रोगनिदान चाचण्या या आपल्या तब्येतीचे आरसे असतात. त्यांच्याद्वारे या साडेतीन हात मानवी देहात काय बरेवाईट घडते आहे, याचा अंदाज येतो. सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआय स्कॅन या गोष्टी गेल्या दशकात एवढय़ा आमूलाग्र सुधारलेल्या आहेत, की गर्भावस्थेतील बाळाचे जन्मजात आजार ओळखून गर्भावस्थेतच त्यावर उपाययोजनासुद्धा या यंत्रणांमार्फत करता येत आहेत. पण प्रत्येक चाचणीला अंगभूत अशा मर्यादाही आहेत.
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रातील एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. एका ज्येष्ठ कर्करोग सर्जनने स्तनाच्या कर्करोग झालेल्या एका स्त्री-रुग्णावर स्तन व काखेतील गाठी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करून तिला वाचवले होते. काही दिवसांनी त्या डॉक्टरांविरुद्ध त्याच स्त्री रुग्णाने बेपर्वाईने व बेजबाबदारपणे उपचार केल्याचा दावा लावून काही लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली.
 न्यायालयाने तिच्या बाजूने न्याय दिला व डॉक्टरांना काही लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. हकीकत अशी होती; की त्या महिलेला स्तनात गाठ आल्याचे लक्षात आल्यावर ती तपासण्यासाठी त्या कर्करोगतज्ज्ञाकडे गेली. त्यांनी तिला गाठीतल्या पेशींची सुईने करण्याची तपासणी पॅथॉलॉजिस्टकडून करून आणायला सांगितली. त्यात ती गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाले. त्या रिपोर्टनुसार डॉक्टरांनी आजार फैलावू नये म्हणून स्तन काढण्याची शस्त्रक्रिया केली; जे रास्तच होते. पण काढलेला पूर्ण अवयव जेव्हा शस्त्रक्रियेनंतर पॅथॉलॉजिस्टकडे पाठवला गेला; तेव्हा त्यातील गाठ कर्करोगाची नसून साधी असल्याचे निदान झाले. ही घटना रुग्णासच काय पण सर्जनलादेखील विलक्षण धक्कादायक होती. वैद्यकीय संहितेनुसार पहिल्या रिपोर्टला अनुसरून केलेली शस्त्रक्रिया योग्य होती; पण दुसऱ्या रिपोर्टनुसार त्या स्त्रीने ‘स्तन काढण्याची शस्त्रक्रिया उगीच केल्याची बेपर्वाई’ असा सर्जनविरुद्ध दावा लावला व ती केस जिंकली. आता प्रश्न उभा राहतो, की पहिला पॅथॉलॉजिस्टचा रिपोर्ट ग्राह्य़ मानला तर त्या डॉक्टरांनी केलेली शस्त्रक्रिया चुकीची कशी? शस्त्रक्रियेपूर्वीच्या तपासणीचा रिपोर्ट व शस्त्रक्रियेनंतरचा पॅथॉलॉजी रिपोर्ट यात एवढी तफावत कशी? या घटनेचा शेवट माहीत असल्यामुळे पश्चातबुद्धी असे म्हणते; की पहिला रिपोर्ट अजून एका पॅथॉलॉजिस्टकडून खातरजमा करायला हवा होता का? तोदेखील कोणी-सर्जनने, स्वत: पॅथॉलॉजिस्टने का रुग्णाने? अशा एकाच तपासणीचे दोन ठिकाणी पसे भरणे रुग्णांना रुचते का? पॅथॉलॉजी रिपोर्टनुसार शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनला एवढी शिक्षा होते; तर पॅथॉलॉजिस्ट काही अंशीदेखील जबाबदार कसा धरला जात नाही?असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. प्रत्येक शस्त्रक्रिया सर्जन सक्रियपणे करत असल्याने त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व कर्मचाऱ्याच्या चुकांची अंतिम नतिक जबाबदारी त्याच्यावरच येते. पण कोणत्याही शस्त्रक्रियेचा निर्णय हा कोणताही सर्जन रोगनिदानाची खात्री दर्शवणारे रिपोर्ट हातात आल्याशिवाय घेत नाही. फार क्वचित वेळा रुग्णाची अत्यवस्थ परिस्थिती, रिपोर्ट मिळण्याची अशक्यता, त्यामागे जाणारा वेळ हा रुग्णाच्या तब्येतीस हानिकारक असेल; तरच अशा आणीबाणीत त्याला शस्त्रक्रियेचा निर्णय निव्वळ त्याच्या वैद्यकीय चिकित्सेवरून घ्यावा लागतो. अन्य वेळी रक्ताच्या चाचण्या, सोनोग्राफी, एक्स-रे, सीटीस्कॅन यापकी आवश्यक संबंधित तपासण्यांद्वारे आपले वैद्यकीय रोगनिदान पक्के केल्याशिवाय शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जात नाही. अशा वेळी या चाचण्यांमध्येच काही चुका असतील, तर त्यानुसार घेतलेल्या शस्त्रक्रियेच्या निर्णयांना तो सर्वस्वी जबाबदार कसा?
