-अश्विनी देशपांडे , शमांगी देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना घडतात, तेव्हा सर्वप्रथम चर्चिला जातो तो मुद्दा म्हणजे या वयोगटातील मुलांना याबाबत जागरूक करण्याचा. शाळांमध्ये आणि कुटुंबांतही मुला-मुलींना योग्य वयात योग्य प्रकारचे लैंगिक शिक्षण मिळावे, समाजात त्यांना सामना करावा लागणाऱ्या धोक्यांची कल्पना दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असली, तरी त्याबद्दल आपल्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर संभ्रम आणि संकोच आहे. त्या दृष्टीने जनजागृतीसाठी होणाऱ्या प्रयत्नांविषयीचा आमचा अनुभव सांगणे गरजेचे वाटते.

बाललैंगिक शोषण म्हणजे काय?

भारतीय कायद्याच्या व्याख्येनुसार एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय त्या व्यक्तीला लैंगिक हेतू मनात धरून शारीरिक/ मानसिक इजा पोहोचवणे, कोणत्याही प्रकारे स्पर्श/ संपर्क करणे, बळजबरीने प्रतिसादाला उद्युक्त करणे म्हणजे लैंगिक शोषण. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या व्याख्येनुसार बाललैंगिक शोषण म्हणजे ‘ज्या लैंगिक क्रिया मुलाला अवगत नाहीत, ज्या गोष्टींसाठी मुलाची/मुलीची पुरेशी शारीरिक वाढ झालेली नाही वा मानसिक तयारी नाही, पुरेशी समज नसल्याने ज्यासाठी संमती देण्यास मुले सक्षम नाहीत, ज्याला समाज- मान्यता नाही, ज्यामुळे कायद्याचे उल्लंघन होते, अशा लैंगिक क्रियांमध्ये मुलांचा सहभाग’. अल्पवयीन वा अज्ञान व्यक्तीच्या बाबतीत तिची संमती असो अथवा नसो, वर उल्लेखलेले वर्तन हे लैंगिक शोषणच आहे. आपल्याकडे कायद्यानुसार अठरा वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती ‘बालक’ वा ‘अज्ञान’ असते.

हेही वाचा…मुलांना हवेत आई आणि बाबा!

शोषण कोणाचे? कोणाकडून?

बाललैंगिक शोषणाच्या घटनांच्या एका आकडेवारीनुसार दर पाच मुलींमध्ये एका मुलीला आणि दर वीस मुलग्यांमागे एका मुलाला लैंगिक शोषणाच्या अनुभवातून जावे लागते. गेल्या काही वर्षांतल्या ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाला’नुसार (एनसीआरबी) ८० ते ९० टक्के प्रकरणांत गुन्हेगार हा अत्याचारग्रस्त बालकाला ज्ञात असतो. अर्थात अशीही काही उदाहरणे असतात, जिथे गुन्हेगार अगदीच अनोळखी असतो. गुन्हा करणारी व्यक्ती तरुण किंवा प्रौढ कुठल्याही वयाची असू शकते. कुठल्याही लिंगाची असू शकते. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी कोणतीही असलेली असू शकते. थोडक्यात, असे वर्तन कोणीही करू शकते.

