मी फक्त ज्येष्ठांच्याच बाजूनं लिहीन की काय, अशी भीती वाचकांना सुरुवातीला वाटली होती. मला फक्त
वृ त्तपत्रांसाठी साप्ताहिक/ पाक्षिक सदरं लिहिणं, त्यातही ‘लोकसत्ता’च्या आठवडी पुरवणीसाठी सदर लिहिणं हे माझ्यासाठी नवीन नाही. २००० सालात ‘अशी घरं अशी माणसं’ आणि २००९ मध्ये ‘पण बोलणार आहे..’ ही दोन साप्ताहिक सदरं मी ‘लोकसत्ता’साठी लिहिली होती आणि त्या वेळी ती चांगली वाचली गेली होती. ‘लोकसत्ता’चा वाचक किती सुजाण आहे, किती दूरवर पसरलेला आहे याचा अनुभव त्या वेळी मी घेतला होता. ‘जुनी विटी नवं राज्य’ लिहिताना त्याचा आधार वाटत असला तरी साशंकता होती. याचं कारण रूढार्थानं ‘घिसापिटा’ वाटणारा त्याचा विषय. ‘जनरेशन गॅप’ या विषयावर अखंड लिहिणं, बोलणं सुरू असतं. जगणाऱ्या प्रत्येकाला (यात विचारपूर्वक जगणं गृहीत आहे.) पिढय़ांचा तिढा कधी ना कधी जाणवल्याशिवाय राहात नाही. सहसा आपली पिढी ‘सफर’ म्हणजे सोसणारी आहे, इतर पिढय़ांचं आलबेल होतं किंवा आहे, आपल्या पिढीचा दोन्हीकडून मृदुंग झाला आहे किंवा ‘सँडविच’ झालं आहे, असं प्रत्येक पिढीला वाटतं. ‘आत्मानुकंपा’ ही सर्वात लोकप्रिय भावना असल्यामुळे आम्ही हालअपेष्टांत जगलो, पुढच्यांना सगळं कसं छान छान आयतं मिळतंय असं म्हणणारा जीव साहजिकच मनोमन सुखावतो. एका मर्यादेपुढे ‘आयतं मिळणं’ यातही वेगळे हाल असू शकतील हा मुद्दा अशा वेळी लक्षात येत नाही. करता करता आपल्याखेरीज इतर पिढय़ांना दूषणं देणं, नावं ठेवणं, दोषारोप करणं किंवा आपलं म्हणणं त्यांना समजणारच नाही असं म्हणून (मनात तणतणत) वरकरणी गप्प राहणं याकडे मंडळी वळतात. मला तो मोह तुलनेनं कमी पडतो. लेखक म्हणून आणि माणूस म्हणूनही समोरच्याची बाजू समजून घ्यायला आवडतं. जगणाऱ्या प्रत्येकाचं काही ना काही ‘रॅशनेल’ असतं, तर्कप्रणाली असते यावर माझा ठाम विश्वास आहे. भले ती एकारलेली असेल, सदोष असेल, धूर्त-चलाख असेल किंवा अगदी तर्कशून्यही असेल. पण ती शोधण्याचा, समजून घेण्याचा माझ्या परीनं मी प्रयत्न करते. ‘जुनी विटी..’ लिहितानाही हाच प्रयत्न जारी ठेवला. म्हणूनच कदाचित याला सर्व पिढय़ांकडून कमीअधिक प्रतिसाद मिळत गेला.
माझं खरं वय आणि लेखकीय वय ज्यांना माहीत होतं, आहे त्यांना मी फक्त ज्येष्ठांच्याच बाजूनं लिहीन की काय, अशी भीती सुरुवातीला वाटली होती. मला फक्त म्हाताऱ्यांच्या रडकथा लिहायच्याच नव्हत्या. गेल्या अर्धशतकाच्या काळातलं मध्यमवर्गीय मराठी माणसाचं जगणं-वागणं-त्याचे आधार आणि त्याच्यावर झालेले आघात हे मी प्रत्यक्षात आणि साहित्यातून बघत आणि वाचत आले आहे. त्याचा हा एक जिताजागता अंश आहे. अनेक प्रकारच्या उणिवा-वंचना-विवंचना यांच्या दाटीवाटीतून कशीबशी आयुष्याची ‘नैया पार’ करू शकलेली माझ्या आजी-आजोबांची पिढी नकळत्या वयात माझ्या डोळय़ांपुढून सरकली. इंडियाचा भारत करण्यासाठी जिवाच्या आकांतानं झुंजलेली माझ्या आई-वडिलांची पिढी मी जाणतेपणानं पाहिली आणि आता पुनश्च भारताला ‘इंडिया’ मानून जगणारी माझ्या पुढची पिढी मी झेलते आहे. दरम्यान, सुराज्य-सुराज्य, उदारीकरण-चंगळवाद-व्यक्तिवाद यांसारख्या शब्दांचे-त्यांच्यामागे दडलेल्या वास्तवाचे