कष्टकरी महिलेलाही अगदी कमीतकमी रकमेची बचत करता यावी म्हणून सुरू झालेली माणदेशी महिला बँक. चेतना गाला सिन्हा यांनी मुंबईहून थेट ग्रामीण भारताकडेच आपला मोर्चा वळवला आणि ही बँक स्थापन केली. महिलांना आत्मविश्वास मिळवून देत त्यांना ‘बिझनेस वूमन’ बनवणाऱ्या चेतनांचा हा यशस्वी प्रवास त्यांच्याच शब्दांत …
दूष्काळी भाग माणदेशामधील कोणती बँक रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या महिलेला सावली देईल का ? होय. म्हसवडमधील अशी एक बँक आहे, ‘माणदेशी महिला सहकारी बँक ’ या बँकेने हे पाऊल उचललेले आहे! या बॅंकेने या महिलेला केवळ सावलीच दिली नाही तर जगण्याचा आत्मविश्वास मिळवून दिला. ‘माणदेशी महिला बँके’ची स्थापना १९९७ मध्ये झाली. याची सुरुवात ज्या निमित्ताने झाली त्याची कहाणी रंजक आहे. १९९२ मध्ये माझ्याकडे एक महिला आली आणि म्हणाली, ‘‘मला बचत करायची आहे. थोडे पैसे साठवायचे आहेत, कारण पाऊस पडायच्या आधी मला घर दुरुस्त करायचे आहे.’’ बचत खातं उघडण्यासाठी मी त्या महिलेला गावातल्या एकूण एक बँकेत पाठविले पण कुठलीही बँक तिचे खाते उघडायला तयार नव्हती. मला प्रश्न पडला, ही महिला प्रत्येक बँकेला बचत खातं उघडण्यासाठी विनंत्या करते आहे. ती काही कर्ज मागत नाही तरीही तिला नकार मिळतो आहे. अर्थात त्याचं उत्तर बँकेला एवढी कमी बचतीची खाती चालू करायला परवडत नाहीत हे होतं. त्या दिवशी मी ठरविले महिलांसाठी महिलांची बँक उभी करायची. आणि त्या दृष्टीने मी कामाला लागले.
बँकेची स्थापना कशी करावी याच्या योग्य मार्गदर्शनासाठी मी ‘इलाबेन भट्ट सेवा’  संस्थेच्या संस्थापिकांची गाठ घेतली. त्या वेळी लक्षात आले की महिला बँँकेची स्थापना करायची असेल तर एकच मार्ग.. सहकारी बँक स्थापना करावी, मी धाव घेतली त्या वेळी सातारा येथे जिल्हा निबंधक दिनेश ओऊळकर यांच्याकडे. त्यांनी माझ्या स्वागतच केले. ते म्हणाले.  ‘‘तुम्ही बँक चालू करत असाल तर मी पूर्ण मदत करेन. म्हसवडसारख्या भागात महिला बँक सुरू करायची तर त्या वेळी ६ लाख रुपये भागभांडवल लागत असे. आम्ही परत कष्टकरी महिलांचे शेअर्स गोळा करायला लागलो. शेअर्स गोळा करताना सुरुवातीला अडचण आलीच. महिला म्हणायच्या, ‘‘आत्तापर्यंत खूप लोकांनी शेअर्स गोळा केले, पण काही संस्था स्थापन झाल्या नाहीत.’’ अर्थात आम्ही निराश झालो नाही. उलट जिद्दीने शेअर्स गोळा करून सहकार खात्याकडे प्रस्ताव दिला. तिथून रिझव्‍‌र्ह बँकेत प्रस्ताव जाणार होता. हा प्रस्ताव देताना गरज होती बँकेच्या प्रमोटिंग सदस्यांच्या विस्तृत माहितीची. सभासदाचे नाव, गाव, व्यवसाय, शिक्षण. जिथे शिक्षणाची माहिती द्यायची तिथे सर्व महिलांचे अंगठे होते. ते अंगठे बघून प्रश्न उपस्थित केले गेले की ‘‘ज्या महिलांना लिहिता वाचता येत नाही त्या महिला एका बँकेच्या प्रमोटिंग सदस्य कशा काय असू शकतात? प्रोमोटिंग मेंबरच अशिक्षित असतील तर लायसन्स कसे देता येईल? बँक कशी चालणार?’  अनेक आक्षेप घेत रिझव्‍‌र्ह बँकेने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि सर्व महिलांची तीन वर्षांची मेहनत पाण्यात गेली. पण निराशा होऊन हट्ट सोडतील, तर त्या माणदेशी महिला कसल्या?
