणे किमान दखलपात्र तरी होणे गरजेचे. त्यासाठी गरज आहे ती पुरुषी दृष्टिकोन त्यागण्याची. त्याची तयारी समाज दाखवत नाही आणि सरकारच्या लेखी तर अद्याप हा प्रश्नच नाही.

devendra.gawande@expressindia.com

(शेतकरी-विधवांची ज्वलंत समस्या मांडणाऱ्या ‘तेरवं’या नाटकाचा हा चमू.)

Story img Loader