चटकेफटके खाताना तावूनसुलाखून निघालेही आहे. या ‘मी’मध्ये नकळत अनेक ‘आम्ही’ सामावलेले आहेत. त्यातल्याच काहींनी ‘आपण’ बनून या सदराला प्रतिसादही दिलेला आहे. पुढच्या पिढीच्या नव्या राज्यातला भावनिक कोरडेपणा आपल्याला असहय़ वाटतो, कितीही प्रयत्न केला तरी आपण ‘आपल्या’ पुढच्या पिढीबरोबर दररोज एकत्र राहू शकत नाही हे ‘आपलं’ दुर्दैव आहे, ‘कम्युनिटी लिव्हिंग’ काळाच्या ओघात गडप झालं की काय, आपला ‘जपण्याचा जप’ बरोबर होता, की पुढच्यांचा ‘बादचा ‘नाद’ बरोबर आहे हेच कळत नाही, ‘रोमान्स’ची कल्पनाच मुळापासून बदलली आहे का, या काही मुद्दय़ांवर (म्हणजेच ते हाताळणाऱ्या सदराच्या भागांवर) त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याचं मला आश्चर्य वाटलं नाही. पण अनेक तरुण वाचकांनी विशेषत: मुलांच्या जडणघडणीबद्दलच्या काही लेखांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला हय़ाचं मला सुखद आश् चर्य वाटलं. एका पिढीनं आपल्या मुलांमधून दणकट प्रॉडक्ट घडविण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं, त्या मानानं आजचे पालक मुलांचं आकर्षक पॅकेज बनविण्यावर जास्त भर देताहेत की काय, अशी शंका मी उपस्थित केली होती. तिला तरुण पालकांनी मोठी दाद दिली. एकमेकांना हा लेख वाचायला सांगितला. फेसबुकवर त्यातली काही वाक्यं उद्धृत केली तर परदेशस्थ युवकांनी माझ्या एक-दोन लेखांच्या लिंक्स इतर वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्या. ‘भाषिक रुजवण’ या लेखाला खूप प्रतिसाद होता. आपल्या पुढच्या पिढय़ा आपल्या मातृभाषेपासून तुटताहेत ही खंत अनेकांना वाटत असावी हे त्यातून जाणवलं. आज ८०च्या घरातल्या आई-वडिलांकडे त्यांची साठीच्या घरातली ‘मुलं-मुली’ बघतात तेव्हा ते श्रावणबाळ नसून ‘श्रावण बाळासाहेब’ असतात ही कल्पना, हा शब्दप्रयोग खूप लोकांनी उचलला आणि आपली किंवा आपल्या घरातल्या कोणाची ‘श्रावण बाळासाहेब’ झाल्यावर कशी फरफट उडते हे पोटतिडिकीनं सांगितलं. आज एकाच कुटुंबातलं, एकाच आईबापाचं एखादं मूल स्वदेशात तर दुसरं परदेशात स्थिरावतं, त्यातून त्यांच्यात जे छुपे तणाव येतात, कौटुंबिक हक्क आणि जबाबदाऱ्या यांच्या वाटपाबाबत जो गोंधळ उडतो तो दाखवणाऱ्या एका लेखाला परदेशातल्या वाचकांनी खूप प्रतिसाद दिला.
आजच्या गढूळ कुटुंबजीवनामागे असा ‘परकीय शक्तीचा ‘हात’ खरोखरच आहे असं कबूल करतानाच ‘या विचारसरणीतला दोष आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू,’ असंही म्हटलं. हे मला हृद्य वाटतं. ‘हा एखाद्या कादंबरीचा विषय होऊ शकतो,’ असं कवी अशोक नायगावकर यांनी म्हटलं, तर ‘तुम्ही गप्पाटप्पांमध्ये महत्त्वाचे सामाजिक विषय हाताळता आहात,’ असा एसएमएस प्रभा गणोरकर यांनी पाठवला. प्रसिद्ध लेखक नंदा खरे, विजय पाडळकर, तत्त्वज्ञ डॉक्टर (आम्ही ‘लोकसत्ता’चे स्तंभ लेखक) डॉ. रवीन थत्ते, लता रेळे यांसारख्या ज्येष्ठांनी काही लेखांचं स्वागत केलं, तर ‘या लेखात नवीन काय होतं?’ किंवा ‘तरुणांचं इथं इथं चुकतंय असं खणखणीतपणे म्हणा की बाई,’ अशा प्रकारच्या टाचण्या लावून कोणी कोणी आमचं विमान उगाच उडणार नाही याची खात्री करून घेतली.