 वास्तविक या सर्व तपासण्या हे आपल्या तब्येतीचे आरसे असतात. त्यांच्याद्वारे या साडेतीन हात मानवी देहात काय बरेवाईट घडते आहे, याचा अंदाज येतो. सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआय स्कॅन या गोष्टी गेल्या दशकात एवढय़ा आमूलाग्र सुधारलेल्या आहेत, की गर्भावस्थेतील बाळाचे जन्मजात आजार ओळखून गर्भावस्थेतच त्यावर उपाययोजनासुद्धा या यंत्रणांमार्फत करता येत आहे. विज्ञानाची ही प्रगती थक्क करणारी आहे; पण प्रत्येक तपासणीला अंगभूत अशा मर्यादाही आहेत. या सर्व प्रतिमांचा, निष्कर्षांचा सुसंगत अर्थ लावणारी नजर व बुद्धी ही मानवाचीच आहे. त्यामुळे तपासण्यांच्या अंगभूत मर्यादा, मानवी त्रुटी व त्या अनुषंगाने होणारा बिंब-प्रतिबिंबासारखा फरक या साऱ्या गोष्टींचा विचार रिपोर्ट बघताना करावा लागतो.
  सात-आठ वर्षांपूर्वी एका रुग्णाची शस्त्रक्रियापूर्व एचआयव्ही चाचणी आम्ही करून घेतली; जी सदोष आली. हे त्याला व त्याच्या पत्नीला सांगणे तर गरजेचे होते. हे सांगितल्याक्षणी त्याने अविश्वास दाखवला व आवाज चढवून धमक्यांपर्यंत भाषा गेली. त्याला ही screening test  असून यामध्ये काही प्रमाणात false positive असे रिपोर्ट येऊ शकतात; याची खात्री करण्यासाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये अजून एक चाचणी करावी लागेल, हे सांगितल्यावर त्याचा पारा जरा खाली आला. खरे तर ही चाचणी सदोष येण्यामध्ये ना डॉक्टरांची, ना चाचणी करण्याच्या साहित्याची काही चूक होती! आठवडय़ाने जेव्हा जे.जे.मधील चाचणीसुद्धा सदोष आली व त्यावर औषधे सुरू करण्यात आली; तेव्हा त्याचा आमच्यावरचा रोष कमी झाला. अशा वेळी डॉक्टर काय सांगतात; ते सबुरीने, शांतपणे ऐकले तर गोष्टी वितंडवादापर्यंत जात नाहीत.
अपेंडिक्सच्या सुजेमुळे पोटावर विशिष्ट जागी वेदना घेऊन रुग्ण आल्यावर मी तपासून निदान सांगते व शस्त्रक्रियेचा सल्ला देते; पण सोनोग्राफीशिवाय रुग्णांची खात्री पटत नाही. बहुतांशी वेळा अपेंडिक्सची सूज सोनोग्राफीवर दिसत नाही. अपेंडिक्स फुटून पू झाला असेल किंवा इतर आतडी तिथे चिकटून त्याचा गोळा बनला असेल तरच हे बदल सोनोग्राफीवर दिसतात; मग त्या अवस्थेला अजून न गेलेला आजार सोनोग्राफीवर कळला नाही; तर तो आजारच नाही असे रुग्णाला वाटते. अपेंडिक्ससारखे वाटणारे अन्य आजार जेव्हा असू शकतील अशी शंका येते तेव्हा आम्हाला खरी सोनोग्राफीची गरज असते. अन्यथा नुसते पोट तपासून, नाडीचे ठोके बघून, रक्ताचे रिपोर्ट पाहून अपेंडिक्सचे निदान उघड असते. हे सर्व समजावून सांगूनही रुग्णाचा सोनोग्राफीचा हट्ट असेल तर नाइलाज असतो.
 परवा स्कॅिनगच्या क्षेत्रात एक मजा झाली. एका रुग्णाला सोनोग्राफीने पित्ताशयात खडा असल्याचे सांगितले. त्याला शस्त्रक्रियेपूर्वी एकदा सीटीस्कॅन करून खात्री करण्याचा कोणीतरी सल्ला दिला; तर सीटीस्कॅनवर पित्ताशय निरोगी असल्याचे सांगितले; तेव्हा संभ्रमित अवस्थेत तो सर्जनकडे आला. त्या सर्जनने सीटीस्कॅनच्या डॉक्टरांशी संपर्क साधल्यावर असे समजले; की जर आरपार एक्स-रे जाऊ शकतील (radioluscent) असा खडा असेल; तर सीटीस्कॅनला तो दिसणार नाही. ही शक्यता रुग्णाला समजावून सांगितली. अजून एका ठिकाणी सोनोग्राफी करून बघितल्यावर पित्ताशयातील खडा पूर्वीप्रमाणेच स्पष्ट दिसला; तेव्हा रुग्ण शस्त्रक्रियेस तयार झाला.