 या तीन वर्षांच्या तयारीमुळे त्यांच्यात मोठा आत्मविश्वास आला होता. आपल्या निरक्षरतेमुळे हा प्रस्ताव फेटाळला गेला याचे त्यांना अतीव दु:ख झाले. ‘‘प्रस्ताव फेटाळण्यामागे एवढेच कारण असेल तर आम्ही लिहायला-वाचायला शिकू,’’ त्यांनी तयारी दाखविली आणि माझे पुढचे प्रयत्न सुरू झाले, त्यांना सुशिक्षित करण्याचे..
या महिलांचे शिकण्याचे वर्ग सुरू झाले. त्यांना लिहिता-वाचता येऊ लागले. आपली सही त्या स्वत: करू लागल्या. पुन्हा एकदा प्रस्ताव तयार झाला. या साऱ्या काळात माझ्या असे लक्षात आले की, या महिला अशिक्षित असल्या तरी त्यांना खूप काही कळते. त्यांच्या जाणिवा समृद्ध आहेत. त्यांच्यात जिद्द आहे. स्वत:ला सिद्ध करण्याची मानसिकता आहे. त्यांच्यातील ही ताकद नव्याने प्रस्ताव सादर होताना वापरता येणार होती.
बँकेसाठी नव्याने प्रस्ताव तयार झाला. या वेळी हा प्रस्ताव सादर करण्यासाठी सगळ्या १७ जणी मिळून रिझव्‍‌र्ह बँकेकडे गेलो. परत तोच प्रस्ताव आल्याचे पाहून वरिष्ठांनी त्यांना बाहेरच्या बाहेरूनच टाळण्याचा प्रयत्न केला. पण चिकाटीने त्यांनी आत प्रवेश मिळविला. आपली भूमिका त्यांनी अतिशय संयमीपणे अधिकाऱ्यांपुढे मांडली. ‘‘आमचा हा प्रस्ताव फेटाळला तरी चालेल पण आमची बाजू समजावून तरी घ्या. आम्ही मोठे होत होतो तेव्हा आमच्या गावात शाळा नव्हती ही आमची चूक आहे का?  पण आमच्याकडे व्यवहारज्ञान आहे. आम्हाला मुद्दल रकमेचे व्याज मोजायला सांगा. तुमच्या अधिकाऱ्यांना कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने तेच काम सांगा. त्यांच्या आधी आम्ही हे काम करून दाखवू. आमच्या गावात शाळा नसल्यामुळे आम्ही मागे पडलो, पण म्हणून आम्हाला व्यवहार जमत नाही,असे नाही ना.’’ आमच्या महिलांनी थेट आव्हानच दिलं आणि खरोखरच त्यांनी तिथल्या तिथे हिशेब करून दाखविले. या महिला जिद्दीने साक्षर झाल्याचे प्रत्यंतर संबंधित अधिकाऱ्यांना आले. परिणामस्वरूप ९ ऑगस्ट १९९७ मध्ये ‘माणदेशी महिला बँके’ला रिझव्‍‌र्ह बँकेकडून लायसन्स मिळाले. आज माणदेशी महिला बँकेचे एक लाख पासष्ट हजार खातेदार आहेत.
माझी पाश्र्वभूमी सांगायची तर मी चेतना गाला. मूळची मुंबईची. माझे वडील मगनलाल खिमजी गाला यांचे नळबाजार – भेंडीबाजार भागात एक दुकान आहे. कुमकुमबेन आणि मदनलाल यांच्या कुटुंबात २१ मार्च १९५८ रोजी जन्मलेली मी तिसरी मुलगी. मी मुलगी म्हणून जन्माला आले पण माझ्यावर कुठलीही परंपरागत बंधने नव्हती. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच झाले. बाहेरच्या जगाचे ‘एक्सपोजर’ मिळत गेले. मास्टर्स टय़ुटोरियल हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण करत साधारण १९७५ मध्ये मुंबईच्या लाला लजपतराय कॉलेजात कॉमर्स शाळेत दाखल झाली. त्याच काळात इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली. त्याविरोधात देशभर सुरू झालेल्या चळवळीचे नेतृत्व जयप्रकाश नारायण यांच्याकडे आले. त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन देशभरात लक्षावधी युवक रस्त्यावर उतरले. मीही त्यापैकी एक होते. आणीबाणीविरोधी आंदोलनातून संघटना बांधली गेली. ग्रामीण भागात काम करण्यासाठी या गटाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली. देश बदलायचा तर ग्रामीण भागात काम उभे राहिले पाहिजे, या जिद्दीतूनच माझे लक्ष ग्रामीण भागाकडे वेधले गेले. त्यातूनच या बँकेची स्थापना झाली.