बालकांवरील हा लैंगिक अत्याचार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रकारे केला जातो. प्रत्यक्ष लैंगिक अत्याचाराचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे स्पर्श न करता लैंगिक शोषण. उदा. लैंगिक/ अश्लील शब्दांचा वापर किंवा शारीरिक अवयवांचा उल्लेख करणे, अश्लील शिव्या देऊन बोलणे, लैंगिक अवयवांकडे रोखून पाहणे, शारीरिक अवयवांकडे निर्देश करणारे हावभाव करणे. तर दुसरा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष स्पर्श करून होणारे लैंगिक शोषण. यात खासगी अवयवांना स्पर्श करण्यापासून प्रत्यक्ष लैंगिक संबंधांपर्यंत शोषणाचे विविध प्रकार घडताना दिसतात. अप्रत्यक्ष प्रकारामध्ये मुलांना अश्लील/ बीभत्स चित्रे/ फिल्म दाखवणे, ते प्रसारित करायला लावणे, मुलांशी अश्लील संभाषण करणे, वगैरे गोष्टी येतात. इंटरनेटवरील विविध सोशल नेटवर्किंग साइटस्, ऑनलाइन गेम्स, या माध्यमातून लैंगिक अत्याचार घडू शकतोच. बालकाला किंवा त्रयस्थ व्यक्तीला पैसे किंवा अन्य मोबदला देऊन केलेला लैंगिक अत्याचार म्हणजे बालकांचे व्यावसायिक लैंगिक शोषण.

हेही वाचा…खाऊ या ‘त्यांच्या’साठीही!

लहान मुलांवर परिणाम काय?

आम्ही करत असलेल्या या उपक्रमात असे लक्षात आले, की मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध पॉक्सो कायद्याची तरतूद असली तरी बालके आपल्यावर झालेल्या अत्याचाराची वाच्यता सहजासहजी कुठे करत नाहीत. आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, यात आपलीच काही चूक असेल, असा अपराधीभाव त्यांच्या मनात असतो. पुन्हा पुन्हा अत्याचाराची आठवण नकोशी वाटते. अत्याचार करणारी व्यक्ती ओळखीची असली, तर ती आपल्याशी नाते तोडेल, आपल्यामुळे अडचणीत येईल, अशी भीती वाटते. शिवाय बऱ्याचदा आपल्यावर अत्याचार होतोय याची जाणीवच त्या बालकाला नसते. अत्याचाराची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने पीडित मूल गप्प बसते. या सर्व प्रकारात बालकांवर मानसिक, शारीरिक, वर्तनविषयक असे गंभीर स्वरूपाचे आणि पुढेही बराच काळ टिकणारे परिणाम होतात.

‘ओळख स्पर्शाची- ३६० अंशांत!’

मुलांचे भावविश्व सर्वार्थानं सुरक्षित राहण्यासाठी, लैंगिक दुर्वर्तनाविरुद्ध काही जाणीव-जागृती आणि ठोस प्रयत्न घडायला पाहिजेत या विचारानं आम्ही एक प्रयोग केला. ‘ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था’ आणि ‘स्त्री-शक्ती प्रबोधन संवादिनी गट’ यांच्यातर्फे २०२२ ते २०२४ या कालावधीत आम्ही पुण्यात ‘ओळख स्पर्शाची- ३६० डिग्री’ हा प्रकल्प राबवायला सुरुवात केली.

यात लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून मुलांच्या भोवतालच्या म्हणजे पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्व घटकांसाठी या विषयाची सत्रे घेतली जात आहेत. विषयाची गरज, व्याप्ती आणि मुलांचे वयोगट लक्षात घेऊन त्यांची निरागसता जपत हा विषय विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवला जात आहे. चांगला-वाईट स्पर्श कोणता? स्वत:ची काळजी कशी घ्यायची? संरक्षण कसे करायचे? याबाबत मुलांना सजग केले जात आहे. सत्र संपताना, ‘मुलांनो काय लक्षात ठेवाल?’ असे विचारल्यावर, ‘अनोळखी व्यक्तींबरोबर कुठेही जाणार नाही’, ‘कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केलाच तर, ‘मला हे आवडत नाही,’ असं जोरात सांगून त्रास देणाऱ्या व्यक्तीचं नाव घरच्यांना सांगू,’ असा प्रतिसाद मुलांकडून मिळत आहे. पालक सत्रानंतरही खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘या गोष्टी मुलांशी बोलाव्यात हे जाणवत होते, पण कशा, हेच कळत नव्हते,’ असे पालक म्हणत आहेत. या सत्रांमुळे मुलांशी बोलणे सोपे झाल्याचे सांगत आहेत.