 या घटनांचा मथितार्थ हाच; की कोणतीही तपासणी करून घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणे, तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना नुकतेच काढलेले मागील रिपोर्ट तुलनेसाठी दाखवणे, तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी नुसते रिपोर्ट हातात न देता रुग्णाशी नीट संवाद साधणे व अंतिम निर्णय पुन्हा उपाययोजना करणाऱ्या डॉक्टरांवर सोपवणे अशा विविध टप्प्यांवर विविध त्रुटी संभवतात. डॉक्टर-रुग्ण संवाद येथे पणाला लागतो. कधी खरी गरज, कधी कायद्यापुढे नाइलाज, कधी रुग्णाचा अविश्वास म्हणून असहाय्यता अशा अनेक कारणांनी डॉक्टर तपासण्या सांगतात. तर कधी हíनयासारख्या आजाराच्या निदानाला सोनोग्राफीची सुतराम गरज नसताना आरोग्यविमा कंपन्या सोनोग्राफी रिपोर्टशिवाय क्लेम मंजूरच करत नाहीत. या सगळ्याची परिणती आरोग्यसुविधांवरील खर्चात एकंदर वाढ व ओझे होण्यामध्ये होते. काही रुग्ण दरवर्षी ‘फुलबॉडी चेकअप’च्या आरशात डोकावून येतात व रिपोर्टचे एक बाड आणून समोर ठेवतात. कधी काही आजार लवकर समजल्याने उपाययोजना त्वरित सुरू होते; तर कधी स्वत:च्या तपासण्यांची चिकित्सक मानसिक छाननी करताना ठणठणीत माणसेही डोकेदुखीने बेजार होतात.
 आजकाल वैद्यकीय व्यवसाय हा ‘ग्राहक सुरक्षा कायद्या’खाली येत असल्यामुळे स्वत:च्या चिकित्सेवरील रोगनिदानावरून उपचार न करता; त्या निदानाला पुष्टय़र्थ ‘पांढऱ्यावर काळा’लेखी रिपोर्ट असल्याशिवाय डॉक्टर पुढे जात नाहीत आणि चिकित्सेला पर्याय म्हणून शंभर टक्के रिपोर्टवर भरवसाही ठेवून चालत नाही. ही तारेवरची कसरत असते. सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, रेडिऑलॉजिस्ट यांचं कधीकधी एक नि:शब्द नातं जुळतं; ज्यात सर्जनला शस्त्रक्रियेपूर्वी नक्की काय बघायचं आहे; हे त्या दोघांना तंतोतंत कळतं. त्यामुळे तेथील रिपोर्टबद्दल सर्जनच्या मनामध्ये एक विश्वासार्हता निर्माण होते ज्यासाठी तो रिपोर्ट तेथेच करण्याचा आग्रह करतो. अर्थात या आग्रहाचा अतिरेक नसावा. पॅथॉलॉजिस्ट, रेडिऑलॉजिस्ट यांचा रुग्णाशी थेट संवाद कमी होत असल्यामुळे कदाचित त्यांच्या रिपोर्टना रुग्ण आव्हान करत नाहीत व परिणामांमध्ये त्या डॉक्टरांना जबाबदार धरत नाहीत; पण कायद्याने तरी या रिपोर्टद्वारे उपाययोजना करणाऱ्या डॉक्टरांना पूर्णत: दोषी धरावे हे कितपत योग्य आहे? रिपोर्ट करणाऱ्या डॉक्टरांची काहीच जबाबदारी नाही का? काही चाचण्यांची अंगभूत मर्यादा कोण लक्षात घेणार? या मर्यादा डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानाने समजतात; पण त्या सामान्य माणसाला समजावून सांगणे खरोखर कठीण असते. पुन:पुन्हा तपासण्या करून घेण्याबद्दल, विशिष्ट ठिकाणच्या रिपोर्टची मागणी केल्याबद्दल रुग्ण संशयितपणे बघतोच; याउपर रुग्णाच्या हितासाठी केलेल्या शस्त्रक्रियेच्या बऱ्यावाईट परिणामांना सर्जनच सर्वस्वी जबाबदार धरला जातो. तेव्हा ‘ताकही फुंकून प्यावे’ हेच बरे!    
 vrdandawate@gmail.com

Story img Loader