बँकेची स्थापना तर झाली पण नंतर माझ्या लक्षात आले की या महिलांना बँकेत येण्यासाठी वेळच नाही. मग ठरवले की बँकेने त्यांच्याकडे गेले पाहिजे. या महिला आपल्या रोजच्या कमाईतून काही वाटा बाजूला काढू शकतात, पण रोजच्या रोज बँकेत भरणा करणे त्यांना शक्य होत नव्हते ही वस्तुस्थिती होती. मग, त्यांच्या घरी वा सोयीच्या ठिकाणी जाऊन पैसे गोळा करणे व बँकेत आणून त्यांच्या खात्यात जमा करणे हा मार्ग समोर आला. ‘डेली बँकिंग’, ‘डोअरस्टेप बॅंकिंग’ म्हणजेच घरपोच सेवाच्या संकल्पना त्यातून समोर येत गेल्या. ही नावे मोठी वाटली तरी त्यांच्या बचतींचे आकडे खूप छोटे छोटे होते. ही रक्कम जमविण्यासाठी मी महिला प्रतिनिधीची नियुक्ती केली. यातून किमान बचतीची सुरुवात झाली. छोटी छोटी पावलं टाकत का होईना सुरुवात तरी झाली होती.
 अर्थात नाव बँकेचे असले तरी त्यातून काही रचनात्मक काम उभे राहिले पाहिजे, याची जाणीव मला सुरुवातीपासूनच होती. कारण माझा मूळ िपड चळवळीचा.. महिलांना आत्मविश्वास देणे, त्यांना मालकी हक्काची जाणीव देणे, त्यांच्या गरजेच्या वेळी पाठीशी उभे राहणे या साऱ्या भूमिका मला व बँकेला पार पाडायच्या होत्या. पण माझ्यापेक्षा महिलांच्याच  अपेक्षा वाढत गेल्या. एक प्रस्ताव आला की, आपल्या वस्तीतील दारूचे दुकान बंद करायचे तर यासाठीही बँकेने मदत केली पाहिजे. त्यातील भावना लक्षात घेऊन मी आपल्या कर्मचाऱ्यांसह त्या लढय़ातही सहभाग घेतला! कर्मचाऱ्यांनी अशा सहभागाला विरोध दर्शविला तेव्हा मी समजावून सांगितले, ‘जोवर घरातील पुरुष दारू पिणार तोवर बाईचा पैसा बाजूला पडणार नाही. आणि हा पैसा बाजूला पडला नाही तर मग त्या बॅकेत कसा भरणार?’ मग हा युक्तिवाद कार्मचाऱ्यांनाही पटला. तेही या चळवळीत सहभागी झाले. या चळवळीत आणखी एक व्यक्ती माझ्याबरोबर सहभागी झाली ती म्हणजे माझे पती विजय सिन्हा. चळवळीच्या माध्यमातून आमची ओळख झाली. व आम्ही लग्न करण्याचे ठरविले. मी मुंबई सोडून म्हसवडला राहायला आले. हळूहळू बँकेच्या कामाला वेग येऊ लागला. पहिल्या वर्षी ६ लाखांचे शेअर आणि ६६ लाखांचे डिपॉझिट जमा झाले. नियमाप्रमाणे भागभांडवल तसेच डिपॉझिट वर ७५ टक्के कर्जवाटपही झाले. पहिले वर्ष सुरळीतपणे पार पडल्यानंतर सर्वाचाच आत्मविश्वास वाढला. बँकेच्या व्यवहारांना आता चळवळीचे रूप येऊ लागले होते. ग्रामीण भागातील महिलांना बचतीसाठी प्रोत्साहित करायचे तर त्यांच्यातील उद्योजकवृत्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे, हे माझ्या लक्षात आले. यातूनच वेगवेगळ्या संकल्पना जन्म घेऊ लागल्या. महिलांना कर्ज देताना तो पैसा अंतिमत: महिलांच्याच नियंत्रणात राहिला पाहिजे या दृष्टीने मी दूरगामी निर्णय घेतले. उदाहरणार्थ ‘कोंबडयां’साठी कर्ज दिले जाते, पण पोल्ट्रीफार्मसाठी नाही! गायी-म्हशी घेण्यासाठी कर्ज दिले जाते, पण डेअरी सुरू करण्यासाठी नाही! रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या महिलांसाठी विविध योजना आणल्या त्यापैकी एक ‘छत्रीसाठी बिनव्याजी कर्जा’ची योजना. उन्हापावसात राबणाऱ्या या महिलांना दिलासा मिळावा म्हणून ही योजना अमलात आणली. सारा स्टॉल झाकला जाईल अशा आकाराच्या छत्र्या महिलांनी बॅकेतर्फे खरेदी केल्या आणि बिनव्याजी कर्जाच्या योजनेत वितरित झाल्या. महिलांच्या गरजांतूनही काही योजनांचा जन्म झाला.
  २००३ मध्ये आस्मा तांबोळी नावाची एक मुलगी बँकेत काही काम मागण्यासाठी आली होती. सुट्टीच्या काळात काम करून मिळणाऱ्या पगारातून एक सायकल घेण्याची तिची इच्छा होती. कारण पुढील शिक्षणासाठी तिला दूर अंतरावर जावे लागणार होते आणि सायकल घेता येईल एवढे पैसे तिच्या पालकांकडे नव्हते. तिने सुट्टीत नोकरी केली आणि त्या आधारावर सायकल घेतली. यातूनच नव्या योजनेने जन्म घेतला. मुलींना सायकल खरेदीसाठी बँकेने बिनव्याजी कर्ज देण्यास सुरुवात केली. मुलींच्या शाळेची सोय तर झालीच पण मुलांप्रमाणे सायकलवरून फिरताना,घरची कामे करताना त्यांचा आत्मविश्वासही लक्षणीयरीत्या वाढला!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार होते त्यावेळची एक आठवण नक्की सांगण्यासारखी आहे. असे प्रसंगच तुम्हाला पुढे जायला ऊर्जा देत असतात. मला राष्ट्राध्यक्षाच्या कार्यालयातून इमेल आला की बराक ओबामांना तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही याल का़? सुरुवातीला तर मी या इमेलकडे कुणी तरी केलेली गंमत यादृष्टीनेच पाहिलं पण नंतर युएस एम्बसीतूनच थेट फोन आला आणि तुम्ही इमेलला उत्तर का पाठवलं नाही हे विचारलं गेले. मी त्यांना स्पष्टपणे जे वाटलं ते  सांगितले. आणि मला भेटण्यामागचे कारणही विचारले. त्यावर ते म्हणाले, ओबामांना काही भारतीय आंत्रप्रनर्सना भेटायचे आहे ज्यांनी काही तरी वेगळे काम केले आहे. तुम्ही त्या यादीत आहात. मी होकार देऊन त्यांना भेटायच्या आदल्या दिवशीच इच्छित स्थळी पोहोचले. दुसऱ्या दिवशी साडे तीन वाजता राऊंड टेबल कॉन्फरन्स होती.  उद्योग क्षेत्रात भारत आणि अमेरिका एकत्र येऊन काय करु शकतो याविषयीची ती भेट होती. बॅंकिंग क्षेत्रातील मी एकटीच होते. विशेष म्हणजे माझ्या कामाची त्यांना पूर्ण माहिती होती. तुम्ही महिलांची बॅंक चालवता ना, असे म्हणून त्यांनी त्याविषयी चर्चाही केली. बँकेचे फोटो दाखवत माहिती देताना मी त्यांना सांगितले की बॅंकेची सुरुवात महिलांच्या बचतीपासून झाली. मात्र महिला बँकेतच पासबुक ठेवायच्या कारण घरी कळले तर तीही बचत शिल्लक रहाणार नाही. जेव्हा हे माझ्या लक्षात आले तेव्हा मी इलेक्ट्रॉनीक बँक बूक तयार केले जे या महिलाही ऑपरेट करु शकायच्या. ओबामा यांनी यावर आश्चर्य तर व्यक्त केलेच शिवाय या महिलांचे कौतुकही केले. हा अनुभव खरोखरच उत्साहवर्धक होता.
 एक छोटं पाऊल उचललं गेलं पण या पावलाच्या बळावर लाखो महिलांना बळ मिळालं स्वप्न पाहण्याचं आणि ते पूर्ण करण्याचंही..संपर्क-  चेतना सिन्हा
अध्यक्षा, माणदेशी महिला बँक व माणदेशी फाउंडेशन, म्हसवड, तालुका माण,    जिल्हा पुणे, सातारा-४१५५०९  बॅंकेचा दूरध्वनी (०२३७३-२७०७८८)
Email: manndeshi.mahila@rediffmail.com

maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
Story img Loader