हेही वाचा…सांदीत सापडलेले.. ! : शिस्त

‘प्रबोधिनी’च्या प्रशिक्षित प्रशिक्षकांकडून अतिशय संवेदनशीलपणे हा विषय विविध खेळ, गाणी, गोष्टी यांच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवला जात आहे. शाळेतील शिक्षकांनाही हा विषय कसा बोलावा, हा प्रश्न बुचकळय़ात टाकणारा असतो. तो प्रश्न सुटत असल्याचे या प्रकल्पातून दिसत आहे. आतापर्यंत पुण्यात ४० हजार आणि अहमदाबादमध्ये जवळपास ४ हजार मुलांपर्यंत हा विषय पोचवण्यात आला आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांपर्यंतसुद्धा हा विषय कसा पोचवता येईल या दृष्टीने पुण्यातील कर्णबधीर, दिव्यांग आणि सौम्य बौद्धिक अक्षम असलेल्या मुलांबरोबर काम करणाऱ्या काही संस्थांच्या मदतीने आशय निर्मितीचे काम चालू आहे. काही पथदर्शी (pilot)) सत्रेही घेण्यात आली आहेत.

या प्रकल्पाची परिणामकारकता बघण्यासाठी सत्र घेतल्यानंतर काही महिन्यांनी ४ हजार मुलांच्या मनोमापन चाचण्या घेऊन त्यांचे याबाबत मूल्यांकन करण्यात आले. खेळ, गाणी, गोष्टी यांच्या माध्यमातून हा विषय पोहोचल्याने त्यांच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतो असे त्यात लक्षात आले. या विश्लेषणाचे सादरीकरण फेब्रुवारीत विशाखापट्टणममध्ये ‘नॅशनल अकॅडमी ऑफ सायकॉलॉजी’च्या परिषदेत करण्यात आले.

याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या ‘प्रज्ञा मानस संशोधिके’ने ‘बाल संवाद कट्टा’ ही विनामूल्य हेल्पलाइनही सुरू केली आहे. मुलांचे संवेदनशील भावविश्व सुरक्षित आणि स्वस्थ राहण्यासाठी त्यांना पडलेले प्रश्न किंवा समस्या मोकळेपणाने मांडता याव्यात यासाठी मुले किंवा पालक ०९२२६०७४७६७ या संपर्क क्रमांकावर फोन करू शकतात. या क्रमांकावर प्रशिक्षित समुपदेशक सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध आहेत. ज्या मुलांना आणि पालकांना प्रत्यक्ष समुपदेशनासाठी येणे शक्य नाही किंवा आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही, एखादा विषय प्रत्यक्षपणे बोलायला संकोच वाटतो किंवा मुलांना मोकळे होण्यासाठी जवळपास कुणी व्यक्तीच उपलब्ध नाही, अशा मुलामुलींनी याचा जरूर लाभ घ्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते. शाळाशाळांमध्ये या प्रकल्पातील सत्रे व्हावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा…माझी मैत्रीण : मैत्रीतलं चुंबकत्व!

मुलांच्या आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षित भवितव्यासाठी या प्रकारचे प्रयत्न ठिकठिकाणी आणि मोठ्या स्वरूपात होण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्तींनी एकत्र येऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि तळमळीने सुरू केलेले असे प्रयोग जनजागृतीच्या दृष्टीने मोठ्या बदलाची नांदी ठरू शकतील, असा विश्वास तरी निश्चितच वाटू लागला आहे. ठिकठिकाणी चाललेल्या अशा प्रयत्नांची साखळी तयार व्हावी, एकमेकांचे अनुभव जाणून घेऊन सर्वांनी एकत्र पुढे जावे, हीच सध्याच्या काळाची गरज आहे.

gtbt360@jnanaprabodhini.org

(बालकांसाठीचे मार्गदर्शनपर सत्र)