माझ्यासाठी अनेकदा वाचकांनी हौसेनं पुढे हाताळावेत असे मुद्दे किंवा विषय सुचवले. फॅमिली डॉक्टर संस्कृती, स्पेशालिस्टांचा जमाना, कोपऱ्यावरचा वाणी, चौकातला सतरंगी मॉल, एकेकाळचं अल्प आयुष्य, आजचं अतिदीर्घ आयुष्य यातून निर्माण झालेले प्रश्न वगैरे वगैरे. खरं तर माझ्या मनातले सगळे मुद्देही मला संपवता आले नाहीत. सदराची कालमर्यादा आड आली. अर्धेकच्चे लिहून सोडलेले किंवा पुढय़ात न घेता आलेले काही विषय अन्यत्र कधीतरी कुठेतरी लिहिण्याची उमेद मी बाळगून आहे. ‘बचेंगे तो और भी लिखेंगे,’ असं म्हणायला हरकत नसावी.
त्यातल्या त्यात दोन सविस्तर प्रतिक्रिया आवडल्या, लक्षात राहिल्या. कारण नकळतपणे त्या या पिढय़ांच्या संघर्षांचा सारांशच सांगणाऱ्या होत्या. म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख करते. ‘नियमावर बोट अन्..’ या लेखाच्या संबंधात नेहमीच्या वाचक (आणि आडनाव भगिनी) मेधा गोडबोले यांनी माझ्यापुढे कबीराचा दोहाच ई-मेलद्वारे ठेवला. तो म्हणाला होता-
तेरा मेरा मनवा एक कैसे होई?
तू कहता कागज की लेखी। मै कहता अंखियन की देखी।।
कागदावरचा करार-लेख-अटी-नियम म्हणूनही एखादा व्यवहार करता येतो आणि मनाच्या डोळय़ांनी त्याचा गहिरा तळ गाठण्याचा प्रयत्नही करता येतो. एकेकाळची (कदाचित अतिरेकी) भाबडी भावुकता आणि नव्या राज्यातला (हाही कदाचित अतिरेकी) रोखठोक रूक्षपणा हा सरळ सरळ या दोन दृष्टिकोनांचा परिणाम आहे. मात्र ‘मनवा एक कैसे होई?’, असा नुसता प्रश्न विचारून जगता येत नाही. सामंजस्यानं, सामोपचारानं तो एक करण्याच्या दिशेनं पावलं टाकावी लागतात किंवा निदान आपण अमुक टप्प्यापर्यंतच एकत्र जाऊ शकू हे स्वीकारावं लागतं आणि त्यापुढच्या ज्याच्या त्याच्या वेगळय़ा वाटांचा आदर करावा लागतो.
इंजिनीअरिंग क्षेत्रातले वाचक प्रकाश धामणगावकर यांनी याच वास्तवाचा एनर्जी इंजिनीअरिंगची भाषा वापरून वेध घेतला. पूर्वीपेक्षा गेल्या २५-३० वर्षांमध्ये फार झंझावाती वेगानं बदल झाल्यानं दोन पिढय़ांचं सहजीवन अवघड झालं हे सांगतानाच हा प्रश्न शेवटी ‘ग्रोथ अगेन्स्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा’ आहे, असं त्यांनी ई-मेलद्वारे म्हटलं. त्यांचे नेमके शब्द असे आहेत-
The real issue in last 15 years is whether we are achieving growth or sustainable development?ढोबळमानानं या शब्दांचा अनुवाद मी ‘वाढ’ आणि ‘विकास’ असा करेन. काळाच्या ओघात माणसांजवळचा पैसा-साधनसामग्री, उपलब्धी ज्या प्रमाणात फोफावल्या त्या प्रमाणात जीवनाचा दर्जा वाढला का? माणसांचं आंतरिक बळ, नाना कौशल्यं, नेकी, इमान वाढलं का? हा प्रश्न अनेकदा पडतो. याला व्यत्यास नाही. नाहीतर मग आपण पुन्हा नव्यानं ‘धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती’ असं मानण्याची भावनिक चैन करायला लागू. कोणत्याही विचारी माणसाला ते पटणार नाही. एका पिढीला सतत वाढीवरची बंधनं सोसावी लागली. नाना अडचणींतून वाट काढावी लागली. दुसऱ्या पिढीला चौफेर वाढीचा, विकासासाठी उपयोग कसा करता येईल हे आव्हान आहे. ‘दो आरजू में कट गये, दो इंतजार में, या चालीवर कोणी अडचणींमध्ये बुडून गेलं आणि कोणी संपन्नतेत गटांगळय़ा खाल्ल्या असं व्हायला नको असेल तर सगळय़ांनाच आपापल्या पाटय़ा तपासून पाहाव्या लागतील आणि दुसऱ्याच्या पाटीवरचं वेगळं-चांगलं, पूरक आढळलं तर ते उमदेपणानं उचलावंही लागेल. याची निदान विचारांच्या पातळीवर सुरुवात व्हावी, विचाराला चालना, गती मिळावी इतकीच माफक अपेक्षा होती. ती काही प्रमाणात साधली असेल तर ‘इतकं यश तुला रग्गड,’ असं म्हणायला मी मोकळी!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा